STORYMIRROR

ABHAY BAPAT

Action Crime Thriller

3  

ABHAY BAPAT

Action Crime Thriller

ॲ लि बी - भाग ८

ॲ लि बी - भाग ८

9 mins
224

आदिती हुबळीकर ला भेटून काहीच निष्पन्न न झाल्याने पाणिनी वैतागूनच ऑफिस मधे परत आला तेव्हा काय झालं ते जाणून घेण्यासाठी सौम्या ने त्याच्यावर प्रश्नांची सरबत्ती केली.त्याने तिला सर्व इत्यंभूत सांगून टाकलं.


“ ओजस सांगत होता की त्याची माणसे टेंबे बाईच्या मागावर होती, त्यातून ते तुम्हाला अपेक्षित असलेल्या, माणसा पर्यंत म्हणजे अनाथाश्रमाच्या सेक्रेटरी पर्यंत पोचले. आदिती हुबळीकर ने ब्युटी पार्लर मधे जाण्यापूर्वी , आपल्या जाहिरातीला जे उत्तर पेपरवाल्यांना देण्यासाठी दिले होते त्याची प्रत ओजस ने मिळवली आहे.” सौम्या ने माहिती पुरवली.


“ काय लिहिलंय उत्तरात? ” - पाणिनी


“ परिस्थितीत बदल नाही. सध्या मुलाखत करणे किंवा भेटणे शहाणपणाचे नाही.तुम्ही चांगले काम करताय.-प.” अस उत्तर लिहिलंय.” सौम्या ने वाचून दाखवलं


“सौम्या मी सांगतो अस च्या अस उत्तर तयार कर. आणि जाहिरातीत जागेच छापून येईल असे बघ. ‘ पण लेखी काही हातात असल्याशिवाय कामा बद्दल ठरवायला मला आवडत नाही.सविस्तर नियोजन आणि तपशील पाठवायची व्यवस्था करा नाहीतर जमून आलेल्या गोष्टीला खिंडारे पडतील याची जाणीव ठेवा.-म “


सौम्या ने ते लिहून घेतलं पण पाणिनी च्या डोळ्यातील काळजीचे भाव पाहून ती म्हणाली,” सर, त्यापेक्षा जरा थांबून काय घडतंय पुढे याचा अंदाज घेऊन हालचाल केली तर कसं?”


“ मी तशा धाटणीचा माणूस नाही.आता इथून पुढे मी अशा गोष्टी करणार आहे की त्यांच्या डोक्यावरचे केसच उभे राहतील ! बघशीलच तू.”


“ जे काही कराल ते काळजीपूर्वक करा.”


“ काळजी घेऊन कोणाला काय मिळवता आलंय?, आपला प्रतिस्पर्धी पुढे काय हालचाल करेल याचा आपण जेव्हा अंदाज बांधतो ना , तेव्हा स्वत:ला त्याच्या भूमिकेत ठेऊन बांधतो. त्यामुळे होत काय की आपण त्याच्याशी नाही तर स्वतः विरुद्धच लढतो. आपण आक्रमण करायला जातो पण आपली हालचाल बचावाची ठरते. चांगला योद्धा दुसरा काय डाव खेळेल याचा विचार करत नाही ,काळजी करत नाही तर स्वतः इतक्या वेगाने हालचाली करतो की समोरच्याला विचार ही करायला वेळ होत नाही.”


“ मला वाटायला लागलंय की लौकरच काहीतरी वेगवान हालचाली घडणार.” सौम्या म्हणाली.


ओजस आत आला. हाय सौम्या, फार सुंदर दिसत्येस तू आज.! “


“ हे कधीतरी तू पाणिनी ला सांग.! “ सौम्या हळूच त्याच्या कानात म्हणाली.


खरं म्हणजे सौम्या सोहोनी, पाणिनी पटवर्धन , कनक ओजस आणि श्रेयस तारकर हे सर्व शाळेतले वर्ग मित्र. हे सगळे सौम्यावर चक्क लाईन मारायचे. शालेय शिक्षणानंतर सर्वांनीच वेगवेगळया क्षेत्रांत पदवी घेतली ,पाणिनी आणि सौम्याने कायद्याची पदवी घेतली त्यामुळे त्यांची मैत्री शेवट पर्यंत टिकली. पाणिनीने प्रथम पासून नोकरी न करता वकीली करायचे ठरवले होते.त्याचे वडीलही प्रथित यश वकील होते पण सौम्या ला घरगुती अडचणी मुळे वकीली करणे शक्य झाले नाही.पण पाणिनीने तिला आपल्या व्यवसायात सामाऊन घेतले.जात्याच हुशार असल्याने ती पाणिनीच्या मनातले ओळखून त्याने न सांगताच अनेक कामे करून टाकायची.एक अत्यंत हुशार सेक्रेटरी म्हणून ती पाणिनीच्या मनात भरली. तिच्या मनात पाणिनीने तिला प्रेयसी आणि पत्नी म्हणून स्वीकारावे असे असायचे पण त्याने कधी तिला ते शब्दात व्यक्त करून दाखवले नाही. त्याच्या वागणुकीतून मात्र ते तिला जाणवायचे.


कनक ओजस ने आणि श्रेयस तारकर ने पोलिसांच्या परीक्षा दिल्या.तारकर हुशार असा इन्स्पेक्टर झाला.कनक मात्र त्या क्षेत्रात रमला नाही,त्याने स्वत:चा गुप्तहेर म्हणून व्यवसाय चालू केला. अल्पावधीत तो शहरातला अत्यंत हुशार आणि विश्वासार्ह असा गुप्तहेर झाला. पाणिनी आणि त्याने एकाच इमारतीत एकाच मजल्यावर ऑफिस घेतले.पाणिनी त्याची अनेक कामे कनक ओजस ला देत असे. श्रेयस तारकर हा अत्यंत तत्वनिष्ठ आणि करडा अधिकारी होता.पाणिनी आणि तो घनिष्ट मित्र असूनही अनेकदा एकमेका विरुध्द उभे रहात पण दोघानीही तत्वाशी तडजोड केली नाही आणि मैत्रीचा उपयोग परस्परांची व्यावसायिक गुपिते उघड करायला केलं नाही.


“ पाणिनी, तू तिची पर्स खेचून आणि आतली कागद पत्र बघण्याची जी युक्ती केलीस ना ! मानले तुला. सौम्या, पर्स खेचून, तिला परत देताना त्या पोलिसासमोर याने जे साळसूद भाव आणले होते ना चेहेऱ्यावर, त्यावरून हा वकिल चुकून झाला, अभिनेताच व्हायला हवा होता, किंवा चोर तरी.” ओजस म्हणाला.


“ आधी ते दार लाऊन आत ये. इतर भाडेकरुना माझे हे अंग कळायला नको.”


ओजस आत आल्यावर पाणिनी म्हणाला.” एक काम द्यायचं आहे तुला. “


“ काय आहे?” 


उत्तर द्यायच्या ऐवजी पाणिनी ने गती ला इंटरकॉम वरून सांगितले,” मला डॉक्टर वाळिंबेना लाऊन दे फोन. त्यांची नर्स तुला सांगेल की ते फोन नाही घेऊ शकणार, पेशंट ना तपासत आहेत वगैरे, तर तिला सांग की पाणिनी पटवर्धन ना तातडीने बोलायचय.”


“ तुला, त्या अनाथाश्रमा च्या हिशोब तपासनीसाचा पत्ता मिळालाय ना?” पाणिनीने ओजस ला विचारले.” तो कोण आहे? राहतो कुठे? आणि कसा दिसतो?”


ओजस ने त्याचा पत्ता सांगितला आणि कसे व्यक्तिमत्व आहे त्याचे वर्णन केले.त्याचे नाव मोकाशी असे असल्याचे सांगितले. तेवढ्यात डॉक्टर वाळिंबे यांचा फोन लावल्याचे गती ने इंटर कॉम वरून सांगितले आणि जोडून दिला.


“ बोल पाणिनी , काय म्हणतोयस?” डॉक्टर म्हणाले.


“ मला एक रक्त दान करणारा हवाय”


“ मिळेल ना, कशा प्रकारचा ?”


“अशा प्रकारचा ,की जो आपले तोंड बंद ठेवेल.”


“ ते ठीक आहे पण रक्त कोणत्या प्रकारचं हवंय ? “


“ फक्त रक्त हवंय एवढंच.” पाणिनी पुटपुटला.


“ अरे रक्त दाता आणि रुग्ण यांचे रक्त गट जुळायला लागतात.”


“ माझ्या कडे कोणी रुग्ण नाहीये. मला फक्त रक्त हवंय.”


डॉक्टर चपापले.” अरे पण कोणाला द्यायचे नसेल तर हसला हवंय ते तुला?”


“ बाटलीत ठेवायला, आणि नंतर विसरून जायला ”


“ ते कसे हाताळायचे आहे तुला?’


“ ते तुमच्यावर सोपवतो मी सर्व.मी तुमच्या दवाखान्यातील लोकांशी संपर्कात राहीन आणि मला कधी हवंय आणि कुठे हवंय ते सांगीन. तुम्ही रक्त देणाऱ्याला तयार ठेवा फक्त.”


“लॅब साठी हवं आहे असे मी दाखवू शकतो. पण माझं नाव यात कुठे येणार नाही याची दक्षता घेशील ना पाणिनी?


“ हो.” पाणिनी ने फोन ठेवला आणि ओजस ला म्हणाला, “ चल आपल्याला जायचय. मन्वंतर अपार्टमेंट ला,मोकाशी ला भेटायला..”


ओजस च्या गाडीने दोघे तिथे पोचले तेव्हा ओजस ने विचारले,” चटका देणार आहेस का मोकाशी ला?”


“ इथून पुढे प्रत्येकालाच मी चटका देणारे, त्यांच्या अंगातून धूर निघे पर्यंत.”


ते दोघे काही न बोलता दुसऱ्या मजल्यावर आले. पॅसेज मधे आल्यावर ओजस ने पाणिनी ला लांबूनच खोली दाखवली.दार ठोठावले गेले, आतून आवाज आला,” कोण आहे?’


“ माझे आडनाव पटवर्धन आहे.”


“ काय आहे?” आतल्या आवाजाने विचारले.


“ बातमी.” – पाणिनी


दार उघडले गेले. डोळ्यावरच्या चष्म्याच्या फ्रेम च्या वरून त्या माणसाने दोघांकडे बघितले. ‘ “काय बातमी आहे?”


“ वाईट आहे.” - पाणिनी.


बोलता बोलता दोघ आत आले. खिडकी जवळच्या खुर्चीत ओजस बसला.त्या माणसाने पाणिनी ला पाहून म्हंटले,” मला नाही वाटत मी ओळखतो तुम्हाला.”


“ लौकरच ओळखाल तुम्ही , बसा. “ पाणिनी म्हणाला


तो माणूस कॉट वर बसला. खोलीतल्या उर्वरित दुसऱ्या खुर्चीवर पाणिनी बसला. तो बसताच खुर्ची कुरकुरली. “ तुमचं नाव मोकाशी आहे?” - पाणिनी


“ हो.”


“ तुम्ही त्या अनाथाश्रमात हिशोबनीस म्हणून होतात? “


“हो,होतो.”


“ इथे काय करताय तुम्ही?’’ – पाणिनी


“ काम पाहतोय “


“ पुन्हा उत्तर द्या. आणि बदल म्हणून जरा खरं बोला.” - पाणिनी


“ तुम्ही माझ्यावर संशय व्यक्त करताय.”


“ आरोपही करीन.” -पाणिनी म्हणाला. “ टोपेच्या खुनाचा.”


तो माणूस घाबरून दचकून उभा राहिला. त्या शांत वातावरणात कॉट च्या स्प्रिंग चा आवाज केवढा तरी आला. “ कोण आहात तुम्ही? पोलीस?”


ओजस कडे बोट दाखवून पाणिनी म्हणाला.” हा गुप्तहेर आहे.... खाजगी.टोपेच्या खुनाचा तपास हा करतोय.”


“ माझ्या कडे तुम्ही लोक यायचे कारणच काय?”


“तुम्ही टोपे ला तो जीवंत असताना ला शेवटचे कधी पाहिलं? - पाणिनी


“ कोण टोपे? “


“ पेपरला त्याच्या बद्दल वाचलं असेल तुम्ही.”


“ अच्छा, अच्छा तुम्हाला म्हणायचय की जो मेलेला आढळल्याची बातमी आली आहे तो ! मी बातमी वाचल्या सारखे वाटतय ,पण नाव वरून लक्षात नाही आलं.


“त्याचा तुमच्याशी संबंध आहे.” - पाणिनी


“ हे पहा तुम्ही अशा प्रकारे इथे येऊन माझ्यावर काहीतरी प्रकरण लादायचा प्रयत्न करू शकत नाही.”


“प्रश्न टाळायचा प्रयत्न नका करू. तुम्ही टोपे ला तो जीवंत असताना ला शेवटचे कधी पाहिलं?”


“ मी कधीच त्याला पाहिलेले नाही, मी त्याला कधी प्लाखत पण नव्हतो.”


“तुम्ही मेसेस टेंबे ला शेवटचे कधी पाहिलं ? “ पाणिनी ने अचानक प्रश्न विचारला.


“ हे बघा, .... म्हणजे... मी कोणाचा खून केलेला नाहीये....मला म्हणायचय की टेंबे बरोबर माझे काही कामाच्या निमित्ताने संबंध आले होते.”


“आणि टोपे? नीट विचार करून सांग, हीच वेळ आहे खरं सांगायची.”


त्याने पाणिनी ची नजर टाळत घाबरून उत्तर दिले,” त्याने मला शोधून काढले, मागच्या आठ दहा दिवसापूर्वी.”


“ टेंबे ला तुम्ही शोधले का?” - पाणिनी


“ म्हणजे,...तुम्हीच पाणिनी पटवर्धन का? टेंबे ने सांगितले मला की तुम्ही गेयता ची वकीली घेतली आहे आणि तिचे पैसे तिला मिळवून देणार आहात.”


“ तुम्ही गेयता ला कसे ओळखता?” -पाणिनी


“ त्या अनाथ आश्रमात तिला ठेवलं होत.”


“ तिथे मुळात ती आली कशी?’


“ ती रशियन होती.टेंबे बाई ने तिला आणली तिथे, बोट फुटून त्यात तिचे आई वडील गेले तेव्हा तिने रशियातून तिला आणले. तिच वय तेव्हा जास्त होत, पण आश्रमा ला वाटलं की तिला कोणी दत्तक घेतलं तर जास्त पैसे मिळतील “


“ टेंबे ला एक मुलगी आहे ना?’


“ मला या एवढया वर्षात लक्षात नाही. त्या संस्थेने तिची सगळी माहिती घेतली असेल.”


“ ते ठीक आहे, टोपे बद्दल सांगा पुन्हा.” पाणिनी म्हणाला.


‘’ त्याने माझ्या कडून माहिती घेण्यासाठी दमदाटी केली. त्याला काहीतरी असा दुवा हवा होता की गेयता ला ट्रस्ट चे पैसे मिळणार नाहीत .”


“ त्या आश्रमाने फुटलेल्या बोटीची हकीगत खरी आहे का याची चौकशी केली होती का?”


“ हो तर , त्यांची पद्धतच आहे, सगळी सखोल चौकशी करतातच ते, आणि खात्री झाल्यावरच पुढे जातात.” – मोकाशी


“ कुसुमाकर गिरम माहिती आहे?” अचानक पाणिनी ने विचारले.


“ नाही , कोण आहे तो?”


“ कधीच नाव नाही ऐकलत? ”


“ कधीच नाही, नावे चांगली लक्षात राहतात माझ्या.”


“ असं ?तुम्हाला तर फार उद्युक्त करायला लागलं मला, टोपेचे नाव काढून घेण्यासाठी “


“ ते मात्र खोटे बोललो तुमच्याशी, मुद्दामच. कबूल करतो मी.मला लाच देऊन माहिती काढायच्या प्रयत्नात तो होता.”


“ यावर टेंबे चे म्हणणे काय होते?”


“ नाही नाही, अहो मी तिला यातले काहीच सांगितले नाहीये.”


पाणिनी पटवर्धन मोकाशी जवळ आला , त्याच्या नजरेला नजर देऊन म्हणाला, “ मला माहित्ये तुम्ही खोटे बोलताय. तो बोट फुटण्याचा आणि रशियातून तिला सोडवण्याचा प्रसंग धादांत खोटा आहे , गेयता त्या कुसुमाकर गिरम च्या प्रेमात पडली आहे. ती खरं तर टेंबे च्या मुलीची अनौरस मुलगी आहे, म्हणून तिला अनाथाश्रमात ठेवायला लागलं.पण गिरम हे सामाजिक दृष्टया मोठा सन्मान लाभलेले कुटुंब असल्याने अनौरस मुलीला ते कधीच स्वीकारणार नाहीत म्हणून हे सर्व रशियन असल्याचे नाटकं.! तुम्हाला या बद्दल किती लाच मिळाली टेंबे कडून ते सांगा फक्त.”


“ पंधरा हजार “


“ त्यातले प्रत्यक्ष किती मिळाले?”


“ एक हजार, आणि बाकीचे गिरम आणि गेयता च लग्न झाल्यावर “

“ मोकाशी, तुम्ही टोपेला शोधून त्याला काही माहिती विकायचा प्रयत्न केलात, त्याने नाही तुम्हाला लाच दिली. खर की नाही?”


तो काही बोलला नाही.अचानक पाणिनी पटवर्धन ने त्याला कॉटवरून उठवले, खिशातून छोटा चाकू काढला, आणि पलंगपोस ओढून काढून गादी मध्यभागी फाडली.त्यात दहा हजार रुपयांच्या च्या नोटा होत्या.” हे तुम्हाला कोणी दिलेत?”


“ टेंबे ने “


“ नाही, टोपेने दिलेत.”


मोकाशी काही बोलला नाही. “ ठीक आहे, मोकाशी. हे पैसे मी घेऊन जातो आणि पोलिसांच्या ताब्यात देऊन त्यांना सर्व सांगतो.”


“ नाही , तसे नका करू. मी तुम्हाला सत्य सांगितले तर मला माझे पैसे द्याल परत?”


“ बोला तुम्ही.”


“ मी टेंबे आणि टोपे दोघांनाही खेळवले. मी टोपेला गेयता बाब्रस बद्दल सांगितले. तो हसला, आणि मला हाकलून दिले. नंतर अचानक टेंबे उपटली.आणि तिने मला तो पंधरा हजाराचा प्रस्ताव दिला.नंतर काही दिवसांनी पुन्हा टोपे अवतीर्ण झाला.आणि म्हणाला मला वचन दे की जेव्हा गरज पडेल तेव्हा गेयता ही अनौरस असल्याची साक्ष मी देईन.नाही केलं मी तस ,तर मी केलेले आश्रमातले सर्व व्यवहार चव्हाटयावर आणीन असा दम दिला. मला त्याने दहा हजार देऊ केले.”


“ तू टोपेला का मारलस?” पाणिनी ने विचारले.” तुला तो जड जात होता? “


“ नाही, मी नाही मारले त्याला. कोणालाच मी मारू शकत नाही.”


पाणिनी ने गादीखाली सापडलेल्या नोटा त्याला परत केल्या आणि दोघे जण बाहेर पडले.


“ त्याच्यावर नजर ठेव कनक, कोणाला तरी नेम.”


“ तो नक्कीच पळायचा प्रयत्न करेल.” ओजस म्हणाला.


“ त्याला करु देत तसा प्रयत्न.तो कुठे जातो तेच बघायचंय”


ओजस ने तो पर्यंत त्याच्या ऑफिस ला फोन करून मोकाशी वर नजर ठेवण्यासाठी एका हेराची नेमणूक करायची व्यवस्था केली. दोघे गाडीत बसले तेव्हा पाणिनी म्हणाला,” पळशीकर खूप धोरणी आणि गूढ व्यक्तिमत्व आहे अस तुझं म्हणणे आहे ना?”


“ खूपच “


“ मला सांग त्याच्या अपार्टमेंट ला गॅरेज आहे?”


“ आहे ना, तिथल्या रखवालदाराकडे सर्वांच्या चाव्या असतात.”


“ पळशीकर त्याच्या गाडीतून गेला का?”


“ नाही गाडी तिथेच आहे त्याची.”


“पोलिसांची त्याच्या घरावर अजून नजर आहे की तपासणी करून गेले असतील ते?”


“ अजून असेल नजर कदाचित.”


“ तस असेल तर आपल्याला अडचण येऊ शकते” पाणिनी उद्गारला.


पाणिनी चा रोख कशाकडे आहे याची अचानक जाणीव ओजस ला झाली.” तुझ्या मनात जे काय चाललंय ते मला आवडलेले नाही पाणिनी. आपण तिकडे जायचं नाहीये.”


“ आवडणार तर मला पण नाही. पण........” सूचक पणे पाणिनी म्हणाला आणि गप्प झाला.


( प्रकरण ८ समाप्त)


Rate this content
Log in

Similar marathi story from Action