ABHAY BAPAT

Crime Thriller

3  

ABHAY BAPAT

Crime Thriller

होल्ड अप प्रकरण चार

होल्ड अप प्रकरण चार

4 mins
195


प्रकरण ४

गर्दीतून वाट काढत कनक ओजस पाणिनी च्या दिशेने आला.

“ काय झालं?” पाणिनी नं विचारलं.

“ ती पळून गेली.” –कनक

“ तू तिला नीट सांभाळून ठेवायला हवं होतंस.” पाणिनी नाराज होऊन म्हणाला.

“ अरे ती पळून जाणाऱ्यातली नव्हती.तिलाच साक्ष द्यायची इच्छा होती मी हे शपथेवर सांगायला तयार आहे. अरे तिने मला शपथ पूर्वक सांगितलं की तिने मरुशिका ला गाडीतून नेलं पण ते होल्ड अप च्या ठिकाणाहून नाही तर त्याच्या आधी दुपारी शॉपिंग ला जाताना.”

“ तर मग कनक, डाका पडला तेव्हा रात्री सिया कुठे होती?”

“ ते तिला आठवत नाहीये.तिला वाटतं ती व्हिला नंबर एक ला होती पण तारखे बाबत ती खात्री देत नाही.

“ तुला काय म्हणायचंय, कनक, मरुशिका ने तिच्याशी होल्ड अप बद्दल अवाक्षर काढलं नाही इतक्या दिवसात?”


“ मागच्या आठवडया पर्यंत सांगितलं नाही तिने. त्यामुळेच तर सिया माथूर ची खात्री आहे की तिने होल्ड अप झालेल्या ठिकाणाहून मरुशिका ला गाडीतून लिफ्ट दिली नाही.”

“ आपल्या दृष्टीने फार वाईट झालं. तिला शोधलंच पाहिजे कनक. आपली महत्वाची साक्षीदार आह ती.” पाणिनी म्हणाला.

तेवढ्यात मरुशिका त्यांच्या जवळून कोर्टाबाहेर जायला म्हणून निघाली.कनक चा पडलेला चेहेरा तिला दिसणे घातक होतं, तिचा आत्मविश्वास अजूनच वाढला असता.त्यामुळे ते जवळ येताच पाणिनी ने कनक च्या खांद्यावर थोपटलं आणि मरुशिका ला ऐकू जाईल अशा आवाजात आणि उत्साही स्वरात तो म्हणाला, “ मस्त काम केलास कनक.”

“ नमस्कार मिस्टर पटवर्धन.” मरुशिका म्हणाली.

“ नमस्कार” पाणिनी म्हणाला. “ सोमवारी भेटूच पुन्हा.”

एक क्षणभर तिचा पाय थांबला. पण क्षणभरच. चेहेऱ्यावर काहीही भाव न आणता ती म्हणाली, “ भेटू , नक्की.

एक मोठा जड आणि जाड हात पाणिनी च्या खांद्यावर पडला.पाणिनी ने मागे वळून पाहिलं.

“हाय, मिस्टर कामोद ! कसे आहात तुम्ही? ” पाणिनी नं विचारलं.

“ मी रागवलोय.” –कामोद

“ काय सांगताय? का बरं?” पाणिनी नं विचारलं.

“ त्या खोलीत मला साक्षीदार म्हणून डांबून ठेवलंय तुम्ही. मला वेड लागायची वेळ आल्ये.”—कामोद

“ साक्षीदारांना अशा स्वतंत्र खोल्यात ठेवायचा नियम आहे. एका साक्षीदाराची साक्ष दुसऱ्याने ऐकू नये आणि त्याच्या साक्षीवर दुसऱ्यांच्या साक्षीचा परिणाम होवू नये हा हेतू असतो.”

“ तुमची गोंडस आणि पुस्तकी उत्तरं !.” कामोद म्हणाला. “ मला दर वेळा माझी सगळी कामं सोडून इथे कोर्टात यायला लागणार ! ”

“ फार वेळ चालणार नाही हे, लवकर मोकळे व्हाल.” –पाणिनी त्याला खात्री देत म्हणाला.

“ अहो आधीच खूप वेळ गेलंय माझा.मी सरकारी वकीलांच्या सहाय्यकाशी बोललोय.त्याच म्हणणं आहे ते पटवर्धन यांच्यावर अवलंबून आहे.माझी साक्ष देऊन झाले पटवर्धन.काय घडलंय ते मी सांगून टाकलंय.मग आता मी का नाही बसू शकत कोर्टात?” कामोद ने वैतागून विचारलं.

“ तुम्हाला कदाचित ते पुन्हा बोलावू शकतात साक्षीला.”- पाणिनी म्हणाला.

“ सरकारी वकील मला तेच म्हणाले. तुमच्यावर अवलंबून आहे म्हणाले ते. म्हणजे साक्ष झाल्या नंतर जर साक्षीदारांना कोर्टात बसायला तुम्ही हरकत घेतली नाही तर हे जमू शकतं.” कामोद म्हणाला.

“ पण मला तसं करायचं नाहीये.” पाणिनी म्हणाला.

“ का?”

“ या खटल्यात मी माझ्या अशिला चे प्रतिनिधित्व करतोय. त्यासाठी कोर्टाच्या नियमांचे मला काटेकोर पणाने पालन होईल असं बघायचं आहे.”

“ मिस्टर पटवर्धन, मी एक मोठा व्यावसायिक आहे. त्या फडतूस चोरा साठी मला इथे यायला लावणे मला बिलकुल आवडलेलं नाही.मी वकिलांसाठी चांगलं करू शकतो तसचं वाईटही.माझा इथे बरंच वट आहे पटवर्धन.ज्या पद्धतीने मला तुम्ही त्रास देताय आणि ह प्रकरण हाताळताय ते मला आवडलेलं नाही. ”

“ सॉरी कामोद.”

“ तुम्हाला सॉरी वाटेल अशी मी व्यवस्था करीन ” –कामोद

“ ही धमकी आहे?” पाणिनी नं विचारलं.

“ तसं समजा हवं तर पटवर्धन.”तुमची ही संपूर्ण कृती न पटणारी आहे. माझ्या पाकिटातून जवळ जवळ वीस हजार रक्कम गेली, माझी हिऱ्याची टाय पिन गेली.मला तक्रार नोंदवायला लागली, ओळख पटवायला पुन्हा स्टेशन ला खेटे मारावे लागले.पुन्हा इथे कोर्टात येऊन तासनतास खोलीत थांबून रहावे लागले.माझे जेवढे पैसे चोरीला गेले त्यापेक्षा जास्त किंमतीचा वेळ वाया गेलाय माझा.”

“ समजू शकतो मी.” पाणिनी म्हणाला. “ ज्याचा वेळ महत्वाचा आहे, अशा माणसाला कोर्टाची पायरी....”

“ मला वेळेचं फार नाही हो,” कामोद जरा सौम्य पणे म्हणाला. “ पण मला त्या खोलीत कोंडून घ्यायला आवडलेलं नाही. मी मोकळ्या मनोवृत्तीचा माणूस आहे. मला बाहेर, कोर्ट रूम मधे बसायचंय, काय काय चाललंय ते ऐकायचंय”

“ ते नाही शक्य. मला माझ्या अशिलाच्या हितासाठी जे करायचं ते मला करावंच लागेल.” पाणिनी म्हणाला.

“ ज्या अशिलाकडून तुम्हाला छदाम सुध्दा फी मिळणार नाहीये.तुम्ही एवढे मोठे वकील असून पैश शिवाय काम करताय आणि इथे मी भरपूर पैसे जवळ बाळगून असलेला माणूस त्या घाणेरड्या खोलीत बसून आहे. पटवर्धन, आपण ही केस काढून टाकली तर? म्हणजे रद्द केली तर?”—कामोद

“ ते सरकारी वकिलांवर अवलंबून आहे.तुम्ही त्याच्या कडे जाऊन जर सांगितलं की तुमचा वेळ वाया जातोय त्यामुळे ही केस चालवू नका तर ते त्याला पटणार नाही.आणि हे तुम्ही माझ्याशी बोललाय असं जर त्याला सांगितलं तर तो मुळीच ऐकणार नाही.”

“ तुम्ही सगळे वकील सारखेच ! उगाच नाही म्हणत की शहाण्याने कोर्टाची पायरी चढू नये म्हणून. सोमवारी मी कोर्टात हवा असेन तुम्हाला तर मला त्या खोलीत न ठेवता कोर्ट रूम मधे बसायला द्या, नाहीतर मला कसं यायला लागेल इथं ,तेच मी बघतो !”- कामोद म्हणाला.

पाणिनी ने त्याच्याकडे लक्ष दिलं नाही.त्याने फक्त नकारार्थी मान हलवली.

“ चल कनक, लिफ्ट आलीच खाली. आपण निघू,” तो म्हणाला.

( प्रकरण ४ समाप्त)



Rate this content
Log in

Similar marathi story from Crime