लेबल
लेबल
घड्याळात बारा वाजले आणि मधल्या सुट्टीची घंटा वाजली आणि मुलांचा लंच ब्रेक झाला. मुले पटापट वह्या, पुस्तके गुंडाळून आपापले लंच बॉक्सेस घेऊन ग्राऊंडवर पळाली. पाचच मिनिटात सगळा वर्ग शांत झाला. मी माझे पुस्तके आवरून निघणार तेवढ्यात अर्णव रडतच माझ्याकडे आला. टीचर माझे डिजिटल वॉच हरवले, ते बॅगेत पण मिळत नाही आहे. मी गेम्स क्लासच्या आधी ते बॅगेत ठेवलं होतं पण आत्ता बघतो तर नाहीये.
अर्णव याचवर्षी शाळेत सातवीत अॅडमिशन घेतलेला नवीन विद्यार्थी होता. शांत स्वभावाचा, कुणाशी जास्त न बोलणारा आपल्यातच मग्न असायचा. त्याचा एकुलता एक मित्र सार्थक लगेच माझ्याकडे येत म्हणाला, टीचर हे नक्कीच रोहनने केले असणार, त्याला सवयच आहे दुसऱ्यांच्या वस्तू घेण्याची..मागे त्याने एकदोनदा विशालचा डबा मुले खाली गेम्स पिरियडमध्ये गेली असता चोरून खाल्ला होता. मी पाणी प्यायला वर्गात आलो तेव्हा त्याला बघितले होते डबा खाताना..मला बघून लगेच तो खाली पळाला.. तो डब्यात रोजच भाजी पोळी आणतो आणि मग दुसऱ्यांच्या डब्यातले खातो. आम्ही तर आता त्याच्याबरोबर बसत पण नाही.
सार्थकचे ते गाऱ्हाणे ऐकून मला एकंदर मामला काय आहे ते कळून चुकले होते. हल्ली रोहनच्या जरा जास्तच तक्रारी येत होत्या. कधी कुणाचं पेन चोरीला गेलं की मुले हमखास रोहनचे नाव घ्यायची आणि तो साफ नकार द्यायचा. पण त्याची बॅग तपासली असता बऱ्याच वेळा त्यात इतरांच्या वस्तू मिळालेल्या होत्या आणि तेव्हापासून त्याच्या नावाबरोबर त्याला दुसऱ्यांच्या वस्तू चोरणारा हे लेबल चिकटले होते.
रोहनच्या घरची परिस्थिती अगदीच बेताची होती. इथे शाळेत येणाऱ्या मुलांकडे चांगली सुबत्ता होती म्हणून महागड्या वस्तू मुले आणत आणि त्याच्या ते आवाक्याबाहेर होते म्हणूनही कदाचित त्याला ही सवय जडली असावी. त्याच्या आई-वडिलांना मीटिंगमध्ये याबद्दल कल्पना दिली तेव्हा याला चांगली शिक्षा करा त्याने असे काही केले की असे म्हणत त्याच्या पाठीत वडिलांनी एक धपाटासुद्धा घातला होता. आम्ही एवढे कष्ट करतो आणि याला त्याची किंमत नाही म्हणत तुम्हीच याला जरा समजवा असे अगदी हात जोडून त्याच्या आईने म्हटले. तो चांगला शिकावा म्हणून चांगल्या शाळेत त्याला आम्ही घातले आहे आणि याला त्याचे काहीच पडले नाही. मॅडम यांच्याकडे जरा लक्ष द्या. त्याच्या आई-वडिलांची ती दशा बघून तेव्हाच मी मनाशी ठरवले की यापुढे याचे पाऊल वाकडे पडू द्यायचे नाही.
अर्णवला शांत करत मी बघते वॉचचे असे सांगून मुलांना खाली पाठवले आणि लगेच आधी रोहनची बॅग तपासली तर त्यात मला काहीच सापडले नाही. ती परत ठेवत असता बॅग एकदम खाली पडली आणि खालच्या बाजूला त्याला एक कप्पा दिसला. त्याची चेन उघडून बघते तर रुमालात गुंडाळलेली अर्णवची डिजिटल वॉच मला मिळाली. मी हळूच ती काढून घेतली आणि रुमाल आत तसाच ठेवला.
आधी पेन, इरेझर या वस्तू वरुन त्याची मजल आता वॉचपर्यंत गेलेली बघून मीही जरा काळजीत पडले. या आधीही त्याला या सवयीसाठी शिक्षा केली, रागावून झाले पण त्याचा काही उपयोग झाला नव्हता. तेव्हा हे प्रकरण आता वेगळ्या पद्धतीने हाताळावे लागणार आहे हे मला जाणवलं.
बेल झाल्यावर मुले जेव्हा वर्गात आली तेव्हा मी अर्णवच्या वॉचबाबत मुलांकडे चौकशी केली असता सगळ्यांनीच नकार दिला आणि काहींनी रोहनचे नाव घेतले. काहींनी सुचविले की टीचर तुम्ही सगळ्यांच्या बॅग्स तपासा म्हणजे खरा चोर सापडेल आणि मग माझी शोध मोहीम चालू झाली. एक एक करत सगळ्यांच्या बॅगा तपासल्या. रोहन जवळ आले तेव्हा त्याची जरा चुळबुळ सुरु झाली. त्यानीच आपली बॅग उघडली आणि मला दाखविली आणि म्हणाला, बघा टीचर, माझ्याकडे नाही आहे. त्याची बॅग बघून मी पुढे वळले.
आणि मग क्लास कपबोर्डमध्ये बघू लागले. लंच ब्रेकमध्ये रोहनच्या बॅगेतून वॉच काढून मी तिथे ते ठेवले होते आणि ते अर्णवला दिले आणि तोच तिथे ते ठेवून विसरला असणार असे मुद्दाम म्हटले. मी रोहनकडे एक कटाक्ष टाकताच त्यानं मान खाली घातली. शाळा सुटल्यावर मला भेटायला स्टाफ रूम बाहेर तो ताटकळत उभा होता. मी येताच मला सॉरी म्हणत रडू लागला.
रोहन तुला माहितीये, मी का मुद्दाम तुझी चोरी लपविली ते? कारण मला माहिती होतं की तुझी चुक तुला नक्की उमजेल. म्हणूनच तुला ही दुसरी संधी दिली तुझ्या चुका सुधारण्याची. तू अजून लहान आहेस. आत्ताच तू स्वतःच्या वाईट सवयी बदलायला हव्यात.. तू बघतोस ना तुझे मित्र पण तुझ्या या सवयीपायी तुझ्यापासून दुरावले आहेत.
मी मुद्दामच सगळ्यांसमोर तुझे नाव घेतले नाही कारण मला विश्वास आहे की तू एक चांगला मुलगा आहेस. तुझ्या आई-बाबांच्या कष्टाची जाणीव तुला आहे. आता कानाला खडा लाव की यापुढे कधीही कुणाची कुठलीही वस्तू चोरणार नाहीस. अरे एकदा का हे चोरीचं लेबल चिकटलं की सुटता सुटत नाही बघ. तेव्हा मला प्रॉमिस कर की, यापुढे तू आपल्या वागणुकीने आई-बाबांचा एक गुणी मुलगा आणि सगळ्यांचा आवडता मित्र हे लेबल मिळवून दाखवशील आणि ही तुझी परीक्षा आहे आणि मला खात्री आहे की या परीक्षेत तू नक्की पास होशील.
माझे बोलणे ऐकून रोहन डोळे पुसत मला म्हणाला, टीचर मी यापुढे कधीही कुणाची कुठलीही वस्तू चोरणार नाही. तुमचा माझ्यावरील विश्वास कधीही तुटू देणार नाही. हे माझे तुम्हाला प्रॉमिस आहे. त्याचे ते सच्चे बोल ऐकून मी प्रेमाने त्याची पाठ थोपटली.
रोहनने अगदी मनापासून ते प्रॉमिस पाळले आणि काही महिन्यातच त्याने आपले जुने लेबल पुसून एक गुणी आणि सर्वांना मदत करणारा चांगला मित्र हे नवीन लेबल सर्वांकडून मिळविले. म्हणतात ना, मुलांच मन म्हणजे कोऱ्या पाटी सारखे असते. त्यावर आपण जी अक्षर गिरवू तसे ठसे उमटतात. तेव्हां लहान वयातच मुलांवर चांगले संस्कार करणे हे खूप महत्त्वाचे असते.
