कथा तुझी अन् माझी - भाग 6
कथा तुझी अन् माझी - भाग 6


शामलने प्रशांतचा फोन कट केला त्यामुळे प्रशांत शामल वर नाराज होता...दुसऱ्या दिवशी सकाळी अकरा वाजले तरी प्रशांतकडून ना फोन ना मेसेज ...शामलला अंदाज आला होता प्रशांत तिच्यावर चिडलाय म्हणून...प्रशांतचा राग घालवण्यासाठी तिने एक सुंदर गुड मॉर्निंग विश करणारा मेसेज प्रशांतला पाठवला...दोनच मिनिटांत शामलला प्रशांतचा मेसेज आला... खूप उत्सुकतेने शामलने मेसेज पाहिला...पण तिचा चांगलाच हिरमोड झाला...प्रशांतचा राग अजून गेला नव्हता...त्याचा रिप्लाय पाहून तिला हसूही आलं... प्रशांतचा मेसेज होता...'हेलो प्लीज दिमाग का दही मत कीजिये.... ना मैं आप को जानता हूँ... और ना आप मुझे...फिर ये प्यारी सी गुड मॉर्निंग विशेस किस लिये..?' शामलने सॉरी म्हणत प्रशांतला मेसेज केला...'हम तो कब से दोस्ती का हाथ आगे कर बैठे हैं...पर पता नहीं कुछ लोग क्यों अकडकर बैठे हैं...' शामल आणि प्रशांतच्या मैत्रीच्या नात्याला सुरुवात झाली... त्यांच्या मैत्रीची सुरुवात अशा मजेशीर नोकझोकने झाली... प्रशांतचं शामलला सतत चिडवणं, उगाच त्रास देणं... शामललाही आवडत होतं... हवंहवंसं वाटत होतं... काही न बोलताही एक अनामिक ओढ दोघांनाही एकमेकांबद्दल वाटत होती... हळूहळू दोघेही नकळत एकमेकांत गुंतत चालले होते... मेसेजेस... फोन तर सतत चालूच होतं... सकाळी उठल्यापासून ते रात्री झोपेपर्यंत दोघेही फोनच्या माध्यमातून एकमेकांशी कनेक्ट होते... एकाचा मेसेज आला नाही की दुसरा अस्वस्थ व्हायचा... एकमेकांशी बोलण्यासाठी दोघेही अधीर असायचे... त्यांच्या नात्याला त्यांनी मैत्रीचं नाव दिलं असलं तरी...दोघांच्याही मनात मैत्रीपलिकडे जाऊन एकमेकांबद्दल भावना निर्माण होत होत्या...पण दोघेही आपल्या मनातील भावना व्यक्त होणार नाहीत याची काळजी घेत होते...समोरच्याला समजू देत नव्हते...
मैत्रीच हे नातं छान फुलत चाललं होतं...एक दिवस प्रशांत अचानक शामलला म्हणाला...'मी युनिवर्सिटीमधे येणारच आहे जर तू म्हणत असशील तर आपण भेटूयात का?' शामलला हे अनपेक्षित होतं...फोनवर बोलणं अन् प्रत्यक्ष भेटणं यात खूप फरक आहे...प्रशांत असं काही भेटण्याबद्दल विचारेल याची तिने कल्पनाच केली नव्हती.... शामलला काही सुचेना काय उत्तर द्यावं त्यात घरी समजले तर...प्रशांतला भेटायची इच्छा तर आहे काय करावे? हा प्रश्न शामलला पडला... शामलचा युनिव्हर्सिटीमधे ग्रुप होता... शामलने प्रशांतला अट घातली... 'मी भेटेन पण एकटीने नाही... माझा फ्रेंडसचा जो ग्रुप आहे तो माझ्यासोबत असेल...तुला चालत असेल तरच मी भेटेन...' प्रशांत म्हणाला ...'अगं माझी काही हरकत नाही ...तेवढीच तुझ्या फ्रेंडसबरोबर माझीही ओळख होईल आणि त्यांच्याकडून तुझ्याबद्दल जाणूनही घेईन...' शामल आणि प्रशांतसाठी आजचा दिवस खूपच खास होता...आजपर्यंत त्यांची भेट झाली ती कुटुंबासोबत असताना आज प्रथमच ते एकटे भेटणार होते... त्यामुळे नाही म्हटलं तरी दोघांनाही थोडं दडपणं आलं होतं भेटीचं... पण तेवढीच एक्साईटमेंट पण होती.... ठरल्याप्रमाणे प्रशांत युनिवर्सिटीमध्ये आला...लेक्चर संपल्यावर सगळा ग्रुप कँटीनमधे जमला...शामल कँटीनच्या बाहेर प्रशांतची वाट पाहत उभी होती... आज शामल नेहमीपेक्षा जरा जास्तच तयार होऊन आलेली...व्हाईट रंगाच्या सलवार कुर्त्यामध्ये ती खूलून दिसत होती... तिने लांबूनच प्रशांतला येताना पाहिलं... पिंक रंगाच्या शर्टमध्ये...किती स्मार्ट दिसत होता तो...शामल समोरून येणाऱ्या प्रशांतकडे पाहातच राहिली... प्रशांतने तिच्यासमोर येऊन चुटकी वाजवली... तशी शामल भानावर आली...
'काय मॅडम कुठे हरवला आहात..?
'काही नाही रे असचं..म्हणत...शामलने प्रशांतला कँटीनमध्ये नेलं...शामलच्या ग्रुपमध्ये सर्व मुलीच होत्या...याची प्रशांतला काही कल्पनाच नव्हती...सगळ्या मुलीच पाहून तोही जरा चपापला...शामलने प्रशांतची सगळ्यांशी ओळख करून दिली..
प्रशांत म्हणाला ...'आश्चर्य आहे तुमच्या ग्रुपमधे एकही मुलगा नाही... boys not allowed की काय...'
शामलची एक मैत्रीण म्हणाली....'मुलं तर खूप आहेत हो पण आम्ही आमच्या क्लासमधल्या मुलांना भाव देत नाही...'
'हो का बरं काय झालं', प्रशांत म्हणाला
शामल म्हणाली...'काय बरं झालं?' 'हेच की मी तुमचा क्लासमेट नाही त्यामुळे मला तो नियम लागू नाही'...प्रशांत हसत म्हणाला आणि सगळेच हसू लागले.... प्रशांतचा स्वभाव बोलका होता...त्यामुळे शामलच्या फ्रेंडस ग्रुपमध्ये तो लगेच मिसळला... प्रशांत गेल्यावर मात्र मैत्रिणींनी शामलला चिडवायला सुरुवात केली....'काय दिसतोय गं शामल प्रशांत... आम्हाला नव्हतं माहित तू अशी छुपी रुस्तम निघशील...'
'ए तुम्ही समजताय तसं काही नाही तो माझा फक्त चांगला मित्र आहे'...शामल म्हणाली....
'ठिक आहे तू नसशील तर आम्ही आहोत तयार'...मैत्रिणी शामलला छेडत म्हणाल्या...
शामल आणि प्रशांत आजच्या भेटीने खूप खुश होते... रात्री कितीतरी वेळ मेसेजवर आजचा दिवस किती छान गेला याच्या गप्पा मारत बसलेले...आज खरं तर दोघांनाही झोप लागत नव्हती... दोघांसाठीही ही भेट खूप खास होती... शामल आणि प्रशांत पहिल्यांदा भेटले तो महिना होता फेब्रुवारी.
..प्रेमाचा महिना ....त्यानंतर आठवड्याभरातच एक घटना घडली... 13 फेब्रुवारीला रात्री झोपण्यापूर्वी शामलचे प्रशांतशी शेवटचे बोलणे झाले ...पण 14 फेब्रुवारी व्हॅलेंटाईन डेच्या दिवशी... सकाळपासून प्रशांतने शामलला एकही फोन केला नाही की मेसेज... शामल फार आतुरतेने प्रशांतच्या कॉल किंवा मेसेजची वाट पाहत होती पण प्रशांतकडून आज कसलाच प्रतिसाद नव्हता... शामलला सुरुवातीला वाटले... प्रशांत हे सगळं मुद्दाम तिला त्रास देण्यासाठी करत असेल...पण पाच पाच मिनिटाला मेसेज करणारा प्रशांत आज ना फोन करत होता ना मेसेज... शेवटी न राहवून शामलनेच प्रशांतला कॉल केले मेसेजेस केले पण प्रशांतने शामलच्या एकाही कॉलचे मेसेजचे उत्तर दिले नाही...
शामल त्या दिवशी कॉलेजला गेलेली..तिचे लक्ष लेक्चरमध्येही लागेना. आज इतका खास दिवस असताना प्रशांत असं का वागतोय तेच शामलला समजेना... काय झालं असेल? काही प्रोब्लेम तर नसेल झाला? प्रशांतला काही झालं तर नसेल? विचारांनी तिचं डोकं भनभनलं...काय करावं? प्रशांतची ख्याली खुशाली कशी कळेल? शामल विचार करत होती...तिने प्रशांतला किती कॉल, किती मेसेजेस केले असतील याचा तिलाही अंदाज नव्हता... अचानक तिच्या लक्षात आलं एकदा प्रशांतने त्याच्या घरच्या लँडलाईनवरून कॉल केलेला... तो नंबर तिने सेव्ह केला होता...त्याच्या घरी फोन करून विचारलं तर...पण त्याच्या घरच्यांनी विचारलं... मी का प्रशांतला फोन करतेय?...तर माझ्याकडे काहीच उत्तर नाही द्यायला... नको नको त्यावरून काही प्रॉब्लेम नको व्हायला... पण प्रशांतचा काहीच कॉन्टॅक्ट होत नसल्याने शामल चांगलीच अस्वस्थ झालेली...दिवसभर तिचं कशातच लक्ष लागत नव्हतं... कॉलेज सुटल्यावर शामलने प्रशांतला पुन्हा कॉल केला..पण आता तर प्रशांतचा फोन स्वीच ऑफ़ येऊ लागला... आता मात्र प्रशांतच्या काळजीने शामल रडायचीच बाकी होती...
शामलची एक खास फ्रेंड होती...शारदा...तिला शामलची ही अस्वस्थता पहावत नव्हती...'ती शामलला धीर देत होती असेल तो ठिक तू उगाच काळजी करते आहेस...' प्रशांत ने एकदा त्याच्या फ्रेंडसबद्दल बोलताना सुप्रिया नाव घेतलेलं... ती त्याच्या सोसायटीतच राहत होती... लहानपणापासून एकत्र खेळलेले... प्रशांत बोलता बोलता तिच्याबद्दल शामलला बोलला होता... शामल अन् शारदाने मिळून पीसीओवरून प्रशांतच्या घरी सुप्रियाच्या नावाने फोन केला...तो फोन प्रशांतच्या लहान बहिणीने घेतला...शामलने प्रशांतची चौकशी केली...पण तिला इतकंच समजलं की तो मित्राकडे गेलाय...पुढे काही विचारणार तोच पलीकडून विचारणा झाली..तुम्ही कोण बोलताय? शामलने पटकन सुप्रिया बोलते म्हणत फोन कट केला... आता कुठे शामलच्या जीवात जीव आला...जेव्हा तिला प्रशांतची खुशाली समजली...पण त्या रात्री शामलला झोपच लागली नाही...शामल आणि प्रशांत फोनवर बोलायला लागल्यापासून असा एकही दिवस गेला नाही की ज्या दिवशी दोघे एकमेकांशी बोलले नाहीत.
दुसऱ्या दिवशीही शामलचं पूर्ण लक्ष फोनकडे होतं... दुपारी 12 वाजता प्रशांतचा फोन आला...शामलने घाईघाईने फोन उचलला...आणि प्रशांतवर प्रश्नांची सरबत्ती केली...कुठे होतास? फोन का नाही केलास? तू नाही केलास पण माझा फोन तर उचलायचास? साधा एक मेसेज ही करावा वाटला नाही? इथे मी वेड्यासारखी तुझ्या फोन, मेसेजची वाट पाहतेय...
सॉरी सॉरी आता स्टॉप घेशील का? मी काय म्हणतोय ते तर ऐकून घे...
हा बोल!!
त्या दिवशी रात्री तुझ्याशी बोलून झोपलो... पहाटे चार वाजता माझ्या मित्राचा फोन आला त्याच्या आईची तब्येत अचानक बिघडली आहे...तातडीने तिकडे गेलो...त्याच्या आईला हॉस्पिटलमध्ये अॅडमिट केले... त्याचे बाबा बाहेरगावी गेलेले तो एकटाच होता... सो मी त्याच्यासोबतच होतो...जाताना घाईघाईने मी माझा फोन घरीच विसरलो...त्यात तुझा नंबर माहित नव्हता त्यामुळे ईच्छा असूनही मला तुला काही कळवता नाही आलं...त्याबद्दल सॉरी...!!!
शामलचा राग आता कुठे शांत झाला...'सॉरी मी तुझ्यावर काही जाणून न घेताच चिडले...तुझी काळजी वाटत होतं म्हणून...' माझी इतकी काळजी शामल की तुझे 100 मिस़्ड कॉल होते माझ्या फोनवर...का बरं?
फ्रेंडस आहोत आपण काळजी तर वाटणारच...शामल म्हणाली
फक्त फ्रेंडस ...की आणखीही काही...प्रशांत मिश्किल हसत म्हणाला...
आणखीही म्हणजे ...आपण फक्त फ्रेंडस आहोत... आणि मग माझ्या घरी फोन केलास त्याबद्दल काय म्हणायचय ते ही फक्त फ्रेंड म्हणून...
फोन? तुझ्या घरी? मी का करु? मी नाही केला फोन... हो का सुप्रियाच्या नावाने कोणीतरी काल माझी चौकशी करण्यासाठी घरी फोन केलेला...मला वाटले तूच केलास
काहीही काय सुप्रियाच्या नावाने होता म्हटल्यावर तीच असेल ना मी कशाला करू फोन...
हो ना सुप्रियाच्या नावाने फोन होता... पण काल आमच्या ग्रुपमधले सगळेच हॉस्पिटलमधे मित्रासोबत होते...सुप्रिया पण होती...मग ती कशी फोन करेल? समजलं नाही मला.. आपली चोरी पकडली जातेय हे पाहताच शामलने विषय बदलला... प्रशांत मला लेक्चरला उशीर होतोय... बाय आपण नंतर बोलूयात...विषय टाळत शामलने फोन ठेवला... (क्रमशः)