कृतघ्न संतान
कृतघ्न संतान


" अहो, उठा ना, राजुला शाळेत सोडायचं नाही का ?" गोविंदरावानां पत्नीने झोपेतुन उठवले." तुम्ही तयार व्हा, तोपर्यंत मी राजुला, तयार करते".
घाईघाईने, त्यांनी ब्रश केला, चहा तयारच होता, फ्रेश होऊन ते ही तयार झाले, तोपर्यंत, शाळेचा गणवेश घालुन, मोजे, बुट, खाऊचा डब्बा,सँक घेऊन त्यांच्या पत्नीने राजुला, गोविंदरावांच्या ताब्यांत दिले.
राजुला बाईकवर पुढे टाकीवर बसवुन, गोंविदरावांनी बाईकला किक मारली. अन पंधरा मिनीटांत ते राजुच्या शाळेत पोहोचले. राजुच्या शाळेत , वर्गात सोडुन ते परत घरी आले.
जवळ जवळ जाणता होईपर्यंत हा रूटीन होता. पुन्हा संध्याकाळी राजुला शाळेतुन पुन्हा घरी आणण्यासाठी ही जावं लागायचं.
आपली नोकरी सांभाळुन ही कामं ही करावी लागायची.
राजु खुप हुशार व्हावा, खुप शिकावा, यासाठी त्यांनी राजुला सी.बी.एस.ई. इंग्लिश मिडीयम स्कुलमध्ये भरगच्च फी असलेल्या श्रीमंती थाट असलेल्या शाळेत टाकले होते.
तरी पण, त्यांची आर्थिक हालत तेवढी खास नव्हती. साधारण क्लार्कची नोकरी करणाऱ्या, मध्यमवर्गीय माणसाकडे पैसा कुठून असणार, राजुची शाळेची फी,घरखर्च भागवता भागवता, त्यांच्या,नाकीनऊ यायचे.पत्नी सुनयना ही शिवणकाम करून,चार पैसे गाठीला बांधत होती.
राजुवरच त्यांची आस होती. राजु चांगला, शिकला तर, आपले जन्माचे पांग तो फेडील,अशी आशा होती.शेवटी आशेवरच मनुष्य जगतो ना.
एवढ ही करून भागायचं नाही, के जी. लेव्हलपर्यंत घरी त्याचा होमवर्क घ्यायला शक्य होतं,पण पुढे वरच्या वर्गात , त्याला शिकवणी लावण्या शिवाय पर्याय नव्हता.अन राजुच्या वर्गातले सारेच जात होते.गोविंदराव अभिमानाने आम्ही शाळेत असतांना कधी ट्युशन लावली नाही असे सांगायचे, पण काळ बदलला होता,जुन्या काळाचे गणित चालु काळांत जमत नव्हते.
बरं ट्युशनच्या क्लासची फी ही खुप होती.कसे तरी काटकसर करीत,त्यांनी ते सहन केले. अन राजुला कमी पडु दिलं नाही.
पुढ जसजसा मोठ्या वर्गात गेल्यानंतर राजुला आपले वडील व मित्रांचे आईवडील यांच्या परिस्थितीतला फरक जाणवायला लागला.
दरवर्षी,शाळेची ट्रिप ही जायची, तिथ ही राजुला पाठवावं लागायचं. घर,नातेवाईक, रोजचा खर्च,करमणुक, आठ पंधरा दिवसांनी बाहेर जेवायला जाणे,प्रवासखर्च ,पुन्हा दिवसें दिवस वाढत्या खर्चांनी, महागाईने,त्यांचे कंबरडेच मोडायचे.
तरी पण दिवस जात होते, राजु ही मोठा होत होता.बघता बघता तो दहावीला गेला. अत्यंत महत्वाचे वर्ष असते.या वर्षावरच पुढची घडण घडत असते
आयुष्याची. राजुच्या सर्व मित्रांकडे बाईक होत्या.त्यावेस राजुने घरांत बाईकचा धोशा लावला. शेवटी कंटाळुन आई सुनयना तयार झाली.
पण गोविंदरावांची अजून होकार भरला नव्हता. रात्री गोविंदराव घरी येताच,जेवणे पार पडल्यानंतर सुनयनाने हळुच विषय छेडला." अहो,काय म्हणते मी."" अगं तू अजून बोलली देखील नाही,ते मी कसं ऐकायचं".
" तुम्हांला ना प्रत्येक गोष्टीत चेष्टाच सुचते.अहो आपला राजु म्हणतो,त्याला अँक्टीव्हा हवी आहे." "कशाला पाहिजे अँक्टिव्हा,हे काय गाडी चालवायचे ,वय आहे कां? अन पडला झडला ,तर काय करायचे." अहो,त्याच्या साऱ्याच मित्रांकडे गाड्या आहेत आता."" असल्या म्हणुन ,काय झालं,त्यांच्या पालका एवढी आपली परिस्थिती आहे कां?जरा विचार करावा,माणसाने."
" तुम्हांला नसल घेऊन द्यायची तर राहु द्या.मी घेऊन देईन माझ्या बांगड्या विकून." सुनयना जराशा फणकाऱ्यातच बोलली.पुन्हा हळुवार,समजुत घालत म्हणाली." अहो,राजु आपला एकुलता एक मुलगा आहे.त्याने जीवाचं बरेवाईट केलं तर सगळं, राहिल जागच्या जागी.आजकाल बँका कर्जाने ही देतात गाड्या.भरू आपण हप्त्याहप्त्याने." सुनयनाचे ते निर्वाणीचे बोल ऐकून ,गोविंदरावांनी सपशेल शरणागती पत्करली.
शेवटी एकदाची, अँक्टिव्हा घरात आली. राजु ऐटीत घेऊन, क्लासला गेला.तसा तो अभ्यासात हुशार होता.बघता बघता बारावीत गेला.अभ्यास ही केला त्याने पण थोडे मार्क कमीच पडले त्याला,मेरीटवर अँडमिशन मिळणे अशक्य होते.
त्याने मला मेडिकलला जायचेच आहे,मला अँडमिशन घेऊन द्या.असा धोशा लावला.त्यासाठी पेमेंट सीटवर डोनेशन मोजून अँडमिशन घेऊन दिली नाही तर,नदीत जावुन जीव देईन अशी धमकी दिली.
शेवटी नाईलाजाने दोघांनी वडीलोपार्जित घर तारण ठेवून ,त्याला डोनेशनवर अँडमिशन घेऊन दिली.
नुसत्या अँडमिशनवर होत नाही तर,मेडिकलच्या विद्यार्थ्याचा दरवर्षाचा खर्च हा सामान्यांच्या आवाक्या बाहेरचा होता.मग एका मित्राने शैक्षणिक कर्जाबद्दल माहिती दिली व त्याचे हप्ते,तो डाँक्टर झाल्यानंतर फेडता येते.तेव्हा दरवर्षी त्या कर्जावर शिक्षण पार पडु लागले.
राजु डाँक्टर झाल्यानंतर त्या दोघांना, कोण आनंद झाला होता.अभिमानाने छाती फुलुन आली होती.त्यांच्या कष्टांचे चीज झाले होते.आयुष्यातला क्षण अन क्षण राजुच्या उभारी करता खर्च झाला होता.
पोस्ट ग्रँज्युएटस होता होता राजुला स्थळे येऊ लागले.मोठमोठ्या घरातील माणसे येऊ लागली.डाँक्टर राजु आता इंटरशिप करित असतांनाच त्याचे लग्न ठरले,मुलगी ही डॉ डाँक्टर होती.
एका सुमुहूर्तावर दोनाचे चार हात झाले.सुनयनाला वाटले, चला आपल्याला आराम मिळेल,पण कसचं काय,अजुन पुर्वीपेक्षा ही दुप्पट काम पाठी पडले. मुलगा व सुन दोन्ही सासरच्या गांवी रहाण्यास गेले.सुनेच्या वडीलांच्या मदतीने त्यांनी हाँस्पिटल ही टाकले.
आता त्या दोघांच्या आयुष्याची, संध्याकाळ झाली होती. गोविंदराव सुध्दा रिटायर्ड झाले होते. थोडी फार पेन्शनीवर घर चालणे अशक्यप्रायच होते. त्यात भर म्हणून ,एके दिवशी सुनयना बाथरूममध्ये पडण्याचं निमीत्त झालं,दोन दिवस अल्प आजार काय झाला अन,देवाघरी गेली. वर्षानुवर्षांची साथ तुटली.गोविंदराव तर मोडुन पडले.जीवनाच्या प्रत्येक प्रसंगात त्यांच्या पाठीशी उभी राहुन,धीर देणारी ,त्यांना सोडुन गेली होती.
मुलगा व सुन आले.राहत्या घरावर राजुला डाँक्टर बनविण्यातच कर्ज झालं होतं,ते घर विकुन ,कर्जाची रक्कम फेडुन,उरलेले पैसे स्वत:च्या ताब्यात घेऊन,गोविंदरावांना घेऊन ते शहरांत आले. काही दिवस सुखांत गेले,नंतर सुनबाई व गोविंदरावात कुरबुरी होऊ लागल्या.
सुनबाई,तिचे आई वडील ,मिळून,राजुचे कान भरू लागली. राजु बायकोचा गुलाम झाला होता.डोळ्यावर धुंदीची पट्टी चढली होती.
गोविंदरावांना तिथे राहणे,असहाय्य झाले होते.पण इलाजच नव्हता.म्हातारपण लाचारच असतं.
एके दिवशी,कहर झाला, सुनेने राजुला निक्षुन सांगितले, एक तर हे राहतील, नाहीतर मी.
भुतकाळाला कोण उराशी बाळगतो..बायको ही राजुचं वर्तमान होतं, शेवटी जन्मदात्या बापाला गोविंदरावांना,वृद्धाश्रमाच्या दारांत,हात धरून स्वत: नेऊन सोडले. गोविंदराव राजुला विणवत होते, हातापाया पडत,राजुला,डोळ्यांत पाणी आणून, आर्जवे करून पकडत होते."मला काही देऊ नको. राहण्यास पथारी व एक वेळच, दोन भाकरी खायला घाल", पण कठोर,पाषाणह्रदयी राजुला पाझर फुटला नाही.
चलतचित्राप्रमाणे त्यांच्या डोळ्यासमोर राजुचे बालपण तरळत होते. डोळ्यातून अश्रुंच्या धारा लागल्या होत्या. आपण जगात एकटे आहोत, अन फक्त मरणाची वाट पाहात, ईश्वर ठेवील तोपर्यंत जगायचे, या जाणिवेने ते मटकन वृद्धाश्रमाच्या अंगणातच बसले.
"देवा कसले हे रे घोर कलयुग,त्रेतायुगात तूच श्रावण बाळाचे उदाहरण आम्हाला दावले ना."
मन देवाला आळवित होते." विठ्ठला, अशी कृतघ्न संतान मिळणार असेल , तर कुणाला ही मनुष्य जन्म देऊ नको.