सोनियाचे दिस
सोनियाचे दिस
रविवारचा दिवस होता,नेहमीप्रमाणे मी रंगोलीचा कार्यक्रम ऐकायला बसलो,तर गाणे लागले, "बच्चे मनके सच्चे,सारी जग के आँख के तारे". हे माझे आवडते गाणे ऐकून मन बालपणात विचरू लागले.
खरचं बालपण किती सुरेख असतं.ना श्रीमंती, ना गरिबी,ना कुणी छोटा,ना कुणी मोठा,स्वार्थ भेद इथे काहीच नव्हता.ईर्ष्या,वैर या थोड्याफार असायच्या,भांडणाच्या वेळेस उफाळून यायच्या.पण तेवढ्याच वेगांत परत शांत ही व्हायच्या.मुलांच्या भांडणात कधी पडायचं नसतं,कारण मोठ्यांच्याप्रमाणे ती मनात काही ठेवत नाहीत.पुढच्या क्षणाला ती सारे विसरून पुर्ववत खेळत राहतात.
यासाठीच तर दत्त गुरूंनी बालकांना गुरू मानलं आहे.बालपणीचा काळ सुखाचा,कुठलीही जबाबदारी नाही,चिंता नाही,तणाव नाही,स्वच्छंदपणे जगायचं.
पाऊस पडला की,पावसांत हाथ पसरून नाचायच,पावसांत बेफानपणे भिजायचं,कागदाच्या होड्या बनवुन पाण्यात सोडायच्या.
सुट्ट्यांमध्ये नदीवर गेलो की,मस्तपैकी पाण्यात डुंबत रहायचं.घरी परत येतांना चिंचेच्या झाडांवर दगडे मारून चिंचा तोडून खायच्या. वेळप्रसंगी शेतकऱ्याच्या हातचा फार ही खायचा. गारशेल चिंचेला जास्त भाव असायचा.
वडाची झाडे दिसली की,सुरपारंब्यांचा डाव रंगायचा.त्याकाळी वाहतूक जास्त नव्हती.रस्त्यांच्या कडेला,पांथस्थांना सावली देणारी,डेरेदार वडाची झाडे खुप असायची.
गल्लीतील मिळमंडळ वेगळंच असायचं विटीदांडु,लिंगोरच्या,अपाधापी,पायाने डब्याला लाथ मारणे,गोट्यांचा डाव रमायचा.जो कोणी जिंकेल तो उधारी ही करायचा.पण व्यवहार चोख ठेवावा लगायचा.नाहीतर धुलाई पक्कीच असायची.
त्याकाळी आमची प्रवरामाई बारा ही महीने वाहत असायची.नदीच्या काठावर अहिल्याबाई होळकरांनी बांधलेले सुरेख घाट आहेत.गंगामाई घाटावर पाण्यात सुर मारून पोहत पोहत महादेव घाटापर्यंत जायचो.परततांना रंगार गल्लीत पावरश्शीवर तुटून पडायचो.अर्थात पैसे आईकडूनच मिळायचे,बापाचा खुप धाक असायचा,त्याला माहित पडलं की धुलाईच व्हायची.
होळीच्या दिवसांत गवऱ्यां चोरायला जायचो,वर्गणी ही जमा करायचो,होळी पेटतांना भान विसरून शिव्या द्यायचो.
रंगपंचमी तर कढईत च्या रंगात डूंबुन निघायचो,येईल त्याला पकडून कढईत टाकायचो. कधी प्रिंटिंग मशीनची शाई,कधी सिल्वर लावायचो,कधी भांगेची गोळी खाऊन खात राहायचो. शेवट नदीत स्नान करण्यात व्हायचा.
हनुमान जयंती,म्हणजे खुप धुमधडाक्यात आमच्यांकडे साजरी व्हायची.आदल्या दिवशी वर्गणी जमवायचो,करंजीची,झाडे तोडून गल्लीत कोपऱ्या कोपऱ्यावर लावायचो.रात्रभर लाईट लावुन धिंगाणा घालायचो.पहाटे तीन ,चारलाच लाऊडस्पीकर लाऊन गाणी लावायचो.गाणे ही बहारदार असायची."ये रेशमी झुल्पे " वगैरे.
बरोबर सहा वाजता गांवात तोफेची सलामी झाली, आम्ही आमच्या स्वनिर्मित छोट्याशा देवळांत आरती करायचो. नंतर तीर्थ व पंजरीच वाटप करायचो.नंतर जे पैसे उरायचे,श्रमपरिहार संध्याकाळी स्वल्पविराममध्ये जाऊन मसाला डोसा खायचो.
शाळेत मास्तरांचं एक तासभर,ऐकणे म्हणजे सजाच असायची.विशेष करून खेळाचा तास खुपच आवडायचा.पण पी.टी.म्हणजे खुप त्रासदायक वाटायची.
एन.सी.सी.च खुप आर्कषण असायचं.ती लाल गोंड्याची टोपी,कडक ड्रेस,काळे बुट,शिस्तबध्द चाल ,त्यांच्या हातातली लहान काठी अजुनही आठवते.
परिक्षा म्हणजे संकटच वाटायचं.वर्गात पुढच्या बाकांवर बसणारी,छान छान उत्तरे देणारी मुले आवडत नसायची.कारण ती कोणांत लवकर मिसळत नसायची.अभ्यास सोडून बाकीच्या बाबतीत भित्री भागुबाई असायची.पण परिक्षेच्या दिवसांत,त्यांना भाव देत,चमचेगिरी करत,थोडफार पास होण्याइतपत शिकुन घ्यायचो.परिक्षा पार पडल्या की दफ्तर फेकून खेळायला पळायचो.
निकालाचा दिवस खुप तणावाचा असायचा.गणपती,शनी,मारूती,सारे देव पाण्यत घालून भजायचो.प्रत्येक देवाला,हे तुला चढवीन,लालुच ही द्यायचो,दम ही द्यायचो.बघ हं मला नाही पास केलं तर,तुझ्या दारांत पाऊल टाकणार नाही.दरवेळी गुरूजी 30 चे पस्तीस करीत पुढच्या वर्गात ढकलायचे. अर्थात एक दोन विषयात तरी,लाल शेरे असायचे.वडीलांचा मार ठरलेला.
परिक्षेनंतरच्या काळात सिनेमा ही पाहायचो राजस्थान,नाहीतर माधवमध्ये,गर्दीत घुसून चेंगरत चेंगरत तिकीट काढणे म्हणजे दिव्यच असायचे.इंटरव्हलमध्ये सोडावाटरच्या गोट्या असलेल्या बाटल्यात लेमन,आँरेंज पिणे चैनच असायची.
मित्रांबरोबर शाळा चुकवून जत्रेला जायचो,गोडीशेव,गाठी,भेळ अन थोडा वेळ तमाशा ही पहायचो.कारण परत घरी ही परतायचं होतं वेळेच्या आत त्याकाळी मोटारसायकली नव्हत्या,आम्ही सायकलीवरच फिरायचो.
माझी मुळ आवड शाळेत ही साहित्यातच होती.वडीलांच्या मुळे मला वाचनाची गोडी लागली.त्या काळात मी खुप वाचन केले. पुरंदरेंचा शिवछत्रपतीचे खंड,रियासतकार सरदेसाई यांच्या मराठी इतिहासावर लिहीलेली माहिती,अशी अनेक पुस्तके वाचनात आली.
पण माझ्या शिक्षकांच्या छान शिकविण्यामुळे,मी गणित व विज्ञानाची गोडी लागली.त्यामुळेच माझा कल पुढे सायन्स फँकल्टीकडे झुकला.
जिल्हा परिषदच्या शाळेत तिसरी चौथीला मला रसाळ गुरूजी होते.ते अगदी रविवारी देखील शिकविण्यासाठी मला घरी येऊन घेऊन जायचे. त्यांची मला खुप भिती ही वाटायची,पण माझ्या शिक्षणाचा पाया त्यांनीच मजबुत केला.
उन्हाळ्यात तर,रस्त्यावरून गारीगार असं ओरडत गाडी ढकलत ढकलत पोऱ्या जायचा.अवघ्या पांच पैशातली गारीगार आमची तृष्णा भागवायची.अर्थात पैसे फक्त आईकडूनच मिळायचे.बाप म्हणजे जमदग्नीच दुसरे,कां पाहिजे,कशासाठी पाहिजे.अन खरं बोलायला गेलो ,तर अभ्यास सोडून हे धंदे सुचतात कसे,मग आम्हांला बेत रहीत करावा लागायचा.
रवीवारच्या दिवशी ग्राऊंडवर न चुकता,क्रिकेट खेळायला जायचो.
क्रिकेट त्या वेळेसही खुप लोकप्रिय होता.पण सितारे वेगळे होते,सोबर्स,रोहन कन्हाय,वाँलकाँट,पतौडी,सरदेसाई,बेदी,चंद्रशेखर,प्रसन्ना,बोर्डे वगैरे.
आम्ही वर्गातही पुस्तकांची पाने उघडून क्रिकेट खेळायचो.तो खेळ आम्हीच शोधला होता.आमच्या वह्याची मागची पाने त्याने भरलेली असायची.
पहिला तास संपुन पुढचे सर येईपर्यंत आम्ही सरांच्या नकला करीत बसायचो.एरवी शांत बसणारी हुशार वर्गमित्र ही त्याला दाद द्यायचे.
आंतरशालेय स्पर्धेला मात्र,खेळात भाग घेण्या बरोबर,प्रत्येक ठिकाणी चिअर अप्स करायचो.आमच्या शाळेचा आम्हांला खुप अभिमान होता.
तीन चार वेळेस शाळेच्या ट्रिपलाही गेलो होतो.औरंगाबाद,वेरूळ,तीन दिवसांची ट्रिप होती.फक्त
12रूपयात जेऊन खाऊन.
पण वडीलांनी मला व माझ्या आतेभावाला फक्त तीनच रूपये दिले.त्यापैकी एका रूपयात हमराज सिनेमा पाहिला.
वेरूळच्या घृष्णेश्वर मंदीराजवळ पाच सहा बाया,द्राक्षे विकायला बसल्या होत्या.द्राक्षाचे घड पाहून कोल्ह्यांच्या तोंडाला पाणी सुटले.बाकीचे खात होते.खायचे तर होते,पण खिशात पैसे नव्हते.
मग एक शक्कल लढविली.प्रत्येक पाटीवाली कडे जात,केवढ्यांला आहे,विचारीत चार पाच द्राक्षे टेस्ट करायचो,अन आंबट आहेत म्हणून दुसरीखडे जायचे.मित्रांना द्राक्षे खात आहे,असं दाखवायचो,पुढे अनेक वेळा मी पर्यटनला गेलो,पण ही ट्रिप कधीच विसरू शकणार नाही.एक एक प्रसंग जीवनाचे धडेच देत गेला.
शाळेत असतांना ,वर्गात मुली ही असायच्या.पण मुली म्हणजे,अगदीच काकुबाई असंच समजायचो.अन मुली मुलांना वात्रट,डांबरट,हलकट अशी विशेषणे द्यायची.मुलींना त्याकाळी खुप बंधने असायची.
एकदा अकबराने दरबारात कोणता हट्ट सगळ्यात मोठा असतो,असा सवाल केला. बिरबलाने त्वरित बालहट्ट असे सांगीतले.अकबराने त्याला सप्रमाण सिध्द करावयास सांगीतले.बिरबल म
हणाला"जहाँपना ,उस मागवा".
लगेच उस आणला गेला.नंतर बिरबल लहान मुलांसारखा मुसमुसत म्हणाला याचे तुकडे करा." लगेच तुकडे केले गेले.परत बिरबल रडत म्हणाला"पुन्हा पुर्वीसारखा करून द्या." बादशहा संतापुन म्हणाला"अरे तुला,वेड तर नाही लागले।असा कसा होईल परत.ते पाहून बिरबल हसत हसत म्हणाला"जहाँपनाह,यालाच बालहट्ट म्हणतात."साऱ्या दरबारात बहुत खुप,वाहव्वा.असा गजर झाला.
तात्पर्य काय बालहट्ट फार कठीण असतो.
घरामध्ये काय आपण घाई गडबडीत कुठे जायचे असलं की ,आपले काही सामान गादीखालीच ठेवतो.डायऱ्या वगैरे.
एकदा एका जोडप्यांनी बाहेर जातांना निरोधचे पाकिट , गादीखाली लपविली.मुले शेजारच्या मुलांबरोबर खेळण्यात मग्न होती.अन ती दोघे मुलांना घराकडे लक्ष दे सांगत बाहेर गेले.
इकडे मुलं खेळ झाल्यानंतर घरात आली.एका मुलाला त्याचं काही सामान गादीखाली होतं,पहायला गेला तर त्याला ते पाकीट हाती लागले.कुतुहलाने त्यांनी ते खोलले तर,निरोध त्यांना दिसले.त्यांना वाटलं ही फुगेच आहेत.म्हणून त्यांनी मित्रांबरोबर ती फुगवुन घराबाहेर टांगली.
ते जोडपे घरी आल्यानंतर ,त्यांच्या नजरेस ते पडले.येणारे जाणारे सारेच हसत होते.त्यांना शरमेने पाणीपाणी झाले.
तात्पर्य काय तर ,मुले निष्पाप असतात.त्यांच्या हातात अशी वस्तु कधीच हाती लागणार नाही अशा जागी ठेवावी.
एकदा काय झाले,दहावीत असतांना ,वर्गात मँडमनी एका मुलीच्या खेळायच्या काचेच्या गोट्या जब्त केल्या व टेबलावर ठेवल्या.शिकवितांना बोर्डवर काहीतरी लिहु लागल्या. पिनड्राप शांतता होती,अन त्यातील एक गोटी अचानक घरंगळत,टेबलावरून खाली पडली.लगेच एक वर्गमित्र म्हणाला"मँडम तुमची गोटी खाली पडली." हास्याचा एकच स्फोट झाला.मँडम त्यावेळेस गरोदर होत्या.त्यांना वाटलं,आपल्यावरचं काहीतरी घाणेरडी काँमेंट केली.
त्यांनी लगेच मुख्याध्यपकांजवळ तक्रार केले.मुख्य अध्यापक वर्गात आले.अन पढच्या बाकावर बसलेल्या दोन तीन मुलांना बदडून काढले.अन आम्हांला बजावले." वर्गाबाहेर व्हा सारे,परत वर्गात तुम्ही यायचं नाही." आम्ही लगेच रागरंग पाहून
बाहेर पडलो.मी माँनीटर असल्यांने माझ्यिंवर ही काही जबाबदारी होती।मी सरांच्या केबीनमध्ये जाऊन सरांजवळ झालेल्या प्रकाराबद्दल माफी मागीतली.तेव्हां सरांनी पालकांच्या सह्या घेऊन या तरच वर्गात बसायला मिळेल,अन्यथा नाही.
मग काय,आम्ही सारे एकत्र जमुन,प्रत्येकाच्या घरी जाऊन सह्या गोळा झाल्या.पण त्या सहज मिळाल्यि नाही,खुप बोलणी खावी लागली.शेवटी एका मित्राच्या घरी गेलो.त्याचे वडील बाहेरच बसलेले होते.त्यांनी आमचा विनंती अर्ज पाहिला.अन चष्म्यातून भेदक नजरेने आमच्याकडे पहात म्हाणले." जा तुमच्या सरांना जाऊन सांगा,परत घेत असेल तर येतो,नाहीतर दुसऱ्या शाळांची कमी नाही."लगेच तो अर्ज टराटरा फाडून टाकला.आमची तर पाचावर धारण बसली.
शेवटी मी मुलांसह परत धाडस करून सरांजवळ गेलो.त्यांनी सांगीतलं अर्ज आणला कां? मग मी त्यांना मान खाली घालून घडलेला प्रसंग सांगीतला.त्यांनी माझ्याकडे पाहिले,अन डोळे भिडवून म्हणाले."जा वर्गात जाऊन बसा.परत असं घडलं तर,एकालाही सोडणार नाही.
दहावीत असतांना,अजुन एक प्रसंग मला आठवतो.गँदरींगमध्ये आम्ही मुलंमुली मिळूनज एकांकिका बसवायचे ठरविले.पण मुलींना आमच्यातील देवीचे व्रण चेहऱ्यावर असलेल्या,गरीबीमुळे मळकट कपडे असलेल्या मुलाला बाहेर काढा,अशी अट घातली.पण हे आम्हांला मान्य होणे शक्य नव्हते.काही झालं तरी तो आमचा मित्र होता.
मग मुलींनी शाळेतल्या ज्येष्ठ रंगकर्मी सरांच्या मार्गदर्शनाखाली बांगलादेश युध्दात अत्याचार झालेल्या ,महिलांच्या व्यथा सांगणारं,त्यावेळच्या करंट विषयावरील एकांकीका बसविली.
आम्हीही आमच्या स्वत:च्या मार्गदर्शनाखाली डाँक्टल,रोगी,यम ही विनोदी एकांकिका बसविली.पहील्या राऊंडला आमच्या एकांकिकेने सर्वांना खुप हसविले.पण मुलींचा विषय गंभीर असल्याने कुणाच्या पचनी पडलं नाही.
पण त्या रंगकर्मी सरांनी,आमच्या एकांकिकेत एक वाक्य जे मधुचंद्रावरचं होतं ते अश्लिल आहे असं सांगीतलं,मग आम्ही त्या वाक्याच्या जागी भाऊबीज असा बदल करीत,दुसऱ्या राऊंडला बाजी मारून बक्षीस मिळविले.
बालपणीचे ते रेशमी बंध असलेले,सोनियाचे दिवस आम्ही कधीच विसरणार नाही.आम्ही सगळेच मित्रमैत्रिणी ,एका ऋणबंधनात अडकलेलो,फुलपाखरांप्रमाणे भुरभुर उडणारं बालपण,फुलांभोवती रूंजी घालत आठवणीचं मध शोषणाऱ्या
भुंग्यापरि आमची अवस्था होते .
बेहोष होऊन,सुर्यकिरणांवर स्वार होऊन साकार होणारं बालपण,ते मित्रमैत्रिणी, आमचे सर,आम्हांला सोडून गेलेले सोबती आजही आठवणीने डोळ्यात पाणी आणतात.
परमेश्वरा तुला काही मला द्यायचं असेल तर,माझं बालपण मला दे. मी सदैव तुझा ऋणी राहीन.