देव तारी त्यास
देव तारी त्यास


आज पण आठवतो मला तो दिवस,तो आठवला की माझ्या अंगावरती शहारे येतात. मी आमच्या मित्रांच्या बरोबर दुसऱ्या श्रावणी सोमवारी त्र्यंबकेश्वरला गेलो होतो. आम्ही ब्रम्हगिरीवर गोदावरी उगमस्थळाचे दर्शन घेण्यासाठी गेलो होतो.
आठ दहा दोस्त, त्यांच्या बायका मुले, असा सर्व लवाजमा बरोबर होता. लवकर सकाळी आम्ही त्र्यंबकेश्वरी पोहोचलो.अन नाश्तापाणी उरकुन लगेच ब्रहगिरी कडे निघालो,रस्त्यावर कुशावर्तावर गोदावरीचे कुंड आहे.अतिशय सुबक दगडात बांधलेले या कुंडात स्नान केल्यामुळे आपण सर्व पापातून मुक्त होतो,अशी धार्मिक धारणा आहे. असंख्य लोक तिथे पुजा अर्चना ही करीत होते.
काही जण पोहत होते,काही मधल्या पायरीवर उभे राहुन डुबक्या मारित होते. कुशावर्ताच्या लगतच्या रस्त्याने आम्ही, निवृत्तीनाथाच्या ,समाधी मंदीराकडे निघाले.पावसाच्या सरी एकापाठोपाठ येतच होत्या. नाथांचे दर्शन घेऊन आम्ही ,ब्रम्हगिरीकडे निघालो. ट्रिपचा मुड असल्याने,प्रत्येक जण आपल्या बायकोला बरोबर घेऊन गड चढत होते. पावसाचे धुंद वातावरण व ब्रम्हगिरी पर्वतावरून कोसळणारे झरे, ढगाचे पुंजके पाहुन , सर्वच खुशीत होते.माझ्या हातात माझी मुलगी होती.बायको मात्र हळुहळु पायऱ्या चढत होती.
सर्व मुलांचा उत्साह बघण्या सारखा होता.उत्साहाने ती भरभर चढु लागली.त्यांच्यात व त्यांच्या आईवडिलांत फारच अंतर पडले होते. पावसाच्या सर येताच मला,धोक्याची चाहुल लागली,अन झपझप मजल टाकित मी मुलांना गाठले.व हात पकडुन चालु लागलो.पावसाची सर येताच , मी त्यांना बाजुला खडकाजवळ बसवित होतो.एकुण दहा बारा मुले होती.माझी मुलगी लहान असल्याने कडेवर होती.मित्राच्या एका मुलीचा हात धरून वर चढु लागलो. मित्रांना हाका मारून पाहिल्या,पण खालुन काहीच प्रतिसाद मिळाला नाही. आता मात्र मी पुरता घाबरलो.दहा ते बारा मुले व मी एकटा बरोबर,ब्रम्हगिरी सारखा दुर्गम गड. मग मात्र माझे सारे लक्ष मुलांकडे केंद्रीत केले.सतत पडणाऱ्या पावसाच्या सरीनी,वाट निसरडी झाली होती.
कसेबसे मुलांना हाती घेऊन डोंगरमाथ्यावर पोहोचलो. माथ्यावर एवढे धुके होते की,समोरच दिसत नव्हते.मुलांना एकमेकांचे हात पकडुन,त्या अवस्थेत ही मी भगवान शंकरांनी आपटलेल्या जटांची निशाणी,वरील उगम स्थलावरील कुंडाचे दर्शन घेतले. तिथेच मी मुलांना एका जागी बसवून सर्वांची वाट पाहु लागलो. इकडे काही वेळाने मित्रांना मुलांची आठवण झाली. माझ्या व मुलांच्या नांवाने हाका मारू लागली,पण काही उत्तर न मिळता त्यांच्या ही तोंडचे पाणी पळाले. मला हाका मारितच ती गड चढु लागली.
इकडे गडावर येऊन आम्हांला बराच वेळ झाला तरी अजून कोणी येईना.दुपारच्या तीन वाजताच ढग व धुक्यामुळे संध्याकाळ भासायला लागली. आता मुलांना गडाखाली कसे न्यायचे ही काळजी मला लागली.काळजीने मी रडवेसा झालो. चिंतेने मी ग्रासुन महादेवाला आळवु लागलो. तेवढ्यात एक चमत्कार घडला जणु.समोरून एक वीस पंचवीस मुलांचा ग्रुपच्या लोकांनी मला पाहिले.मला व मुलांना पाहताच,परिस्थिती त्यांच्या लक्षात आली. त्यांनी मला विचारले,तुम्ही कां थांबले इथे,मुलांना घेऊन.मी थोडक्यात त्यांना सर्व परिस्थिती सांगितली. ती मला म्हणाली, " आम्ही घेऊ का मुलांना" ओळख ना पाळख,
तरी ,महादेवानेच माझ्या मदतीला पाठविल्या सरशी ती आली, प्रसंग बांका होता, मुले चढ तर चढली होती,पण पावसात उतरणे खुप अवघड असते,काही ही घडु शकले असते.मी मागचा पुढचा विचार न करता म्हणालो," उचला एकेकाला".त्यांनी पटपट त्यांना उचलले व मी तणावमुक्त होऊन,ब्रम्हगिरीवरून उतरलो.खाली उतरल्यावर मी अक्षरश: त्यांचे खुप आभार मानले,पैसे ही देऊ केले,पण नम्रपणे त्यांनी नाकारले,हा त्यांचा मोठेपणा होता.
आमची मित्रमंडळी नंतर खाली आली,ती ही खुप काळजीत होती.मुलांना सुखरूप पाहताच,त्यांचा जीव भांड्यात पडला. त्यांच्या बायकांच्या तर डोळ्यांत पाणी आले होते. मुले सुखरूप पाहताच,त्यांच्या आनंदाला पारावर राहिला नाही.
म्हणतात ना देव तारी त्यांस कोण मारी.
आत्याच्या घरी गेल्यावर आत्याच्या मुलांने आम्हांला खुप झापले." काय नवसबिवस केला होता काय, पावसांत मुलांसवे ब्रम्हगिरी चढायचा,अरे मुर्खांनो आम्ही इथले रहिवासी असून ही ,पावसाळ्यात ब्रम्हगिरी चढत नाही."
परंतु अंत भला तर सब भला असं म्हणतात,आत्याने खाऊ घातलेल्या साबुदाणा खिचडीवर अधाशासारखे तुटून पडलो.