Anil Chandak

Others

2  

Anil Chandak

Others

मी तिरंगा बोलतोय

मी तिरंगा बोलतोय

7 mins
16.2K


सव्वीस जानेवारी जोशात पार पडली. दिवसभर सकाळी झेंडावंदन, नंतर टि.व्ही.वरची राजपथावरची दिल्लीतील परेड पाहण्यास बसलो.

कडाक्याच्या थंडीतही असंख्य दिल्लीकर वाट पाहत होते.


आपल्या लष्कराची ताकद बघुन, आपले भविष्य सुरक्षित हातात आहे, हे पाहुन अभिमानही वाटला.

सांस्कृतिक कार्यक्रम, वेगवेगळ्या प्रांतातील झाकी पाहून मन थक्क झाले.


त्या दिवशी खुप थकल्यामुळे नेहमीपेक्षा लवकरच झोपलो होतो.


अचानक रात्री केव्हातरी कसल्याश्या आवाजाने मला जाग आली. आधी मला कळेना कुठून आवाज येतोय. पण काळ्याकुट्ट अंधारात काहीही दिसत नव्हते.


पुन्हा आवाज आला, मी त्या दिशेला पाहिले. "अरे, असा वेड्यासारखा काय करतोस. मी तिरंगा बोलतोय. तुमचा सर्वांचा राष्ट्रध्वज आहे. आजच अभिमानाने जनमनगण राष्ट्रगीत गाऊन मला स्तंभावर उंच फडकावले. अरे तिकडे पंजाबात तर सीमारेषेवर लोकांनी एवढा उंचावर मला उभारले की पाकिस्तानमधूनही लांबवरून दिसू शकेन.


अमृतसर जवळच्या वाघा बाॅर्डरवर तर असंख्य लोक रोज ध्वज उत्सवासाठी येतात, पलीकडे, पाकिस्तानीही त्यांच्या ध्वजासाठी येतात.


माझा इतिहास खुप जुना आहे. पारतंत्र्यात असताना सगळ्यात आधी देशभक्त मॅडम कामांनी मला जन्म दिला. त्यावेळेस माझे स्वरूप वेगळे होते. आजचे थोडे वेगळे आहे.

माझ्या अंगावर तीन रंगांनी भरलेला आहे.


भगवा रंग त्यागाचे प्रतिक, आध्यात्मिक शांती, राजसपणा, संन्यस्तपणा इत्यादी गुणांचे प्रतिक आहे.


मधला रंग पांढरा, अलिप्तता तटस्थता, निधर्मीवाद, शांतता, सहिष्णुतेचे प्रतिक आहे.


तिसरा रंग हिरवा हा समृद्धी, हरित क्रांती, भरभराटीचे, मांगल्याचे प्रतिक आहे.


मध्यभागावरचे निळ्या रंगातील चक्र गतिमानतेचे, प्रगतीचे प्रतिक आहे. जे चक्र अशोकाच्या स्तंभावरून घेतले आहे.


माझ्या जन्मापुर्वी पारतंत्र्यात वेगवेगळ्या जनसमुहांचे वेगवेगळे झेंडे असायचे. माझ्या येण्याने ही वेगवेगळ्या समुहांना एकत्र करण्याचे काम केले.


काँग्रेसची स्थापना 1885 साली सर अॅलन ह्युम यांनी केली. त्यानंतर देशभक्तांचा संघर्ष चालु झाला. ज्ञात-अज्ञात कित्येकजण, देशासाठी फासावर गेले. त्यांच्यासाठी ना कुणी अश्रू ढाळले. समाधीवर चिरा, पणतीही नशीबात नाही आली.


बंगालच्या फाळणीच्या वेळेस खूप मोठा जनआक्रोश झाला. दादाभाई व लाल, पाल, बाल या त्रयींनी सारा देश ढवळून काढला. शेवटी जुलमी व्हाॅईसराय लाॅर्ड कर्झनला फाळणी रद्द करावी लागली.


वेगवेगळ्या राज्यात क्रांतीचा उद्रेक सतत चालुच होता.

"स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे, अन मी तो मिळविणारच." असे म्हणत टिळकांनी ब्रिटीश सत्तेला आव्हान दिले. त्यामुळे त्यांना कारावासाची शिक्षा झाली.

मी लोकमान्यांना अगदी जवळून पाहिले. त्यांचे देहावसन झाल्यानंतर मला त्यांच्या देहाचा स्पर्श होताच, मी अंग अंग शहारलो.


पुढे आंदोलनाची सुत्रे गांधीजींच्या हाती गेली.


सुतकताई हा ग्रामविकासाला ऊर्जा देणारा गांधीजींचा संदेश असल्याने माझ्या अंगावर चरख्याचे निशाण बरेच दिवस होते. तो राष्ट्रीय काँग्रेसचा अधिकृत ध्वजच होता.


असहकार आंदोलन, दांडीमार्च, बिहारमधील चंपारण्यातील नीळ सत्याग्रह, बार्डोलीचे शेतकऱ्यांचे आंदोलन वल्लभभाई पटेलांच्या नेतृत्वाखाली झाले. जगाने आजवर सशस्र युद्धे पाहिली होती, पण गौतम बुद्ध, महावीर वर्धमानाची अहिंसा प्रत्यक्षात उतरविणारे जगातील पहिलेवहिले नेते महात्मा गांधी होते. मला त्यांचे कर्तृत्व खूप जवळून पाहण्याचा लाभ झाला.


लाहोरच्या काँग्रेस अधिवेशनात मी दोन तरूण नेत्यांची कारकीर्द घडतांना पाहिली. एक पंडीत जवाहरलाल नेहरू व दुसरे नेताजी सुभाषचंद्र बोस. नेताजींच्या कर्तृत्वावर साऱ्या देशाचा विश्वास होता, पण ते थोडेसे डाव्या विचारसरणीचे असल्याने महात्मा गांधींचे मन जिंकू शकले नाहीत.

पंडीत नेहरू हे मोतीलाल नेहरूंचे चिरंजीव, उच्चशिक्षित बॅरिस्टर, ऐश्वर्यसंपन्न राजबिंडे, सौम्य व्यक्तिमत्वाचे धनी होते. वेगवेगळ्या विषयांचा अभ्यास असल्याने साहजकिच महात्मा गांधींचा कल त्यांच्याकडे झुकला.


जालियनवाला बागेत तर, जनरल डायरने मला हातात घेतलेल्या निरपराध स्री-पुरूष, मुलांबाळावर गोळ्या घालुन हत्या केली. त्यांचे हुंदके, प्राणांतिक वेदना, किंकाळ्या आजही माझ्या मनात घर करून राहिली आहेत. त्यामुळे त्या रक्ताच्या थेंबाथेंबातुनी असंख्य क्रांतीवीर देशासाठी काहीही करण्यास प्रवृत्त झाले.


1942 ला गांधीजींनी ‘चले जाव’चा लढा आरंभिला. मला हातात घेत गावागावातील स्वातंत्र्यसैनिक सशस्र इंग्रजांसमोर लढा देण्यास उतरले. हजारो, लाखोंना कारावासात टाकले गेले. भगतसिंग, राजगुरूसारखे असंख्य क्रांतीवीर ‘मेरा रंग दे बसंती चोला’ म्हणत फासावर गेले.


दुसरीकडे नेताजी सुभाषचंद्रांनी जपान व जर्मनीबरोबर हातमिळवणी करून ‘आझाद हिंद सेने’ची उमारणी केली व सिंगापूरपासून ते इंफाळ,कोहीमापर्यंत भारताच्या पूर्व सीमेवर सशस्र लढा आरंभिला. आता मला जगातील बऱ्याच राष्ट्रांनीवअधिकृत ध्वज म्हणून मान्यता दिली.


इंग्रज सरकार, दुसऱ्या महायुद्धाने बेजार, कंगाल राष्ट्र झाले होते. ब्रिटीश साम्राज्यावरचा सुर्य मावळू लागला होता. नौदलाच्या सैनिकांनी बंड केल्यानंतर तर ते आणखीन हादरून गेले.


पण सुंभ जळाला तरी पीळ गेला नव्हता. इथून जाता जाता, या भारतभूची फाळणी करून गेले. गत शतकातला भीषण रक्तपात, जाळपोळ, माणसाचा जंगली श्वापदाचा मुळ स्वभाव उफाळून आला. बलात्कार, लुटालुट, हरवलेली माणुसकी, हैवानियतचा नंगानाच जगाने पाहिला.


आता त्यांनी आम्हाला स्वातंत्र्य देण्याचे कबुल केले होते. घटनासमितीने ठरविल्याप्रमाणे, माझ्या मध्यभागी अशोकचक्र आले.


शेवटी 15 आॅगस्ट 1947 ला मी स्वतंत्र भारतात स्तंभावर चढु लागलो. त्याचवेळेस ब्रिटिशांचा अजिंक्य युनियन जॅक उदास चेहऱ्याने उतरत होता. त्याची मस्ती धुळीस मिळाली होती.


मी शिखरावर असताना माझ्यावर भगतसिंग, राजगुरू, चंद्रशेखर आझाद, टिळक, चाफेकर, फडके, झाशीची राणी, तात्या टोपे माझ्यावर पुष्पवृष्टी करीत होते. ‘वंदे मातरम’ म्हणत माझे स्वागत करीत होते. जण गण मनच्या सुरांच्या लयीवर मी तरंगत होतो.


त्यावेळेस स्वतंत्र भारताचे पहिले पंतप्रधान यांचे नियतीशी करार हे जगप्रसिद्ध भाषण ऐकण्याचा सुवर्णकांचन योग मला आला. तो दिवस करोडो भारतवासियांच्या मनातील हुंकार होता. अन माझ्याबरोबर हवेत तो ही तरंगत होता. आता कोणा स्वातंत्र्यवीराला माझे ध्वजवंदन केले म्हणून गोळ्या घालणार नव्हते. देशात आनंदाचे वातावरण होते. जणू रामराज्यच अवतरले होते. दिडशे वर्षांच्या गुलामगिरीनंतर हा दिवस उजाडला होता.


पण हा आनंद फार दिवस टिकला नाही. फाळणीने दुखावलेल्या एका देशबांधवाच्या गोळीने महात्मा गांधीजींच्या छातीचा वेध घेतला. "हे राम" म्हणत महात्म्याने जगाचा निरोप घेतला. सारे जग हळहळले. त्यांच्या कृश कलेवराला मला गुंडाळले तेव्हा मी धाय मोकलुन रडलो. अंत्यदर्शनाला लाखोंची गर्दी लोटली. बापु आमचे कसे होईल, आता या देशाचे काय होईल, त्यांच्या मनाचा आक्रोश पाहवत नव्हता.


पुढे 26 जानेवारी 1950 ला भारत देश प्रजासत्ताक राष्ट्र झाले. जगातील सर्वात मोठी लोकशाही अस्तित्वात आली. आता मला दोन राष्ट्रीय सणाच्या दिवशी अभिवादन मिळु लागले. एक पंधरा अांगस्टला पंतप्रधानांच्या हस्ते लाल किल्ल्यावर, दुसरे सर्वोच राष्ट्रपतींच्या हस्ते 26 जानेवरीला.


भारतमाता असंख्य लढाऊ नररत्नांची भूमी, तिला कधी पुत्रांची कमी पडली नाही. आता पंचशील तत्वाचा कालखंड आला. साऱ्या जगात आता मला मान होता. पंचवार्षिक योजनांनी देशात कामे चालु झाली होती. मोठमोठी धरणे, कलासंस्कृती कृषी क्षेत्र विस्तारत होते. आपण साऱ्या जगात उच्चस्थानी आहोत असे वाटत होते.


बासष्ट साली मात्र हा भ्रमाचा भोपळा चिनी आक्रमणामुळे फुटला. आमच्या देशाचा बराच भूभाग चीन ने बळकावला. सैनिक खुप शौर्याने लढले, पण तुटपुंज्या साधनांवर युद्धे जिंकता येत नसतात. पुन्हा एकदा देशाने शहीदी पाहिली. माझ्यात लपेटून जेव्हा शवपेट्या गावागावांत गेल्या, तेव्हा चीनविरुद्ध वातावरण निर्माण झाले. याचा धक्का बसुन चाचा नेहरूंनी जगाचा निरोप घेतला. देश पुन्हा एकदा पोरका झाला.


ध्यानचंदसारख्या खेळाडुंनी, आॅलिंपिकमध्ये सुवर्णपदक मिळवुन दिले, त्यावेळेस जगातल्या इतर ध्वजापेक्षा जेव्हा झेंडा उंचावला, त्यावेळेस माझी छाती भरून येते. व्यक्तिगत स्पर्धामध्येही जे जे खेळाडु, कलाकार यांनी मला सर्वोच पुरस्कार मिळवुन दिला, त्या त्या सर्वांच्या ऋणात मी कायमच राहिन.

1965 च्या युद्धात, आपल्या सेनेने, लाहोरच्या वेशीला धडक मारली. अटकेच्या किनाऱ्यावर फडकण्याचे भाग्य मला लाभले.


ज्या पंतप्रधान लालबहादूर शास्रींनी हे रण जिंकुन दिले, त्यांच्या निर्जीव कलेवराला, माझ्या वस्रात गुंडाळून भारतात आणले, तो हृदयद्रावक प्रसंगही मी पाहिला. त्या वीरपुत्राच्या सान्निध्यात मी धन्य झालो.


1971 ला भारतीय सेनेने आपल्या अतुलनीय शौर्याच्या जोरावर, बांगलादेश निर्माण केला. पूर्व पाकिस्तान नकाशावरून पुसून टाकले. जवळजवळ एक लाख पाकिस्तानी सैनिकांनी नि:शस्र उभे राहून मला सलामी दिली.


त्यानंतर आणिबाणी आली. व्यक्तिस्वातंत्र्याची गळचेपी झाली. व्यक्तिस्तोम खुप माजले.


आणिबाणीच्या आधी एक गौरवपूर्ण घटना घडली. भारताने अणुस्फोट करून आपण बलशाली झाल्याचे प्रमाण जगाला दिले. पण जगातील मोठ्या राष्ट्रांनी आपल्याला काळ्या यादीत टाकले. 


जनता हीच सर्वोच्च आहे, लोकशाहीत तिने आपली ताकद दाखवुन दिली. जनता पक्षाचे आघाडीचे सरकार पहिल्यांदाच येथे गादीवर आले.


पण आपापसातील लाथाळीमुळे ते पुरते पाच वर्षेही टिकले नाही. पुढच्याच निवडणुकीत इंदीरा गांधींचे सरकार परत स्थापन झाले.


याच दरम्यान आपल्या शास्रज्ञांनी आर्यभट्टाचे प्रक्षेपण करून, मला अंतराळातही स्थापित केले.


त्यानंतर अनेक वेळा सरकारे बदलली. आता राज्यकर्त्यांतील सेवाभाव नष्ट झाला होता. अन घोडेबाजाराचे सगळीकडे खूप महत्व वाढले. देशभक्ती तर केव्हाच लोप पावली. ध्येयवाद संपून भोगवाद फोफावला.


भ्रष्टाचार, अनाचार बोकाळला. जातीजातीतील तेढ रूंदावली गेली. चमचेगिरी, सत्तालोलुपता वाढली. गांधीजींची तीन माकडे तर केव्हाच गायब झाली. कायद्यानेही गांधारीची पट्टी डोळ्याला बांधली.


अशात जन्मजात शत्रु पाकिस्तान प्राॅक्सी वाॅर खेळत होता. सैनिक मात्र कर्तव्यनिष्ठेने, शहीदी पत्करत होते. त्या शहीद सैनिकांच्या कलेवराबरोबर जेव्हा मी जायचो तेव्हा मला भरभरून यायचे.


अशात कारगीलचे युद्ध झाले. एक एक घुसखोर टिपून आमच्या सेनेने रणकौशल्य दाखवुन, दास सेक्टरमधल्या सर्वोच्च शिखरावर पुन्हा पहिल्यासारखा मी फडकु लागलो.


पण सैनिकांना श्रेय देण्यापेक्षा राजकारण्यातच आम्ही केले, आम्ही केले अशी स्पर्धा लागली. त्यामुळे मला फार वाईट वाटायचे.


प्रांतवाद, भाषावाद, सीमावाद, जातीभेद उफाळुन येत राहिले.


पण विज्ञानाच्या प्रगतीने सारे जग जवळ आले. येथील उच्चशिक्षित युवकांनी मला साऱ्या जगात उंचावर नेले. दुसरी हरित क्रांती, दुग्ध क्रांती घडुन आली. आज अशी परिस्थिती आहे की आपली अर्थव्यवस्था जगात तिसऱ्या-चौथ्या क्रमांकाची अर्थव्यवस्था बनलो आहोत. पुर्वी आपण विकसनील राष्ट्र म्हणून जगात नरोटी घेत भिक मागत होतो, आज जग आपल्याकडे आशेने पहात आहे. त्यामुळे क्षणोक्षणी माझी मान उंचावते आहे.


हायवे, एक्सप्रेस वे, जलमार्ग, सुलभ विमानप्रवास आता श्रीमंती चैन राहिली नसून, सर्वसामान्य नागरिकही त्याचा प्रभावीपणे वापर करीत आहे.


भारत आता युवकांचा देश समजला जातो. येथील भरलेले, गजबजलेले मार्केट जगातील व्यापारी कंपन्यांना खुणावत आहे.


हे पाहून मला भरते येत आहे, माझा युवाशक्तीवर पुर्ण विश्वास आहे. ते पुन्हा एकदा देशाला सुवर्णकाळ दाखवतील याबद्दल माझ्या मनात जरादेखील शंका नाही.


बरे आता खूप बोललो तुझ्याशी. बऱ्याच दिवसात कोणाशी बोललो नव्हतो.


जातो आता, सुखाने राहा, जय भारत, जय हिंद...


असे म्हणत तो नाहीसा झाला. अन मी रडवेल्या डोळ्यांनी बाय बाय करीत हात हलवू लागलो.


मी डोळे उघडुन पाहतो तर, बायको म्हणत होती. अहो, असे वेड्यासारखे काय करता. वाईट स्वप्न पाहिले का?


मी आहे आमची एक गंमत म्हणत, तिला जवळ ओढले. अन पुन्हा तिच्या करपाशात गाढ झोपी गेलो.


Rate this content
Log in