स्त्रियांच्या जाणिवा उणीवा
स्त्रियांच्या जाणिवा उणीवा


पूर्वीच्या काळी आपली आजी, आई वयस्कर स्त्रिया पहाटे उठून जात्यावर दळतांना ओव्या म्हणायच्या.
स्त्री असते गं बाई,
घराचे घरपण !
मायेचे दर्पण !
आईच्या हृदयात !!
आजी, आई, सखी, गुरू, सहचारीणी, मुलगी, नात, पुतणी, भाची अशा विविध रूपात स्री आपल्याला आयुष्यांत भेटते.
अगाध तुझा महिमा,
आदीशक्ती, जगताची जननी!
दिशादर्शक, प्रेरणा जगताची !
त्रिखंडी, गाजतो डंका,
झुगारूनी, पुरूषी वर्चस्वाला,
रणरागिणी, स्रोत संस्काराची !!
पुराणात, उपनिषदात ही स्त्री शक्तीचा गौरव केलेला आढळतो. तिला देवतुल्य मानून,तिचे महात्म्य वर्णिलेले आहे. पण तिच्या शक्तीकडे आपले दुर्लक्ष झाल्यामुळे आपण हजारो वर्षे पारतंत्र्यात खितपत पडलो होतो.
सरंजामशाही व राजे महाराजांच्या काळात स्त्रियांचे स्थान दुय्यम होते. चुल मुल , पती हाच परमेश्वर माना, रांधा वाढा, उष्टी काढा या पलीकडे स्त्रियांना स्थान नव्हते. तिच्या पायात बंधनाच्या मणामणाच्या बेड्या पडलेल्या होत्या. पुरूषांचे विवाहबाह्य संबध, अंगवस्त्र ठेवणे समाजमान्य होते. पण स्त्रीचे शील तिच्या अब्रुवरच आधारलेले होते. तिचे शरीर ही तिच्या नवऱ्याची, मालकाची मान्यता समजली जायची. बालविवाह, विधवापण, सतीची चाल, सारख्या वाईट चालीरिती समाजात होत्या. घराच्या उंबरठ्याआड तिचे भावविश्व गुंतले होते.
त्या काळात ही राणी लक्ष्मीबाई, सीता द्रौपदी, राजमाता जिजाबाई, अहिल्या होळकर, रणरागिणी ताराराणी, चांदबिबी, राणी चिनम्मासारख्या महिला आपल्या कर्तृत्वाने झळाळुन निघाल्या. आजही आपला देश त्यांना पूज्य मानतो.
राजा राममोहन रॉय, सावित्रीबाई फुले, महात्मा फुले, राजर्षी शाहु महाराज, महर्षी धोंडो केशव कर्वे यांसारख्या महापुरूषांनी स्त्रियांना प्रगतीचा रस्ता दाखविला.
सावित्रीबाई फुलेंनी तत्कालीन समाजाचा रोष सहन करीत घोर कष्ट उपसून स्त्रियांना शिक्षणाचे द्वार खुले करून दिले.
सावित्री गं लेक,
तुझं बाई वरदान !
गाती गुणगान !
अवघ्या विश्वात !!
देशात स्वातंत्र्य युध्दात, झाशीची राणी लक्ष्मीबाई, मादाम कामा, कॅप्टन लक्ष्मी सेहगल, सरोजिनी नायडू, कस्तुरबा गांधी .यांसारख्या महिलांनी भाग घेतला होता. तरीही सामान्य स्त्रियांचे भावविश्व पिता, भाऊ, पतीच्या छायेत गुंतलेले होते.
लेक एकाची, सून दुसऱ्याची,
वेल चढवी, वंशाची!
भोग भोगते सतीचे,
जरी आधार सृष्टीची !!
ग्रामीण भागातील स्त्रियांचे आयुष्य, शेणकुर काढणे गायीम्हशींचे दुध पहाटे उठून चरवीत काढणे आदी कष्टदायक कामे, स्वयंपाक, मुलांना जन्म, संगोपन, पालनपोषण, संस्कार, शेतीवरची अडेल नडेल कामे यातच अडकले होते. पण आज बदल घडतो आहे.
७३ वर्षे झाली स्वातंत्र्य मिळून आपणांस असे दिसते की स्त्रियांच्या सामाजिक, राजकिय कक्षा रूंदावल्या आहेत. स्त्रियांना 33 टक्के आरक्षण मिळाल्यापासून ती प्रगती झाली आहे. तरीसुध्दा विधानसभा व लोकसभेत स्त्रियांना जागा हाताच्या बोटावर मोजण्या इतपतच आहेत. कोणत्याही राजकिय पक्षाने त्यांचे महत्व जाणलेले दिसत नाही. अन् ज्या स्त्रिया आहेत त्या घराणेशाहीच्या वारशातूनच आलेल्या दिसतात.
एवढं असूनदेखील स्त्रिया ग्रामपंचायत, जिल्हा परिषद, लोकसभा विधानसभेत सशक्तपणे काम करताना दिसतात. कॉर्पोरेट जगत, औद्योगिक जगत, मनोरंजन, क्रिडा या साऱ्या क्षेत्रात स्त्रिया पुरूषांना मात देत देशाचा झेंडा विश्वात उंचावत आहेत. पुरूषांच्या खांद्याला खांदा लावून कामे करीत आहेत.
उपेक्षित, वंचित, शेतमजूर स्त्रियांची स्थिती तर पूर्वी अत्यंत दयनीय होती. पण बाबासाहेब आंबेडकरांनी केलेल्या कायद्यांमुळे त्यांचे जीवनमान उंचावलेले दिसत आहे. मुस्लिम स्त्रियांची अवस्था तर अत्यंत बिकट आहे. मध्ययुगात वावरणारा मुस्लिम समाज, त्यांना बुरख्यात ठेवून स्त्री स्वातंत्र्याची बोटचेपी करत़ो. तलाकसारख्या अमानुष कायद्यांनी त्यांचे जीवन असुरक्षित करतो. सरकारने कायदे जरी केले तरी मुल्ला मौलवींचे वर्चस्व मानणारा समाज कितपत नवीन कायद्याला किंमत देईल, हा अभ्यासाचा विषय आहे. तरीही बचतगटांमुळे ग्रामीण व नागरी स्त्रियांचे आयुष्य बदलत आहे तिला आत्मशक्तीचे भान आले आहे. शिक्षणाचे महत्व वाढले आहे.
आहे नारी मी सबला! नाही राहिली अबला!
समजू नका निर्बला! आहे मी स्वयंसिध्दा!!
स्त्रिया मुळात कुटुंबाचा कणा, गृहिणीची जबाबदारी पार पाडताना तिला प्रत्येक गोष्टीत बारकाईने लक्ष घालावे लागते. तिच्या काटकसरी वृत्तीमुळे अगदी कमी खर्चात घर चालवू शकते.
नातेसंबंध सांभाळुनी,
सुख, साऱ्यांनाच देते !
सगळ्यांचे करताना,
अविश्रांत ती राबते !!
आज टिव्ही मोबाईल मीडियातील क्रांतीमुळे, सारे जग जवळ आले आहे. जातीजातीतल्या भिंती कोलमडून पडत आहेत. आंतरजातीय विवाहांनाही काही अपवाद मानता लोक स्वीकारत आहेत. आता पूर्वीसारखं घर कमी खर्चात चालविणे सोपे राहिलेले नाही. शिक्षण, करमणुक, पर्यटन, शॉपिंग यांचे प्रमाण खूप वाढले आहे. त्यामुळे अर्थार्जनासाठी स्त्रियांना घराबाहेर पडणे आवश्यक झाले आहे. आज स्त्रियांनी आपल्या कर्तबगारीने पुरूषांवर प्रत्येक क्षेत्रात मात दिली आहे. आज आपल्या चांद्रयान मोहिमेत शास्त्रज्ञ बनून स्त्रिया कार्यरत आहेत. आपल्या देशाची अर्थमंत्री एक स्त्रीच आहे. अगदी सीमेवरसुध्दा देशाच्या रक्षणाचा भार स्त्रिया उचलत आहेत. जी कामे आजपर्यंत पुरूषांचीच मानली जायची.
यंदा 26 जानेवारीला, परेडमध्ये पुरूषांच्या तुकडीचे संचालन एक स्त्री करीत होती, हे भारताच्या उज्वल भवितव्याचे चिन्ह आहे. तरीसुध्दा स्रियां खूप समर्थ झाल्या, अन् समाजही खूप बदललेला असा दिसत नाही. रोज वर्तमानपत्र उलगडून पाहिले की, स्त्री अत्याचार, लैंगिक शोषण, बलात्काराच्या घटनांत वाढ होताना दिसत आहे. पुरूषप्रधान समाजाची मानसिकता बदलण्यास तयार नाही. भृणहत्यांनी स्त्रियांचे प्रमाण कमी झाल्यामुळे, त्याचे परिणाम समाजाला भोगावे लागत आहेत. लग्नासाठी मुलीच मिळत नसल्याने हुंडाबळीत थोडी घट झाल्यासारखी वाटत आहे. पण एकत्र कुटूंबपध्दती मोडल्यामुळे घटस्फोटाचे प्रमाण खूपच वाढलेले आहे. घटस्फोटीत स्त्रियांचे प्रश्न हा चिंतनाचा विषय झाला आहे. कायद्याने कितीही संरक्षण दिले तरी, नैसर्गिक दुर्बलतेने स्त्रिया अत्याचाराच्या शिकार होताना दिसतात. अर्थात काहीवेळा यात स्त्रियांचीही चुक असते. कधी भावनेने, कधी लोभ मोहाने, प्रेमबंधनात फसून, यात गुंतल्या जातात. मानवी समस्यांचा गुंता दिसतो तेवढा सोपा नाही. तरीही स्त्रिया आज प्रगतीची उंच भरारी घेत आहेत, ही अभिमानाची गोष्ट आहे.
दु:खे, पचवी अनेक,
माय, सावित्रीची लेक !
मार्ग, नारी उद्धाराचा,
ध्यास, भारताचा नेक !!
आजच्या महिला दिनी स्रीशक्तीला अभिवादन करून एकच गोष्ट सुचवीतो.
उंबरठा ओलांडुनी,
कर आव्हान जगाला !
कर्तृत्वाने उजळत,
हात लाव क्षितीजाला !!