अती तिथे माती
अती तिथे माती


नुकतंच माझ्या वाचनांत डाँक्टर श्रीकांत मुंदरगी यांचे ट्रँजेडी क्विन मीनाकुमारीवरील पुस्तक वाचण्यांत आलं.
मीनाकुमारी करोडो रसिकांच्या मनांवरती राज्य करणारी गुणी अभिनेत्री.
अगदी पाकिस्तानच्या त्यावेळचे पंतप्रधान झुल्फिकार अली भुट्टोंनीही मान्य केलं की, पाकिझा सारखा चित्रपट आम्ही बनवुच शकत नाही.
अभिनेत्री बरोबर तिला वाचनाची खुप आवड होती. शुटिंग च्या फावल्या वेळात ती खुप पुस्तकं वाचायची. तिने रामायण, महाभारत, कुराण,बायबल सारखे ग्रंथ ही वाचले होते. तिला पुराणातील सर्व कथा माहिती होत्या. त्यामुळे ती पात्रे साकारतांना ती सहजगत्या त्यात प्राण फुंकायची व भूमिका अमर करायची.
तिचे आईवडील,आई हिंदु प्रभावती व वडील मुस्लिम अलिबक्ष होते.आईने लग्नानंतर धर्म बदलुन इक्बाल बेगम हे नांव धारण केले.ती एक यशस्वी नृत्यांगना होती.नवराबायको दोघे मिळून कामं करायचे.भरपुर कमाई असायची त्यांची.धर्म जरी वेगवेगळे होते,तरी आत्मा अस्सल कलावंतांचा होता.
कादंबरी जशी आपण पुढे ,वाचत जातो,मीनाकुमारीच उर्फ मेहरजबीनचं आयुष्य आपल्यासमोर साकार होतं.त्या काळांतील देशांतील वातावरण, ही समजते.
आईवडील दोन्ही कलावंत असल्याने तिला ही सिनेसृष्टीची आवड असली,यात नवल काय.एकदा घरांसमोर असलेल्या मोठा स्टुडीओ पाहण्यांसाठी,सुरक्षा कर्मचाऱ्याला खाऊची लालुच दाखवुन,आत जाऊन सर्व स्टुडीओ पाहुन येते.त्यामुळे कँमेरा,तेथील वातावरण,यांची तिला माहिती झाली.
शाळेतील अभ्यासांत ही ,तिची खुप प्रगती होती.पण दुसऱ्या महायुध्दाचे दिवस असल्यांने मंदीत तिच्या आई वडीलांचे उत्पन्न कमी झाले.खाणारी तोंडे पुष्कळ,अन कमाई कमी.तेव्हां मेहरजबीनची शाळा सुटली व बालकलाकार म्हणून ती काम करू लागली.तिला बेबी मीना हे नांव मिळाले.
तिच्या बहिणी ही दिसायला चांगल्या असल्यांने त्या ही काम करू लागल्या.
तिच्या पहिल्यांच चित्रपटाला ,तिला 25 रूपये पगार मिळाला.चित्रपट ही चालल्यामुळे बालभूमिकेंची रांग लागली.कँमेऱ्यासमोर बिनधास्त वावर,संवादांची फेक,विषयांची जाण,या साऱ्या गोष्टींची तिला मदत होत राहिली.
तिच्याबरोबर या दिवसांत दुसऱ्या ही बालकलाकार होत्या,त्यातिल बेबी मुमताज,नंतर झालेली मधुबाला व दुसरी कक्कु हिला नृत्याची विशेष जाण होती.तिच्याकडुनच ती पाहात नृत्य शिकली,जरी तिची पहिली गुरू तिची आईच होती.
कादंबरी पुढे सरकते,ती तारूण्यात पाय ठेवते. तो काळ भारताच्या फाळणीचा होता.अत्यंत अस्थिर व अविश्वासाचे वातावरण होते.बंधुभाव नष्ट झाला होता.
आता वय वाढल्याने त्या बाल भूमिकेतील तिची गरज संपली होती.त्या दिवसांत तिच्या आईला कँन्सर होतो,व सारी कमाई आजारांवरती खर्च होऊ लागली.
तेव्हां विजय भट्ट नावांचे दिग्दर्शक जे बालपणापासून तिचे गाँडफादर होते,ते तिला एका चित्रपटात भूमिका देतांत.ती भूमिका असते देवी लक्ष्मीची,तिला वाचनांमुळे त्या भूमिकेतील खोली समजुन,तिने काम केले. तिचा चित्रपट यशस्वी झाला.अन तिला ही चांगल्यापैकी लोकप्रियता मिळांली.जिथे जाईल तिथे, भाबडे देवभोळे लोक तिच्या पाया पडायचे.ती मुस्लिम आहे हे ही लोकांना पटायचे नाही.हाच अनुभव पुढे जय संतोषी माँ या चित्रपटातील मुख्य नटीलाही आला.
कादंबरी पुढे सरकते,त्यात फिअरलेस नादीयाचा ही उल्लेख येतो,कशी एक आँस्ट्रोलियन नटी बाँलीवुडमध्ये येते.आपल्या अभिनय सामर्थ्यांने ती बाँलीवुडमध्ये स्थान मिळवते व होमी वाडिया, या नामवंत दिग्दर्शकाबरोबर विवाह करून येथेच स्थिरावते.हीच हंटरवाली नादीरा,मीनाकुमारीच्या अभिनयाचे बारकावे समजुन,नवऱ्याला तिला भूमिका द्यायला लावते.
नंतर अशोककुमारच्या महल या चित्रपटाचा उल्लेख येतो.खुप गाजला त्या काळांत,अन बेबी मुमताज उर्फ मधुबालाला ब्रेक मिळून ती नामवंत नटी म्हणून ओळखली जाऊ लागते.अन ज्या दिग्दर्शकामुळे हे घडते,त्या कमाल अमरोहीचं,बालपण,कारकिर्द,आपल्यां समोर रोमहर्षक पध्दतीने मांडले जाते.
कमाल अमरोही यांचे राजबिंडे रूप,कर्तृत्व, सारे मीनाकुमारीला आवडुन जाते.तिच्या बहिणी ही ,तिला ती व्यक्ती विवाहित असून त्याला पहिल्या पत्नीपासून तीन मुले आहेत.याची जाणिव करून देतात.अर्थात तिच्या पित्याला याची खबर ही नसते. यौवनाच्या वेशीत आलेल्या मीनाला पुरूषी सहवासाची ओढ लागलेली असते.असंच महाबळेश्वरला शूटींग साठी गाडी चालवितांना कशी ती कमालच्या विचारात हरवते.अन तिचा गाडी एका झाडावर आदळते व त्याच वेळेस तेथून जात असलेला तरूणींच्या ह्रदयांवर राज्य करणारा देव आनंद तिला पुण्यात ससुनला घेऊन जातो,तिचे प्राण वाचवीतो,हा रोमहर्षक भाग आला आहे.
मीना कमाल अमरोहींच्या प्रेमात एवढी दिवानी होते की,तिला कुणाची पर्वा नसते.अर्थात ती ह्या प्रेमाची भानगड वडील अलीबक्ष पासून ही लपवुन ठेवते.कारण ते कधी ही तीन मुलं असलेल्या इसमाला आपली मुलगी द्यायला व उत्पन्न देणारी सोन्याची कोंबडी सोडायची,शक्यता कमीच होती. कारण साऱ्या घराचा डोलारा मीनाच्याच कमाईवर अवलंबुन असतो.आई तर कधीच अल्लाला प्यारी झालेली होती.
प्रेम प्रकरण खुप रंगत जाते.वडीलांना समजु नये म्हणून उत्तररात्री फोनवरून प्रेमकुंजनात रंगतात.अन एके दिवशी ती गुपचुप त्यांच्याबरोबर निकाह लावते,पण ते ही जगाला न समजता.रोजचे व्यवहार सूरळीत चालु असतात.कोणांला न समजता.
अर्थात जरी निकाह झाला तरी तो करण्यापुर्वी पारंपारिक धार्मिक स्वभावामुळे कमाल तिला खुप अटी घालतात.
परपुरूषांबरोबर फिरू नये.पार्ट्यांत जाऊ नये वगैरे.प्रेमात धुंद झालेली मीना सर्व अटी तेव्हां मान्य करते.
शेवटी एक दिवस वडीलांना समजतेच,तेव्हां तिला या घरात काही स्थान नाही,असे बजावतात. तेव्हां अंगावरच्या कपड्यांनिशी घर सोडुन पतीच्या घरी यावे लागते.
इतके दिवस वडील व्यवहार पाहात होते,आता पती पाहु लागले.तिची स्वत:ची कमाई असून फक्त गरजेपुरतेच पैसे ती वापरू शकायची.
ही मीनाकुमारीच्या आयुष्यांतील शोकांतिकाच आहे.तिला तिच्या जवळच्यांनीच खुप लुबाडले.
दिवसरात्रीत तीन तीन शिफ्ट,या स्टुडीओतून त्या स्टुडीओत, जाणे,खुप कष्ट उपसायची ती.
जागरणांमुळे तिला निद्रानाशाचा विकार जडतो.फँमिली डाँक्टर तिला झोपण्यापुर्वी रोज ब्रँडीचा एक पेग घेण्यांचा सल्ला देतो.पण हा एकच प्याला ,सिंधुच्या तळीरामाप्रमाणे तिचे आयुष्य बरबाद करणारा असतो.
मीनाकुमारीस गाड्यांचे खुप वेड असते.एकदा फिल्म अभिनेता प्रदीपकुमार आपल्या नवीन इंम्पोर्टेड गाडीमधुन तिला राईड करवतो.
मीनाकडून कमालच्या अटीचा भंग होतो.तो तिला खुप बोलतो.मीनां ही त्याला,पाण्यांत पडल्यावरती माश्यांशी वैर कसे घेता येते.अभिनयात माझा प्राण वसला आहे असे ठणकावून सुनावते.तात्पुरता तो शांत बसतो.पण पुढे असेच प्रसंग ओढावतात तेव्हां कमाल फोनवरूनच तलाक,तलाक,तलाक तीन वेळा उच्चारतो.मग मात्र मीनाकुमारी, पतीचं घर सोडून तिची बहिण मधु व त्याचा पती काँमेडिअन मेहमुदच्या घरी येते.आता तिचे व्यवहार इथे ही मेहमुदच्या हातात जातात.
तरीसुध्दा तिची फिल्मी कारकिर्द जोरात चालू असते. ती तिच्या काळची सुपरस्टारच होती.तिचा शब्द बाँलीवुडमध्ये प्रमाण मानला जायचा.तिने अनेक उभरत्या अभिनेत्यांना टेकु देवून वर आणले,त्यापैकी धर्मेंद्र हा एक.तिच्या व धर्मेंद्रच्या प्रेमकहाण्या सिनेपाक्षिकांचे खाद्य होते,त्यावर ती चालत होती. मीनाकुमारीला गझल लिहीण्यांचा शौक असल्याने गुलजारशी तिचे सुत जमले, यांत नवल कोणते.पुढे भविष्यांत मृत्यू समोर दिसायला लागला ,तेव्हां ती आपल्या लिखाणांच्या वह्या गुलजारकडेच देते.
राजेंद्रकुमार,राजकुमार,या साऱ्या अभिनेत्यांबरोबर ती खुल्लमखुल्ला लफडी करीत होती.तरी तिच्या शेवटच्या आजारपणांत एक ही जण तिला मदतीचा हात देण्यांसाठी पुढे आला नाही.जणु फुलांतील रस संपल्यानंतर भुंग्यांनी तिचा अव्हेर केला होता.
तिचे पिणे ही खुप वाढले होते,तरी ही ती पाच वेळा फिल्मफेअर पुरस्कार मिळवलेली, फिल्मफेअरची तर पहिलीची पुरस्कांरप्राप्त नटी होती,अन दरवर्षी नामांकनात ही तिचे नांव अग्रणी होते.
मद्य खुप प्रमाणांत प्राशन करून ही ती कँमेऱ्यासमोर उभी राहायची,ती वेगळीच व्यक्ती भासायची.
साहिब बीबी गुलाममधली छोटी बहुची भूमिका तिला सर्वोच सन्मान देणारी ठरली,तरी त्या चित्रपटात दारूड्या पतीला वेश्यागमनापासून थांबविण्यासाठी एकच प्याला हातात घेते व मादक नृत्य ही करते, जणु नियतीच तिचं भविष्य सांगुन गेली. तसंच प्रत्यक्ष जीवन ही दारूमुळे उध्वस्त झाले. ती कधी दारूमुळे बेहोष होईल,आजारी पडेल,नुकसान आपल्याला भोगावे लागेल या भीतीने , निर्मात्यांवर परिणाम झाला.तिला चित्रपट मिळेनासे झाले.आता शरीर खंगत चालल्यामुळे तिला काही दुय्यम भूमिका ही कराव्या लागल्या.
एकदा ती खुप आजारी पडली तेव्हा तिच्या लिव्हरवर इंग्लडमध्ये आँपरेशन केले गेले.बरी झाल्यानंतर त्या डाँक्टर तिला सल्ला देतात,तुला ज्या दिवशी मरावेसे वाटेल,त्या दिवशी दारू पी असं कडक शब्दांत तिला वाँर्निंग दिली. तिचा इंग्लडमधील खर्च ,स्वितझर्लंडमधील हवापालटचा खर्च तिचे चाहत्यांनीच तिच्या वरच्या प्रेमापोटी केला.
पण तरी ही आल्यानंतर ती तिचे व कमाल अमरोहीचे स्वप्न असलेला पाकिजा चित्रपट पुर्ण करतेच.पण त्याचे यश पाहण्यांस ती हयात नसते.
वयाच्या अवघ्या ३९ व्या वर्षी ती अल्लास प्यारी होते.जातांना तिचे हात ही सिंकदराप्रमाणेच मोकळे असतात.तिचा हाँस्पिटलचा खर्च हि कमाल अमरोहीच करतात.कारण अजुन ही तेच तिचे कायद्याने पती होते.
आश्चर्याची गोष्ट म्हणजे आधी तिकीटबारीवर मंद चालणारा पाकिजा,ती गेल्यानंतर अत्यंत यशस्वी चित्रपट ठरला. हा चित्रपट कमाल अमरोहीला मालामाल करून गेला.
व्यसनांने कशी एका प्रतिभावंत कलाकाराची धुळधाण होते, याचे मुर्तिमंत उदाहरण म्हणजे मीनाकुमारी.
बाँलीवुडची ही ट्रँजेडी क्विन,तिचे बोलणे,चालणे,तिचं शालिन सौंदर्य,रसीकांच्या ह्रदयांला हात घालणारा अभिनय, सारंच लाजवाब होतं.पडद्यावरची तिची भारतीय नारीची सोज्वळ प्रतिमा, दु:खाला संघर्ष करून हिंमतीने सामोरे जायची भूमिका तिला यश मिळवुन देत होती.
पण प्रत्यक्ष जीवनात ती अगदी उलट,बंडखोर मनोवृत्तीची होती. तिच्या हितचिंतकांचा, डाँक्टरचा सल्ला तिने कधीच मानला नाही.
तिच्या गझला ही तिच्याप्रमाणेच अद्वितीय होत्या. "सब तुम को बुलाते है,
पलभर को,तुम आ जावो!
बंद होती,मेरी आँखो में,
मुहब्बत का इक ख्वाब सजाओ !!"
तिचे व्यक्तिगत आयुष्य कसे ही असले तरी, ती रसिकांच्या ह्रदयांतील सम्राज्ञी होती.आज ही तिचे स्थान कोणतीही अभिनेत्री हरण करू शकलेली नाही.मैलाचा दगड होती ती.
तिच्या पवित्र स्मृतीस अभिवादन करून आज ही आमच्या पापण्या नम होतात.
सामान्य स्थितीतून कलाकार म्हणून प्रसिध्दीच्या उच्च शिखरावर गेलेली अभिनेत्री म्हणून ती असंख्य रसिकांना प्रेरणादायी व्यक्तिमत्व वाटते. पण त्याच बरोबर अती तेथे माती होते,हा महत्त्वाचा धडा मीनाकुमारीच्या या चरीत्रात्मक कादंबरीतून मला मिळाला,म्हणूनच ते पुस्तक माझ्या मनांला भावून गेले.