कोणते नाते म्हणू हे...
कोणते नाते म्हणू हे...
सकाळी आदित्यने गालावर मिठी दिली तेव्हा कुठे मी उठले. बराच उशीर झाला होता आज मला उठायला. गडबडीने आदित्यला मागे ढकलुन उठायला लागले तोच तो म्हणाला professor प्रांजल तुम्ही टेन्शन घेऊ नका आज कॉलेजला सुट्टी आहे तुझ्या, ठाकुर सरांचा फोन होता ,त्यांनी सांगितलं मला तुला सांगायला, म्हणुन तर मी तुला उठवलं नाही लवकर..
बरं पण मग रूचिताची तर शाळा आहेच ना! तिला डब्बा पण तर द्यावा लागेल. तुला पण नाहिये का ऑफीसला जायचं. तुझी पण तर तयारी करावी लागणार ना?
अगं हो! किती किती बोलतेस.. मला बोलू देशील का?
रुचिता शाळेला गेली आहे. तिचा डब्बा मी दिलाय तिला तयार करून आणि हो आज मी ऑफिसला जाणार नाही आहे. So dear प्राजु तु आता झोप थोडावेळ तो पर्यंत मी जरा फ्रेश होऊन फेरफटका मारून येतो.
थांब! आदित्य आज तू सुट्टी का घेतली आहेस जरा कळेल का मला काही?
किती प्रश्न विचारते गं तू!!
बरं आज माझा जिवलग मित्र येणार आहे घरी म्हणुन मी ऑफिस ला रजा टाकली आहे. आणि हो तो काही जेवणार वैगेरे नाहीये, सहज खूप वर्षानी इथे पूण्याला आलाय आणि मला भेटायचं म्हणतोय, मी म्हटलं घरीच ये ना वहिनीला ही भेटून घेशील. त्यावर तो तयार झाला, घरी यायला.
कळलं आता जाऊ मी?
हो...
बरं ठिक आहे,तो तुझा मित्र जेवणार नाहीये पण मग नाश्त्यात काय आवडतं त्याला ते तरी सांग की-
आश्चर्याने माझ्याकडे बघत तो म्हणाला - त्याचं तसं काही नाही. तू कर तुला काय आवडतं ते.
मी गुलाबजामुन घेऊन येतो.
आदित्य तयार होऊन गेला. मग मी पटापट कामाला लागले. आज बऱ्याच वर्षांनी आमच्या घरी आदित्यचा कोणी मित्र येणार होता. काय बनवु काय बनवु हा विचार करता करता. बटाटावडा व त्याची तिखट-गोड चटणी, पोहे आणि कचौरी असा काहीसा मेनू मी ठरवला आणि कामाला लागले. तोवर माझी मदतनीस पूनम ही आली. तिला बघताच मी कामाची यादीच तिला देऊन टाकली. मनात विचार चालूच होता कोण असणार आदित्यचा मित्र... कारण एवढ्या वर्षात त्याच्या जवळ-जवळ सर्वच मित्रमंडळीला मी ओळखत होते. आणि मी विचारलं सुध्दा नाही त्याला कशी मी रागच आला मला स्वतःचा.
तेवढ्यात दाराची बेल वाजली, सूटकेचा निःश्वास टाकत मी मनात म्हटलं बरं झालं आदित्य आला. त्याचा मित्र येण्याच्या आधी.. म्हणजे थोडंफार कळेल त्याच्याविषयी, पूनम दार उघडायला जात होती, तिला म्हटलं थांब तू मी बघते. तू पटापट दूसरी कामं कर बघु. दार उघडला आणि मी आपली पडले चालू- काय रे आदित्य कोण तो तुझा मित्र? त्याचं नाव तरी सांगायचं ना, उत्तर न आल्यामुळे मी मान वर करून बघते तर काय ? आदित्य नव्हता दारात कोणीतरी दूसराच होता.अदबीने त्याने मला विचारले हं..हे
आदित्यचचं घर ना ..?
हो
या ना तुम्ही दारात का उभे आहात , या या तुमचीच वाट बघत होतो आम्ही.
आदित्य पण येतच असेल, तुम्ही बसा मी पाणी घेऊन येते. जाता-जाता मी टिव्हि लावला. एक गोष्ट मला खुप खटकली ती म्हणजे अगदी घरात येऊन बसेपर्यंत आदित्यचा मित्र माझ्याकडे एकटक बघत होता. मला ही त्याला कुठेतरी बघितल्यासारखं वाटत होतं, पण आठवत नव्हतं कुठं बघितलं ते. मी स्वयंपाकघरात आले. पूनमला सांगितलं जा बरं पाणी दे तर त्यांना आणि मग आदित्यला फोन लावला. त्याला सांगितलं अरे तुझा मित्र आलाय रे घरी ,लवकर ये एकतर नाव वेगैरे काही सांगितलं नाही मला..
अगं हो आलोय मी खालीच आहे.. येतोय गं
दार उघडचं होतं आदित्य आला. मी किचनमध्ये कचोरी तळत होते. त्याचा बहूदा खमंग वास त्याला बाहेर आला असावा आणि मग बाहेरूनच तो ओरडत म्हणाला - वाह! कचोरी बनवतीयेस तुला कसं कळलं माझ्या मित्राची आवडती आहे. मस्त वास येतोय गं, ये गरम गरम घेऊन..
त्याचा आवाज ऐकुन मी पूनमला पूढचं समजवून बाहेर आले.
आदित्यने ओळख करुन दिली- प्राजू हं प्रांजल माझी बायको हं तुझी वहिनी आणि प्राजू हा माझा मित्र "प्रवीण" प्रवीण पाटील, आम्ही दोघं ही विद्यापिठात पहिल्यांदा भेटलो प्रविण माझा सिनीयर होता.
आता मला एक-एक करून माझं भूतकाळ आठवायला लागलं f.y.bcom पहिलं वर्ष , इंग्रजी शिकवायला होते, प्रवीण पाटिल सर,आदित्यचा मित्र म्हणजे प्रा.प्रवीण पाटिल सर, माझ्या पायाखालची जमीनच सरकली. माझं पहिलं प्रेम आणि शेवटचं प्रेम दोघंही माझ्यासमोर होते. मी
एकदम सून्नच झाले होते. सरांनी काही सांगितलं तर नसेल ना आदित्यला. माझा सुखाचा संसार उध्वस्त तर होणार नाही ना ..
माझ्या चेहऱ्यावरचे बदलते हावभाव बघून आदित्य जरा गडबडला माझी अशी अवस्था कधीच झाली नव्हती. मला काही कळलंच नाही. काय होतंयं काय हे..
मी क्षणातच खाली कोसळले.
नंतर काय झाले मला ठाऊक नाही. मी शुध्दीवर आले तेव्हा बेडवर होते. आदित्य आणि पाटील सर समोर उभे होते.रूचिता माझ्याजवळ बसली होती. सर्वे खूपच काळजीत दिसत होते. मी शुध्दीवर आली आहे हे बघून आदित्य माझ्या जवळ आला माझ्या मला मिठी देत म्हणाला प्राजू ...
तु आई होणार आहेस...
मी तर एकदम घाबरलोच होतो तूला चक्कर आली तेव्हा ,कशी गं तू सकाळ पासून तुझ्या पोटात काहीचं नाहीये,आता एवढ्यातच डाँक्टर येऊन गेल्या. तूला आता जास्त काळजी घ्यावी लागेल बरं का स्वतःची! थांब मी तुझ्यासाठी दूध घेऊन येतो. आदित्य गेला त्याच्या मागोमाग रूचिता ही गेली. रुममध्ये मी आणि सर एकटेच होतो. तेवढ्यात पाटील सरांनी माझा हात हातात घेतला, मी जरा घाबरलेच ,पट्कन माझा हात काढून घेतला त्यांच्या हातातुन, मान फिरवुन मी त्यांना जायला सांगितलं, ते एकटक माझ्याकडे बघत होते. तेच ते डोळे ज्यांना बघून मी तेव्हा ही स्वतःला सावरु शकले नव्हते आणि आजही अगदी काय होते त्या डोळ्यांमध्ये आज खूप प्रेम दिसत होतं मला त्यांच्या डोळ्यांत माझ्यासाठी, अगदी असंचं तेव्हाही त्यांना बघताच क्षणी मी त्यांच्या प्रेमात पडले होते. त्यावेळी ते काही माझ्या प्रेमात पडले नव्हते. माझ्यापेक्षा 10 वर्षांनी मोठे होते ते. माझे प्राध्यापक होते ते, त्यांना त्यांच्या मर्यादा माहीत होत्या. पण जसंजसं ते मला ओळखू लागले आमची ओळख वाढत गेली. आम्ही जवळ यायला लागलो. एकमेकांना समजता समजता एकमेकांच्या प्रेमात पडलो. माझ्या फटकळ स्वभावामुळे जास्त काळ आमचं नातं काही टिकलं नाही. जो टिकवण्याचा मी माझ्या परीने आटोकाट प्रयत्न केला होता. मी एम.काँम ला असतांना त्यांचं लग्न झालं आणि मग आमच्यातलं जे काही तरी होतं ते सगळं संपलं. आमचा एकमेकांशी काही संबंध होता असं मला वाटलचं नाही कधी कारण आमचं नातं हे चौकटीबाहेरचं नातं होतं, जे समाजाला कधीच मान्य झालं नसतं. त्यांच्यासाठीच्या माझ्या भावना खऱ्या होत्या. ते आकर्षण नव्हतं हे नक्की! पण आज एवढ्या वर्षांनी त्यांना हे असं बघुन मला उमगलंच नाही मी काय प्रतिक्रिया देऊ ते.
एक मोठा श्वास सोडत ते म्हणाले- प्रांजल अगं घाबरु नकोस मी आदित्यला आपल्या दोघांच्या भूतकाळाविषयी काहीच सांगितलं नाहीये. मागचं सर्व विसरून जा. मला जर थोडीही कल्पना असती की तू आदित्यची बायको आहे तर मी इथे कधीच आलो नसतो.
काँच फुटण्याचा आवाज आला
आदित्यने आमचं बोलणं ऐकलं , त्याचा हात रक्ताने भरला होता, मी त्याला जखम झाली आहे हे बघताच त्याच्याकडे धाव घेतली. रूचिताने फर्स्ट एड बाँक्स आणुन दिला, मी त्याला लागलं होतं ते साफ करून पट्टी लावून दिली. त्याला बसवलं आतमध्ये जाऊन त्याच्यासाठी पाणी आणणार तोच त्याने माझा हात घट्ट पकडला आणि म्हणाला
कोणते नाते म्हणू हे??
काय उत्तर देणार होते मी त्याचं
एक क्षणही न लावता सर निघुन गेले..
काही व्यक्तींना कितीही विसरण्याचा प्रयत्न केला ना तरी त्यांना विसरता येत नाही. माझ्या आयुष्यातली सरांची जागा आदित्यने घेतली होती यांत मला शंका नव्हती. पण त्याने मला विचारलेल्या प्रश्नाचं उत्तर माझ्याकडे नव्हतं.
मी आणि सर मित्र-मैत्रीण होतो, का आमचं नातं गुरु-शिष्याचं होतं,ते मला त्तत्वज्ञान देणारे की मार्गदर्शक असं काही एक नातं नव्हतंचं आमचं मग काय उत्तर देणार मी त्याच्या प्रश्नाचं?
हेच जर त्याने त्याच्या आणि माझ्या नात्याविषयी विचारलं असतं तर मी त्याला सांगु शकत होते तुला वाटेल ते नाव दे तु आपल्या नात्याला
त्याने माझा हात अजुन घट्ट करत विचारलं प्राजू अजूनही तुझं प्रेम आहे का त्याच्यावर?
माझ्या टपोऱ्या डोळ्यात बघितल्यावर त्याला त्याचं उत्तर मिळालं..
त्याने मला घट्ट मिठी दिली, तो रडत होता कदाचित ते आनंदाश्रु होते. कसला आनंद झाला होता त्याला ?आमच्या नात्याला एक नविन नाव मिळालं होतं आज.. पण त्याला काय नाव द्यायचं मी त्याला विचारलं काय रे
कोणते नाते म्हणू हे ?
समाप्त...