Archanana Borawake

Inspirational Others

3  

Archanana Borawake

Inspirational Others

कोमल है, कमजोर नहीं तू

कोमल है, कमजोर नहीं तू

4 mins
301


    आज कल्याणीने डोळ्यांनी जे पाहिले.... त्यानंतर तिच्या डोळ्यात अंगार फुलू लागला . कुणी इतक नीच कसं असू शकतं? एक शिक्षक असून असे वर्तन? आता काही तरी केलेच पाहिजे.... त्या कोवळ्या मुलींना त्या नकोशा स्पर्शातून वाचवलेच पाहिजे....


         मागच्या वर्षी ती त्या शाळेत नोकरीला लागली होती. सुरुवातीला सगळे तिच्याशी चांगलेच वागत होते.... पण जेव्हा कळलं की, तिचा घटस्फोट झाला आहे...... सगळ्यांचाच तिच्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलला. काहींना तिची दया आली, " अरेरे बिचारी, चार वर्षातच संसार मोडला... त्यात लहान मूल... कसं करील एकटी."


   तर काहींच्या अजून वेगळ्याच प्रतिक्रिया, " इतकी सुंदर बायको एखाद्याने सोडून दिली म्हणजे तिच्यातच काही तरी खोट असेल.... आजकालच्या मुली अशाच!"


    फारच थोड्या लोकांनी तिची खरी परिस्थिती समजून घेतली.... शाळेच्या मुख्याध्यापिकांनी मात्र तिला आधार दिला, शाळेत नोकरी मिळवून दिली. नाहीतर इतकी शिकलेली असूनही तिने सगळी आशाच सोडली होती. नवऱ्याकडून झालेल्या अन्याय आणि अत्याचारामुळे तिचा आत्मविश्वासच डळमळीत झाला होता. पण त्यांनी तिला कणखर बनवले आणि परिस्थितीशी लढायचे बळ दिले...... आणि कल्याणी आता त्या शाळेत चांगली रुळली होती.


       आज तो धक्कादायक प्रकार बघून तिला त्या शाळेतले पहिले काही महिने आठवले. विज्ञानाचे शिक्षक मुद्दाम तिला काही ना काही कामानिमित्त शाळा सुटल्यावर थांबायला लावायचे.... कामाच्या निमित्ताने स्टाफरूममध्ये बोलवायचे. एकटी आहे बघून तीच्याशी लगट करायचा प्रयत्न करायचे... एक दोनदा तर तिचा हातही पकडला..... ती अशी निराधार! ती कोणाकडे तक्रार करेल? असं त्यांना वाटत होतं. पण आता ती बरीच सावरली होती... तिला कळून चुकले होते की, एकटीने रहायचे असेल तर अशा लोकांचा सामनाही करावाच लागेल.... एकदा त्याने तिचा हात असाच हातात घेतला..... तिने लगेच तो हात झिडकारून टाकला... आणि सटकन त्याच्या एक थोबाडात लावून दिली.. 

"पुन्हा असं कराल, तर पोलिसात तक्रार करेल", असा दम दिला.

तिचा तो आवेश पाहून तो परत तिच्या वाटेला गेला नाही.

 

      पण आज तिने प्रयोगशाळेत जे पाहिले....ते पाहून तिला खात्री पटली की हा माणुस सुधारण्याच्या पलीकडचा आहे. प्रयोग शिकवताना मुलींच्या अंगाला आक्षेपार्ह प्रकारे हात लावणे, त्यांच्या नको इतके जवळ जाणे सुरूच होते त्याचे..... मुली बिचार्‍या घाबरून अंग चोरून उभ्या होत्या... त्या काय बोलणार? ... म्हणुन त्याचे अजूनच फावले होते. कल्याणीने नंतर त्याच्यावर पाळत ठेवली.... पण जेव्हा जेव्हा प्रॅक्टिकल असे, तेव्हा तेव्हा प्रयोगशाळेत मुलींशी त्याचे घृणास्पद वागणे सुरूच होते.


       आता काही तरी केले पाहिजे.... मी एकटीने तक्रार करून काय उपयोग? मुली पुढे आल्या पाहिजेत. तिने काही मुलींना बोलावले. त्यांना त्या सरांच्या वर्तणुकीबद्दल विचारले..... पण कुणी काही बोलायला तयारच नव्हत्या. कल्याणीला जाणवले की, त्या सरांचे नाव घेताच, त्यांच्या चेहर्‍यावर राग मात्र नक्की आला होता. तिने त्यांना विश्वासात घेतले.


   "हे बघा, तुम्ही अशा शांत राहणार असाल तर मी तुम्हाला कशी मदत करणार? मी माझ्या डोळ्यांनी हे पहिले आहे. आपल्या शरीराला कुणी आपल्या इच्छेविरुद्ध हात लावते, ही सहन करण्याची गोष्ट नक्कीच नाही....कुणीही आपल्याला असे घृणास्पद स्पर्श करू शकत नाही.... तुम्ही आज काही बोलला नाहीत तर, हा प्रकार असाच अनेक वर्ष सुरूच राहील... अनेक मुलींना याचा सामना करावा लागेल.... आणि मी तुम्हाला कायम शिकवलं आहे ना की, अन्याय करणारा जितका दोषी, तितकाच अन्याय सहन करणाराही चुक असतो. हे सर्व थांबवणे आपल्याच हातात आहे.... तुम्ही बोलाल का याविरुद्ध? मी तुमच्या सोबत आहे... मी तुमची साथ कधीच सोडणार नाही.... "

 

मुलींना आता कल्याणीचे म्हणणे पटले. दुसर्‍या दिवशी मुख्याध्यापिकांना भेटायचे ठरले. कल्याणी मुख्याध्यापिकेच्या केबिनमध्ये गेली... सगळे सांगितले.... त्यांनी त्या सरांना बोलावले. त्याला मॅडमने जाब विचारला.

  "मॅडम तुम्ही कोणावर विश्वास ठेवता? अशा बाईवर, जिला स्वतःचा संसार करता आला नाही, नवऱ्याने घराबाहेर काढले... तिची लायकी तरी आहे का माझ्याबद्दल असं बोलायची... स्वतः काहीतरी गुण उधळले असतील म्हणून तर नवऱ्याने हाकलले आणि आता माझ्या चारित्र्यावर प्रश्नचिन्ह उभे करते आहे... अजिबात विश्वास ठेवू नका तिच्यावर."

    "सर तोंड सांभाळून बोला, तुम्ही माझ्याबरोबर कसे वागलात हे अजून मी मॅडमला सांगितलेच नाही. मी आता पूर्वीची कल्याणी राहिलेली नाही... माझ्या भूतकाळाबद्दल बोलण्याचा तुम्हाला काय अधिकार... काहीही झाले तरी बाईचीच चूक दिसते सर्वांना... पण पुरूषांचा खोट्या मुखवट्याच्या आतला राक्षसी चेहरा कोणालाच दिसत नाही... एका राक्षसाच्या तावडीतून मी स्वतःला सोडवले आहे आणि आता वेळ आहे या दुसर्‍या राक्षसाच्या हातातून कोवळ्या मुलींना वाचवण्याची... तुमच्या पापाचा घडा भरला आहे... हे बघा... मुलींनी तुमच्या नावाची लेखी तक्रार केली आहे... खाली सह्या आहेत मुलींच्या... आता तुम्हाला कोणी वाचवू शकत नाही... नोकरी तर जाणारच, आणि जेलची हवाही खावी लागणार आहे."


   हे सर्व बघून त्याची बोलतीच बंद झाली. गयावया करू लागला... माफी मागितली पण आता मुख्याध्यापिका मॅडम आणि कल्याणी मागे हटणार नव्हत्या. कोवळ्या मुलींच्या मनावर आघात करणार्‍याला वाचवणे म्हणजे त्या मुलींवर अन्याय करण्यासारखे आहे... अशा वृत्तीच्या या नराधमांचे अशानेच फावते... त्यांना वाटते की या अबला स्त्रिया काय करतील? पण या स्त्रियांमध्ये असलेल्या महिषासूरमर्दिनीला ते विसरतात... जेव्हा देवही राक्षसांपुढे थकून जातात, तेव्हा अंबेलाच कालीमाता बनून शस्त्र हाती घ्यावे लागते... आणि अशा दुष्टांचा नाश करावा लागतो.

   

   त्या सर्व मुलींनी सुटकेचा निश्वास सोडला. कल्याणीच्या रुपात, त्यांना दुर्गा भवानी दिसली. तिने परत एकदा लढाई जिंकली... आधी स्वतःची सुटका करून घेतली आणि आता अनेक निष्पाप कळ्यांना वाचवले...कल्याणीसारख्या अशा रणरागिणी म्हणजे पृथ्वीवरील नवदुर्गाच आहेत... ज्या कोमल दिसत असल्या तरी कमजोर नक्कीच नाहीत! 


Rate this content
Log in

Similar marathi story from Inspirational