कमिटमेंट#२
कमिटमेंट#२
"आई.....
आज तरी काहीतरी पोटभर
खायला आण ना..."
'हो नक्की आणते रे माझ्या पिलांनो'.
झोपडीच्या दाराशी बसलेल्या तिच्या चिल्या-पिल्ल्यांकडे तिने हताशपणे पाहिलं आणि ती निघाली.
कामावर जाताना वाटेत 'त्यांचा' वाडा लागायचा. शिशारी येईल अशी त्यांची नजर तिच्या अंगावरून फिरत राहायची. तिला कळायचं...
पण करणार काय
मोठं प्रस्थ होतं ते. ...
ती मग पदर जरा जास्तच ओढून
लपेटून खाली मान घालून भराभर
चालत पुढे जायची.
नवरा गेल्यापासून तिला अशा नजरांमधला बुभुक्षितपणा जास्तच जाणवू लागला होता.
>
आणि मंगळसूत्राची कमतरताही. ...
कामावर गेल्यावर कळलं की
काम सुटलं होतं.
आता त्यांना मजुरांची गरज नव्हती.
तिने गयावया करून पाहिलं
पण काहीच उपयोग झाला नाही.
डोळ्यातून पाणी वाहायला लागलं.
ती माघारी निघाली.
पुन्हा वाटेत तोच वाडा.........
तिनं वर पाहिलं
नजरेला नजर मिळाली
त्या नजरेतली 'भूक' तिला ओळखता आली.
डोळ्यासमोर मुलांचे भुकेलेले
चेहरे दिसत होते.
दोन्ही नजरांमध्ये भूकच........
फक्त स्वरूप वेगवेगळं.
ती आगतिकपणे वाड्याच्या
पायर् या चढू लागली.....