किंमत
किंमत
शोभा लहानपणापासून अभ्यासात हुशार. दोन भाऊ आणि एक बहीण होती तिला. आई वडिलांची विशेष मर्जी होती तिच्यावर. खूप अपेक्षा होत्या तिच्याकडून सर्वांना. घरची परिस्थिती खाऊन पिऊन सुखी, पण बेताचीच.जुनी मॅट्रिक झाली शोभा आणि तिला नोकरी पण मिळाली लगेच. रूप छान. गोरीपान पण उंचीत मार खाल्ला तिने. खूप बुटकी. तिला खूप वाईट वाटे. पण ह्या गोष्टी थोड्याच आपल्या हातात असतात असं म्हणत समजूत काढायची स्वतःची. लग्नासाठी स्थळं येऊ लागली.रूप देखणं असूनसुद्धा पसंती येत नव्हती. हताश व्हायची ती फार. शेवटी एक सरकारी नोकरी करणारा माणूस तयार झाला लग्नाला. तिला तो अजिबात शोभत नव्हता. पण सरकारी नोकरी आहे म्हणून तिने होकार दिला. लग्न झालं. रुळायला थोडा वेळ लागला तिला. महिन्याची दहा तारीख आली. तिला वाटलं नवरा तिच्या हातात पगार देईल आणि सांगेल ठेव बरं देवासमोर. पण तसं काहीच घडलं नाही.तिने विचारलं "अहो, झाला का पगार?" पण तो चिडचिड करत म्हणाला," परत कधी विचारायचं नाही मला." ती खूप दुखावली गेली होती. तिला वाटलं कुठे आगीतून उठून फुफाट्यात येऊन पडले. पुढे मुलगी झाली त्यांना. झालं डोकं फिरलं त्या माणसाचं. चक्क माहेरीचं रहा आता असं म्हणाला तिला. वर्षभर सासुरवास सहन केला आता अजून काय पाहायचं ठेवलं रे देवा. सारखी हुमसून रडायची. नोकरी करायला परत सुरूवात केली तिने. माहेरच्यांना जड झाली होती ती आणि तिची पोर. एवढ्याश्या त्या बाळाला सोडून नोकरी करताना तिचा जीव तुटत होता. पण पर्याय नव्हता. पुढे घरच्यांनी तिच्या नवऱ्याची समजूत काढली आणि मग तो घेऊन गेला तिला घरी. परत दिवस गेले तिला. ह्यावेळी मात्र मुलगा झाला.दिवस थोडे बरे झाले होते आता.
पण नवरा जेवढा घर खर्चाला लागायचा तेवढेच पैसे द्यायचा. तसेच मुलाबाळांचं करण्यात आपलं दुःख गिळून टाकत होती भाड्याच्या घरात. एकदा घरी तिच्या लोक आले पैसे मागायला. तुझा नवरा कुठे आहे? त्याने पैसे घेतलेत आमच्याकडून. तिने ते बाहेर गेले आहेत म्हणून वेळ मारून नेली. नवरा आल्यावर धाडसाने तिने विषयाला हात घातला. नवरा शांत. तोंडातून एक शब्द नाही. रडली ती खूप. आभाळ कोसळल्यासारखं झालं तिला. पुढे मुलीचं लग्न झालं. तिच्या लग्नाचा सगळा खर्च तिच्या भावांनी कर्ज काढून केला. महिना उलटून गेला तरी पैशाची एक पै मिळाली नाही म्हणून तिचे भाऊ घरातील तिचं साम
ान घेऊन गेले. मेल्याहून मेल्यासारखं झालं तिला. मी घर सोडून जात आहे अशी चिठ्ठी लिहून घराबाहेर पडली ती. पण तो माणूस काहीच झालं नाही असं वावरत होता. परत चार दिवसांनी घरी आली.तसेच दिवस काढत होती. गरज तिला होती. पुढे तिच्या मुलाने आंतरजातीय विवाह केला. सून नोकरी करणारी होती. आता तरी चांगले दिवस येतील असे वाटलं तिला. पण जेव्हा तिला तिच्या सासऱ्यांचं प्रकरण समजलं तेव्हा ती वेगळं राहायला लागली. इतके वर्ष झाली तरी काहीच बदल नव्हता तिच्या नवऱ्याच्या वागण्यात. सारं आयुष्यं काटकसर आणि तडजोड करण्यात घालवलं तिने.तिच्याबरोबर ज्या मैत्रिणी होत्या त्यांचा फार हेवा वाटायचं तिला. एवढा चांगल्या पगाराचा आयुष्यात कधीच उपभोग घेता आला नाही असं वाटलं तिला.
नवरा रिटायर झाल्यावर त्याला ती म्हणाली, "आयुष्यभर मला खूप त्रास झाला.आता नाही राहिली हिम्मत सहन करायची.आपण गावी जाऊन राहू. गेले ते दोघे त्यांचं चंबूगबाळ घेऊन गावी.तो थोडा बदलला होता आता असे तिला वाटले. पंधरा वर्षांनंतर त्याने मिळालेल्या पैशातून मुलीच्या लग्नाचे कर्ज फेडून टाकले.तिच्या चेहऱ्यावरचे समाधान डोळ्यांत दिसत होते. घरात टीव्ही, फ्रिज ह्या गोष्टी आल्या होत्या. राहिलेल्या पैशांची एफडीपण केली. दिवस आता बरे आलेत असं वाटायला लागलं होतं तिला. दारावर रोज एक गाय यायची तिच्या. रोज गाईला घास घालायची शोभा. तिच्याशी बोलायची. पण वरवर जसे दिसत होते तसे नव्हते. मूळचा स्वभाव बदलला नाही तिच्या नवऱ्याचा. परत लोकांकडून पैसे घेतले होते त्याने उधारीवर. तिच्या रागाची आता सीमा ओलांडली होती.
विचारलं तिने,"काय करता तुम्ही पैशाचं? पण नवरा नेहमी सारखा निरुत्तर.सगळी एफ डी मोडून लोकांचं कर्ज फेडलं तिने. आता फक्त पेन्शनवर घर चालत होतं. ती पण सगळी देत नव्हता तिला तो. एक दिवस तो पेन्शन आणायला गेला होता बँकेत. तेव्हा तिला घरी एकटी असतांना तीव्र हृदयविकाराचा झटका आला आणि तिने तिचे प्राण गमावले. नवरा घरी आला. तिला पाहून त्याची बोबडीच वळाली. रडला तो फार. दुसऱ्या दिवशी गाय नेहमीप्रमाणे दारासमोर उभी होती. तो गाईशी बोलत होता रडत रडत म्हणाला, आत तुला घास देणारी सोडून गेली आपल्याला. आता तुला आणि मला कोणीच नाही भरवणार घास. हे ऐकून गाईच्या डोळयांतून पाणी वाहायला लागले. आज त्याला आपल्या बायकोची खरी किंमत कळली होती.