STORYMIRROR

Savita Tupe

Romance

3  

Savita Tupe

Romance

खरे प्रेम !

खरे प्रेम !

10 mins
349

   नरेश दिपाची वाट पाहून कंटाळला होता .रोजच्या प्रमाणे चार वाजता भेटू म्हणून सांगितले होते दिपाने ,आणि आता सहा वाजत आले तरी तिचे येण्याचे काही चिन्ह दिसेना . फोन पण बंद लागत होता दिपाचा .

    नरेश कंटाळून निघाला . मनात असंख्य प्रश्नांचे काहूर माजले होते . त्याला काही समजत नव्हते की नक्की काय झाले असावे ? आज पर्यंत कधीच असे झाले नव्हते . थोडाफार उशीर झाला तरी त्यांचं भेटणं रोज ठरलेलं होतं .

  नरेशच्या मनात आले , घरी जावं का दिपाच्या ? पण परत त्या विचाराला त्याने मुरड घातली . तिथे उगीच काही गोंधळ नको म्हणून तो सरळ त्याच्या घरी निघून आला .

   पुढचे दोन दिवस असेच वाट पहात निघून गेले . त्या दिवसापासून दिपाचा फोन पण बंद लागत होता . आता मात्र नरेश खूपच काळजीत पडला . त्याने दुसऱ्या दिवशी दिपाच्या घरी जायचे ठरवले . त्याला दुसरा काही मार्ग दिसत नव्हता . त्याने ऑफिस मध्ये फोन करून सुट्टीसाठी परवानगी मिळवली .

   दुसऱ्या दिवशी तो सकाळीच आवरून निघाला . एकदम घरी जाणे योग्य नाही म्हणून तो पहिले दिपाच्या ऑफिसमध्ये गेला . तिथे दिपाची मैत्रीण नरेशला भेटली . तिला पण काहीच माहीत नव्हते , ती पण दिपाला फोन करून दमली होती . दीपाच्या काळजीने तिनेही आज दुपारनंतर सुट्टी घेवून दिपाकडे जायचे ठरवले होते .

     नरेशला आपण सोबत जावू असे सांगून तिने नरेशला दिपाच्या घराजवळ असणाऱ्या मंदिराजवळ थांबायला सांगितले .

  दुपारी दोघेही दिपाच्या घराजवळ पोहोचले . घर बंद होते .दोघेही चकित झाले . असे काहीच न सांगता दीपा कुठे गेली असावी ?

  शेजारी चौकशी करताना त्यांना दिपाच्या घरचे सगळे कोणालाही न सांगता पहाटेच निघून गेले असल्याचे कळले पण नक्की कुठे गेले ते कोणालाही माहीत नव्हते .  

   दिपाच्या बोलण्यातून नरेशने बऱ्याच वेळा तिच्या मावशीचे फलटणला घर आहे असे ऐकले होते . इतर कोणी नातेवाईक बाहेर गावी आहेत असे त्याला तरी ऐकण्यात आले नव्हते .

   नरेशला काही कळेना काय करावे ? दिपाच्या काळजीने तो पुरता हतबल झाला . तिच्या घरच्यांनी तिला घेवून जावून तिचे लग्न तर लावून दिले नसेल ना ? या विचारा सरशी त्याची झोप उडाली . 

  दोन दिवसात जिथे जिथे शक्य होईल तिथे सगळ्या ठिकाणी जावून त्याने दिपाबद्दल काही कळते का म्हणून प्रयत्न केले .पण त्याला कुठूनही काहीच कळले नाही .

   खुप विचाराअंती त्याने स्वतः फलटणला जायचा निर्णय घेतला . तिथे नक्की कुठे दिपाला शोधणार याची त्यालाही खात्री नव्हती पण दिपाशिवाय आता त्याला चैन पडत नव्हते . 

     दोन वर्षापूर्वी त्यांची ऑफिसला जाताना बस मध्ये ओळख झाली . नरेशच्या बस स्टॉप नंतर दोन बस स्टॉप सोडून तिसऱ्या स्टॉप वरून दीपा बस मध्ये बसायची .दोघांचे उतरण्याचे ठिकाण एकच होते पण ऑफिस वेगवेगळ्या दिशेला होते . असेच एकदा सुट्ट्या पैश्यावरून दीपा आणि बस कंडक्टरची थोडी बाचाबाची झाली , तेव्हा नरेशने मध्यस्थी करून त्यांचा तंटा सोडवला होता . तेव्हापासून मग दोघांची छान मैत्री झाली आणि मग दोघेही एकमेकांच्या प्रेमात पडले . दोघांनाही अजून एक दोन वर्ष तरी लग्नाची घाई नव्हती . घरून ही काही विरोध होईल याची शक्यता नव्हती. म्हणून आधी एकमेकांसोबत छान वेळ घालवू असे दोघांचेही मत होते. पण आज हे असे अचानक काय घडले होते ? याचे त्याला कोडे पडले होते .

   नरेश दिपाच्या ऑफिस मध्ये गेला . तिच्या दुसऱ्या मैत्रिणीकडे चौकशी करून तिच्याबद्दल अजून काही कळेल या आशेने विचारणा केली पण तिथेही फक्त एवढेच कळले की दिपाची फलटणला एक मावशी आहे आणि दीपा जर कुठे गेलीच तर फक्त तिथेच जावू शकते .  

    दिपाच्या मैत्रिणीने तिच्या काकांचे नाव त्याला सांगितले , पण पत्ता मात्र तिलाही माहित नव्हता .

   नरेश आणि दीपा रोज भेटायचे पण घरातल्या इतर गोष्टींबद्दल त्यांच्यात जास्त चर्चा होत नसे . ऑफिस मधल्या कामाचं बोलणं आणि फक्त आई वडील , भाऊ बहिण यांबद्दल मोघम चर्चा एवढाच त्यांच्या चर्चेचा विषय असायचा .आज नरेशला असं वाटत होतं की त्याने या सगळ्या गोष्टी जाणून घ्यायला हव्या होत्या म्हणजे आज ही वेळ आली नसती .

     नरेशला फलटणमध्ये जावून दिपाचा शोध घेणे हा शेवटचा एकच पर्याय उरला होता. तो त्याच्या ऑफीस मध्ये चार दिवसांची रजा टाकून सरळ फलटणला निघाला .

   तीन चार तास प्रवास करून तो फलटणला पोहोचला . उतरल्यावर एका हॉटेल मध्ये जावून तो जरा फ्रेश झाला . थोडाफार नाश्ता आणि चहा घेवून त्याने बिल देताना सदाशिव जावळेना ओळखता का म्हणून विचारले . दिपाच्या ऑफिसमध्ये त्याला काकांचे नाव कळले होते . तेवढा एकच नावाचा आधार घेवून तो निघाला होता .

    त्याच्या नशिबाने त्याला साथ दिली आणि हॉटेलवाला त्यांच्या ओळखीचा निघाला , त्याला पत्ता विचारून तो दिपाच्या ओढीने त्या ठिकाणी अगदी उतावीळ होवून निघाला . 

   नरेशने सरळ रिक्षा केली आणि रिक्षा वाल्याला पत्ता सांगून तो रिक्षात बसला . नरेशला तिथे पोहोचायला अर्धा तास लागला . रिक्षावाल्याने त्याला त्याने सांगितलेल्या पत्त्यावर आणून सोडले .पैसे देवून तो खाली उतरला .   

    आजूबाजूला बरीच घरे होती . त्यातल नक्की घर कोणतं ते त्याला कळेना . एक दोन घरात त्याने चौकशी केली आणि मग हवे ते घर त्याला मिळाले . तिथे बाहेर थोडावेळ थांबून , मनाची पूर्ण तयारी करून , मोठ्या आत्मविश्वासाने नरेशने दार वाजवले .

    आतून एका वयस्कर आजीने दार उघडले . दारात अनोळखी व्यक्ती पाहून तिने कोण हवे आहे म्हणून चौकशी केली . एकदम दिपाचे नाव न सांगता त्याने काकांचे नाव सांगून , त्यांना भेटायचे आहे असे सांगून आधी घरात प्रवेश मिळवला . आजीने त्याला आत घेवून बसायला सांगितले ,

" सदा , अरे कोण आले आहे बघ बर ! " असे म्हणून काकांना आवाज दिला . तोवर नरेश घरात कुठे दिपाची चाहूल लागते का याचा अंदाज घेत इकडे तिकडे बघायला लागला .

   घर बरेच मोठे होते , नरेश बसला होता तो बैठकीचा भाग होता आणि आता बरेच मोठे घर असल्याने त्याला तिथे बसून आतल्या माणसांचा आवाज येत नव्हता . तो थोडा निराश झाला , तेवढ्यात काका येताना दिसले . 

 त्यांनाही हा नवा पाहुणा कोण आहे म्हणून उत्सुकता लागली . नरेशला नमस्कार करून बसत ते म्हणाले ," कोण हवे आहे आपल्याला ? मी तुम्हाला ओळखत नाही . कुठून आला आहात ? "

 एवढे बोलून त्यांनी पाणी आणायला बाळू म्हणून कोणाला तरी आवाज दिला . पाणी येईपर्यंत नरेशाला बोलायला थोडा धीर मिळाला . मनात तो काय आणि कसे बोलायचे याच विचारात होता तेवढ्यात बाळूने पाणी आणून दिले . पाणी पिल्यावर  दीर्घ श्वास घेवून नरेशने बोलायला सुरवात केली . " माझी माहिती सांगण्याआधी मी तुम्हाला काही विचारू शकतो का ? " नरेश हात जोडत नम्र होवून म्हणाला .

काका म्हणाले , " हो विचारू शकता . काय जाणून घ्यायचे आहे तुम्हाला ?"

 नरेशने मग वेळ न घालवता मोठ्या अधिरतेने त्यांना विचारले , " काका , दीपा ससाणे , पुण्याला असते ती तुमचीच भाची आहे ना ? "

काका थोडे शाशंक नजरेने नरेशकडे बघत म्हणाले , " हो माझी भाची आहे ती . पण तुम्ही हे का विचारत आहात ? तुम्ही तिला कसे काय ओळखता ? "

 आपण योग्य ठिकाणी पोहोचलो आहोत हे लक्षात येताच नरेशला मनातून हायसे वाटले . काका त्याच्याकडे आश्चर्याने बघत होते .त्यांची निराशा न करता नरेश पुढे बोलू लागला .

" माझे नाव नरेश दिगंबर सातव . मी पुण्याला आयटी कंपनीत कामाला आहे .घरी आई वडील , एक भाऊ आणि एक विवाहित बहीण आहे .

   मी आणि दीपा दीड वर्षापासून एकमेकांना खुप चांगल्या प्रकारे ओळखतो . "

 काकांच्या चेहऱ्यावरचे भाव निरखत नरेश पुढे बोलत राहिला .

" आम्ही लग्न करायचे ठरवले पण सगळ्यांच्या संमत्तीने पुढे जायचे ही दोघांचीही मनापासुन इच्छा आहे . आम्हा दोघांनाही ही खात्री होती की दोघांच्याही घरून आमच्या लग्नाला पाठिंबा असेल . म्हणून मग आम्ही आधी एकमेकांना पूर्णतः जाणून घ्यायचे निश्चित केले होते .

 पण मध्येच चार दिवसापासून दीपा कुठे गायब झाली काही कळायला मार्ग नाही . मी दोन दिवस सगळीकडे फिरलो पण मला तिच्याबद्दल कुठेच काही कळलं नाही . मागे एकदा बोलताना तिच्याकडून फलटणला मावशी राहते आणि कधीतरी तिच्याकडे जातो असे कळले होते . इतर कोणी नातेवाईक बाहेरगावी नाही आणि तिच्या घरी गेलो होतो तेव्हा शेजारच्या माणसांकडून ते सगळे बाहेरगावी गेल्याचे कळले . बाहेरगावी गेले म्हणजे ती फक्त इथेच येवू शकते म्हणून मग मी इथे आलो आहे . काका कृपा करून मला सांगा दीपा इथे आहे का ? कशी आहे ती ? आणि अचानक इकडे कशी काय निघून आली ?"

 काका नरेशचे बोलणे आणि स्पष्ट बोलण्याने जरा प्रभावित झाले होते . मुलगा चांगला आहे आणि दिपावर मनापासुन प्रेम करतो आहे हे त्यांच्या अनुभवी नजरेने अचूक हेरले .नरेशच्या प्रश्नाचे उत्तर टाळत ते त्याला अजून जाणून घेण्यासाठी चिडल्याचे नाटक करत प्रेम वगैरे सगळं खोटं असत , अजाण वयात नको ते निर्णय घेवून नंतर सगळ्यांच्या जीवाला घोर लावणारे प्रेम म्हणजे फक्त तात्पुरते आकर्षण असते . " अश्याप्रकरे त्याला त्याच्या लग्नाच्या बाबतीत तो किती ठाम आहे याची जणू परीक्षाच घेत होते .

 त्यांनी विचारलेल्या प्रत्येक प्रश्नाला नरेश तितक्याच शांतपणे आणि ठाम पणे उत्तरं देत होता . काका त्याचा ठाम निश्चय पाहून मनातून खुश झाले . आपल्या भाचीची निवड चुकीची नाही याची त्यांना पूर्ण खात्री झाली . ते जरा शांत झाले .

 नरेश त्यांना पुन्हा खुप विनम्र होवून म्हणाला ,

 " काका , तुम्ही मला अजूनही हे नाही सांगितले की दीपा इथे आली आहे का ? "

 काका काही न बोलता आत उठून गेले . नरेश फक्त , " काका सांगा ना , " एवढेच बोलत राहिला .काकांनी काहीच प्रतिक्रिया न दिल्याने तो अवसान गेल्यासारखा गळून गेला . जरावेळ तिथे थांबून आतून कोणाचाच प्रतिसाद न मिळाल्याने हताश होवुन तिथून निघाला . दाराजवळ जाई पर्यंत सारखा मागे वळून बघत होता .कोणीही दिसेना तेव्हा निराश होवून तो तिथून निघाला .

    दाराजवळ जाताच त्याला दिपाने हाक मारल्याचा भास झाला . तो चमकून मागे वळला . समोरचे दृश्य पाहून त्याला हसावे का रडावे तेच कळेना .तो तिथेच गुढग्यावर खाली बसला . त्याच्या समोर दिपासहित घरातली इतर मंडळी उभी होती . दीपा आणि काका पुढे आले , जवळ जावून त्या दोघांनी त्याला उठवून खुर्चीवर बसवले . काका त्याच्या डोक्यावर थोपटत त्याला म्हणाले , " बोला दोघेजण निवांत , तुमचं बोलून झालं की आम्हाला बोलवा मग बोलू आपण .आणि हो तूझ्या घरच्यांना बोलावून घे , लग्नाचं ठरवायला मोठी माणसेच हवी ना ! "

 काका आणि इतर घरातली माणसे आत निघून गेली .

दीपा कान पकडत म्हणाली ," माफ कर मला , माझ्यामुळे तुला खुप ञास झाला ना ! "

 नरेश सावरत तिला म्हणाला , " हो खुप ञास झाला , पण आता सगळी भरपाई करून घेणार आहे , लग्न तर होऊ दे मग बघ कसा त्रासाची परत फेड करून घेतो ते ."

 दीपा घाबरल्याचे नाटक करत म्हणाली , " अरे बापरे , लग्न झाल्यावर जर तू त्रास देणार असशील तर मला नाही करायचे लग्न ."

नरेश तिच्याकडे बघून हसत म्हणाला , " बर ठीक आहे , नाही देणार त्रास मग तर करशील लग्न ."

" विचार करायला काही हरकत नाही ." दीपा त्याची अजूनच खेचत म्हणाली .

" म्हणजे तुला अजूनही वेळ हवा आहे का विचार करायला ? " नरेश आश्चर्याने बोलला .

 तसे मग दोघेही मनापासुन हसले .

  नरेश मग शांत होत तिला म्हणाला , " हे असे का वागली तू ? न सांगता निघून आलीस . थोडा पण विचार नाही केलास ना तूझ्या अश्या वागण्याने माझी काय अवस्था होवू शकते ते ?"

दिपाचे पण डोळे भरून आले , ती बोलली ,

" त्रास फक्त तुलाच झाला आणि मला काय आनंद होत होता का असे करून ?"

" मग का असे केलंस ? " नरेश अजीजीने बोलला .

दीपा पुढे बोलत म्हणाली , " त्यादिवशी आपण जेव्हा भेटलो तेव्हा माझ्या दादाने आपल्याला पाहिले होते . मी घरी आल्यावर माझ्यावर सगळेच चिडले . सगळ्यांना समजावून सांगता सांगता मला पण खुप ञास झाला . माझा फोन , माझा जॉब सगळंच बंद झालं . इकडे यायचा निर्णय घेवून सगळ्यांनी माझे लग्न करूनच निघायचे असा निर्णय घेतला . त्यात त्यांची चूक नाही , प्रत्येक आई वडिलांना आपली मुलगी वाईट वळणाने जावू नये असेच वाटते . त्या काळजीने त्यांनी हा निर्णय घेतला . इथे आल्यावर वडिलांनी मावशी आणि काकांना सगळं सांगून स्थळ पाहायला लावले . काका आणि मावशीला मी तुझ्या बद्दल सगळी माहिती सांगितली . मग त्यांनी माझ्यापुढे अशी अट घातली की , तू काही न कळवता इथे आली आहेस , जर तुझे माझ्यावर खरच प्रेम असेल तर तू माझा शोध घेत नक्कीच येशील , तुझं इथपर्यंत येणं ही माझ्यासोबत तुझीही परीक्षाच होती . जर तू आलास तर माझे लग्न तुझ्यासोबत नक्की करून देईन असा शब्द मला काकांनी दिला . आणि जर तू नाही आलास तर मात्र काका म्हणतील त्या ठिकाणी मी लग्नाला तयार व्हायचे असा दम पण भरला . मला खात्री होती तू येशील म्हणून मी तयार झाले ह्या गोष्टीला . आणि तू इथे येवून माझ्यावरचं प्रेम सिध्द करत , सगळ्यांच्या परीक्षेत खरा उतरला आहेस . मला माझ्या प्रेमाचा अभिमान आहे नरेश ! मी खुप नशिबवान आहे की तुझ्यासारखा जोडीदार मला लाभला आहे ."

नरेश हे सगळं ऐकून निःशब्द झाला . त्याने केलेल्या कसरतीचे त्याला सार्थक झाल्यासारखे वाटले . समाधानासोबत जग जिंकल्याचा सार्थ अभिमान त्याला वाटू लागला .

 त्यांचे बोलणे झाल्यावर मग काका आणि घरातली इतर मंडळी जमा झाली . सगळ्यांनी नरेशची ओळख करून घेतली . नरेशचा बोलका आणि निर्मळ स्वभाव सगळ्यांना खुप आवडला , आपल्या मुलीची आवड अगदी योग्य आहे याचे समाधान दिपाच्या आई वडिलांच्या चेहऱ्यावर दिसत होते . 

  काकांनी पुढाकार घेवून नरेशच्या घरच्या मंडळींना बोलावून घेवून पुढचे सगळे नियोजन करत दोन महिन्यांनंतरची लग्नाची तारीख काढली . 

  दोन्ही घरच्या सगळ्यांच्या पसंतीला दोघेही खरे उतरत थोड्याच दिवसात एकत्र बंधनात अडकले .


Rate this content
Log in

Similar marathi story from Romance