Shobha Wagle

Tragedy Others

3  

Shobha Wagle

Tragedy Others

खेळ नियतीचा

खेळ नियतीचा

11 mins
1.7K


      

"सुरेखा, झाला नाही का चहा?" रमेश जोराने ओरडला. 

"अहो आणते आणते", आतूनच सूरेखाने उत्तर दिले

पण तिला यायला दोन मिनिटे उशीर झाला. रमेशचा पारा चढला. 

"माझी तुला पर्वाच नाही. कधीपासून मी वाट पाहतो." 

तो आणखी काही बोलायचा तेवढ्यात सुरेखाने त्याच्या समोर चहाचा कप धरला. 

"किती गार हा चहा! तुला माहीत आहे मला गरम चहा लागतो, तरी मुद्दाम तू मला गारच करून देते." "अहो, दूध गॅसवर होते. ते ऊतू जाईल म्हणून थांबले, तो पर्यन्त वेळ झाला. द्या गरम करून देते." रमेशने कप पुढे केला व सुरेखा तो घेणार इतक्यात त्याने त्या कपातला चहा तिच्या तोंडावर फेकला व ओरडला

"घे तूच पी तो" 

व कप जोराने खाली आपटला. घरभर काचा पसरल्या. चहा एवढा गार नव्हता व जास्त गरम ही नव्हता म्हणून बरे झाले. नाही तर सुंदर सुरेखा क्षणात विद्रुप झाली असती. ती काहीही न बोलता आत गेली व नवीन चहा बनवून त्याला आणून दिला व नंतर काचांचा पसारा आवरू लागली. मनात विचार करू लागली, माझ्यावर जिवापाड प्रेम करणारा हाच कां रमेश? किती बदलला हा माणूस!

स्वभावाने बदललाय तसे वागणे ही बदललेयं

एक होतकरू चांगला माणूस म्हणून ह्याच्या प्रेमात पडले. सगळं सोडून ह्याच्या बरोबर आले. लग्न झाल्यानंतर ह्याचे एक एक प्रताप व गुण दिसू लागले. दारू घेणे,सतत मित्राबरोबर भटकणे,पैसे लाऊन रमी खेळणे. कधीतरी मजा म्हणून खेळतो म्हणत होता. पण हल्ली ह्याच जास्तच झालयं. एकदा जाब विचारला तर उलट सुलट बोलून मलाच गप्प केले. आणि मीच पायावर घोडं मारून घेतलं होतं आता सांगणार तरी कुणाला? आणि एक दिवस तो मोटर सायकलचा अकॅसिडेंट झाला व होत्याचे नव्हते झाले.


त्या दिवशी रविवार होता. रमेश व त्याच्या खास मित्रांनी जंगल पार्टी ठरवली. एका मित्राचे वापी मध्ये फार्म हाऊज होते. तेथे जायचे ठरले व भल्या पहाटेला सारे मित्र मोटर सायकलवर स्वार होऊन निघाले. दिवसभर मौज मजा केली. त्यामध्ये खाणं पिणही आलं. वेळेचे भान राहिले नाही. नंतर भरभर परतीला निघाले. रात्र झाली होती. थोडी नशा ही चढली होती. मोटर सायकलची रेस लावायची पण हुक्की आली, व घडू नये ते घडले. समोरहून येणाऱ्या ट्रकला चुकवण्याकरिता रमेश डावी कडे वळला. ट्रक पासून बचावला पण मोटारसायकल दरीत कोसळली. मागे बसलेल्याला जबर मार लागला. रमेशने हेल्मेट घातले होते म्हणून डोक्याला मार लागला नाही पण पाठीला, पायाला जबर इजा झाली. रमेशला तीन महिने हॉस्पिटल मध्ये राहावे लागले. दोन ऑपेरेशन करावी लागली. कितीतरी दिवस फिजिओथेरपी केली पण काय नियतीचा खेळ म्हणावा. रमेश आपल्या पायावर परत कधीही उभा राहू शकला नाही. कंबरेपासून खाली त्याचे शरीर पूर्ण लुळे पडले. सुरेखा ने खूप प्रयत्न केले. कितीतरी डॉक्टर केले, कोण म्हणेल ती औषधं केली पण कशाचा उपयोग झाला नाही. रमेश कायमचा अपंग झाला. ह्याचा परिणाम त्याच्या स्वभावावर ही झाला. मवाळ प्रेमळ रमेश, चिढखोर व तापट झाला.


बायकोच्या जीवावर जगू लागला व त्यामुळेच त्याचा चिढखोरपणा वाढू लागला. तिला हे समजत होते व त्याची दया ही येत होती. तो कसाही वागला तरी ती त्याच्याशी प्रेमानेच वागत होती. 


सुरेखा आई वडिलांची लाडकी लेक होती. रंगाने गोरी, रुपाने उजवी, चाफेकळी नाक, लाल लाल ओठ, गुलाबी गाल व काळे कुरळे लांब केस. ह्या रुपामुळे सर्वांचेच तिच्याकडे पटकन लक्ष जायचे. तिचे कुटुंब खाऊन पिऊन सुखी होते. एक मोठी बहीण, लहान भाऊ व आई वडील. एवढच कुटुंब, पण सुखी व समाधानी. आई वडिल दोघेही शाळेत शिकवत. त्यामुळे तिनही मुले ही चांगली शिकत होती. मोठ्या बहिणीचे वयात आल्यावर लग्न लाऊन दिले. सुरेखा कॉलेजमध्ये जायची व लहान भाऊ दहावीच्या वर्गात.


त्यांच्या घरासमोरंच देशपांडेंचा बंगला होता. त्याचा एकुलता एक मुलगा संदिप विलायतेला जाऊन वकिली शिकून आला होता. त्याची नजर सुरेखावर पडली. त्याला ती खूप आवडली व तो आपल्या आईशी त्या बद्दल बोलला. त्याचे आईवडील ही सुरेखाला व तिच्या घरच्यांना चांगले ओळखत होते. त्यांना ही सूरेखा सून म्हणून हवी होती. त्या दोघांच्या पालकांनी ठरवले व सगळे ठरल्यावर सुरेखाला सांगितले.


सुरेखाचे मत त्यांनी जास्त विचारात घेतले नाही. श्रीमंत घराणे, शिकलेला मुलगा आणखी काय हवं असं आईवडिलांचं मत झालं. कुणीच सुरेखाचा विचार केला नाही व साखरपुड्याची तारीख नक्की केली. सुरेखाचे बाहेर सुत जमले होते. तिचा प्रियकर रमेश होता. त्याचे इंजिनिअरिंगचे शिक्षण झाले होते व तो एका प्रायव्हेट कंपनित कामाला होता. त्याचे आईवडील गावी शेती व्यावसायात होते. तिची मोठी बहीण साखरपुड्याला आली होती. सुरेखाचा नूर तिला वेगळा दिसला व त्या बद्दल तिने तिला खोदून खोदून विचारले. तेव्हा तिने आपल्या व रमेशच्या प्रेमाबद्दल सांगितले. रात्रभर दोघींचा डोळा लागला नाही. ताईने तिला खूप समजावले. पण सुरेखा मानायलाच तयार नव्हती. शेवटी ताईची समंती घेऊन ती भल्या पहाटे रमेश बरोबर मुंबईला गेली व तेथे रजिस्टर लग्न करून दोघे राहू लागले.


आपल्या पोरीने आपल्या तोंडाला काळं फासलं. साखरपुड्याच्या दिवशी पळाली, हे गावभर पसरले. आईवडिलांना तोंड दाखवायला जागा राहिली नाही.

देशपांडेंच्या संदिपला तर तो एक मोठा आपमानच वाटला. सुरेखाशी सर्वांनीच नाते संबंध तोडून टाकले. फक्त तिची ताई सोडून.


रमेशने एक लहान सेल्फ कन्टेन्ड मुंबईत जागा घेतली होती. रजिस्टर पद्दतिने लग्न करून तेथे त्यानी आपला संसार मांडला. गावी आईबापाला लग्न केल्याचे कळवले. असे अचानक व काही ही थांगपत्ता लागू न देता सरळ लग्न केलयं म्हटल्यावर त्याचे वडील व मोठा भाऊ खूपच रागावले.

 "लग्न म्हणजे काय खेळ वाटला?" 

 असा त्यांनी जाब विचारला. 

 "सगळं स्वतः केलंस! आम्ही कोणी नाही? ये, तुझा हिस्सा घे व चालू लाग. परत आयुष्यात तोंड दाखवायची गरज नाही", 

 अशी त्याला सक्त ताकीद दिली. आता घरचे रागावलेत, थोड्या दिवसांनी राग निवेल, मग जाऊ, असे रमेश व सुरेखाने ठरवले.


सुरेखाचे शिक्षण पूर्ण झाले नव्हते व आता पूर्ण करणे कठीण होते. तिने डी.एड. करायचे ठरवले. ती हुशार होतीच, त्यामुळे उच्च श्रेणीत पास झाली व त्याच वर्षी तिला चांगली सरकारी प्राथमिक शाळेत नोकरी ही लागली. सगळे ठीक चालले होते फक्त दोघांचे आईवडील मात्र त्यांच्याशी बोलत नव्हते. ह्याचीच दोघाना फार खंत होती.


दरम्यान सुरेखाला दिवस राहिले. दोघांच्या आईवडिलांना ही खबर कळवली, पण ते तटस्थ राहिले. सुरेखाची ताई मात्र तिला भेटायला व चार दिवस आपल्याकडे राहायला घेऊन गेली. ती अगोदर सुध्दा येऊन जाऊन होती. आईवडिलांनी करायच्या सगळ्या चाली रिती ती आपल्या परीने करून आपल्या छोट्या बहिणीचे व मेव्हण्याचे कौतुक करत होती. तसेच सुरेखा व रमेश ही तिला वडिलकीचा मान देत होते.


दिवस भरताच सुरेखाने एका सुंदर मुलीला जन्म दिला. तिच सगळं बाळंतपण तिच्या ताईनेच केलं. मुलगी एका महिन्याची झाल्यावर रमेश बायको मुलीला घेऊन गावी वडिलांकडे गेला. त्याच्या आईने थोडे सोपस्कार केले पण मनात राग धरूनच. वडिल आणि भाऊ बोलले सुध्दा नाहीत. एक जेवण घेऊन ते लगेच परतले. हा अनुभव घेऊन सुरेखाने आपल्या आई वडिलांकडे जाण्याचा विषयच काढला नाही. आपल्या मुलीला ताईकडे सोपवून सुरेखा शाळेत जात होती व शाळा संपल्यावर मुलीला घेऊन घरी यायची. ताईचा आधार होता म्हणून ती आपली नोकरी टिकवून होती.


दिवसेेन दिवस खर्च वाढत होता. एका पगारावर भागवणे कठीण होऊ लागले. सुरेखाने मग शिकवण्या घेतल्या. मुलांच्या घरी जाऊन शिकवणे रमेशला पसंत नव्हते. त्याचे संशयी मन त्याला स्वस्थ बसू देईना. तिला घरी यायला जरा उशीर झाला तर तो चिडचिड करायचा. 

"एवढा वेळ काय शिकवण्याच चालल्या होत्या का?" 

असा तो तिला टोमणे मारायचा. मग ती मुलांच्या शिकवण्या घरीच घेऊ लागली. तरी त्याची पिरपिर सुरूच. 

"धड शांतता नाही घरात. घराची शाळा झालीय." 


आता चार पैसे मिळवायचे तर हे सर्व करायलाच हवे होते. या उलट रमेशने सुध्दा शिकवण्यांमध्ये तिला मदत करायला हवी होती. पण शिकवणीच्या वेळी त्याची चिडचिड बडबड चालू होत असल्यामुळे मुलांची संख्या कमी होऊ लागली. सुरेखाही आता खूप वैतागली. संवादाऐवजी वाद होऊ लागले. रोज धावपळ, शाळेच्या,घरच्या कामाच्या ताणाने तिचा जीव मेताकुटीला यायचा. तिची ताई तिला मदत करायची पण मऊ म्हणून किती खणायचं! मदत घेण्यालाही काही सिमा असतेच ना!


एके दिवशी संध्याकाळी तिची शिकवणी चालू होती. इतक्यात रमेशचे दोघे मित्र विलास व समीर घरी रमेशला भेटायला आले. तिने ही त्यांचे चहा पाणी देऊन आदरातिथ्य केले व पुन्हा ती मुलांच्या शिकवणीला लागली. वेळ झाल्यावर मुलांना तिने घरी पाठवले व

 "मी छोटीला घेऊन येते हं" 

 असं सांगून ती आपल्या ताईकडे गेली. थोड्या वेळाने आली तरी रमेशचे मित्र मंडळी घरीच होती. "सर्वांना एक एक कप चहा कर गं" 

 असे रमेशने तिला फर्मावले. तिने ही मुकाट्याने करून दिले. चहा घेऊन मंडळी गेली. 

आज रमेशची मनःस्थिती खूपच चांगली होती. "छोटीला मी खेळवतो, तू लाग स्वयंपाकाला"

 असे तो म्हणाला. तिला वाटले मित्र भेटून गप्पा झाल्याने बरं वाटलं असेल. येऊ देत, गप्पा मारू देत. चहा पाणी द्यायचे ते देईन पण घरात शांतता राहू दे असे तिने देवाकडे हात जोडून मागणे मागितले.


दोन दिवसांनी समीर एकटाच आला. तिची शिकवणी चालू होती. रमेशने तिला हाक मारून आपल्या खोलीत बोलवून घेतले व सांगितले, "लडंनचे एक साहेब येणार आहेत परवा. ते मला त्यांच्या कंपनित काम देणार आहेत. आमचं सगळं बोलणं झालंय. मी घरी बसून काम करणार. मग आपला पैशांचा प्रश्न सुटेल. तुला परवा समीर बरोबर त्या साहेबांकडे जायचे आहे माझी फाईल घेऊन." 

सुरेखाने लगेच म्हटले, 

"अहो, मग साहेबांनाच आपल्या घरी बोलवा ना." "नाही, ते शक्य नाही. ते आपल्या घरी येणार नाहीत. त्यांच्याशी तुझी ओळख व्हावी व आपली परिस्थिती त्यांना कळावी म्हणून तुला मी पाठवतो. त्यांनी विचारलेल्या प्रश्नांची खरी खुरी उत्तरं द्यायची. घाबरू नकोस, समीर असेल तुझ्या बरोबर." 

तिला ही ते पटले. सुखाचे दिवस येतात तर येऊ दे, असा तिने विचार केला.


तिसऱ्या दिवशी सुरेखा साहेबांना भेटायला जायचं म्हणून तयार झाली. तिने सादाच ड्रेस

घातला होता, तर रमेशने तिला गुलिबी साडी नेसायचा हट्ट केला.

 "हे काय पोरी सारखा ड्रेस घालून जाते, चांगली ती गुलाबी साडी घाल. माझी बायको म्हणून जाते ना!" उगीच त्याचा मुड बिघडायला नको म्हणून तिने त्याच्या पसंतीचा पेहराव केला. तयार होऊन आल्यावर रमेश सुध्दा तिच्याकडे पाहुन भान हरपून गेला. अगोदरच सुंदर, गुलाबी साडी व हलकासा 

मेकअप, खरंच सुरेखा एक लावण्यवतीच दिसत होती. समीर आल्यावर ती टॅक्सीतुन फाईल घेऊन निघाली.

साहेब एका प्रशस्थ हॉटेल मध्ये उतरले होते. समीर व सुरेखा रूम मध्ये आल्यावर त्यांनी समीरला हस्तांदोलन केले. 

"एस एस कमिंग, वेलकम वेलकम माय स्वीट हार्ट."

म्हणून सुरेखापुढे हात केला. पण सुरेखाने दोन्ही हात जोडून त्यांना नमस्ते केले. साहेबांनी फाईल बघण्याचा देखावा केला, जुजबी गप्पा समीरशी मारल्या व थोड्या वेळाने समीरला खाली कामा करता पाठवलं आणि समीर ही गेला. सुरेखा बरीच घाबरली. एवढ्यात ते साहेब तिच्या जवळ येऊन बसले व बोलले,

"एस माय डार्लिंग यू आर लुकिंग सिंपली बुय्टीफुल ".

असे म्हणून त्यांनी तिचा हात धरला व तिला जवळ खेचण्याचा प्रयत्न केला. सुरेखा पण किचांळली, "ओट नोन्सेन्स आर यू डुईंग?"

 असे म्हणून तिने आपली सुटका करून घेतली. पण नंतर जे साहेबांनी तिला सांगितले ते ऐकून ती चक्रावून गेली.

"नाव यू कान्ट से नो. आय ह्यव ओलरेडी पेड हाफ ड मनी टू युवर हजबंड एण्ड रेस्ट, आय वील पे यू"" सुरेखा लगेच भानावर आली. काहीतरी बहाणा सांगून तिने तात्पुरती वेळ मारून नेली. काही दिवसांनी मी स्वतः तुम्हाला भेटायला येते असे त्यांना आश्वासन दिले. 

"नो प्रोबलम माय डार्लिंग" असे म्हणून साहेबांनी तिला हस्तांदोलन केले. तिने ही त्यांना प्रतिकार केला नाही पण, हातावर दाब येताच आपला हात सोडवून घेतला. एवढ्यात समीर ही एक बॉक्स घेऊन आला. ते त्याने साहेबाना दिले. दोघे ही साहेबांना बाय बाय करून बाहेर पडली.


टॅक्सीत बसल्यावर तिने समीरला सगळ्या गोष्टीचा जाब विचारला. तो ही चकीत झाला.

 "नाही वहिनी, मला हे काही माहीत नव्हते." आपल्या मुलाबाळांची शपथ घेऊन सांगितल्यावर तिची खात्री पटली. मग तिने त्याला सरळ प्रश्न विचारला, 

 "आता मला सांगा भावोजी, तुम्हाला कुणाची साथ द्यायची आहे, तुमच्या मित्राची की माझी?"

 "नक्की वहिनी, तुमचीच साथ द्यायची आहे. माझीच मला लाज वाटते. तुम्ही सांगा वहिनी, तुम्ही सांगाल त्या प्रमाणे मी करीन." 

  "बरं तर, उद्या माझी शाळा सुटते तेव्हा मला बाहेर भेटा. मी काय करायचं ते सांगते",

  असे सुरेखा त्याला म्हणाली. ती घरी आली. तिची नाराजी तिने रमेशला दाखवली नाही, उलट आपण खूप आनंदित असल्याचा खोटा आव आणला. रमेश ही खुष होता. बायकोच्या सौदर्याचा बाजार करून ऐश आरामात जगण्याचा त्याचा मनसुबा होता. तर इथे सुरेखा रात्रभर न झोपता साहेबाला व रमेशला कसा धडा शिकवायचा ह्याचा विचार करत राहिली.


दुसऱ्या दिवशी ती सगळं ठरवूनच शाळेत गेली. अगोदर मुलीला ताईकडे सोपवले. दोन दिवस मुलीला तुझ्याचकडे ठेव, मला बाहेर जावं लागतंय, असे ताईला सांगून शाळेत गेली. दुपारी समीर आल्यावर जवळच्या बागेत बसून त्यानी सगळं कसं काय करायचं याचा बेत आखला व मोठ्या निर्धाराने ती घरी परतली.


रमेशने छोटी बद्दल विचारले तर तिने सांगितले की ताईने तिला वाढदिवसाला जायचंय म्हणून ठेऊन घेतलंय. तिच्या बेता प्रमाणे समीरने सगळी तयारी केली व दुसऱ्या दिवशी तो तिला घेऊन साहेबांकडे गेला. सुरेखाचे स्वागत साहेबानी अतिशय आनंदाने केले. आता किमंत वसूल होणार म्हणून तो आनंदित होता. त्याने दोन शँपेनचे पेग तयार केले. एक स्वतः घेतला व दुसरा सुरेखापुढे धरला. तिने ही सराईत असल्या सारखा तो घेतला व ओठी लावला व पीत असल्याचं नाटक केलं. साहेबालाही भरपूर पाजली. त्या धुंदीत साहेब तिच्याशी अंगलट करू लागले. त्यांनी तिच्या पदराला हात घातला. तेव्हा तिने त्याना जोराचा धक्का दिला. ते परत उठून तिच्यावर झेप घेणार तेवढ्यात ते भोवळ येऊन खाली पडले कारण सुरेखाने त्यांच्या नकळत त्यांच्या ग्लास मध्ये विष टाकले होते. साहेब गतप्राण झाले असल्याची तिने खात्री केली. तेवढ्यात समीर पोलिसांना घेऊन रूम मध्ये आला. आपणच साहेबांना विष पाजले असल्याचे तिने कबूल केले व सुरेखाला खुनाच्या आरोपाखाली पोलिसांनी पकडले.


दुसऱ्या दिवशी सगळ्या वर्तमान पत्रात खुनाची बातमी आली. ह्या खुनाच्या भानगडीत सुरेखाचा काय संबंध याचा तिच्या लोकांना काही बोध होईना. खुनाच्या केसचा खटला सुरू झाला. सुरेखाचे वकिलपत्र कोण घेईल? समीर व तिची ताई खूप काळजीत होती. अचानक देवा सारखे संदिप देशपांडेने तिचे वकिलपत्र घेतले. हा तोच होता ज्याच्याशी सुरेखाचा साखरपुडा ठरला होता. ताईला थोडा संदिपमुळे दिलासा मिळाला. चार पाच वेळा खटल्याची सुनावणी झाली.


संदिपने मोठ्या शिताफिने सुरेखाची सुटका करून घेतली. स्त्रिला स्वचारित्र्य संरक्षर्णाथ जर खून करावा लागला तर कोर्टाने तिला दोषी ठरवू नये हे बऱ्याच उलथापालथी करून सिध्द करून दाखवले व तिची निर्दोष म्हणून सुटका करून घेतली. कोर्टाचे कामकाज संपल्यावर संदिप सुरेखाला भेटला. तिला ही आपण त्याच्याशी जे वागलो याचा पश्चाताप झाला. 

"संदिप,सोरी आणि खूप आभार मानते तुझे "ती बोलली. 

"जाऊ दे गं, हा सारा नियतीचा खेळ. दोष तुझा नाही. तुझ्या नवऱ्याशी मला जरा बोलायचे आहे येऊ कां घरी?" 

असे त्यांने विचारले व तिने ही संमती दिली. खरं म्हणजे रमेशचे तोंड ही बघायची तिची इच्छा नव्हती. त्या दिवशी ती ताईच्याच घरी राहिली. दुसऱ्या दिवशी ती, संदीप व तिची ताई मिळून रमेशला भेटायला गेले. 


संदिपने त्याला स्वतःची ओळख करून दिली आणि त्याला म्हणाला, 

"रमेश किती रे कमनशीबी तू? सोन्यासारखी बायको तुला मिळाली होती. मला त्यागून ती तुझ्याकडे, तुझ्या प्रेमाखातर पळून आली होती. तुझा एवढा अपघात झाला तरी ती तुझी सेवा करत राहिली व महाकष्टाने संसार सावरत राहिली. तिचा तू प्रियकर! तुला प्रियकर म्हणणे सुध्दा लज्जास्पद आहे. तुझ्या अशा वागण्याने लोकांचा प्रेमावरचा विश्वासच उडून जाईल. प्रेमात स्वार्थ असता कामा नये, त्यागच असावा. सुरेखाचे तुझ्यावर खरं निःस्वार्थी प्रेेम होते. तिचा विश्वासघात केलास तू. तुझ्यावर विसंबून सर्वस्व सोडून आली होती ती. आता तुझ्यामुळे एकटी पडलीय ती. बघ, नीट वाग आता. तिला आणि तिचा संसार सांभाळ", 

असे बोलून तो बाहेर पडला. नंतर ताई व सुरेखाही घराबाहेर गेल्या. सूरेखा ताईकडेच राहिली. दुसऱ्या दिवशी रमेशचा ताईला फोन आला. तिला, सुरेखाला व छोटीला पाच मिनिटांकरता येऊन जायला सांगितले. तसेच त्याने संदिपला ही बोलावले.

" वेळ कमी आहे, दिरंगाई करू नका, लवकर या, असं म्हणाला."


काय घोळ झाला असेल म्हणून सगळे रमेशकडे आले तर रमेश मरणाच्या दारात होता. त्याने सुरेखाचे पाय धरून माफी मागितली व संदिपला विनंती केली 

"तुझा हक्क मी घेतला होता. पण मी नालायक ठरलो. मी आता चाललो "

असे बोलता बोलता तो कोसळला. त्याने जालीम विष प्राशन केले होते. त्याने आत्महत्या करून स्वतःला शिक्षा दिली होती. काही महिन्यांनी संदिपने छोटी सकट सुरेखाचा स्वीकार केला. आईवडिलांनीही सुरेखाला माफ केले.      


Rate this content
Log in

Similar marathi story from Tragedy