केली पण प्रीती -भाग ७
केली पण प्रीती -भाग ७


कथा पुढे -
पण कसे??
मालूला खबर न लागता कसे ??
विचारअंती निर्णय घेतला.
मी माझ्या एका विश्वासु ज्युनिअर ला बोलावलं .
कामाच्या चार गोष्टी बोलतानाच सहज विचारले, "का रे हर्षा तुझं एफ बी अकाउंट आहे का?"
"हो सर आहे ना ? का सर?"
"सहज विचारलं रे . वापरतोस का रेग्युलर ?"
"म्हणजे काय? रेग्युलर असतो ना रात्री ऑनलाइन . तुम्हीच मला कधी अॅक्टीव दिसत नाही. तुम्हांला रिक्वेस्ट पाठवली होती , २-३ महिन्यापूर्वी , तुम्ही अजुनपर्यंत अॅक्सेप्ट केली नाही."
"अरे काय सांगु. मी थोडा बॅकवर्डच आहे या बाबतीत. कधीतरी ४ महिन्यातून एकदा लॉगिन होतो. आणि . . . आमची मिसेस हॅण्डल करते आमचं अकाउंट "
"ओहो !!!!असं का? समजलो. मग तुम्ही दुसरं अकाउंट ओपन करा वेगळ्या नावाने. लोकांचे कितीतरी फेक अकाउंटस असतात. "
"हं ! हो का. पण घरी कळलं तर?" मला तीच शंका.
"कसं कळणार सर ?. नाव दुसरं लावायचं आणि सांगायचं नाही कुणाला. काय सर तुम्ही इतके भीता?"
"अरे नाही सवय नसल्याने भीती वाटते इतकच! तसा भित्रा नाहिय मी . एफ बी वर काहितरी वापरलं कि पब्लिक होतं सगळं असं वाटतं मला "
"मला यातलं सगळं माहित आहे सर मी शिकवेन ना , कसं सेफ वापरायचं. काही अवघड नसतं सर. मॅनेज करता आलं पाहिजे. प्रायवसी सेटिंग करून घ्यायची. तुमची प्रोफाइल कुणाला दिसावी -कुणाला नाही हे पण तुम्ही ठरवू शकता. "
"हो का ?अरे व्वा! "
"बरं , तुम्हांला आता वेळ आहे का? मी थोडंसं दाखवतो , शिकवतो तुम्हांला . म्हणजे बघा तुम्हांला जमतंय का ?"
मी घड्याळाकडे पाहिलं . अर्धा एक तास वेळ होता माझ्याकडे. वर्कलोड कमी असतं कधीकधी .
मी म्हटलं , "हो"
हर्षाने त्याचा लॅपटॉप माझ्या केबिनमधे आणला.
त्याचं एफ बी अकाउंट लॉगिन केलं.
बर्याचशा गोष्टी दाखवल्या , समजावल्या . मला सोपंच वाटलं .
आश्चर्य वाटलं कि इतकी मोठी कंपनी चालवून सुद्धा मी या बाबतीत अनाडीच कसा राहिलो.
पाहिलं तर त्याचे ७०० च्या वर मित्र आहेत.
"कुठे भेटले हे सगळे.?" मी.
"सगळे काही अोळखीचे नाहित. सर. १०० - १५० वगैरे माझे आताचे मित्र आहेत. यात काही एफ. बी
मित्र आहेत. काही वेगवेगळ्या ग्रूप वर भेटलेत , विचार जुळ ले मैत्री झाली. काही म्युच्युअल मधून भेटले. "
" अरे व्वा! अन बाकीचे २००"
"सर ते माझे शाळेचे , कॉलेजचे ,कॉलनीतील मित्र आहेत . काही जुने सहकर्मचारी आहेत. काही मी शोधलेत . काहींनी मला शोधले."
म्हणजे आपण कुणालाही शोधू शकतो?
" हो त्यात काय. तुम्हीच एक नाव सांगा, मी शोधून दाखवतो."
"मी सहज म्हणालो, सुषमा घोरपाडे"
त्याने नाव टाइप केलं आणि ८-१० फोटो आले त्या नावाचे.
"सर बघा यातली कोण तुमची मैत्रिण आहे?"
"सॉरी हर्षा! माझी कुणीच ओळखीची नाही. मी सहजच काहितरी नाव सांगितलं ."
तो मोठ्यांदा हसला,
"काय जोक आहे सर? ते जाऊ द्या. बरं एखादं ओळखीचं नाव सांगा!"
मी रवीचं , माझ्या मावसभावाचंं नाव सांगितलं , आणि तो सापडला .
मग अनायास निघालं 'शरयु पोतदार'"
"लग्नानंतरचं नाव सर?"
"काही कल्पना नाही बुवा"
"ठीक .आहे का बघुयात ? जर अकाउंट त्याच नावाने असेल तर? . . सापडेलही."
आताही तसंच झालं ३-४ प्रोफाइल आल्या.
आणि आश्चर्य . . . . !!!!!
त्यातली एक ती होती , माझी जुनी मैत्रीण शरयु!!!
गुलाबी साडीत केवढा गोड, सुंदर फोटो होता.
कुठल्यातरी सिनेमाचा डायलॉग आठवला--- "सादगी मे ही सुंदरता होती है"
मालूला भयंकर दागिन्यांची हौस होती आणि मेकपचं खूप वेड!!
म्हणजे तयार झाल्याखेरीज ती फोटोच काढत नाही.
तिला नॅचरल फोटोज आवडत नाहीत.
पण शरयुचा हा फोटो किती साधा ! किती नॅचरल ! पण किती सुंदर !!
आजही ती तशीच साधी सरळ आहे, पूर्वीसारखीच !
पण एक बदल जाणवला, ती आता खूप आकर्षक दिसत होती. म्हणजे तेव्हांपेक्षाही.
मी चटकन ओळखलं तिला.
"हो ! हीच ती"
"सर, त्यांना फ्रेन्ड रिक्वेस्ट पाठवू का?"
"अरे पण हे तुझं अकाउंट अोपन आहे ना ? माझं कुठे उघडलंय अजुन?" मी घाई घाईने म्हणालो.
" तसं नाही सर तुमचं अकाउंट उघडून रिक्वेस्ट पाठवू का असं म्हणालो मी. !तुम्हांला शिकवीन ना कशी पाठवायची रिक्वेस्ट . आलेली फ्रेन्ड रिक्वेस्ट अॅक्सेप्ट करताना काय काळजी घ्यायची ? अनोळखी व्यक्तिची रिक्वेस्ट आली तर काय काय चेक करायचं ?,सगळं सांगतो तुम्हांला "
"आता शरयुची प्रोफाइल पाहुन सांग ना डिटेल्स?"
"सर यांनी पूर्ण माहिती नाही दिलीय"
"कुठे असते ती आता?"
" सर, फक्त इंदौर लिहिलय? बाकी सेटिंग अशी आहे कि फक्त फ्रेन्ड लिस्ट मधले लोकच पाहू शकतात. पब्लिक नाहिय प्रोफाइल !"
" फोटो दाखव ना" मी म्हणालो.
तिचा नवरा नागपूरचा होता तर ती इंदौरला कशी गेली ? कळत नव्हतं मला.
"सर , दोनच फोटो आहेत. एक त्यांचा आणि एक फॅमिली चा!"
एक मुलगा , एक मुलगी आणि नवर्यासोबत छान फोटो होता.
बघून खूप बरं वाटलं .
" हर्षा , बस झाली आज पुरती ट्युशन!! उद्या पुढचा क्लास" मी म्हणालो , अन त्याने हसून लॅपटॉप बंद केला
क्रमशः