swati Balurkar " sakhi "

Romance

3  

swati Balurkar " sakhi "

Romance

केली पण प्रीती - भाग ६

केली पण प्रीती - भाग ६

8 mins
1.8K


एक दिवस ऑफिसमधून निघतच होतो.

रिसेप्शन जवळ हेलमेट घेतलं तेवढ्यात ऑफिसचा फोन वाजला . रिसेप्शनिस्टने फोन उचलला आणि मला थांबवलं

" नाईकसर एक मिनिट तुमच्यासाठी फोन आहे "

"कोण?"

"सर बहुतेक घरून आहे."

"हॅलो, कोण बोलतंय ?"

"हॅलो श्रीधर , मी शरयु बोलतेय घरून, इथे घरी तुमचे मेहुणे आलेत. म्हणजे मालुचे भाऊ."

"काय माधव?? ?!अरे यार तो घरी कसा आला?"

"ते बहुतेक साखरपुड्याचं आमंत्रण देण्तयासाठी आलेत. म्हणजे मावशींना माहित आहे ना सगळं? "

"तशी कल्पना आहे. माई नाना फोन करणार होते आत्याला. शरयु प्लीज , त्याला बसव आणि काळजी घे. मी पोहोचतो १० मिनिटात."

"ओके श्रीधर. मी आहे तुम्ही टेंशन घेवू नका"

ती बोलली आणि हसली.

साखरपुड्याचे आमंत्रण देण्यासाठी माझा मेहुणा माधव घरी आला आणि शरयु ने दार उघडले होते. तिला पाहुन तो चपापला होता.

मग तिने त्याचा छान पाहुणचार केला . हे त्याने मला पुन्हा सांगितले होते.

शरयुने आत्याला ही खूप छान समजावले होते ,मग तो आत्याला आमंत्रण देऊन गेला.

मला शरयुचे आभार मानायचे होते पण ती काही एकटी भेटत नव्हती.

त्यानंतर काही दिवसांनी एकदा शरयु हॉलमधे अभ्यास करत बसली होती.

संध्याकाळची वेळ होती , मी लवकर अालो होतो.

"काय मग ?अभ्यास जोरात चाललाय वाटतं!" मी सहज म्हणालो.

"हो ना ! उद्या पहिला पेपर आहे . खूप टेंशन आलय मला ."

"आत्या कुठे गं ?"

"ते गुरुमाऊलींच्या पादुका आल्यात कॉलनीत , जोशी काकूंकडे. तिथे गेल्यात मावशी दर्शनाला. म्हणूनच मी इथे बसले अभ्यासाला. काही हवय का?"

"काही नाही. चहा घेतला असता मस्त !"

"मी करू का?" शरयु बोलली.

"नको . तू अभ्यास कर. मी बघतो. रीमा कुठे गं ?"

"ती खोलित आहे. अभ्यास खूप झाला, आता आराम करतीय."

"हं . छान आहे."

मी खोलित जाऊन फ्रेश झालो आणि किचनमधे

चहा करायला गेलो.

शरयु ला थँक्यू म्हणण्याची चांगली संधी होती.

दूध तापायला ठेवलं. चहा -साखर सापडेना . ओरडून विचारले. तिने सांगितलं .

पण इथे चहा कुणाला येत होता ?

तो पण विचारून घेतला. मग कसेतरी चहा करायला ठेवला.

आता आलं सापडेना!

" शरयुsss"

"आले sss! आता तुम्हांला अदरक सापडत नाहिये कि छोटी किसणी ??"

"दोन्ही "

ती आत आली.

किती गोड हसत होती.

सहज किसणी आणि आलं माझ्या हातात दिलं

"तु्झ्यासाठिच करतोय चहा, परीक्षा आहे ना उद्या ." असं म्हणत जवळ गेलो .

हे तिला अनपेक्षित होतं .

(पण मला आभार मानण्याची अन् टेंशन दूर करण्याची एकच पद्धत अवगत होती.)

तिने दोन्हीं हाताने मला थांबवण्यासाठी हात समोर आणले अन् मी तिच्या हातात माझी बोटे गुंफली अन् पटकन तिला भिंतीला टेकवलं.

माझा चेहरा तिच्या चेहेऱ्यापाशी जाण्यापूर्वी, ती कठोरतेने पन जोरात रागानेच बोलली.

""कंट्रोल युवरसेल्फ श्रीधर! . माईंड इट"

मी विजेचा धक्का लागल्याप्रमाणे बाजुला झालो.

माझा चहा करपत होता तिकडे .

ती रागानेच तिच्या खोलित गेली बहुदा.

पुन्हा माझीच चूक होती.

पण यावेळचं तिचं वागणं करेक्ट होतं .

तिच्या त्या झिडकारण्याचं गिल्ट अजुनही माझ्या मनात आहे.

आमच्या दोघांचीही लग्नं ठरलेली होती हे कसा विसरलो मी त्यावेळी.

ही माझी शेवटची जवळीक होती , तिच्याशी.!!

४-५ दिवसात लगबग सुरू झाली.

मग वेगळे वातावरण .

रोजच घरचे फोन, मालुचे फोन लॅण्ड लाईन वर सुरु झाले.

मी वेगळंया विश्वात रमायला लागलो.

साखरपुड्यादिवशी लग्नाची तारीख ठरणार होती, कारण मला बैंगलोरला राहण्याची व्यवस्था करायची होती.

नाशिकला साखरपुडा झाला.

सगळा आनंदी आनंद !

मी मालूला लग्नाचं दिलेल वचन पूर्णत्वात येत होतं.

महिनाभरातलीच लग्नाची तारीख काढली.

** ***** ***** **

कसल्याशा खरेदीसाठी मालू पुण्यात आली होती.

तिच्या आईवडिलांनी सोबत बाहेर जाण्याची परवानगी दिली.

मग काय ? आम्ही गाडीवर खूप भटकलो.

संध्याकाळी सारसबाग ही झाली.

मग घरी घेवून आलो, आत्याच्या सांगण्यावरून !

आय्याने खूप छान स्वागत केलं तिचं, पण आत्या मनातून खुश वाटली नाही.

मग मी तिला माझ्या खोलीत आणलं , ती लक्षपूर्वक सगळीकडं पहात होती, जणु डिटेक्टिव !

आम्ही दोघं काहीतरी बोलत खूप जवळ उभे होतो, हातात हात होते.

दार उघडं आहे याचं भान राहिलं नाही. (नेहमी प्रमाणे).

तेवढ्यात शरयु चहा घेवून आली. मी एकदम गोंधळलो, मालु तर दचकलीच .

"सॉरी नॉक करता आलं नाही, हातात ट्रे होता. !"

"Its ok. no problem! ये ना शरयु. "

"हे बघ ही माझी मालती, होणारी बायको आणि मालू ही शरयु.! रिमा आणि शरयु दोघी आत्याकडे पी .जी. म्हणून राहतात. पदवीच लास्ट इयर आता."

मी भडाभडा बोलून गेलो.

"अय्या हो का? छान वाटलं भेटून. रीमा कुठे आहे?"

माझ्याकडे बघत मालू बोलली होती.

" ती बाहेर गेलीय , बाहेरची कामं आहेत ,शिवाय मैत्रिणींना भेटायचं होतं. ---

अॅक्चुअली आमचा पॅकिंग चाललंय."

"उद्या सकाळी आम्ही परत जातोय. "

परीक्षा झाल्या. शिक्षण सपलं."

हे सांगताना शरयु माझ्याकडे पहात होती अन् मालू शरयुकडे!!

"अरे हो का? "

मालू इतकच बोलली. पण तिने जो कटाक्ष माझ्याकडे टाकला तो बाणांपेक्षा कमी घातक नव्हता .

मी ही अचानक भानावर आलो. शरयु उद्या चाललीय , कायमची.

"अरे शरयु ,चहा तुम्ही का आणला.? आम्हाला बोलवायचं ना " मालू अौपचारिकतेने म्हणाली.

"मावशीच म्हणाल्या दोघे दमले असतील ,खोलीतच चहा देते. म्हणून मग मी आणला. "

आम्ही चहा घेतला.

दोघीत थोडी शांतता ,मग थोडं बोलणं !

मग पुन्हा शांतता .

मला तर काय बोलावे कळेचना.

तिच्याबद्दल बोललो तर मालूचे कटाक्ष जहरीले अन मालू बद्दल काही सांगाव तर शरयुच्या डोळ्यातले अवाचनीय भाव!!

जबरदस्त सँडविच झाल होतं माझं !

थोडावेळाने शरयु गेली.

मालूने खोलवर माझ्या डोळयांत पहात विचारले," श्री ती टपोरे डोळेवाली मुलगी हीच का रे?"

"काय?? कोण टपोरे डोळेवाली? काय विचारतीस?" मी तर उडालोच होतो.

"अरे मागच्यावेळी भेटलो तेव्हां , तुमच्या माई म्हणजे सासुबाई, हिची खूप स्तुति करत होत्या. अगदी माझी आईपण म्हणाली कि एकदा भेटायला पाहिजे त्या मुलीला.

म्हणून विचारलं हीच का ती?"

"कल्पना नाही, पण हीच असेल, कारण माई तर रीमाची तारीफ़ करणार नाही. ती महा फटकळ आहे" . मी.

"तुला पण आवडते कारे ही शरयु?"ती.

"काय गं मालू ,काहिहि काय बोलतेस?" मी.

मी मनातून चरकलो होतो.

"नाहि रे गंमत केली. वर्षभर इथे होतास ना ! काहितरी संपर्क अाला असेल ना . सहजच विचारलं !"

"मालू काय झालं? आता ह्या अनावश्यक विषयावर बोलायचं का अापण? का हा अमूल्य वेळ वाया घालवायचा आपण. आता लग्नानंतरचं भेट ना आपली. " मी जवळ गेलो.

"श्री प्लीज sss मला निघायचंय आता!"

"ok ok! अगं! आत्याशी बोलू ना थोडावेळ . मला उद्या रिलिविंग लेटर आणायचंय . तुला सोडून येतो " मी सावरलं स्वतःला.

"हो अरे निघुयात चल . मला थोडं फ्रेश होऊ दे. साडी ठीक करते, तू जा बाहेर"

"बाहेर जाणं जरूरी आहे का ? "

" ?? श्री प्लीजsss" तिने मला खोलीतुन बाहेर घालवलं.

बाहेर हॉलमधे आलो तर आत्या आणि शरयु जवळ जवळ बसल्या होत्या. आत्याचा हात शरयुच्या हातात होता , ती उदास होती अन् आत्या पदराने डोळे पुसत होती.

"अरे ये ना श्री बस! बघ रे उद्या पहाटेच जाणार पोरी. तू पण या आठवड्यात जाणार. घर कसं खायला उठेल मला." आत्याचा स्वर दुःखी वाटला.

"हो का! उद्या जाणार का तुम्ही?"मी.

शरयु मानेनेच हो म्हणाली.

"पोरींनी खूप लळा लावला रे! शरयुनी तर जास्तच ! मला करमणारच नाही गं !" आत्याला भरून येत होतं .

"मावशी मला पण करमणार नाही तिथे !"

"हो गं आत्या मलाही वर्षभर इथली सवय लागलीय. थोडा वेळ लागेल रुळायला .

"अगं नाना म्हणाले ना काल. महिनाभरात लग्न अाहे , तिकडेच ये रहायला म्हणून ! पुढच्या महिन्यात शरद दादा परत येणारच आहे. मग काय दादा वहिनींमधे गुंग होशील तू." मी समजावलं

" हो रे बघते आता कसं जमतं ते! घर सोडून यायचं म्हणजे अवघड आहे रे. येते पुढच्या आठवड्यात तुमच्याकडे. श्रीधर सुनबाई कुठे आहे रे ?" अात्या शांत झाली.

" अगं ती फ्रेश होवून येतीय. तिला सोडून येतो ना पाहुण्यांकडे!" मी.

एवढ्यात मालू मस्त फ्रेश होऊन आली.

आत्याच्या पाया पडली.

आत्याने तिलाही दुसर्‍या बाजूला बसवून घेतलं .

आत्याकडे शरयुसाठी असलेला ओलावा मला मालूसाठी जाणवला नाही..

आम्ही बाहेर पडलो.

रात्री मी उशीरा परतलो.

शरयु आणि रिमाचा औपचारिक निरोप घेणं झालं नाही.

दुसर्‍या दिवशी मी अॉफिसला तयार होईपर्यंत त्या दोघी गेलेल्या होत्या. घराला एक मरगळ आल्यासारखी वाटली.

दोन दिवसांनी मुलींची ती रूम साफ करण्यासाठी माळीकाकांना बोलावलं होतं आत्याने.

मुलींनी बर्‍यापैकी रूम स्वच्छ केली होती.

काकांनी ती झाडून घेतली.

मी तिथेच होतो निगराणीवर .

माळ्यावर काही कॅसेटस सापडल्या आणि काही पुस्तक वह्या !

टू इन वन ( टेप रेकॉर्ड आणि रेडिओ) आत्याचा होता , त्यांनी जाताना परत केला होता.

उत्सुकते पोटी पाहिलं , २-३ कॅसेटस खराब होत्या पण एक चांगली होती. ती शुक्रतारा , अरुन दातेंची.

शरयुची आवडती गाणी!.

कदाचित रिमाने फेकली असावी माळ्यावर , मुद्दामच !

वह्या भरलेल्या होत्या , दोघींच्याही. नोटस होते. काही मागच्या वर्षीची पुस्तकं होती.

एका वहीच्या शेवटच्या पानावर शरयुच्या सुंदर अक्षरात तेच गाणं पुर्ण लिहिलेलं होतं -- तिचं आवडतं . .

"अखेरचे येतील माझ्या हेच शब्द ओठी,

लाख चुका असतील केल्या केली पण प्रीती !

" इथे सुरु होण्या आधी संपते कहाणी,

साक्षीला केवळ उरते डोळ्यातील पाणी"

जखम उरी होते ज्यांच्या तेच गीत गाती.

लाख चुका असतील केल्या केली पण प्रीती !

सर्व बंध तोडून जेव्हा नदी धुंद धावे ,

मीलन वा मरण पुढे हे तिला नसे ठावे,

एकदाच आभाळाला असे भिडे माती,

लाख चुका असतील केल्या केली पण प्रीती !

अखेरचे येतील माझ्या हेच शब्द ओठी,

लाख चुका असतिल केल्या ,

केली पण प्रीती !"

ते समुदकिनाऱ्यावरचं पोस्टरही भिंतिवर तसच होतं , जे तिने मला हॉटेल मधे दाखवलं होतं..

खूप काही आठवलं , मला खूप गलबलून आलं होतं .

माझं दुर्दैव मी तिच्या प्रेमास पात्र ठरलो नाही.

इतकी मनस्वी मुलगी आणि इतकं गहिरं प्रेम करणारं कुणी भेटायलाही नशीब लागते !!

त्या दोघी गेल्या , आयुष्यात पुन्हा भेटल्या नाहित. भेटतील अशी आशाही नव्हती.

* * * * * * * * * *

आमचं लग्न झालं (माझं व मालूचं). शरयुचंही लग्न झालं म्हणून कळालं , आत्या गेली होती. ती मला पत्रिका देणारच नव्हती आणि येऊ नका असं बजावलं होतं .

माझा गोड , सुंदर , सुखाचा प्रेमळ संसार मालूसोबत सुरु झाला. संसार वेलीवर दोन कळ्या उमलल्या .सई जी सी.ए. च्या फर्स्ट इयरला आहे, आणि तेजश्री , (तेजु )जी आता दहावीला आहे.

आयुष्यात उतार चढाव आले. पण सुंदर काळ गेला मालूसोबत. २१ वर्षे कुणीकडे गेली कळंलं नाही.

७-८ वर्षांपूर्वी मी स्वतःची कंपनी सुरु केली. हाताखाली २५ -३० माणसं आहेत.

लग्नानंतर दोघांनीही जुने संपर्क काढायचे नाहित असा नियम मालूने बनवला होता. तो तिने पाळला व मला पाळावाच लागला.

मालू डोळयांत तेल घालून माझ्या वर लक्ष ठेवायची.

त्यामुळे मी पुन्हा भरकटलो नाही म्हणा.

काही वर्षांपूर्वी मोबाइल फोन आले , मग स्मार्ट फोन आले, मग व्हाटस् अप आणि मग फेसबुक!

तिने युक्त्या शोधुन काढल्या.

प्रत्येक ठिकाणी मालू माझ्या सोबत होती, म्हणजे असते. फेसबुक अकाउंट उघडलं तर ती पहिली फ्रेंड!

व्हाटस् अप आणि मेसेज ती न चुकता चेक करायची. सफाई द्यावी लागायचीच .

फोन नंबर सगळे सेव्ह असले पाहिजेत.

व्हाटस् अप वर डि. पी. गणपतीचाच, फेसबुक वर डि पी.कंपनीतल्या आठ दहा जणांचा ग्रूप फोटो.

म्हणजे एकंदर काय तर कडेकोट बंदोबस्त , नजरकैद !!

मी सगळ्या मैत्रिणींशी संपर्क तोडले.

एकच मैत्रिण मालू !

अन् मनोरंजन टि.वी. गाणी , मालू अन् माझ्या दोन पर्‍या!!

कधीकधी अॉफिसच्या कामाने पुण्याला गेलो तर आत्याच्या घरात जुन्या गोष्टीची आठवण यायची.

शरयु आठवायची कधीकधी, पण मालूला हे सांगु शकत नव्हतो.

मनाच्या कुठल्यातरी कप्प्यांमध्ये शरयु पोतदार घर करून होती.

कशी असेल, कुठे असेल? आता कशी दिसत असेल? असं वाटायचं .

२१ वर्षाँनंतर शरयुचा फोन आला होता , मी खूप खुश झालो होतो . पण त्याचं असं झालं!!

अचानक तिचा फोन आला आणि मी भूतकाळात रमलो.

या वयात तिला एकदा बघावं, भेटावं , बोलावं असं तीव्रतेने वाटायला लागलं! पण कसं?????????

क्रमशः


Rate this content
Log in

Similar marathi story from Romance