केली पण प्रीती -भाग ४
केली पण प्रीती -भाग ४
(पुढचा भाग )- - - - केली पण प्रीती !! (भाग ४)
त्यादिवशी ऑफिसमधे होतो आणि अचानक साठे सर म्हणाले" अरे श्रीधर तुझ्यासाठी कॉल आहे. रिसेप्शन ला जा"
मी क्षणभर दचकलोच
.
माझ्यासाठी इथे कॉल कसा? कुणी केला असेल ?
तेव्हां मोबाइल नव्हते ना , सगळे एमर्जनसी कॉल्स कंपनीच्या लॅण्ड लाइनवरच यायचे.
रिसेप्शनिस्ट ला विचारले "कोण होतं रे लाईनवर?"
"नाव नाही सांगितलं , पण मुलगी आहे कुणीतरी . फोन करतीलच पुन्हा! "
मी मनात चरकलोच .
मालती म्हणजे मालू तर असे काही धाडस करणार नाही.
मग कोण असेल बुवा??
माझी छाती अचानक धडधडायला लागली.
इतक्यातच फोनची घंटी वाजली.
रिसेप्शनिस्टने उचलून मला दिला.
"हेलो कोण " मी बोललो.
" हॅलो श्रीधर , मी रीमा बोलतेय."
"ओह तू का! बोल कुठुन बोलतियस "
"मी कॉलेज जवळच्या पी. सी. ओ. वरून बोलतीय"
"काय झालं गं आत्या बरी आहे ना "
"हो मावशींना काही नाही झालं . ते शरयु. . . "
"काय झालं शरयु ला ?"
"काही नाही !! तिला बोलायचय तुमच्याशी."
"हो का! बोलु दे ना मग"
रिमाने शरयु ला फोन दिला बहुतेक--
"हॅलो"
"हं ! बोल शरयु"
"श्रीधरच बोलताय ना?"
"हो गं ! मीच बोलतोय. काय झालं ?"
" माझं काम होतं तुमच्याकडे"
"सांग ना"
"थोडं बोलायचं होतं"
"अगं , मग बोल ना"
"नाही . . . असं नाही. . . म्हणजे प्रत्यक्षच बोलायचं होतं !"
"ओके. मग घरी आल्यावरच बोलू. . शरयु ठीक आहेस ना?"
"अं हं . .म्हणजे घरी नको"
"बरं बाहेर भेटून बोलायचं का ?. काही सिरियस नाही ना ?"
तिने थोडा पॉज घेतला मग म्हणाली-
"हो .बाहेरच भेटुया. तसं सिरियस नाही . . पण महत्त्वाचं आहे "
"बरं कधी भेटायचं ?"-- मी
"आज!!!" ती घाईने म्हणाली.
"आ. . . ज. . . अगं आज जमेलसं वाट त नाही. मला उशीर होईल . उद्या मला ऑफ़ आहे. उद्या चालेल??"
"हो चालेल. पण कुठे ?"
"मी सांगतो तुला!! ठिक आहे ना .? टेंशन नको घेउस . बोलुयात आपण. ओके. मग फोन ठेवू का?"
"हो ! ठेवा फोन .थँक्यू "
ती काय बोलणार कल्पना नव्हती.
कुठे भेटायचं तेही ठरवायचं होतं.
रीमाने फोन केला म्हणजे तिला माहित असेल का हा विषय ?
पण ती सांगेल का मला?
एक ना अनेक विचार. रात्री उशीरा घरी आलो.
ती वाट पहात होती. कदाचित माझ्या निरोपाची वाट पहात असावी.
एरवी दोघी मैत्रिणी जेवण झाले कि आपल्या रूम मधे जाऊन अभ्यास करत बसायच्या .
कधीकधी आत्या माझी वाट पहायची तर कधी मी लॅच ची चावी न्यायचो.
आज मी जेवून येणार होतो.
शरयु किचनमधे होती. तिला उद्याचं प्लानिंग सांगावं या विचारात होतो, तेवढ्यात आत्या आली.
तिला झोपताना गरम पाणी पिण्याची सवय होती.
" जेवलास ना रे श्री? कि काही खायचंय ?"
"हो आत्या पोटभर जेवण झालंय. स्टाफ मीटिंग होती ना. तू का गं झोपली नाहिस अजुन.?"
"अरे एवढा काही उशीर झाला नाही अजुन ! आता १० तर वाजलेत. दुधाचं भांडं बाहेर राहिलं होतं फ्रिजमधे ठेवावं म्हणून उठले होते. "
"मावशी मी ठेवलय ते आत. हे घ्या गरम पाणी." शरयु हॉलमधे आली.
"गुणाची गं पोर माझी.!! ही ज्याच्या घरी जाईल ना ते फार नशीबवान बरं कारे श्री"
" हो का!! असेल बुवा!" मी मिश्किल पणे म्हणालो.
ती लाजली.
आत्या गरम पाणी पीत होती तेव्हां मी शरयुला दुपारी ३ वाजता असे इशार्याने सांगितले ,तिने कुठे असे नजरेने विचारले.
" उद्या यशवंतराव चव्हाण नाट्यगृहात कसलातरी नाट्यप्रयोग आहे गं आत्या !"
"हो का रे? मी काही पेपर पाहिला नाही बाबा अाज."
"असं होय! . यशवंतराव चव्हाणलाच आहे दुपारी तीन वाजता! "
"श्री . .जायचय का तुला ?"
"नाहि गं मी कसला जातोय? बाहेरची आणि बॅँकेची कामे आहेत. एकच सुट्टी मिळते. "
शरयुला निरोप कळाला , ती आनंदाने गेली तिच्या खोलीत.
मी आणि आत्या थोडावेळ गप्पा मारत बसलो.
मग मी खोलित आलो, पडलो. .पण एक वाजेपर्यंत डोळाच लागला नाही.
तो दिवस अन ती रात्र खूप कठिण गेली मला.
अजुनही आठवते , कसल्यातरी - काहीतरी स्वप्नांमधे रात्र निघून गेली. सकाळ शरयुच्या विचाराने झाली.
माझी बाहेरची कामे आटपून मी यशवंतराव नाट्यगृहाजवळ पोहोचलो. बँकेत वेळ लागल्याने मला १०-१५ मिनट उशीर झाला होता. नाट्यगृहासमोर कसलीशी गर्दी ही होती.
एका बाजुला रीमा आणि शरयु उभ्या होत्या.
मी दोघींना पाहुन दचकलो.
म्हणजे मला शरयु एकटीच अपेक्षित होती.
नेमकं बोलायचय कुणाला आणि काय? असा प्रश्न पडला .
"तुम्ही दोघी इकडे??? सॉरी मला थोडा उशीरच झाला."
" हे बरंय. तुम्ही वेळ देता अन् तुम्हीच पाळत नाही.
आम्ही दोघी अश्या रस्त्यावर उभ्या बरं नाही वाटत."
रीमा कडाडली.
"पुन्हा एकदा सॉरी ! पण रीमा तू इथे कशी?"
" कशी म्हणजे ??. शरयु सोबत!"
"अरे हो! पण कुणाला बोलायचय माझ्याशी??" तुला कि तिला??"
"अर्थात तिलाच. पण ती माझ्यासारखी बोल्ड नाही ना ! म्हणून सोबत आले होते. "
"हे पहा रीमा ती कशी आहे ते मला माहित आहे, आणि काय अनं कसं बोलायचं ते आम्ही दोघे बघुन घेवू. प्लीज तू परत जा. मी आहे ना सोबत. काळजी नको."
" काय गं शरे मी जाउ ना?"
शरयुने होकारार्थी मान हलवली.
रीमा तिच्या गळ्यात पडली आणि कानात काहीतरी कुजबुजली .
पुन्हा हात मिळवून ऑल दि बेस्ट 'म्हणाली.
मला हे कुठेतरी तिला लढाईला पाठवल्यासारखं वाटत होते!
रीमाची एवढी काळजी मला विचित्र वाटत होती.
"रीमा . . मी खाणार नाही तुझ्या मैत्रिणीला" मी.
"ओके बाय!!!"
रीमा गेली.
शरयु अजुनही अनईझी उभी होती.
"निघायचं??" मी.
"हो , पण कुठे जाणार ?" ती.
"पुढे एक छानसं फॅमिली होटेल आहे. तिथे जाऊया." मी
"ठिक आहे ! तुम्ही चला .मी रिक्षाने येते." ती.
"वेडी आहेस का ? तु चल ना गाडीवर!" मी.
"नको .कुणी पाहिलं तर बरं नाही वाटणार!" ती.
(तेव्हां चेहेऱ्यावर स्कार्फ बांधायची पद्धत नव्हती अजुन.)
"दुपारची वेळ आहे, कोणी पहात नाही. आणि किती लोक ओळखतात गं आपल्याला इथे??" मी.
"चल बस गाडीवर, तमाशा नको रस्त्यांत."
मी वैतागुन म्हणालो.
गाडीवर सुद्धा ती खूप अवघडून बसली होती.
तिला घेवून छानशा फॅमिली हॉटेल मधे आलो.
वर फॅमिली सेक्शन होता.
पायर्या चढतांना ती थबकत होती.
"काय झालं?"
"मी कधीच कुणासोबत असं हॉटेल मधे आले नाहिय. मला खूप भीती वाटतीय."
(२०-२२ वर्षांपूर्वी हे खरच मोठं दिव्य होतं.!)
"काही होत नाही गं !आता इतके लहान आहोत का आपण? भिण्याची काय गरज आहे?"
तरीही हळु हळू ती आली.
आम्ही वर आल्यावर पाहिलं तर एक वेगळी रूमही होती जिथे दोनच टेबलं होते. आणि वरच्या भागात कुणीही नव्हतं .
मी तिकडे बसण्याचा इशारा केला.
वेटरने रूम उघडून दिली, पाणी दिलं .
तोही माझ्याकडे असं बघत होता जसं मी हिला पळवून आणलीय .
ती घाबरलेली , लाजणारी पांढर्याशुभ्र ड्रेसमधली शरयु मला अजुनही आठवते.
वेटरला पाठवून दिलं मग ती थोडी कंफर्टेबल झाली.
"काय खाणार?"
"नको . भूक नाहिय मला."
"अगं हे मंदिर नाहिय. आपल्याला फुकट नाही बसू देणार हे."
"तुम्हांला भूक आहे ना?"
"असो वा नसो. .मला दोसा खायचाच आहे. तुला??"
"मला एक चहा! " ती मेन्यूकार्ड कडे बघत बोलली.
मी वेटरला बोलावलं आणि अॉर्डर दिली.
"ए बाबू ! दोन्ही एकदाच आणायचं आणि उगीच डिस्टर्ब नाही करायचं."
" आता जा आणि जाताना दार लोटून घे." माझ्या स्पेशल सूचना !
तो गेला. शरयु अजुनही गांगरलेलीच खाली पहात बसलेली.
""ए शरयु !!! बोल ना काय महत्त्वाचं बोलायचं होतं तुला ?"
ती थोडावेळ जुळवाजुळव करत होती.
मग मोठ्या पर्समधून एक छोटीशी पर्स काढली.
तिचा चोर कप्पा उघडला आणि हळुच एक चिठोरी काढली.
मी यांत्रिकपणे सगळं पहात होतो.
" मला फक्त हे विचारायच होतं कि हे काय आहे?" तिने चिठोरी समोर ठेवली.
त्यावर लिहिलेलं होतं शरयु नाईक!!!
"काय आहे हे? शरयु नाईक!!! "
मी मोठ्याने वाचले.
"नाव असेल कुणाचं तरी. त्यात काय??"
"हे अक्षर तुमचंच . .आहे ना?"
"हो माझंच वाटतंय . तुला कुठे सापडली ही? आणि एवढ्या चिठोरी साठी तू का परेशान होतीयस?"
तिने आवंढा गिळला अन् म्हणाली -
"तुम्हांला अजुनही समजलं नाही. तुमच्यासाठी ही चिठोरी असेल पण गेल्या एक महिन्यापासून जिवापाड जपलंय मी हिला."
"अगं पण एवढं काय आहे त्यात? एक नाव बस्सं" मी.
"त्या नावातच तर सगळं आहे ना श्रीधर ! तुम्हाला कसं समजाऊ?
लग्नानंतर मुलींचं आडनाव बदलतं ना!
मग आता सांगा याचा अर्थ काय होतो. ??
गेल्या महिनाभरापासुन हा एकच प्रश्न मनात आहे. तुमच्या वागण्याने मी क
न्फ्युज्ड आहे." ती.
डोळ्याच्या कडा ओल्या होत्या. ती अगतिक होऊन बोलत होती.
शरयु जेव्हा हे बोलत होती, तेव्हां माझ्या डोक्यात प्रकाश पडला. मी अक्षरशः कपाळाला हात मारला आणि निशःब्द झालो.
माझे नाव श्रीधर नाईक आहे- - त्या कागदावर शरयु नाईक असे लिहिलेले होते. अक्षर माझे होतं , चिठ्ठी तिच्याकडे होती.
आता मला समजलं , गेल्या महिनाभरात शरयुमधे जे बदल मला दिसत होते ते या कारणामुळेच होते.
अरे देवा!!! हे काय झालं होतं माझ्याकडून ???
"अगं शरयु , कुठे सापडली ही चिठोरी तुला?" मी वरवर आव आणत बोललो.
"शरद दादाच्या खोलीला दरवाजा आहे ना त्या फटींमधून माझ्याकडे आली. मला वाटलं तुम्हिच पाठवलीय मुद्दाम! उगीचच मावशींच्या हाती लागली तर गैरसमज नको म्हणून मी ती जपून ठेवली."
"अजुन कुणाला माहित आहे का?"
"नाही ! म्हणजे रीमाला दोन दिवसांआधी दाखवली."
" हे बघ शरयु. हा निव्वळ योगायोग आहे.
हो हो आठवलं!!
त्या दिवशी शरद दादाच्या खोलित कादंबरी वाचत होतो. त्यातल्या नायिकेचं नाव होतं शरयु नाईक.
हातात पेन असला की काहितरी लिहायची सवय आहे मला. आताही बघ केवढी खाडाखोड केलीय मी मॅगझिनवर !"
" मी सहज लिहिलं आणि चिठोरी फाडली. तेवढ्यात मला वाटतं . . मला आत्याने बोलावलं. मी चिठ्ठी फेकली अन् खोली बंद केरून गेलो."
ती कपाळाला हात लाऊन बसली.
" हे बघ ! तू जसं समजतेस तसं काहिच नाहिय.
अग जस्ट तुमची कंपनी एंजॉय करतो मी. सिरियस नाही.
तू समजतेस तसं तर काहिच नाही.
तसं असतं तर मी तुला अंधारात ठेवलं नसतं. "
तिच्या डोळयांतून अश्रुधारा वाहात राहिल्या शांतपणे.
मला तिचं रडणं बघवेना . कुणाच तरी मन तोडलं होतं मी. वाटलं. .तिला जवळ घेवून अश्रु पुसावे तिचे.
पण आता तर तोही अधिकार गमावला होता मी.
टेबलावर ठेवलेले तिचे हात मी हातात घेतले.
ती बावरली. तिचे हात गार पडले होते.
मी तिच्या तळव्यांना चोळत होतो.
तिने पटकन हात बाजुला घेतले.
मी उठून तिच्या बाजुला बसलो. रुमाल दिला. तिच्या खांद्यावर हात ठेवला .
"शरयु सॉरी यार , रडू नकोस ना प्लीज . तो वेटर काय समजेल? गैरसमज होईल."
तिने डोळे पुसले, माझा हात बाजुला काढला.
"तुम्ही प्लीज तिकडे बसा. नाहीतर मी निघून जाईन"
" अरे शरयु हे काय? ओके. ओ के. मी तिकडेच बसतो. मग तर झालं !! एक वर्षांपासून चांगली मैत्री आहे आपल्यात. अचानक परक्यासारखं वागु नकोस ना ग !"
"एक सांगु? " ती डोळे पुसत बोलली.
"कदाचित हा नियतीचा खेळ आहे.
तुमच्या मनात काही नसेलही पण तुमच्या बोलण्या वागण्यातून तसं वाटायचं.
मी सरळमार्गी मुलगी आहे , मला हे सगळं नाही कळलं.
गेल्या सहा महिन्यापासून घरी स्थळं शोधतायत.
शिक्षण झालं कि लग्न करून द्यायचं असा बाबांचा विचार आहे. "
ती थांबली. पुन्हापुन्हा डोळे भरून येत होते.
" ही चिठ्ठी मिळाली आणि माझं विश्वच बदललं. मला असं वाटलं कि तुम्ही तुमच्या मनातलं इतक्या सहज छोट्या चिठ्ठीत सांगितलंय.
ही प्रपोज करण्याची मोहक पद्धत वाटली मला.!
मग मला तुमचं वागणं तसंच वाटु लागलं. तुमची जवळ येण्याची धडपड? ते सोबत गाणी ऐकणं, तो चिठ्ठ्यांचा खेळ, छेडाछेडी सगळंच!! हे तुमचं सिग्नल आहे असं वाटल्यावर तर आपोआप भावनिक रित्या गुंतत गेले. मी स्वतःला थांबवलं नाही."
ती थोडीशी नॉर्मलला येत होती तेवढ्यात वेटर दोसा घेवून आला.
"चाय किधर है?"मी.
"चाय नही बनेगा . दूध फट गया . और कुछ होना ?" वेटर
"ठिक है . दो मिक्सफ्रुट जुस लेकर आना और आधा घंटे के बाद आना. ओके" मी हाताने इशारा केला. तो हसला.
"नको श्रीधर ! मी निघते आता. आधा घंटा नको प्लीज .रीमा वाट पहात असेल." ती.
"बस गं जरा वेळ. काही होत नाही. "
माझं मन सांगत होतं-- ही कदाचित शरयुची शेवटचीच भेट आहे . ती अशी घाईगडबडीने संपू नये.
मग दोघांनी मिळून दोसा खाल्ला.
अन् ती हळू हळू तिच्या लहानपणीच्या गोष्टी सांगु लागली. मग तिचं घर, बालपण , ध्येय , संघर्ष . . सगळं सगळंकाही बोलत राहिली. मी ऐकत होतो. तिचे भावी आयुष्याबद्दल विचार, आम्हा दोघांचे काही प्रसंग तिच्या संदर्भातून समजावत राहिली.
खरच चूक तिची नव्हतीच , माझी होती.
मी फ्लर्ट करत होतो आणि ती वेड्यासारखं सिरियसली घेत राहिली.
मग बराचवेळाने मी तिचा हात हातात घेतला. , ती सोडवू लागली.
"शरयु प्लीज !! मी खूप टेंशनमधे आहे आता."
आणि ती मोठ्यांदा हसली.
"तुम्हांला कसलं टेंशन हो? माझ्या आयुष्याची दिशाच बदलून गेलीय. आणि तुमचा हा डायलॉग ऐकला कि मला हसूच येतं " ती मस्त हसली ओल्या डोळयांनी !
मी तिचे दोन्ही हात तसेच दाबून धरले आणि डोळयांत डोळे घालून बोललो " तू खूप चांगली मुलगी आहेस शरयु! तुला खूप छान जोडीदार मिळेल. तुझा स्वभाव मला खूप आवडतो गं पण. .
"पण-- - काय???- " ती पटकन बोल ली आश्चर्याने.
पण मी अलरेडी एंगेज्ड आहे. इंजिनियरिंगच्या दुसर्या वर्षांपासून ते आतापर्यंत मी एका मुलीच्या प्रेमात आहे.
मालू, मालती जामकर तिचं नाव."
"हो का ?" तिच्या चेहर्यांवरचे भाव बदलले.
माझ्या पाकिटातला मालूचा फोटो ही मी तिला दाखवला.
"छान आहे. तुम्हांला साजेशी .!" डोळे पुसत ती बोलली.
तिचे अश्रु मला चुभत होते पण नाईलाज होता.
"कुठे भेटल्या या तुम्हांला ?" ती.
मग मी इंजिनियरिंगच्या दुसर्या वर्षाँत सुरु झालेली माझी प्रेमकथा , त्या मजेदार घटना ,ती टूर , ते नाटकी प्रपोज करणं सगळं मन लावून सांगत गेलो .
ती तन्मयतेने ऐकत गेली.
ती थोडी रिलॅक्स वाटली.
माझ्या जिवात जीव आला.
" म्हणजे , तुम्ही लव मैरेजच करणार ना !!.प्लीज मालतीला अंतर देवू नकात. तुम्ही खूप केअरिंग आहात . तरीही . . .पण तिला दुखवू नकात."
"अगं काय हे ?"
साहेब ज्यूस " वेटर आला.
"हां ! ठेव तिकडे"
"औेर कुछ होना तो बोल दो"
"शरयु काही हवय?"
"नको नको"
"ओके . अब कुछ नही चाहिये , बिल लाओ -दस मिनट के बाद "
मी त्याला पुन्हा इशारा केला.
शेवटची १०- १५ मिनिट शरयुसोबत.
मला उगाच त्या इजाजत मधल्या नसीरची आठवण झाली.
अनु कि रेखा मधे तो एकटाच पडतो.
ज्यूस घेताना मी तिला काहितरी सांगुन हसवण्याचा प्रयत्न करत होतो.
मी ज्यूस संपवला आणि वेगळ्याच उद्देशाने उठलो. एक आठवण या भेटीची असावी असे वाटले.
तिही उभी राहीली.
खोलित मंद लाइट होता.
मी तिच्या खांद्यांवर हात टाकला.
तिचा हात हातात घेतला.
थांबलो अन म्हणालो." शरयु आयुष्यभर माझी मैत्रीण बनून रहा ना गं !!"
ती टपोरे डोळे माझ्या डोळ्यात घालून म्हणाली
" श्रीधर मैत्री नंतर प्रेम होऊ शकतं पण प्रेमानंतर मैत्री रहात नाही. मी तरी तुमची मैत्रिण राहणार नाही!" हात झटकला.
"अगं हे काय स्पष्ट नकार!!"
" मला या सगळंयात पुन्हापुन्हा गुंतायचं नाही. यातुन बाहेर निघणंच माझ्यासाठी मोठं दिव्य आहे. तुम्हांला व मालतीला शुभेच्छा !! "
आता तिने हात मिळवला.
मी पटकन तिला जवळ ओढलं आणि ओंजळीत तिचा चेहरा घेतला.
क्षणभर पहातच राहिलो. मनात वेगळीच गोड इच्छा होती.
मी चेहरा जवळ नेणार एवढ्यात तिने मान फिरवली. आणि दूर गेली.
" श्रीधर . . प्लीज !! मी हे सगळं राखून ठेवलंय, माझ्या जोडीदारासाठी . तुमच्या आठवणी नकोत मला"
"सॉरी सॉरी "मला खूप अपराधी भावना आली.
"कोण आहे तो नशीबवान जोडीदार?"
"आता बदललाय तो ,पुन्हा अस्पष्ट झालाय!"
"म्हणजे ??"
"ती फ्रेम पाहिली का तुम्ही मागच्या भिंतिवरची. तुम्हांला दिसली नाही इतकावेळ . तुमच्या मागे होती ना. "
"हो ही का ?!! मस्त आहे रोमान्टिक.!तिचं काय?"
" तशीच फ्रेम माझ्या खोलित आहे , माझ्या मनातही. ! सुर्यास्त आणि समुदकिनाऱ्यावर एक जोडपं हातात हात घेऊन उभं आहे ! तो माझा स्वप्नातला जोडीदार आहे. . त्याच्या डोळयांत समुद्रकिनारी मला सूर्यास्त पहायचाय!!. छोटसं स्वप्न आहे माझं ."
"श्रीधर, गेले काही दिवस ती पाठमोरी प्रतिमा मला तुमची वाटत होती. आता पुन्हा तिथे अनोळखी जोडीदार आहे. ती मुलगी मात्र तीच आहे. मी . . शरयु"
तिने काय सुंदर नेत्रकटाक्ष दिला. मी अक्षरशः मनात कळवळलो.
"कमाल आहेस यार तू!! शरयु केवढी भावनिक आहेस. ! आय अॅम सॉरी . मला या गिल्टी फीलिंग मधून बाहेर काढ, प्लीज !!"
" मी कधीच सिरियस नव्हतो यापुर्वी. अशीच चिडवाचिडवी आणि छेडाछेडी ची सवय अाहे मला." मी.
"ती सवय मोडा आता. कुणालाच दुखवु नकात!" ती.
इतक्याच वेळात आम्ही खोलिच्या बाहेर आलो होतो. तिने पटकन हात सोडवला व पायर्या उतरू लागली.
मी बिल देऊन गाडीजवळ येईपर्यंत ती ऑटोत बसत होती.
"अगं शरयु थांब !" मी बोलावलं .
"बाय " ती म्हणाली अन ऑटो निघून गेली.
- - - -=क्रमशः
© सौ. स्वाती बालूरकर देशपांडे " सखी"
दिनांक ०४ . ०१ . २०१९