केली पण प्रीती - भाग २
केली पण प्रीती - भाग २
मन भूतकाळाकडे धाव घेऊ लागले.
20-21 वर्षाँनंतर सगळ्या जुन्या गोष्टी सिनेमाप्रमाणे आठवायला लागल्या.
पहिल्यांदा नोकरी लागली आणि ट्रेनिंग साठी पुणे मिळाले.
सहा महिने ट्रेनिंग , सहा महिने प्रोबेशन आणि मग पोस्टिंग !!
पुण्यात आत्या रहायची.
मी आत्याकडे रहावे असा विचार होता.
मामा दोन वर्षांपूर्वीच देवाघरी गेले होते, आणि शरद , माझा आतेभाऊ कंपनीतर्फे लंडनला गेला होता.
नोकरीमुळे वर्षभर आत्याकडे राहता येईल आणि तिलाही सोबत होईल असे वाटले!
लहानपणी किती जीव लावला होता तिने मला. .
मी नेहमी सुट्टया मधे यायचो पुण्याला.
फ़ोन केला तर कळाले कि दोन मुली आत्याकडे पी.जी. म्हनून राहतायत.
तीने सोबत म्हणून ठेवून घेतल्यात.
लेटर मिळाले कि आत्याच्या घरी अालो .
घरात सगळींकडे मुलींचाच वावर होता.
माझ्यासाठी आत्या त्यांना काढु शकत नव्हती आणि त्यांच्या साठी मला इथे राहु नको म्हणु शकत नव्हती.
मी वेगळी खोली करून राहतो म्हणालो तर अात्या रागावली.
मामांनी बंगला भारी बांधला होता.
तीन बेडरूम ,एक गेस्ट रूम , मोठा हॉल ,किचन आणि गार्डन.
एक बेडरूम मुलींना दिली होती, मास्टर बेडरूम आत्याची. शरदची बेडरूम बंद होती.
हॉल आणि किचन कॉमन होते.
गेस्ट रूम मला दिली.
दुसर्या दिवशी आत्याने दोघींची अोळख करून दिली.
शरयु आणि रीमा.
पहिल्याच भेटीत रीमा मला थोडी शिष्टच वाटली, गोरीपान ,सुंदर , पण रुक्ष!
(रीमाने मला कधी भाव दिला नाही अाणि मी कधी तिच्याकडे लक्ष दिले नाही.)
पण शरयु. .पहिल्या भेटीतच मला आपलीशी वाटली!
साधी , सरळ, भोळी ,निरागस . .पण कमालीची आकर्षक .
मला ती भावली.
काही दिवसातच कसा कोण जाणे , तिच्याकडे ओढला गेलो मी.
मला आता वाटतय कि तेहीे प्रेमच होतं कदाचित !!
पण तेव्हा वाटले कि माझं,"ते " प्रेम तर मालूवर होतं, कॉलेजपासून!
आणा भाका झाल्या होत्या, सगळं ठरलं होतं.
नोकरीला दोन वर्षे झाली कि लग्न ही करणार होतो आम्ही.
मी एकटा असलो कि मला मालूची आठवण यायची.
.पण शरयु समोर आली की काही सुचायचे नाही.
मालूचा विचारही मनाला शिवायचा नाही.
माझी खूप काळजी घ्यायची ती.
हळू हळु एक मैत्री चे नाते तयार झाले, मग हक्क गाजवणे, कधीकधी सर्वांनी एकत्र जेवणे अशी कौटुंबिक भावना वाढत गेली.
सकाळी भेट व्हायची - चहाच्या वेळी ,मग रात्रीच जेवताना.
शरयु खूप अभ्यासू पण त्यातून वेळ काढून ती आत्याला कामात मदत करायची.
मला फार कौतुक वाटायचे तिचे. शांत असायची.
तिला बरोबर कळायचे केव्हा काय करायचे.
तिचं अबोल असणं , नजरेला नजर न भिडवणं, मूकपणे वावरणं, हळू हळू आवडत होतं मला.
रिमा मात्र पूर्ण विरुद्ध . ती स्वतःतच असायची.
पक्की पेइंग गेस्ट सारखी रहायची.
फक्त जेवणासाठी किंवा टिवी पाहण्यासाठी यायची.
नाहितर खोलितच असायची.
त्या दोघींची मात्र मस्त मैत्री होती.
एकदा माई आणि नाना पण कुणाच्यातरी वास्तुशांती साठी आत्याकडे आले होते आणि दोन दिवस राहिले .
जाताना माई(माझी आई) खूप खुश होती.
तिची शरयु शी खूप गट्टी जमली होती.
त्या दोघींत काय बोलणे झाले होते , मला आतापर्यंत कळाले नाही.
नानाही सारखे चहासाठी , पेपरसाठी तिला हाक मारत होते.
तिला आवडते म्हणून बाहेरून फाफडा - जिलेबी आणलेलं ही मला आज अाठवतं.
मी अर्धवट सोडून गेलेलं शब्दकोडं रात्री पूर्ण झालेलं दिसायचं.
माझे कपडे वेळेवर इस्त्री ला जायचे.
निघेपर्यंत डबा भरलेला असायचा.
आत्याला न झेपणारी बरीच कामे ती मुकाटयाने करायची, कळायचे ही नाही.
तो सुंदर काळ मोबाइल फोन किंवा व्हाटस् अप चा नव्हता.
हे फार छान वाटते मला.
एकत्र टि वी वर रविवारचा , डि डी वरचा हिन्दी सिनेमा पाहणे, चित्रहार पाहणे या सगळ्यांमधे एक छान मैत्री फुलत होती.
मला अंदाजही नव्हता तिच्या मनात काय चाललंय.
कॉलेजपासून मी मस्तीखोर होतो, मुलींशी फ्री राहणे, मैत्री करणे, प्रसंगी छेडणे हा माझा स्वभाव होता.
त्यामुळे तर मालूचे आणि माझे प्रेमप्रकरण तीन वर्ष चालले.
एकदा आत्याला कसलीतरी फाइल हवी होती म्हणून शरद दादाची खोली उघडली.
रूम मी स्वच्छ केली.
फाइल शोधली.
त्यावेळी माझ्या लक्षात आले कि शरयु आणि शरद दादांच्या खोलीला जोडणारा एक दरवाजा अाहे ज्याला कुलुप अाहे.
तिकडून मुलींच्या गप्पांचा , हसण्याचा मंजुळ अावाज येत होता.
मला ऐकायला खूप छान वाटत होते , पण गप्पांचा विषय कळत नव्हता .
कुणीतरी मैत्रिणी पण आल्या होत्या बहुतेक , कारण चार पाच जणींचा आवाज येत होता.
मी फाइल देवून आलो आणि व. पु. च एक पुस्तक दिसलं म्हणून तिथे रमलो.
तिकडे रेडिओवर रोमांटिक गाणी लागली होती.
दाराजवळच शरयु बसली असावी कारण तिच्या ओढणीचे टोक दाराच्या फटीतून दिसत होते.
पटकन ती ओढणी ओढावी आणि तिला परेशान करावे असे वाटले, पण मैत्रिणी होत्या म्हणून मोह आवरला.
रूम बंद करून अालो आणि माझ्या खोलित येवून पडलो.
शरयु चा तो मंद हसलेला आवाज आणि दबले्ल्या अावाजात बोलणे मला आठवत राहिले.
मग तो माझा छंदच झाला ,शरद दादांच्या शेल्फमधील पुस्तके वाचण्यासाठी नेहमीच मी रूम मधे जायला लागलो आणि मुलींच्या गप्पा ऐकायला लागलो.
मजा यायची. या पोरी एवढ्या हळू आवाजात काय बोलतात. .हे कुतुहल होतंच।
पण शरयु एकट्यात कशी असते , कशी बोलते? हे एेकावे ,पहावे असे वाटे.
या क्रमात एकदा शरयू एकटीच होती खोलीत आणि मी इकडे एकटाच दादाच्या खोलीत!
तिची ओढणी व वहीचे एक टोक खालच्या फटींमधून दिसत होते.
मला स्वतःवर ताबा राहिला नाही अन् मी तिची ओढणी ओढली.
ती खूप घाबरली असावी , किंचाळतात किंचाळता राहिली.
""कोण""
"मी" दबलेल्या आवाजात मी बो
ललो.
"मी "कोण???" दरडाऊन ती.
"अगं मी श्री " आणि मला हसू फुटलं.
"अहो काय तुम्ही .?? असे?? मेले असते ना मी??"
"हो का? "इतक्या लवकर"
"प्लिज ! असं नका करत जाऊ."
"मग कसं करू???" मी मिश्किल पणे बोललो!
" जा बाई ।"
इतक्यात रिमाची हाक आली."शरे , कुठे आहेस यार?"
मी दाराजवळून उठलो आणि खोली बंद करून माझ्या खोलीत अालो.
शरयुचं बोलणं पुन्हापुन्हा आठवत राहिलं .
असं न पाहता बोलण्यात एक नशा , एक मस्ती होती.
ह्याच क्रमात दोघांनी बरेचदा गजल एेकल्या.
रिमा नसली की मला ती सुवर्ण संधी वाटायची.
मी गुंतत चाललो होतो का कदाचित ???
पण माझं ध्येय मालूच.
ही तर नुसती फ्लर्टिंग होती.
२-४ महिन्यात मला जिकडे पोस्टिंग , तिकडे जायचं होतं.
बोललेला आवाज आत्याला ऐकायला जाऊ नये म्हणून पुन्हा छोट्या छोटया चिठोर्यावर संवाद सुरु झाला . . मजा यायची. दाराच्या फटीतून. . अगदी साधं बोलणं.
आजच्या चाटिंग सारखं.
एकदा एक कादंबरी वाचत पडलो होतो त्यातल्या नायिकेचं नाव होतं शरयू. . . शरयु नाईक .
मी सहजच एका चिठोऱ्यावर लिहिलं शरयु नाईक!!
"श्री " कुठे आहेस ? माईचा फोन आलाय ..घे" आत्याने आवाज दिला .
मी रूम बंद केली. आणि फोन घेतला.
"काय चाललेय श्री? बरा आहेस ना? " माईचा मधाळ आवाज.
"हो माई मजेत."
"अात्याकडे लक्ष देतोस ना?"
"हो गं . तुझी तब्येत बरी ना? नानांचं काय चाललेय ?"
"हो रे बाळा. मी ठणठणीत. नानांचं काय सांगावं , त्यांना सुनेचे वेध लागलेत आता. तुझ्यासाठी स्थळ पहायला सुरुवात केलीय त्यानी!" माई मोकळेपणाने हसली.
" काय गं माई ? किती घाई ही . नोकरी लागून वर्षभर पण नाही झालं ना!"
"आता सुरुवात केली तर वर्ष लागतं रे जुळेपर्यंत. आणि हे म्हणालेत कुणी असेल तर तसं सांग म्हणावं , आम्ही पाहुन घेऊ पुढचं."
"माई मी फोन ठेवतोय आता , तू आत्याशी बोल."
मला हे अनपेक्षित होते या वेळी अचानक.
आईला वाटलं मी लाजलो.
बरोबर आहे , मालूबद्दल घरी सांगयला हवं आता, नाहितर नाना स्थळांचा भडीमार करतील.
तिच्या घरी पण लग्नाचं चाललं असावं.
परवाच्या पत्रात काही उल्लेख नव्हता पण लिहिलं होतं घरी कधी सांगायचं ? कळवा .
सहा महिन्यापूर्वी भेटलो होतो मी तिला घाईगडबडीत .
मला कुणाशी तरी हे सगळं बोलायचं होतं पण इथे कुणी मित्र ही नव्हता .
मैत्रिण होती म्हणा. शरयु!! पण . मग शरयु ला सांगावे का सगळे?
ती सल्ला देइल का?
रात्री जेवताना शरयु वाढत होती, पण तिच्या चेहर्यांवरचे तेज वेगळेच होते.
मी योग्य वेळेची वाट बघत होतो.
ती आज खूप गोड दिसत होती .
काहितरी झाले होते हे नक्की.
तिचं बघणं, बोलण, मला खूप आकर्षक वाटत होतं .
मी माझं सगळ टेंशन विसरलो.
वाटलं , तिला एकट्यात भेटून विचारावे कि काय विशेष आहे?
आत्याने आवरा आवरी केली .आणि तिच्या खोलीत गेली.
मी हॉलमधे टि. वी. पहात होतो अन् तिच्या हालचाली न्याहाळत होतो.
अर्ध्या तासाने ती आली " मावशी गरम पाणी देऊ का करून , प्याल का आता? "
"दे गं बाळा . मी विसरलेच आज"
मी पाणी पिण्यासाठी किचनकडे निघालो.
ती तन्मयतेने फिल्टरमधील पाणी घेत होती.
मी पटकन तिचा हात अडवला ,
"मला पण पाणी हवं" मी बोललो.
"गरम??"
"तू देशील ते" रोखून पहात होतो.
"धत् !! असं काय हो ? कुठलं ते सांगा ना" ती किती गोड लाजली.
"बरं थंडच दे"
ती ग्लास देत होती, मी हात धरला.
"अय्या हे काय? "
"सॉरी यार. . .
काय गं काय विशेष? कुणाच्या प्रेमात वगैरे पडलीस का ?"
"काय बाबा तुम्ही ? काहीही बोलता"
तिने आत्याचे पाणी ग्लासात ओतले आणि निघाली.
मी चौकटीला हात लाऊन रस्ता अडवला .
ती खूप जवळ होती, मनात वेगळाच मोह आला पण तिने माझा हात काढला आणि निसटली.
कशी ते मला समजलेच नाही.
दादाच्या खोलित गेलो." का रे भुललासी वरलिया रंगा" व. पु.काळें चं पुस्तक वाचत होतो कालपासून.
तिची रूम शांत होती.
रिमाला बहुतेक झोप लागली असावी.
हळूवार आवाजात सिलसिलाची गाणी ऐकू येत होती.
कॅसेट होती कि रेडिओ माहित नाही.
" ये कहाँ आगये हम. . " चालू होतं . मी खूप बेचैन झालो.
गाण्याच्या शब्दासोबत मी खूप भावनिक झालो.
अमिताभ च्या आवाजतले बोल मला दाराजवळ घेवून गेले.
दाराला पाठ लावून ती बसलेली असायची ,रोज अभ्यास करत.
मी हळुच माझी बोटं फटीजवळ नेली. तिच्या बोटांना स्पर्श झाला.
वीज लागल्याप्रमाणे तिने हात बाजूला केला.
"प्लीज" ती पुटपटली.
"प्लीज ,प्लीज" मी पुटपटलो
तिची बोटं परत तिथे अाली .
गाणं चरमसीमेवर आलं आणि वाटलं हे दार असू नये मधे.
मालूचं आणि लग्नाचं खूप टेंशन आलं होतं .
टेंशनमधे असलं की मालू मला जवळ लागायची ,हे मालूलाही माहित होतं.
(ती एकदा म्हणालीच होती- तू टेंशनमधे असल्यावर जास्त रोमँटिक असतोस.)
मी चिठ्ठी पाठवली, दाराच्या फटींमधून ,
"इकडचं लॉक काढू का? मी खूप टेंशनमधे आहे !!"
ती घाबरली बहुतेक, तिने गाणं बंद केलं.
"लॉक इकडून सुद्धा आहे. ते कधीच उघडणार नाही. असा अविचार करू नका."
पुन्हा लाइट ही बंद झाला.
मी थोडावेळ वाट पाहली. . अन् मग मला माझी चूक कळाली.. मी चुकलो होतो.
शरयु छोट्या गावात वाढलेली , सरळमार्गी मुलगी होती .
मी तिच्याशी शहरातल्या माझ्या अडवांस मैत्रिणींप्रमाणे वागायला गेलो.
दोन दिवस मी तिला टाळत राहिलो.
नजरेला नजर दिली नाही.
आणि ती मात्र माझी जास्त काळजी घेत राहिली.
क्रमशः
© सौ. स्वाती बालूरकर देशपांडे, " सखी"
दिनांक ०४ .०१. २०१९