जरंडेश्वर (बालकथा)
जरंडेश्वर (बालकथा)


"आजी, आज भारी गोष्ट सांग, रडायची नको."
शौर्य उशीवर डोकं टेकवत म्हणाला.
" तू तर माझा छळ लावलायेस बघ, रोज रोज काय सांगूं भारी. " आज्जी त्याच्या अंगावर पांघरून घालत म्हणाली.
"माझी आज्जी गुणाची। गोष्ट सांगे रावणाची "
" मधेच काय आणलं हे रावण? "
" गुणांची या शब्दाला यमक जुळवून यावं म्हणून. "
" तू तर फारच हुशार आहेस. तूच सांग ना एखादी गोष्ट, रावणाची, नाहीतर कौरवांची..." आजी चेष्टेने म्हणाली.
" मग झोप कशी येईल मला? तू गोष्ट सांगताना मी कधी झोपतो मलाच कळत नाही. म्हणून तूच सांग." शौर्य म्हणाला. मग आजीची सुटका नसते. ती गोष्ट सांगू लागते.
" आपण गावाला जाताना तो डोंगर लागतो कि नय त्या डोंगराची गोष्ट सांगते." आजी म्हणाली.
" डोगंराची? बरं सांग, बघू तरी कशी आहे." शौर्य म्हणाला.
" त्रिपुटी गाव आहे. पंढरपूर सातारा रोडवर. तिथे जरंडेश्वराचा डोंगर आहे. खूप उंच आहे. डोंगरावर मारुतीचे मंदीर आहे. त्या डोंगराची गोष्ट आहे. रामI रावण युद्धात एके दिवशी लक्ष्मण मूर्च्छित होतो."
" म्हणजे काय?"शौर्य म्हणाला.
"बेशुद्ध होतो. वैद्य येतात पण त्यांनाही जमेना त्याला शुद्धीवर आणण्याचे. मग वैद्य बुवा म्हणाले,
हिमालयाचे ठिकाणी।
असते संजीवनी।
कोण देईल का आणुनि।
सुर्योदयाच्या आधी।
दाखवीन लक्ष्मणास उठवुनी।"
वैद्यांनी असं म्हटल्यावर सगळेच विचारात पडले. लढाई लंकेत आणि हिमालय कुठे, लांब उत्तरेत. तिकडून वनस्पती आणणार तरी कोण? तेही सूर्योदयाच्या आधी.... तोवर कसा राहील लक्ष्मण जीवंत. सगळ्यांना पेच पडला. जायचं कसं? रामही काळजीत पडला. मग धिप्पाड हनुमान पुढे आला. रामाला म्हणाला,
" मी जातो हिमालयात आणि संजीवनी आणतो. "
" अरे, पवनपुत्रा, सूर्योदय होण्याआधी परतायचं आहे." राम म्हणाला.
"मी येईन परत, पहाटेपर्यंत। " हनुमान म्हणाला. दुसरा काही उपायच नव्हता. राम म्हणाला, " ठीक आहे. जा."
मग हनुमानाने रामाला नमस्कार केला आणि उंच उडी मारून आकाशात झेपावला. मजल दरमजल करत तो हिमालयात गेला. तिथे डोंगर पायथ्याशी दाट जन्गल होते. हनुमान जन्गल ओलांडून डोंगरावर गेला, पण संजीवनी ओळखायची कशी. वनस्पतीवर काय नाव लिहिलेले नसते. तेव्हा काय फोन नव्हते. विचारायचे तरी कुणाला? काय करावे सुचेना त्याला. आता आलोय इथपर्यंत तर माघारी तरी कसं जायचं? तसच माघारी गेलो मोकळ्या हाताने तर लक्ष्मण शुद्धीवर येणार नाही. आणि काय होईल... या कल्पनेनेच हनुमान घाबरला. मग हनुमानाने आक्खा पर्वत उचलला आणि निघाला.
कारण सूर्योदयाच्या आधी त्याला पोहचायचे होते. उड्डाण करत करत हनुमान निघाला. तो दंडकारण्यातून म्हणजे महाराष्ट्रातून जात असताना त्या डोंगराचा एक तुकडा त्रिपुटी भागात पडला. त्या तुकड्यालाच जरंडेश्वर असे नाव पडले. तो तुकडा उंच एकटाच आहे. त्यावर विपुल प्रमाणात औषधी वनस्पती आढळून येतात. तेथील वैद्य जरंडेश्वर या डोंगरावरच्याच ओषधासाठी वनस्पती आणतात. तिथे एक पाण्याचे तळे आहे.
दर शनिवारी लोक डोंगरावर जातात. ते कधीच आजारी पडत नाहीत. अशी तेथील हवा संजीवक आहे. आपणही एकदा जाऊ बरं का जरंडेश्वरच्या डोंगरावर."
आज्जी असं म्हणतेय पण शौर्य केव्हाच झोपला होता. मग आज्जीही त्याच्याजवळ झोपली.