Yogesh Khalkar

Inspirational

3  

Yogesh Khalkar

Inspirational

जीवन संघर्षाचा साक्षीदार

जीवन संघर्षाचा साक्षीदार

2 mins
347


नानू मामा


आयुष्याच्या चढ-उतारात अनेक माणसं भेटत असतात. ही माणसं आयुष्याच्या प्रत्येक वळणावर आपल्याला काही ना काही अनुभव देऊन जात असतात. परोपकार करणे हा काहींचा स्वभाव गुणधर्म असतो. एखाद्या चंदनाप्रमाणे सुगंध दुसऱ्याला देऊन ते स्वतः जळत असतात. प्रतिकूल परिस्थितीत आपल्याला अशी काही मदत करतात की आपली समस्या सुटतेच. अगदी याचं जीवंत उदाहरण म्हणजे आमचे नानूमामा. सख्या आणि रक्ताच्या नात्या पलीकडे आमच्या घराशी असणारे त्यांचे कौटुंबिक संबंध. नानूमामा मला आठवतात ते माझ्या इयत्ता पहिलीपासून. डोक्यावर पांढरी टोपी आणि पांढरा शर्ट असा त्यांचा पोशाख वर्षानुवर्ष मी पाहत आली. गावाच्या चौकात वैभव किराणा मालाचे दुकान लागते ते नानू मामांचे. 


नानूमामा व्यापारी असले तरीही गावातील गरजवंताला मदत करण्यात सतत तयार असतात. गावात शुभ कार्य असो की एखादी दुःखद घटना. नानूमामा असल्याशिवाय गावातले कार्य पूर्ण होत नाही. गावात काहीही घडले तर पहिला प्रश्न असतो नानू मामा कुठे आहेत? नानू मामांना पटकन बोलवा. मग गल्लीतला एखादा मुलगा नानू मामांना बोलवायला जातो, क्षणभरात नानू मामा तेथे हजर होतात. असे नानूमामा माझ्या उपयोगी पडले त्याची ही  गोष्ट. 


आमच्या घरची परिस्थिती हलाखीची होती. मला शिक्षण घेता घेता कामही करावे लागायचे. माझे कष्ट नानू मामांना पाहवत नव्हते. कष्ट करत करत मी पदवीपर्यंतचे शिक्षण पूर्ण केले. आता मला M.A. करायचे होते. कसाबसा मी कॉलेजला प्रवेश घेतला. कॉलेजची परीक्षा फी भरली नाही. सहा महिन्यापर्यंत काही घडले नाही. सहा महिन्यांनी कॉलेजची परीक्षा जाहीर झाली. मला आमच्या प्राचार्यांनी केबिनमध्ये बोलवले. मी भीत भीतच केबिनमध्ये गेले, त्यांनी मला दोन दिवसात कॉलेजची फी भरायला सांगितले. घरच्या परिस्थितीमुळे ते शक्य नव्हते. आता कॉलेज बंद होणार की काय अशी भीती वाटू लागली. मी सरळ नानू मामांकडे गेले, त्यांना माझी अडचण सांगितली. पुढच्या दिवशी ते माझ्याबरोबर कॉलेजला आले, प्राचार्यांना भेटले आणि माझी कॉलेजची संपूर्ण फी भरली. 

           

खरंच असे संकटमोचक नानू मामा माझ्या आयुष्यात शिक्षणासारख्या एका महत्त्वाच्या प्रसंगात देवदूताप्रमाणे धावून आले आणि माझी शिक्षणाची वाट पुढे चालू राहिली. रक्ताच्या नात्यापलीकडे विचार करून त्यांनी केलेले सहकार्य माझ्या नेहमी लक्षात राहील.


Rate this content
Log in

Similar marathi story from Inspirational