जगण्याची आशा
जगण्याची आशा
प्रिय आई बाबा,
खूप त्रास होतोय हे लिहिताना पण आता सर्वकाही माझ्या सहनशक्तीच्या पलीकडे गेलंय.माझी जगण्याची इच्छा नाहीशी झालीये.मी जातेय.
शक्य झाल्यास मला माफ करा.
रेवाची ही चिट्ठी वाचून तिच्या आई बाबांच्या पायाखालची जमीन सरकली. आई तर बेशुद्ध होऊन पडली. बाबांना तिला सांभाळता येईना. त्यांनी लगेच रेवाच्या मोठ्या भावाला विजयला बोलावून घेतलं.विजय डॉक्टरांना घेऊनच आला.रेवाच्या बाबांनी जे काही घडलं ते सर्व विजयला सांगितलं.रेवाचा शोध घ्यायला ते निघाले.
घरापासून काही अंतरावर काही अंडरकंन्स्ट्रक्शन बिल्डिंग होत्या. रेवा बिल्डिंगच्या टेरेसवर उभी राहून रडत होती. दोन तीन वेळा तिने उडी मारण्याचा प्रयत्न केला पण प्रत्येक वेळी आई बाबांचा भावाचा चेहरा आठवून तिचे पाय थांबत होते. शेवटी तिने निश्चय केला आणि उडी मारणार इतक्यात
"इथून पडलीस तर फक्त हात पाय तुटतील.जीव नाही जाणार" , एका महिलेचा आवाज आला.
"तुम्ही कोण मला हे सांगणारे.जा इथून", रेवा म्हणाली.
"तुला जीवच दयायचा आहे तर अजून मोठ्या बिल्डिंगवर जा.इथून पडलीस तर आयुष्यभर अपंग म्हणून जगावं लागेल", ती महिला म्हणाली.
त्या महिलेच्या बोलण्यावर रेवा थांबली. तिने विचार केला खरंच आहे .ज्याच्यासाठी आलोय तेच नाही झालं तर ...
"हे बघ असंही तू जीव देणार आहेस.मग माझी एक गोष्ट ऐकून जाशील का.मला लोकांना गोष्टी सांगायला खूप आवडतात म्हणून मी नेहमी लोक शोधत असते आणि त्यांना गोष्टी ऐकवते", ती महिला म्हणाली.
रेवा मनात म्हणत होती. ही काय बाई आहे. मी इथे जीव द्यायला आलेय आणि ही मला गोष्ट सांगतेय.
"आता नाही म्हणून जाऊ कुठे ....सांगा.", रेवा म्हणाली
तुझ्यासारखीच एक मुलगी. माझ्या माहितीतील. दिसायला सुंदर, शिक्षणात बऱ्यापैकी, पण confident, स्वावलंबी. तीच शिक्षण पूर्ण झालं, आईवडिलांनी लग्न करून दिलं...एका वर्षात तिला बाळ ही झालं.
तिचा सगळा वेळ बाळाचं करण्यात जायचा. तीच राहणीमान बदललं.शरीर स्थूल झालं..चेहऱ्यावर एक प्रकारचा पोक्तपणा आला होता. असेच दिवस जात होते. एके दिवशी तिला कळलं तिच्या नवऱ्याचं affair चालू आहे.तिला फार मोठा धक्का बसला. जगण्याची आशा संपून गेली..पण कुठेतरी या गोष्टीला ती स्वतःला जबाबदार ठरवत होती. बाळाचं घरातलं करता करता आपणच आपल्या नवऱ्याकडे दुर्लक्ष केलं..तिला स्वतःचा राग यायला लागला. मग तिने ठरवलं. स्वतःला बदलायचं. पुन्हा पूर्वीसारखं बनायचं. तिने टापटीप राहायला सुरुवात केली. स्थूलपणा घालवण्यासाठी प्रयत्न सुरू केले.पण एवढं करूनही नवरा मात्र तिला जवळ करत नव्हता.ती निराश झाली, हतबल झाली. मग तिने ठरवलं ज्याच्यावर मनापासून प्रेम केलं ,स्वतःला बदललं तोच जर दुर्लक्ष करत असेल तर जगण्यात काय अर्थ आहे. एके दिवशी तिने विष पिलं .घरातल्यानी तिला हॉस्पिटलमध्ये admit केलं. सुदैवाने ती वाचली. ती शुद्धीवर आल्यावर तिने जे ऐकलं त्यावर तिचा विश्वास बसला नाही.तिचा नवरा आपल्या आई बाबांना सांगत होता.. मेली तर बरं होईल.. कंटाळा आलाय मला आता हिचा...हा तिच्यासाठी दुसरा धक्का होता.
मग तिने ठरवलं. दुसऱ्यासाठी नाही स्वतःसाठी जगायचं.. स्वतःवर प्रेम करायचं. अशा लोकांसाठी आपण आपलं आयुष्य वाया घालवायच नाही.आपल्या आई बाबांनी आपल्याला जन्म दिला, शिकवलं, मोठं केलं, ते असंच संपवण्यासाठी का?? आता रडायचं नाही, आनंदात जगायचं..
तिने घटस्फोट घ्यायचं ठरवलं.. प्रश्न होता बाळाचा.. तिच्या सासरच्यांनी ती मानसिक रुग्ण आहे, स्वतःचा आणि बाळाचा जीव घेईल या आधारावर बाळ स्वतःजवळ ठेवून घेतलं..
घटस्फोट, बाळाची ताटातूट यामधून बाहेर पडणे खूप अवघड होते.. देवाने हा दिलेला दुसरा जन्म असे मानून तिने आपले आयुष्य समाजकार्यासाठी बहाल करावे, असे ठरवले.. अनेक सामाजिक संस्थांना जाऊन भेटली.. तिच्यासारख्या घटस्फोटीत स्त्रिया किंवा ज्यांची जगण्याची आशा संपली आहे अशांचे समुपदेशन करण्यास सुरुवात केली..
"काय मग कशी वाटली गोष्ट???", त्या महिलेने विचारले.
"खरंच चुकले मी.. माझ्या आयुष्यावर माझ्यापेक्षा माझ्या आई बाबांचा जास्त अधिकार आहे..कोणा एका व्यक्तीसाठी मी ते संपवणार नाही.तुमचे खूप आभार... तुम्ही माझे डोळे उघडले. पण तुम्ही इथे कशा आलात???", रेवाने विचारले.
इतक्यात "रेवा" , विजयची हाक ऐकू आली.
"जा तुझे आई बाबा आणि भाऊ तुला घ्यायला आलेत", ती महिला म्हणाली.
"म्हणजे..??", रेवा प्रश्नार्थक मुद्रेने विचारत होती.
"अगं मीच त्यांना फोन केला होता ..याच त्या सामाजिक कार्यकर्त्या आहेत ज्यांची गोष्ट तू ऐकलीस. सुहासिनी देशपांडे..", विजयने सांगितले.
रेवाच्या आई बाबांच्या चेहऱ्यावरचा आनंद बघून सुहासिनीच्या चेहऱ्यावर समाधान झळकले...
