ब्रेड आम्लेट व कारल्याची भाजी
ब्रेड आम्लेट व कारल्याची भाजी
आज सकाळीच चैतालीच्या सासूबाई बाजारात गेल्या .. तोपर्यंत तिने नाश्त्याची तयारी केली...तिने पोहे केले होते आज...तिचा सगळ्यात नावडता पदार्थ.. तरीही ती सगळ्यांसोबत नाश्त्याला बसलं की थोडं का होईना खायची..
थोड्या वेळाने सासूबाई आल्या..त्यांनी आणलेल्या पिशवीतून एक एक भाजी काढून वेगळी करू लागली..त्यात एक ब्रेडच पॅकेटही होतं.. अरे देवा,नाश्ता तर बनवून झाला मग आता हे कधी खायचं..
तिने सासूबाईंना सांगितलं की तिने पोहे केले आहेत म्हणून...
सासूबाई म्हणाल्या, एका दुकानात समोरच दिसला ब्रेड...म्हटलं संध्याकाळी ब्रेड आम्लेट करू..आज अभिजीत घरी आहे...त्याला खूप आवडतं...आणि त्याच्या बाबांनाही आवडत..
ब्रेड आम्लेट तर तिच्याही आवडीचं होत..लहान असताना तिची आई पूर्ण ब्रेडच पॅकेट तिला ब्रेड आम्लेट बनवून द्यायची..लग्नानंतर माहेरी गेल्यावरही अगदी ताट भरून ते खायची..सासरी मात्र असं मोकळेपणाने कधी खाताच आलं नाही..आपण जास्त घेतलं तर इतरांना पुरणार नाही, हा विचार प्रथम येतो...मग शेवटी सगळ्यांना देऊन आपल्या वाटेला जेवढं येईल तेवढं खायचं...
खरंच आहे,एकत्र कुटुंबात स्वतः पेक्षा इतरांचा अधिक विचार करावा लागतो, हे तिला क्षणोक्षणी जाणवत..आपल्याला काय आवडत त्यापेक्षा इतरांना काय आवडत, त्यांचं पोट भरलं की नाही याकडे लक्ष द्यावे लागते..
आणि दुसरी गोष्ट म्हणजे कधी एकटी असताना ब्रेड आम्लेट बनवून खाल्ले तरीपण आईच्या हातची चव तिच्या हातात कधी उतरलीच नाही..
इतक्यात तीच लक्ष गेलं कारलींकडे..तिच्या आवडीची भाजी..म्हणतात की कडू कारले तुपात तळले, साखरेत घोळले तरी ते कडू..पण तिची आई भाजी बनवायची ती कडू कधी लागलीच नाही..उलट ती तिच्या आवडीची भाजी बनली..
सासरी आल्यावर एकदा दोनदा तश्या प्रकारे बनवण्याचा प्रयत्न केला पण नेहमीप्रमाणे आई बनवते तशी बनलीच नाही आणि कारल्याची भाजी कडूच चांगली लागते, असा सासरच्यांचा विचार..मग एकटीसाठी कशाला बनवावी म्हणून कित्येक वर्षे झालीत कारल्याची भाजी बनवलीच नाही...
विचार करत करत बराच वेळ गेला..मग तिने सगळ्यांसाठी पोहे डिशमध्ये काढले..स्वतः साठी 2 घासाचे पोहे आणि थोडी बिस्किट घेतली आणि सर्वांना नाश्त्याला या म्हणून बोलवायला गेली...
नाश्ता करता करता ब्रेड आम्लेट आणि कारल्याच्या भाजीची चव तिच्या जिभेवर रेंगाळत होती..
