इंद्रधनुष्य
इंद्रधनुष्य
स्वराच्या येण्याने सगळं घर आनंदलं होतं. किती वर्ष वाट पाहिली होती समीर आणि रेशमाने या क्षणाची! शरदराव तर आसुसले होते आपल्या नातवंडांला खेळवायला! अखेर सहा वर्षांची त्यांची प्रतीक्षा संपली होती. घरट्यात एका चिमुकल्या पक्षाची चिव चिव आता ऐकू येणार होती. स्वरा घरी आल्यावर तिच्यासाठी काय खरेदी करू अन् काय नको असं साऱ्यांनाच होऊन गेलं. घर खेळण्यांनी भरून गेलं. दोरीवरचे बाळाचे इवले-इवले कपडे आणि दुपटे बाल्कनीची शोभा वाढवू लागले. स्वराच्या हसण्याने, तिच्या रडण्याने घराला जिवंतपणा आला होता. आजोबा तर आपल्या लाडक्या नातीला एक क्षणही एकटं सोडत नव्हते. पत्नी गेल्यानंतर शरदरावांना आता जगण्याचा आधार मिळाला होता. आजीची सगळी उणीव ते भरून काढत होते. आजीचं प्रेमही तिला देत होते. तिला ते खेळवत, गाणी गात झोपवत, तिला छान छान कपडे घालून तिचे आवरून देत, इतकेच काय पण रात्री ती उठली तर तेच तिला झोका देवून झोपवत, रडत असेल तर मांडीवर घेऊन तासनतास बसत. रेशमाला मोठा आधार होता त्यांचा! स्वराचे बारसे तर खूप जोरदार झाले. जे कुणी तिला बघत ते म्हणत, 'किती सुंदर बाळ आहे! टपोरे डोळे, गोबरे गाल, हसरा गोड चेहरा! अगदी दृष्ट लागण्यासारखा!'
दिवस भरभर जात होते. स्वरा आता चार महिन्यांची झाली. हातात वस्तू पकडू लागली. आवाजाचा वेध घेऊन पुढे सरकण्याचा प्रयत्न करू लागली. पण शरदरावांना काही तरी खटकत होते. आवाज करणारे खेळणे घेण्यासाठी ती झेपावे, पण आवाज न करणारे खेळणे तिच्या पुढे धरले तर ती तिकडे पहातही नसे. त्यांनी पुष्कळ वेळा प्रयत्न केला पण ती फक्त आवाजाच्या दिशेने पाही, दूसरी कोणतीही गोष्ट डोळ्यापुढे धरली तरी तिचे लक्ष वस्तूकडे अजिबात जात नसे. ते बेचैन झाले. आपली शंका त्यांनी समीर आणि रेशमाला सांगितली. त्यांनीही मग निरीक्षण करायला सुरुवात केली. आणि आजोबांची शंका खरी ठरली. ते लगेच हॉस्पिटलमध्ये धावले. डॉक्टरांनी अनेक टेस्ट केल्या.... आणि शेवटी त्या हसत्या-खेळत्या कुटुंबाला मोठा धक्का बसला. स्वरा दोन्ही डोळ्यांनी अधू होती. तिला काहीही दिसू शकत नव्हते. हे ऐकून त्या तिघांच्याही डोळ्यासमोर अंधार दाटला. इतक्या दिवसांनी त्या घरात आलेला आनंद असा क्षणात नाहीसा झाला. रेशमा आणि समीर तर पुरते कोसळून गेले. शरदराव त्यांना समजावत होते, पण खरं तर तेच आतून तुटून गेले होते. स्वरा त्यांचा जीव की प्राण होती, आणि तिच्याच बाबतीत दैवाने असा खेळ खेळला होता. त्यांनी अनेक डॉक्टरांना दाखवले, खूप प्रकारच्या टेस्ट केल्या. पण तिच्या डोळ्यांवर काही इलाज नव्हता! एकच उपाय होता, तो म्हणजे डोळे प्रत्यारोपन! (eyes transplant!) पण तेही लगेच शक्य नव्हते, एकतर स्वरा खूप छोटी होती आणि दुसरे म्हणजे, तिला ज्याचे डोळे जुळतील असा दाता मिळणे! आधीच आपल्या देशात अजून नेत्रदानाविषयी लोक इतके जागरुक नाहीत, आणि गरजूंची यादीही खूप मोठी आहे. त्यामुळे स्वराचा नंबर लवकर लागणे शक्यच नव्हते! आता हातात एकच गोष्ट होती..... वाट बघणे! कित्येक वर्षही लागु शकतात किंवा असेच आयुष्य काढण्याची वेळही तिच्यावर येऊ शकणार होती!
आहे ती परिस्थिती स्विकारण्याचे सर्वांनी ठरवले. समीर आणि रेशमा आपापल्या ऑफिसला जायला लागले.....स्वराची पूर्ण जबाबदारी शरदरावांवर येऊन पडली. ते तिचे सर्व करत. त्यांचे बोट धरून ती चालायला शिकली, बोबडे बोल बोलू लागली, 'आजोबा!' असं तिने म्हणताच शरदरावांना कोण आनंद झाला! ते तिला एकेक वस्तू हातात देऊन तिचे नाव सांगू लागले. तिला दिसत नसले म्हणुन काय झाले, तिला सर्व गोष्टी कळल्या पाहिजेत असं त्यांना वाटे. तिला ते दिवसभर खेळवत, शिकवत, चालताना आधार देत..... तिच्या साठी जे-जे शक्य होईल ते करत. समीर आणि रेशमा त्यांचे प्रयत्न पाहून थक्क होत. कुठून आणतात ते इतके धैर्य, कुठून येते इतकी ऊर्जा?
शरदराव स्वराला आता बाबागाडीत रोज जवळच्या बागेत घेऊन जाऊ लागले. तिला निसर्गाचेही ज्ञान व्हावे म्हणुन तिला फुले, झाडे सर्व स्पर्शाने दाखवत. बर्याच गोष्टी वर्णन करून सांगत. बागेत आता त्यांच्या खूप ओळखी झाल्या होत्या. त्यांच्यासारखेच समवयस्क लोक आपापल्या नातवंडांना घेऊन तिथे येत. सर्व मुले एकत्र खेळत. स्वराकडे बघुन कोणाला वाटतही नसे की, ती पाहू शकत नाही! तिच्या गोड बोलण्याने ती सर्वांची लाडकी बनली. तिचा पाचवा वाढदिवस त्यांनी बागेतच सर्व मुलांबरोबर साजरा केला.
एकदा असेच शरदराव स्वराला घेऊन बागेत गेले. पाऊस नुकताच पडून गेला होता. बेंचवर बसल्यावर त्यांचे लक्ष आकाशात गेले.
" स्वरा आकाशात किती सुंदर इंद्रधनुष्य तयार झाले आहे!"
" आजोबा इंद्रधनुष्य म्हणजे काय हो?"
" अग सात रंगांची कमान! तो निसर्गाचा सुंदर चमत्कार आहे. पाऊस पडून गेल्यावर दिसते इंद्रधनुष्य! "
" आजोबा, रंग म्हणजे काय?"
शरदरावांच्या डोळ्यात टचकन पाणी आले. इतके अगतिक , इतके असहाय ते कधीच झाले नव्हते.
माझ्या स्वराला हे रंग कधीच दिसणार नाही का? तिच्या आयुष्यात असा अंधारच राहणार का? ते या विचाराने दुःखी झाले. त्यांच्या चेहऱ्याचे हसूच मावळले. ते आता खिन्न दिसू लागले. त्यांचे बागेतले मित्रही त्यांना याबाबत विचारात. पण ते काही बोलत नसत. असेच दिवस चालले होते. अचानक एक दिवस त्यांना जोराचा अॅटॅक आला. त्यांना हॉस्पिटलमध्ये नेले पण काही तासातच त्यांचा मृत्यू झाला. स्वराचा एक प्रेमळ आधार तिला सोडून गेला.
त्यानंतर जवळ जवळ एक महिन्याने स्वराने हट्ट केला म्हणून रेशमा आणि समीर तिला घेऊन बागेत गेले होते. स्वराला बघताच शरदरावांचे बागेतील मित्र लगेच आले. शरदराव गेल्याचे त्यांना आत्ताच कळत होते. सर्व खूप हळहळले.
इतक्यात स्वरा ओरडली, " बाबा आकाशात काय दिसत आहे ते?"
" स्वरा, त्याला इंद्रधनुष्य म्हणतात."
" मला आजोबांनी एकदा सांगितले होते. सात रंगांची कमान आहे ती! आजोबा तिकडेच गेलेत ना त्या आकाशात?"
स्वराचे बोलणे सर्वांनी ऐकले. तिला सर्व दिसत आहे असे बघून ते आश्चर्यचकितच झाले. समीरच मग म्हणाला,
" बाबा गेले. पण एक अमूल्य भेट स्वराला देऊन गेले. त्यांचे डोळे! त्यांनी मृत्यूपूर्वी हीच इच्छा व्यक्त केली होती. आणि विशेष म्हणजे त्यांचे डोळे काहीही अडचण न येता तिला जुळले. आणि ते जुळणारच होते! दोघांचे नातेच होते ना असे! ......त्यांना जे जे स्वराला दाखवायचे होते ते सर्व ती त्यांच्या डोळ्यांनी आता बघेल. तिचे आजोबा तिच्याबरोबर कायम राहतील. बाबांनी स्वराबरोबरच आम्हालाही नवे जीवन दिले आहे. "
बोलता बोलता समीरच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. इकडे स्वरा त्या इंद्रधनुष्याकडेच बघत बसली होती. आणि तिला एका ढगात आजोबा दिसले. त्यांना पाहून ती खुदकन हसली. जणू तेही त्या ढगातून तिच्याकडे पाहून समाधानाने हसत होते. स्वराच्या आयुष्यात त्यांनी इंद्रधनू फुलवले होते...... स्वरा आता रंगांच्या दुनियेत न्हाऊन निघणार होती...... आजोबांच्या डोळ्यांनी जग पाहणार होती... आणि तेही कायम तिच्या जवळच असणार होते.... नेत्ररूपाने तिच्या बरोबर जगणार होते!
