Click here to enter the darkness of a criminal mind. Use Coupon Code "GMSM100" & get Rs.100 OFF
Click here to enter the darkness of a criminal mind. Use Coupon Code "GMSM100" & get Rs.100 OFF

Smita Bhoskar Chidrawar

Inspirational Others


4.2  

Smita Bhoskar Chidrawar

Inspirational Others


इच्छा मरण...अनुभूती आनंदाची

इच्छा मरण...अनुभूती आनंदाची

10 mins 273 10 mins 273

" देवा मला माफ कर. पण खरंतर हे तुझंच काम होतं. ते करतेय मात्र मी . आज कदाचित सगळ्यांच्या नजरेतून उतरेन मी .पण मी माझ्या आईची इच्छा आज मी पूर्ण करणार आहे . यासाठी मला पापाचा धनी व्हावे लागले तरी चालेल पण आईचे हाल खरंच बघवत नाहीत आता माझ्याच्याने .आई खरंच मी हे करतेय फक्त तुझ्यासाठी . तुझ्या आनंदासाठी . तुला दिलेले वचन मी पूर्ण करते आहे . माझ्या पोटी तू पुन्हा जन्म घेशील याची मला खात्री आहे ." असे म्हणून प्रियाने आईचा हात हातात घेतला . तिला मिठी मारली . आई क्षीण हसली . तिच्या चेहेऱ्यावर समाधान होते . प्रियाने साश्रू नयनांनी डॉक्टरला खूण केली आणि आणि डॉक्टरांनी व्हेंटिलेटर बंद केला.


' वत्सलाबाई वारल्या ' . सगळीकडे बातमी गेली . " सुटल्या एकदाच्या " असे म्हणत सगळे हळहळले . काही लोकांनी समाधानाचे सुस्कारे सोडले . 

" मुलीच्या मांडीवर प्राण सोडला आणि ते ही आजच्या एकादशीच्या दिवशी ." 

" इतका त्रास भोगला पण मरण मात्र खूप छान आलं . " 

" आजच्या दिवशी मृत्यू म्हणजे स्वर्गात स्थान मिळणार नक्की . " 

सगळे लोक बोलत होते .


प्रियाच्या डोळ्यातले पाणी अखंड वाहत होते . तिला नुकताच पाचवा महिना लागला होता . खूप त्रास होत होता तिला आणि त्यात आईचे होणारे हाल तीच्याच्याने बघवत नव्हते .गेले कित्येक महिने आई सोसत असलेल्या मरण यातना तिला सहन होणाऱ्या नव्हत्या . 


" देवा अरे किती परीक्षा बघतोस ? उचल रे आता . माझ्यामुळे किती त्रास होतोय सगळ्यांना ? किती रे छळशील ? " वत्सला बाई काकुळतीला येऊन देवाला विनवत होत्या .


गेले कित्येक महिने हे असंच चाललं होतं . पण देवाला मात्र त्यांची दया येत नव्हती . वत्सला बाईंचे अगदी हाल हाल होत होते . सगळ्यांचे प्रयत्न थकले होते . आता फक्त परमेश्र्वरच वाली होता . वत्सला बाईंची मुलगी प्रिया , मुलगा साकेत आणि सून श्रेया सगळेच त्यांची प्रेमाने सुश्रुषा करत होते . पण शेवटी त्रास हा त्यांना स्वतःलाच भोगावा लागत होता. पैश्यापायी पैसा खर्च होतंच होता . वत्सलाबाईना मुलांचा त्रास बघवत नव्हता . 


वत्सलाबाई आणि गोविंदराव एक सुखी दाम्पत्य होते . साकेत आणि प्रिया अशी दोन गोड मुलं त्यांच्या जीवनात आनंद निर्माण करत होते . गोविंदराव साधीशी नोकरी करायचे आणि वत्सलाबाई एक आदर्श गृहिणी होत्या . त्यांनी आपल्या सालस , कामसू आणि प्रेमळ वृत्तीने सगळ्यांना आपलंसं केलं होतं . 


प्रिया नावाप्रमाणेच गोड होती . साकेत खूप हुशार होता . दोंन्ही मुलांनी आईवडिलांचे चांगले गुण अगदी छान तऱ्हेने आत्मसाद केले होते . अचानक कोणाची तरी दृष्ट लागावी तसा वत्सला बाईंचा सुंदर संसार मोडला . एका अपघातात गोविंदराव देवाघरी गेले आणि ते हसते खेळते कुटुंब दुःखाच्या छायेत होरपळून गेले . वत्सलाबाई पुरत्या कोलमडून गेल्या . आपलं घर , संसार , मुलं ह्यालाच सर्वस्व मानणाऱ्या वत्सलाबाई आता पूर्णपणे हतबल होऊन गेल्या होत्या . प्रत्येक गोष्टींसाठी त्या नेहेमी गोविंद रावांवर निर्भर होत्या . शिक्षण कमी आणि बाहेरचं कोणतंही काम त्यांनी एकटिने कधीच केले नव्हते . मुलं लहान होती . आधाराला कोणीच नव्हतं . समोर फक्त अंधार दिसत होता . काय करावे काहीच कळत नव्हते .


कितीतरी दिवस मायलेकर धक्क्यात होते पण हळूहळू मुलं सावरली आणि त्यांनी आईलाही सावरलं . मुलांकडे बघून वत्सलाबाईनी आपले दुःख मनात बंद करून टाकले आणि त्या सावरल्या . गोविंदराव साधीशी नोकरी करायचे . नेटाने संसार करून स्वतःचे हक्काचे छोटेसे घर इतकीच त्यांची संपत्ती होती . आता वत्सलाबाईंपुढे यक्षप्रश्न होता , घर कसे चालवायचे ? मुलांचे शिक्षण कसे करायचे ? स्वतःच्या पायावर कसे उभे राहायचे ? 


मुले खूप समजूतदार होती . आईचे दुःख त्यांच्याच्याने बघवत नव्हते . आपली आई अन्नपूर्णा आहे , तिच्या हाताला खूप छान चव आहे हे ओळखून साकेतने त्यांच्या शाळेतल्या कार्यक्रमासाठी काही पदार्थ बनवून देण्याची ऑर्डर आईला मिळावी यासाठी मुख्याध्यापकाना विचारले . त्यांनीही आनंदाने परवानगी दिली . 


हे ऐकून वत्सलाबाई काळजीत पडल्या . इतकी मोठी ऑर्डर तर मिळाली पण खरंच जमेल का आपल्याला ? पदार्थ बिघडले तर ? आपण आतापर्यंत फक्त आपल्या घरच्यांसाठी जेवण बनवले आहे . पण आता मात्र सगळं नीट झालं पाहिजे यासाठी त्यांनी देवाचा धावा केला . सामानाची यादी केली . शेजारच्या मैत्रिणींना मदतीसाठी यायची गळ घातली . वत्सलाच्या गोड स्वभावामुळे आणि तिच्यावर ओढवलेल्या परिस्थतीमुळे त्या लगेच तयार झाल्या . मुलंही मदतीला होतीच .


खूप मेहेनत घेऊन , डोळ्यात तेल घालून वत्सलाबाईनीं बनवलेले पदार्थ सगळ्यांनाच खूप आवडले . त्या कामाचे चांगले पैसेही मिळाले आणि यापुढे होणाऱ्या प्रत्येक कार्यक्रमाच्या ऑर्डर्स तुम्हालाच मिळतील अशी ग्वाहीसुद्धा मुख्याध्यापकांनी दिली . वत्सलाबाई आनंदल्या . 


वत्सलाबाई आजूबाजूच्या सोसायटीत स्वयंपाक करायला जाऊ लागल्या . 

" बाळानो आईची लाज वाटत असेल ना रे तुम्हाला ? पण काय करू मी तरी ? ना शिक्षण ना कुठला अनुभव . तुम्ही दोघांनी खूप शिकावं , मोठं व्हावं अशी तुमच्या बाबांची इच्छा तुम्ही पूर्ण करावी यासाठीच हे करतेय मी . आणि कष्टाचं खातो आपण . त्यामुळे लाज बाळगू नका पोरांनो . " वत्सलाबाई मुलांना म्हणाल्या .

मुलं आईला बिलगली . दोघंही खूप गुणी आणि समजूतदार होती .साकेत आणि प्रिया त्यांना होईल तितकी मदत करत असत . आपल्या मित्रमैत्रिणींच्या घरी असणाऱ्या पार्ट्याच्या ऑर्डर्स मिळवताना त्यांच्या डोळ्यात कुठेच लाचारी नसायची . 

मुलं मोठी होत होती . वत्सलाबाई सुद्धा आता चांगलं कमावू लागल्या होत्या . 


साकेत उत्तम मार्कानी बारावी झाला आणि कॉलेज करून संध्याकाळी शिकवण्या घेऊ लागला . प्रियाने आणि साकेतने मिळून आईला एक छोटंसं ' स्वयंपाकघर ' उघडून दिलं . प्रिया आईला सगळी मदत करायची . वत्सलाबाईंच्या हाताची चव प्रसिद्ध होतीच त्यामुळे स्वयंपाकघर उत्तम चालू लागलं. आईला मुलांचा खूप अभिमान होता . मुलांनाही आईच्या कष्टाची जाणीव होती . दोघेही मन लावून अभ्यास करायचे . 


वत्सला समाधानी होती . आता सुखाचे दिवस येऊ लागले होते . साकेतला नोकरी लागली आणि वत्सलाबाई भरून पावल्या . आता दोघांनी प्रियाच्या लग्नाचा घ्यास घेतला होता. प्रियाच शिक्षण पूर्ण होऊन तिलाही छानशी नोकरी लागली होती . संजय नावाच्या गुणी , सालस मुलाशी तिचं लग्न जमलं . साकेत आणि श्रिया सुद्धा एकमेकांना अगदी अनुरूप होते . एकाच मांडवात दोघांचं लग्न लागलं आणि वत्सलाबाई अगदी निर्धास्त झाल्या . 

श्रेयासारखी सुंदर , लाघवी सून घरात आली आणि प्रियाची जागा तिने भरून काढली . 


श्रेया वत्सलाबाईना अगदी छान प्रेमाने वागवत होती . तिने आता आईना सगळ्या कामातून मुक्ती दिली होती . आपल्या आईने आता फक्त आरामात जगायचं अशी साकेत आणि प्रीयाचीसुद्धा

इच्छा होती . हातपाय चालतात तोपर्यंत काम करावे असं त्यांना वाटे . पण मुलं ऐकत नव्हती आणि त्यातच श्रेयाने गोड बातमी दिली त्यामुळे वत्सलाबाईचा नाईलाज झाला . सगळं सोडून त्या नातवाच्या कौतुकात मग्न झाल्या . 


वत्सलाबाई अगदी सुखाच्या हिंदोळ्यावर झुलत होत्या . इतक्या वर्षांचा त्रास नातवाचे तोंड बघितल्यावर कुठल्या कुठे पळून गेला होता . अधून मधून दुखणारे पोट इतकाच काय तो त्रास बाकी या वयातही त्यांची तब्येत अगदी ठणठणीत होती . आपण इतकी वर्ष शिळे अन्न खाल्ले , कधीकधी तर अर्धपोटी राहिलो म्हणून हा त्रास होत असावा असच त्यांना वाटायचं . मुलांच्यासमोर त्यांनी कधीच हे दाखवलं नाही . नेहेमीच त्या आनंदी असल्याचं नाटक करायच्या . फक्त प्रियाला अजून मुल झालेलं नव्हतं म्हणून त्यांना काळजी वाटायची


एक दिवस अचानक वत्सलाबाईंचं पोट खूपच दुखायला लागलं . त्या गडबडा लोळू लागल्या . साकेत आणि श्रेया खूप घाबरले . त्यांनी ताबडतोब आईला हॉस्पीटल मध्ये ऍडमिट केलं . डॉक्टरांनी सगळ्या टेस्ट करून घ्यायला सांगितल्या . आपली आई इतकी धडधाकट असताना अचानक काय झालं हे कोणालाच कळेना . 


रिपोर्ट्स आले . डॉक्टरांनी साकेत आणि श्रेयाला बोलावले .

" साकेत , श्रेया हे बघा मी आता तुम्हाला जे सांगणार आहे ते खूप भयंकर आहे . अगदी तुमच्या कल्पनेपलीकडचं . पण हेच सत्य आहे . मी दुसऱ्या दोन डॉक्टरकडून खात्री करून घेतली आहे . आता मन घट्ट करा . वत्सलाबाईंना कॅन्सर आहे . लास्ट स्टेज . " डॉक्टर म्हणाले आणि साकेत श्रेयाच्या पायाखालची जमीन सरकली .


दोघेही धाय मोकलून रडू लागले . थोडं सावरल्यावर साकेतने प्रियाला बोलावून घेतले . तिला सगळं कळल्यावर तिचीही अवस्था साकेत श्रेयासारखीच झाली . तिघेही अगदी कोसळले . कोण कोणाला सावरणार अश्यात . 


आता पुढे काय करायचं ? हा मोठा प्रश्न होता . तिघेही माघार घेणार नव्हते . आईसाठी काहीही करण्याची त्यांची पूर्ण तयारी होती . 


वत्सलाबाई वाचण्याची शक्यता अगदी नगण्य होती . वत्सलाबाईंना अतोनात वेदना होत होत्या . त्या बर्या होण्याची शक्यता नव्हतीच पण तरीही मुलं आणि डॉक्टर प्रयत्नांची कसूर करत नव्हते . 


तिघेही आईची खूप छान काळजी घेत होते . तिला होईल तितका आनंद देण्यासाठी प्रयत्न करत होते . वत्सलाबाई मृत्युसाठी देवाला रोज विनवत होत्या . आता त्यांना त्रास सहन होत नव्हता. पण देव त्यांची परीक्षा बघतच होता .


एक दिवस प्रिया आईजवळ बसली होती . 

 " पियु , बाळा माझं आयुष्य आता संपत आलय . मी आनंदी आहे . समाधानी आहे . तुझ्या मुलीचं तोंड काही मी बघायला राहणार नाही . पण तुझ्या पोटी मात्र मी नक्कीच जन्म घेणार बघ . माझं एक ऐकशील का ग ? मला सोडवशिल या सगळ्यातून ? पाठवशिल मला देवाकडे ? " आईचं बोलणं ऐकून प्रियाला काहीच कळेना .


" आई अग हे काय बोलतेय तू ? मला खरंच काही कळत नाहीये . आणि मला माहितीये तुला माझ्या बाळाला बघायचे आहे . पण काय करू ग इतके प्रयत्न करूनही अजून माझी कुस उजवत नाहीये . पण तुझी इच्छा नक्कीच लवकर पूर्ण होईल बघ . आता झोप बघू " प्रियाने आईला समजावले . 


आईचे म्हणणे ऐकून खरंतर प्रिया चक्रावून गेली होती पण तरीही तिच्या समाधानासाठी ती डॉक्टरकडे गेली . आणि काय आश्चर्य ? डॉक्टरांनी आनंदाची बातमी दिली . प्रिया आई होणार होती . हा चमत्कारच होता . प्रियाला खूप आनंद झाला . ती लगेच आईकडे आली आणि तिला आनंदाची बातमी दिली .


" बघ माझी इच्छा पूर्ण होणार आता . मी तुझ्या पोटी पुन्हा जन्म घेणार . तुझ्या मुलीच्या रूपाने मी पुन्हा तुमच्या सोबत असेन . पण आता मला सोडव यातून . माझी शपथ आहे बघ तुला . माझी ही शेवटची इच्छा तू पूर्ण कर . मला इच्छामरण हवं आहे . मला मृत्यू हवा आहे , मृत्यू हवा आहे .... माझं ऐक ग पोरी , इतकी इच्छा पुरी कर . आपल्या आईला आनंद दे ग ...मला मरण दे ग " वत्सलाबाई रडत रडत प्रियाला विनवत होत्या आणि त्यांचा तो त्रास बघून प्रिया रडत होती .


काय करावे काहीच कळत नव्हते . प्रियाने खूप विचार केला . ती डॉक्टरांशी बोलली . 

" वत्सलाबाईंची वाचण्याची आजिबात शक्यता नाहीये . त्या म्हणतात तसं इच्छामरनाला भारतात नुकतीच परवानगी मिळाली आहे . पण परदेशात ही कन्सेप्ट अस्तित्वात आहे . जीवघेण्या आजारात पेशंटच्या मर्जीने किंवा त्यांच्या घरच्या व्यक्तींच्या मर्जीने कमीत कमी त्रास होईल असा मृत्यू दिला जातो . तुमच्या आईंचा त्रास माझ्याच्याने खरंच बघवत नाहीये . माझे वडील सुद्धा काही दिवसांपूर्वी असेच लंग्ज कॅन्सरने गेले . मी त्यांना सुखाचा मृत्यू दिला याचा मला आनंद आहे . त्यामुळे मी त्यांचा थोडातरी त्रास कमी करू शकलो . शेवटी डॉक्टर असलो तरी दैवापुढे आम्हीही हतबल असतो . 

मी तुमच्या सोबत आहे . तुमची आई मला माझ्या आईप्रमाणे आहे . कळवा मला . " डॉक्टर म्हणाले .


प्रियाला काहीच सुचेना . आईकडे गेली की ती सतत प्रियाला विणवत होती . शपथ घालत होती . प्रिया प्रेग्नंट आहे हे खर म्हणजे आईला कसं कळलं ये एक मोठं आश्चर्य होतं . तीचा मेंदू तिला आईचं ऐकण्यासाठी सांगत होता तर तिचं मन मात्र हे मानायला तयार नव्हतं . आईसाठी तिचा जीव तुटत होता आणि तिचे हाल सुद्धा पाहवत नव्हते . 


असेच काही दिवस गेले . प्रिया आईकडे जातही नव्हती . तिथे गेल्यावर आईला तोंड देण्याची तिची हिम्मत नव्हती .साकेतने तिला घरी बोलावले . आई तिची खुप आठवण करत होती .

त्याच रात्री प्रियाचे बाबा तिच्या स्वप्नात आले .

" पियू बेटा , अग किती खस्ता खाल्ल्या तुमच्या आईने तुमच्यासाठी . किती झिजली बिचारी . आणि आता तुला तिची कीव येत नाही का ? तिला लवकर पाठव माझ्याकडे . मी वाट बघतो आहे . करशील ना इतकं आमच्यासाठी ? तुला तुझ्या आईची शपथ आहे , तुझ्या होणाऱ्या बाळाची शपथ आहे ...मी वाट बघतोय..." बाबा म्हणाले आणि प्रिय दचकून उठली.


सकाळी प्रिया दवाखान्यात आली . आईजवळ बसली . बाबा स्वप्नात आल्याचं सांगितलं . 


" मला माहितीये तुझे बाबा माझी वाट बघतायत . काही दिवसांत मी जाईनच ग पण या यातना नाही ग सोसवत आता . मला सोडव यातून बाळा मला सोडव . आईसाठी इतकं कर . मला मरण दे . " आईला जास्त बोलवत नव्हतं . तिची अवस्था अगदी मरणासन्न झाली होती . डॉक्टरांनी सगळ्या आशा सोडल्या होत्या . 


प्रिया डॉक्टरांशी बोलली . उद्याच एकादशी होती . आईसाठी खूप पुण्याचा दिवस . साकेत , श्रेया , त्यांचा मुलगा सारंग सगळेच वत्सलाबाईंजवळ बसले . मनमोकळ बोलले . वत्सला बाईंनी सगळ्यांना मनभरून पाहिलं . डॉक्टरांनी सगळ्यांना बाहेर जायला सांगितलं आणि थोड्याच वेळात त्यांचा आत्मा अनंतात विलीन झाला. 


आई बाबांचा आनंदी आत्मा तिला खूप आशीर्वाद आणि धन्यवाद देत होता . आज खऱ्या अर्थाने प्रियाने मुलीचं कर्तव्य निभावून आईला समाधान दिलं होतं.एका आईचा आनंद हेच मुलीसाठी सुख .


काही महिन्यातच प्रियाने एका गोंडस मुलीला जन्म दिला . ती अगदी आपल्या आजीसारखीच होती. 

' वल्लरी ' च्या रूपाने वत्सलाबाई आपल्या घरात परत आल्या.


प्रियाने केलं ते खरंच योग्य होतं का ? परेशात या गोष्टीला कायदेशीर मान्यता आहे. पण भारतात मात्र मान्यता मिळूनही फारच क्वचित ही गोष्ट घडते . एखाद्या व्यक्तीला आपण त्रासातून मुक्त करू शकत असलो तर ते करणे कितपत योग्य आहे? 


( सदर कथा पूर्णपणे काल्पनिक आहे. कोणाच्याही भावना दुखावण्याचा आजिबात हेतू नाही ? )


Rate this content
Log in

More marathi story from Smita Bhoskar Chidrawar

Similar marathi story from Inspirational