हुकमाचा एक्का की जोकर
हुकमाचा एक्का की जोकर
काल एका साहित्यिक ग्रुप वरती विषय दिला होता हुकुमाचा एक्का की जोकर मग विचारचक्र सुरू झाले. कालपासून विचार करते माझं स्थान नक्की काय आहे. मी हुकुमाचा एक्का आहे? का जोकर आहे? आणि विचार करता करता एक लक्षात आले की हुकमाची मी राणी पण नाही आणि हुकमाचा एक्का पण नाही आणि जोकर पण नाही. जशीजशी वेळ पडेल तसे तसे माझं स्थान बदलत राहते. मी जरी स्वतःला म्हटले ,
मी या घरची राणी
माझ्या राजाला शोभते
सांगेल का मज कोणी?
सुख ऐसे कोणा लाभते
नाते सर्वांशी मी
आपुलकीचे जोडते
असं म्हटलं किंवा
हुकमाची राणी मी
माझे सगळे गुलाम
एक्का दुर्री तिर्री
हिला करती सलाम
म्हणून मी काही घरची राणी होत नाही. तर म्हणायला राणी, पण काही घरात बिचारी दासी असते. तू स्वामिनी, तू राणी, तू घरमालकीण असं म्हणून गोड बोलून तिच्याकडून सारं काही करून घेतलं जातं. मग मी जोकर आहे का हो? होय! मी जोकरच आहे. पण या जोकर चा अर्थ वेगळा आहे. हुकुमाचा एक्का म्हणजे काय असतं? एकदाच एक विजय तुमचा किंवा एक हात तुमचा.
या हुकमाच्या एक्क्याला एखादं काम सांगितलं की ते फत्ते झालं पाहिजे. पत्त्याच्या डावांमध्ये हुकुमाचा एक्का एकदाच वापरता येतो. पण संसारात मात्र वारंवार वापरला जातो. हे काम करायचे, तिच्याकडे सोपवा. ते काम करायचे तिच्याकडे सोपवा. का? तर ती तडीला नेणारच, पार पाडणारच. हुकुमाचा एक्का बनण देखील आपल्याला तोटाच.
आता जोकरचा विचार करू या. हो मी जोकरच आहे. कारण कोठेही, कसंही माझं सामर्थ्य मला वापरता येतं. कोणत्याही दोन पत्त्यांच्या मध्ये जोकर लावला की रमीचा डाव जिंकता येतो. तसंच माझं घरातलं स्थान नाही का? घरातलं कोणी आजारी पडलं की मी परिचारिका बनते. मुलांसाठी अभ्यास घेताना शिक्षिका बनते. घरच्या मंडळींसाठी उत्तम कुक असते, स्वयंपाकी असते. नवऱ्याची प्रेयसी असते, आई असते, बायको असते, क्षणाची पत्नी आणि अनंत काळची माता असते.
पानी रे पानी
तेरा रंग कैसा
जिसमे मिलाओ
लगे उस जैसा
तशी मी कोणत्याही रंगात स्वतःला सामावून घेते. मुलांशी मूल होऊन खेळते. सासू-सासर्यांशी त्यांच्या वयाची होऊन राहते. आणि नवऱ्याची तर काय सखी, प्रिया ,सचिव ,मंत्री, अभिसारिका सारंच काही मी असते. घराचे अर्थकारण सांभाळताना मी लक्ष्मी असते, मी अर्थमंत्री असते. घरादारावर आपत्ती आली तर मी दुर्गा असते, मी संरक्षण मंत्री असते. बाकी इतर वेळी गृहखातं माझ्याकडेच असतं. आणि तरीही मी मात्र यात कुठेच नसते. मी जोकर असते. माझं स्थान पानातल्या मिठाएवढं, घरात असलं तर दुर्लक्षित, पण नसलं तर कोणत्याही गोष्टीला चवच नाही. तसं घराला घरपण स्त्री शिवाय नसतं संसाराची चव जाते. जसे मीठा वाचून कोणत्याच पदार्थाला चव नसते खूप स्त्रियांची ही व्यथा आहे मग त्यांचा त्यांनी ठरवायचं असतं.
आपण काय बनायचं हुकमाची राणी बनायचं का जोकर बनायचं मला वाटतं जसा जसा प्रसंग पडेल तसं तसं बनलं पाहिजे. अगदीच बारा महिने तुम्हाला हुकुमाची राणी पण बनता येत नाही. पण बारा महिने जोकर देखील बनू नका. तुमच्या अस्तित्वाची जाणीव तुम्हीच दाखवली पाहिजे. तुम्हीच ती सर्वांना दिली पाहिजे. शेवटी स्त्रियांचं असं आहे,
"गुंतुनी गुंत्यात साऱ्या
पाय माझा मोकळा
रंगुनी रंगात साऱ्या
रंग माझा वेगळा"
मग आता तुम्हीच मला सांगा मी हुकमाचा एक्का आहे का जोकर आहे?
