Venu Kurjekar

Comedy Inspirational Others

4.3  

Venu Kurjekar

Comedy Inspirational Others

हरवलेले तिकीट अन् चेकर

हरवलेले तिकीट अन् चेकर

3 mins
188


थंडीचे दिवस होते.हवेत चांगलाच गारठा होता. नाशिक बसस्थानकावर प्रवाशांची बरीच गर्दी होती. नाशिक -पुणे नऊची एशियाड लागली होती.तिकीटासाठी मोठ्ठीच मोठी रांग होती. मी ही त्या रांगेत होते.मी तिकीट घेऊन गाडीत चढले व माझी जागा सांभाळली. एक एक प्रवासी आपापल्या जागेवर येऊन बसू लागले.थोड्याच वेळात माझ्या शेजारी एक पोक्त काकू येऊन बसल्या.थंडी असल्याने काकूंनी लांब बाह्यांचे स्वेटर घातले होते व स्कार्फ ही बांधला होता. काकूंची जागा खिडकीच्या बाजूने असल्याने त्या खूश होत्या. प्रवास सुरू झाला.काही प्रवासी सुखद थंडीने लगेच पेंगू लागले.कोणी कानात हेडफोन च्या गुंड्या घालून गाणी ऐकू लागले. कोणी मोबाईल वर बोलत होते. शेजारच्या काकू ही मधून मधून पेंगत होत्या. मधेच त्यांचा मोबाईल त्यांना उठवत होता. काही वेळ काकू छान झोपल्या. संगमनेर आले असेल तेव्हा काकू आळस देत जाग्या झाल्या.त्यांनी कुणाला तरी फोन लावला.हातवारे करत गप्पा झाल्या.हसणे झाले. गाडी सुरू होताच काकू पुन्हा डुलक्या देऊ लागल्या.पुढचा प्रवास सुरू झाला. नारायण गाव आले. नारायण गावात तिकीट चेकर गाडीत चढला व प्रत्येकाचं तिकीट तपासू लागला.  तो आमच्या जवळ आला, तेव्हा पर्स मधून काढून मी माझे तिकीट दाखवले. काकूंना तिकीट विचारले, तेव्हा काकूंनी आपल्या मनगटी घड्याळात पटकन हात घातला; पण तिकीट काही सापडेना.

काकू घाबरल्या. " अहो घड्याळाच्या पट्ट्यात च तिकीट अडकवून ठेवले होते मी". असे त्या म्हणाल्या. खाली पडले असेल म्हणून सीट खाली शोधू लागल्या.आम्ही दोघीही आपले अवजड शरीर हलवून पुढच्या मागच्या सीट खाली शोधू लागलो.काकूंनी पर्स मध्ये व बॅग मध्ये शोधले पण तिकीट सापडेना. तिकीट चेकर रागावला; म्हणाला " बाई असे तिकीट ठेवतात काय ? तिकीट म्हणजे चलन ते पैसे च समजायचे.तुम्ही शंभराची किंवा पाचशे नोट अशी घड्याळाच्या पट्ट्यात अडकवून ठेवता काय? ते काही नाही, तुम्हाला नाशिक ते पुणे दुसरे तिकीट काढावे लागेल."

काकू तयार होईनात. माझ्याकडे बघून " माझ्या कडे होतं ना हो तिकीट" असं म्हणत त्या माझा होकार मिळवत होत्या. गाडीतला एक प्रवासी म्हणाला " या काकूंना तिकीटाच्या रांगेत मी पाहिले". दुसरा म्हणाला " त्या माझ्या पुढेच उभ्या होत्या. बहुतेकांनी काकूंना रांगेत पाहिले होते. तरीही तिकीट चेकर ऐकेना. काही प्रवासी काकूंच्या बाजूने बोलत होते.तर

काही म्हणाले काकूंनी तिकीट सांभाळून ठेवायला हवे होते. काही म्हणू लागले जाऊ द्या हो गाडी पुढे, उशीर होतोय.चला ;काकू घ्या आता तिकीट काढून.

शेवटी तिकीट चेकर ने नारायण गाव ते पुणे असे तिकीट काकूंना काढायला च लावले व तो उतरला. काकू चिडू लागल्या. " मी प्रवासात नेहमी असेच तिकीट ठेवते, पण असे कधी झाले नाही." त्यांनी किती प्रवास केला हे ही सांगितले.

" काश्मीर ते कन्याकुमारी पर्यंत प्रवास केला; पण मेला असा ‌‌‌‌‌‌‌‌‌‌प्रसंग कधी आला नाही" असे त्या म्हणाल्या.

गाडी सुरू झाली. काही वेळाने काकूंच्या डाव्या कोपरापाशी काहीतरी टोचू लागले. काकू चुळबुळ करु लागल्या.काहीतरी स्वेटर च्या बाहीत आहे, असे त्यांना वाटले व त्यांनी उजवा हात डाव्या हाताच्या स्वेटराच्या बाहीत घातला आणि काय गंमत, मघाशी घडाळ्याच्या पट्ट्यात ठेवलेली तिकीटाची इवलीशी घडी सरकत सरकत कोपरापाशी गेली होती, अन् तीच टोचत होती. काकूंनी पटकन ते तिकीट बाहेर काढले व मोठ्याने म्हणाल्या,"अहो हे बघा तिकीट". सर्व प्रवासी काकूंकडे बघून हसू लागले.काकू वरमल्या. आता त्या तिकीटाचा काही उपयोग नव्हता. प्रवास सुरू झाला होता.चेकर मागेच राहिला होता.



Rate this content
Log in

Similar marathi story from Comedy