दामू वारकरी
दामू वारकरी
एक पावसाळी संध्याकाळ.पावसाची रिपरिप.पावसाने रस्त्यावर झालेली चिकचिक.घर गाठण्यासाठी पायांची लगबग.
एका हातात छत्री अन् दुसऱ्या हातात भाजीची पिशवी सावरत चालत होते. रस्त्यातले खड्डे चुकवत, व्यवस्थेला नावं ठेवत कुरकुरतच खरे तर चालत होते. चौकाजवळ येताच चार दिवसांपूर्वी मान्सून सेल मधून घेतलेल्या चपलेने दगा दिला. कोपऱ्यावर च्या विठ्ठल मंदिराजवळ बसणारे दामूभाऊ आपल्या दुकानाची आवराआवर करत होते. कसेतरी पाय फरफटत त्यांना गाठले व चपलेचा बंध शिवून देण्याची
विनंती केली.
" ताई; दुकान तर आवरायला घेतले पण देतो बंध शिवून,नंतर मात्र चपलांना सोल लावून घ्यावा " ते चप्पल निरखत म्हणाले.
मी म्हटलं " राहू द्या तुमच्या कडे चपला. सोल लावून, पक्क्या करून दोन्ही चपला शिवून द्या.उद्या संध्याकाळी घेऊन जाईन.
घर जवळच आहे. जाईन मी बिना चपलेची."
"ताई; मी उद्या पासून पंधरा वीस दिवस नाही बरं का इथं."दामू भाऊ म्हणाले
का हो दामूभाऊ? मी विचारलं
वारीला जातोय. उद्या विठ्ठल मंदिरात दिंडी येईल त्या दिंडी सोबत जाईल व दिंडी सोबत परत येईल. दामू भाऊ आनंदून म्हणाले.
अरे व्वा ! भारीच हो , पण मग इतके दिवस दुकान बंद ठेवणार? धंद्याचं काय ? माझा व्यवहारीक प्रश्न.
ताई कामाचं म्हणाल ना ते वर्षभरच असतं हो पण वारी निमित्त पंढरीला जाईन.वर्षातून एकदाच जायला मिळते.
माऊली साठी जायचं. माऊली साठी कशाला ,मी माझ्या साठीच जातो की.
ताई वारीतल्या लोकांच्या मी मोफत चपला शिवून देतो. खूप आनंद वाटतो,थोडी सेवा केल्या सारखे वाटते.
वारकऱ्यांच्या चपला तूटतात चालतांना, जमेल तसं सांधून देतो.सगळं साहित्य घेऊन जातो सोबत. दामू भाऊ भरभरून बोलत होते.
दामू भाऊंचा सेवाभाव मनाला भावला. चप्पल शिवता शिवता वारी च्या गप्पा,गमती जमती ते सांगू लागले.
मी विचारलं " येवढ्या लांबून जाता पंढरीला त्या गर्दीत, होतं का हो विठूराया चं दर्शन ?
नाही हो ताई पण कळसाचं दर्शन होत ना, अन् मुर्ती ची दर्शन
झालंच पाहिजे असं कुठं आहे? समस्त वारी अन् वारकरी च विठू माउली नाही का ताई.
अहो हरीपाठ म्हणू नका , अभंग म्हणू नका भजन, कीर्तन, गवळणी म्हणू नका . काय नसतं हो वारीत ?
निव्वळ आनंद. कसं मनाला एकदम भारी वाटतं बघा. सगळी कशी प्रेमळ माणसं भेटतात, लहान मोठं असं काही नसतं ताई तिथं.
विष्णू मय जग , वैष्णवांचा धर्म
भेदाभेद भ्रम, अमंगळ. अशी गोष्ट असते ताई तिथं. चार चांगल्या गोष्टी, चार अभंग
कानावर पडतात. हरीपाठ म्हणायची सवय या वारी मुळं लागली. हे चौथे वर्ष आहे माझं.वारी बद्दल काय बोलू आणि किती बोलू असं त्यांना झालं होतं, जणू वारीचं धावतं समालोचन ते करत होते.ते मनानं केव्हांच वारीत सामील झाले होते. त्यांच्या चेहऱ्यावरची प्रसन्नता जणू विठ्ठल भेटीचा आनंद दर्शवित होती.
ताई जो वर जमतं तो वर जायचं.माझ्या सारखे किती तरी सेवेकरी असतात वारीत.वारी करून यायचं अन् मग जोरात कामाला लागायच. झाली चप्पल शिवून म्हणत माझ्या पुढ्यात दामू भाऊंनी
चपला ठेवल्या. मी त्यांचे पैसे दिले व घराकडे निघाले. मनात विचार आला,कीती मोठ्या मनाची असतात काही माणसं. वारीत सेवा करायला मिळते म्हणून वारीला जाणारी.
आपल्या धंद्याचा, मिळकतीचा विचार न करता आपला वेळ देणारी. निस्वार्थ पणे सेवा करणारी सेवाभावी माणसं.
आम्हा पामरांना घर, ऑफिस, सुट्ट्या अशा अनेक सबबी अन् विवंचना.नेहमी आबंट तोंड करून वावरत असतो आम्ही.
दामू भाऊ सारख्या लोकांसमोर आपण किती खुजे आहोत याची जाणीव झाली.
