दोस्ती उंट,जिराफाची
दोस्ती उंट,जिराफाची
उंट अन् जिराफाची झाली छान दोस्ती,
गळ्यात गळे घालून करु लागले मस्ती......
च्याऊ म्याऊ करत धरले एकमेकाचे कान,
कान धरता धरता दुखली दोघांचीही मान....
दोघांनीही मारल्या उंच उंच उड्या,
गुदगुल्या करत काढल्या एकमेकांच्या खोड्या..
खोड्या करता करता ,लागले चिडवायला,
जिराफ तर लागला उंटाला नावे ठेवायला..
मी तर सर्वात उंच प्राणी, तांबुस पिवळा माझा रंग
तू तर उंटोबा गबाळा, ओबडधोबड तुझे अंग..
उंट म्हणे; जिराफा नको करू रंग रुपाचा माज,
मी आहे बर का, वाळवंटातील जहाज...
ओझी वाहतो, कष्ट करतो, नाही फुकाचे खात
' रुपापेक्षा गुण श्रेष्ठ' नाही का तुला ज्ञात....
नको तुझी दोस्ती जिराफा, घेतली मी कट्टी
नको येउस माझ्या संगे करत गट्टी बट्टी...
जिराफ म्हणाला नको रे उंटा,नको रे ती कट्टी,
चुकलंच माझं दोस्ता , माझ्याशी घे ना बट्टी..
दोघांचीही झाली पुन्हा छान दोस्ती,
गळ्यात गळे घालून करू लागले मस्ती...
