हरवलेला खजिना
हरवलेला खजिना


आज घरी खूप आनंदाचे वातावरण होते. रवीला प्रमोशन मिळाले होते आणि एका महिन्यातच ऑफिस कडून मिळालेल्या नवीन बंगल्यात त्यांना शिफ्ट व्हायचे होते. त्यामुळे आता हळूहळू सामानाची आवरआवर करायला सुरवात करायची होती. घरातले नको ते जुने सामान काढून परत एकदा नव्याने संसार थाटायला मिळणार या विचाराने रश्मी अगदी खुश होती.
रविवारचा दिवस उगवला तसे रवीने माळ्यावर असलेले सामान आवरायला घेतले. त्यातल हवं नको ते सामान बघून बाकीचे रद्दी वाल्याला द्यायचे होते. बऱ्याच छोट्या छोट्या बॅग्स मध्ये जुनी कागद पत्रे आणि इतर सामान ठासून भरले होते. ते सर्व एकेक करून नीट बघून नको असलेले सामान एका कोपऱ्यात रवीने भरून ठेवले. त्या पसाऱ्यात रश्मीची एक जुनी फाईल त्याला मिळाली.
"अग रश्मी, हे जरा बघ..तुझे काही कामाचे कागदपत्रं आहे का यात ते..नसेल तर रद्दीत टाक" असे सांगून तो पुढच्या कामाला लागला. स्वैपाकघरातली सगळी कामं आटोपून रश्मी बेड वर जरा निवांत पडली तेवढ्यात तिचे लक्ष रवीने ठेवलेल्या त्या फाईल कडे गेले.. उत्सुकतेने तिने ती फाईल उघडली..आणि त्यातला खजिना पाहून ती हरखलीच.
तिने इतके वर्ष अगदी जपून ठेवलेली मैत्रिणींची ग्रीटिंग कार्ड्स आणि बरीच पत्रे त्यात होती.. तिने अलगद एक पत्र उघडले.. रंगीबेरगी कागदावर तिच्या मैत्रिणीने लिहिलेले ते सुंदर अक्षरातील पत्र बघून नकळत तिच्या जुन्या आठवणीं ताज्या झाल्या.
त्यावेळी ना मोबाइलचा सुळसुळाट होता ना इंटरनेटचा, त्यामुळे पत्र हे एक असे माध्यम होते की त्याद्वारे एकमेकांशी आपली मने मोकळी करता यायची. पोस्टमन दारावर येताच मिळणाऱ्या पत्राची सर्वांना ओढ असायची. आणि मग एखाद्या आवडत्या व्यक्तीचे पत्र मिळताच एक वेगळाच आनंद व्हायचा.
रश्मीला ती पत्रे बघताच तिच्या जुन्या मैत्रिणींची खूप आठवण आली. रश्मी तिच्या आत्या कडे उन्हाळ्याच्या सुट्टीत राहायला जायची. तिथे तिला मिळालेल्या नवीन मैत्रिणी आणि त्यांच्यासोबत घालवलेले ते रम्य दिवस तिला आठवले आणि नंतर देखील पत्राद्वारे कायम ठेवलेली ती मैत्री तिच्या कायम स्मरणात राहिली.
पुढे शिक्षणासाठी बाहेरगावी गेल्यावर तर जुन्या मैत्रिणींशी पत्राद्वारे ही मैत्री अधिकच घट्ट होत गेली. त्यातला प्रेमाचा ओलावा मनाला नेहमीच आधार द्यायचा. आताच्या काळातली फेसबुक, इंस्टाग्राम मधील मैत्री मध्ये तुम्ही मित्रांशी लगेच कनेक्ट होऊ शकता पण मनाचं मनाशी असलेले कनेक्शन मात्र त्यात हरवलंय.
आज अचानकपणे मिळालेला हा हरवलेल्या पत्रांचा खजिना बघून रश्मी खूप आनंदली होती. त्या पत्रातील आठवणीतून ती जीवनातले हरवलेले ते मैत्रीचे अनमोल क्षण परत एकदा नव्याने जगत होती.