होत्याचे नव्हते झाले
होत्याचे नव्हते झाले
किसन आणि त्याची पत्नी राधा. जणू राधा-कृष्णाचीच जोडी. संपतराव पाटलाचा एकुलता एक सत्शील, सोज्वळ स्वभावाचा सुंदर मुलगा किसन. संपत पाटील गावातील श्रीमंत असामी होती. श्रीमंत बापाचा एकुलता एक असूनही किसनच्या वागण्यात किंचितही श्रीमंतीचा अभिमान नव्हता. त्याचे सर्व मित्र गरीब घरातीलच होते. तेथील लोकांचे प्रेमही त्याने अनुभवले होते. किसन या अशा साऱ्या मित्रांसोबत लहानाचा मोठा झाला. तारुण्यात पदार्पण केल्यावर तो खरोखर श्रीकृष्णा सारखा नयन मनोहर दिसायला लागला. आजू बाजूला नातेवाईकांमध्ये चर्चा व्हायला लागली. एका पेक्षा एक सुंदर मुली सांगून यायला लागल्या. पण त्याला काही पसंद पडेना. लहानपणा पासून गरीब मित्रांमध्ये राहिल्यामुळे गरीब घरातली मुलगी प्रेमळ आणि मनमिळाऊ असेल असा त्याचा होरा होता. त्यामुळेच, 'गरीबाचीच मुलगी पत्नी म्हणून आणायची' हे त्याने मनाशी निश्चित केलेले होते, आणि 'त्याच्या पसंतीशिवाय लग्न करायचे नाही' हे संपत पाटलांनी ठरवलेले होते. अखेर शेजारच्या गावातील गरीब परंतु सोज्वळ कुटुंबातील सुसंस्कृत आणि सुंदर मुलगी राधा किसनाला पसंद पडली. संपत पाटलांनीही मोठ्या मनाने तिचा स्वीकार केला. स्वतः पदरमोड करून त्यांनी हे लग्न धुमधडाक्यात पार पाडले.
राधा लग्न करून सासरला आली. साऱ्या गावानं तिचं, तिच्या सौंदर्याचं तोंड भरून कौतुक केलं. वयस्कर बायकांनी तर बायजा बाईंना तिची दृष्ट काढायला सुद्धा सुचवलं. तिचा संसार सुरळीत सुरू झाला. सासू सासरे हे तिच्या साठी आई वडीलच होते. माहेर सोडून ती या आई वडिलांच्याच घरात आली होती. इथे माहेर पेक्षाही जास्त सुख तिच्या वाट्याला आलं होतं. तिचा स्वभावही अतिशय प्रेमळ असा असल्यामुळे गावातल्या प्रत्येकाला तिचं बोलणं आवडायचं. तिच्या सोबत बोलायला प्रत्येक जण आसुसलेला असायचा. तिला कुठे माहीत होते, 'तिचा हा मोकळा स्वभाव जीवनाचे तीन तेरा वाजवणार आहे ते.'
तिच्या या सोन्यासारख्या संसाराला कुणाची दृष्ट लागली काय माहीत, चहाचंही व्यसन नसलेला किसन चक्क दारू पिऊन आला. राधाला तर हे अगदीच अनपेक्षित होतं. बायजाबाईंना तर धक्काच बसला. कुणी तरी मुद्दाम असं केलं असावं, असं तिला वाटलं. तिनं त्याची मीठ मोहरीने दृष्ट काढली. संपत पाटलांना मात्र वाटलं, 'मित्रांसोबत केलं असेल थोडंफार मद्यपान. रोजच थोडा घेणार आहे?'
किसन आता रोजच पिऊन यायला लागला. राधा सोबत बोलणेही त्याने बंद केले. राधा काही विचारायला गेली तर, तिच्यावर डाफरायला लागला. वाकडं तिकडंही बोलू लागला. ती मात्र निमूटपणे सहन करत होती. प्रेमळ सासू सासऱ्यांना आधीच दुःख होत आहे आणखी काही सांगून दुःख देण्याची तिची इच्छा नव्हती. काही बिघडले नाही अशा अविर्भावात ती वावरू लागली. परंतु तिच्या चेहऱ्यावरचे हे उसने अवसान किती दिवस टिकणार? एक दिवस दोघांनीही तिला प्रेमाने जवळ बसवून विचारल्यावर मात्र तिला स्वतःला सावरता आलं नाही. ती चक्क रडायलाच लागली. तिने सारं काही त्यांच्यापुढं मांडलं. त्यांनाही दुःख झालं. दोघांनीही विचार विनिमय करून तिच्या माघारी त्याला काही गोष्टी समजावण्याचा प्रयत्न केला. त्यांच्या पुढे त्याने निमूटपणे सारे ऐकून घेतले. मात्र रात्री राधावर राग काढला. कधी नव्हे ते त्या रात्री त्याने राधावर हातही उचलला.
सकाळी राधाने काहीही न सांगता बायजा बाईंना तिची कहाणी समजलीच. तिच्या गालावर उमटलेले बोटांचे व्रण, रडून आणि रात्रभराच्या जागरणाने सुजलेल्या डोळ्यांनी सर्व काही सांगून टाकले. त्यांनी हा प्रकार संपतरावांना सांगितला. एवढ्या प्रेमळ मुलीवर होत असलेला अन्याय त्यांना सहन झाला नाही. आधीच हृदयविकाराचे रुग्ण असलेल्या संपत पाटलांच्या छातीत एकदम कळ निघून ते जे खाली कोसळले ते कायमचेच. पाठोपाठ बायजा बाईंसुद्धा एक महिन्याच्या आत राधाला एकटीलाच सोडून देवाघरी निघून गेल्या. राधा एकटी उरली, किसनचा अन्याय सहन करायला.
राधा आपले दुःख स्वतःच झेलत होती. कुणाजवळही काही तक्रार ती करत नव्हती. किसनचे व्यसन आणखी वाढतच चालले होते. अमावस्या पौर्णिमेला भेटणारा मार आता रोजच भेटू लागला. अशात जीव गुंतवण्यासाठी एखादे मुल बाळही नव्हते. राधा वैतागली. मनमोकळं करायलाही जवळचं कुणी उरलं नव
्हतं. या सर्व गोष्टी तिच्या आई वडिलांच्या कानावर गेल्यानंतर तेही खूप दुःखी झाले. होईल तेवढी मदत त्यांनी केली पण परिस्थितीमुळे ते काही करू शकले नाहीत. एका अल्पशा आजाराने दोघेही लवकरच निधन पावले. राधा पूर्णपणे पोरकी झाली. आणि एक दिवस सकाळी गावात बोंब उठली, रात्री झोपलेली राधा सकाळी उठलीच नाही.
बघता बघता सर्व गावात ही बातमी वणव्या सारखी पोहोचली. क्षणात सर्व गाव गोळा झाला. किसन जवळच डोक्याला हात लावून बसला होता. आयाबाया रडत होत्या. पुरुष मंडळीही डोळ्यात पाणी आणून पुढच्या तयारीविषयी चर्चा करत होते. पुन्हा काही गडबड नको म्हणून कुणी तरी पोलिसांना सुद्धा कळवले. पोलिस आले. गर्दी बाजूला केली. पंचनामा करून प्रेताला सोबत आणलेल्या अँबुलन्समध्ये पोस्टमार्टमसाठी तालुक्याला घेऊन गेले.
पोस्टमार्टमच्या रिपोर्टमध्ये राधाच्या पोटात विष सापडले. म्हणजे राधाने रात्री झोपतांना विष प्राशन केले होते, असे निष्पन्न झाले. त्यासाठी तिच्या नवऱ्याला जबाबदार धरून पोलिस केस झाली. तेरावे होईपर्यंत तो गावातच पण नजरकैदेत राहणार होता. चार पोलीस त्यासाठी गावात हजर होते. तेरावे झाल्यावर त्याला तुरुंगात डांबले जाणार होते.
गावातल्या परंपरे प्रमाणे दररोज दहावीस जण घरून भाजी भाकरी घेऊन किसनकडे जेवायला येत असत. हळूहळू दुःख कमी व्हावे हाच त्यामागचा उद्देश असावा, नाही का? जेवतांना चर्चा व्हायची. चर्चेचा विषय अर्थातच राधा आणि तिचा प्रेमळ स्वभाव हाच असायचा. किसन मात्र सारी चर्चा निमूट पणे, निर्विकार पणे ऐकून घ्यायचा.
एक दिवस अशीच चर्चा सुरू असतांना शेजारचा पांडबा एक प्रसंग सांगायला लागला आणि किसनने कान टवकारले. पांडबाने सांगितलेली गोष्ट अशी होती..
पांडबाचे शेत किसनच्या शेताला लागूनच तर होते. एक दिवस दुपारच्या वेळी औताचे बैल सोडून झाडा खाली बांधले. चारा टाकाण्यासाठी कडब्याच्या गंजीतून कडब्याची पेंढी काढत असतांना त्याला तिथे एक भलामोठा साप दिसला. त्याने घाबरून ती पेंढी तशीच फेकून पळ काढला. पळता पळता तो एका झुडुपात अडकून पडला. त्या झुडुपावर बसलेले मोहोळ उठले. त्या मधमाशांनी त्याच्यावर जोरदार हल्ला चढवला. तो उठून पळेपर्यंत अनेक माशांनी त्याला चांगलेच घायाळ केले. कसाबसा उठून तो त्या झाडाखाली आला. बाजूलाच शेजारच्याच शेतात राधा काम करत होती. तिचे तिकडे लक्ष गेले. गडबडा लोळत असलेल्या पांडबाकडे ती धावत गेली. काय झालं ते विचारलं. मधमाशांनी दंश केलेले काटे काढण्यासाठी त्याला शर्ट काढायला सांगितला. आणि जवळ बसून अंगातला एक ना एक काटा स्वतःच्या प्रेमळ हाताने उपटून काढला. म्हणूनच तो वाचला होता नाहीतर माहीत नाही त्या काट्यांच्या विषाने त्याचे काय झाले असते. पांडबा सांगतांना रडत होता. आणि अचानक किसनने हंबरडाच फोडला.
"हीच घटना आमच्या सर्वनाशाला कारण ठरली. ती पांडबाचे काटे काढत असतांनाच मी तिकडून आलो, माझे लक्ष अचानक तिकडे गेले. पांडबा शर्ट काढून झोपलाय आणि राधा जवळ बसून त्याच्या अंगावर हात फिरवतेय. हे पाहून माझी तळपायाची आग मस्तकाला गेली. असंच जाऊन तिच्या झिंज्या उपटाव्यात. तिला चांगली बुकलून काढावी असं वाटत होतं. पण आपल्या पत्नीच्या चारित्र्याचा आणखी बोभाटा होईल असं वाटलं आणि तो विचार मनातून काढून टाकला. परंतु डोक्यातली तिडीक शांत बसू देत नव्हती. मी एका दारुड्या मित्राकडे गेलो व दारू प्यायची इच्छा व्यक्त केली. मित्रानेही जास्त आढेवेढे न घेता दारू पाजायला सुरुवात केली. दारूने डोक्याचा ताबा घेतला. जरा बरं वाटलं. प्रतिष्ठेपायी मनातील मळमळ कुणा जवळ मोकळी करू शकलो नाही. मनातल्या मनात कुढत राहिलो. राधेलाही 'त्या' बद्दल कुठलाही जाब विचारला नाही. त्या मुळे हा सगळा अनर्थ घडला. माझ्या निष्कलंक अशा राधेला कलंकिनी ठरवून व्यसनात गुरफटलो. आई बाबा मानसिक धक्क्याने गेले. सीतेसारखी सत्शील आणि निष्कलंक राधा आत्महत्या करून मेली. या साऱ्या अनर्थाला मीच जबाबदार असून तिच्या अगोदर मीच मरायला हवे होते."
असे सांगत किसन ओक्साबोक्शी रडत होता. बाकीचे सारे स्तिमित होऊन पाहत होते. हातात दुसरे उरले तरी काय होते?