Pratibha Tarabadkar

Tragedy Inspirational

4.7  

Pratibha Tarabadkar

Tragedy Inspirational

गुरूदक्षिणा

गुरूदक्षिणा

9 mins
458


  अमेयची बदली लांब दक्षिणेतील गावात झाली आणि अनुजा धसकलीच. परका मुलूख, अपरिचित भाषा... कसं जमणार आपल्याला? त्यातून अन्वय अवघा दोन वर्षांचा.अन्वयला घेऊन दोघांनीच परमुलूखात जायचं म्हणजे...पण जाण्याशिवाय गत्यंतर नव्हते कारण अमेयला प्रमोशनवर पाठविले होते त्यामुळे बदली नाकारणे अशक्यच.आईला फोनवर सांगताना अनुजाला भरुन आले.'आई, कसं होईल गं माझं? अन्वय इतका लहान, मुलूख परका, तिथल्या लोकांना धड हिंदीसुद्धा येत नाही म्हणे',अनुजाचा स्वर रडवेला झाला होता.'अगं अनुजा, सगळं ठीक होईल.'आई अनुजाची समजूत काढत म्हणाली.'लोकं तर परदेशी जातात. तिथे कसे रहात असतील ते? वर्षानुवर्षे भारतात यायलासुद्धा मिळत नाही.तू तर भारतातच रहाणार आहेस. कधी गरज पडली तर आम्ही येऊ, कधी अमेयचे आईबाबा येतील.असं हातपाय गाळून कसं चालेल?' आईच्या बोलण्याने अनुजाला धीर आला आणि ती आता त्यांच्या बदलीच्या गावाबद्दल, होनागेरे बद्दल माहिती गोळा करू लागली . आता त्या गावाला तिने मनाने स्वीकारले होते.

  अनुजाचे आईबाबा त्यांच्या बरोबर होनागेरे गावास आले असल्याने सामान लावणे, खट्याळ अन्वयला सांभाळणे इ.गोष्टी सुकर झाल्या.होनागेरे एक टुमदार गाव होते.अमेयला रहाण्यासाठी तीन खोल्यांचे अपार्टमेंट मिळाले होते तेसुद्धा गावाच्या मध्यवर्ती भागात. त्याची बॅंक, भाजीबाजार, दुकाने सर्व काही हाकेच्या अंतरावर. नव्यानेच बांधलेल्या इमारतीतील ते घर पाहून सर्वांनाच हायसे वाटले.अनुजाचे आईवडील असल्याने सामान पटकन लागले.अन्वयसुद्धा सुरुवातीला बावरला पण लवकर रमला.आईबाबा परतले आणि अनुजा आता गावाला सरावली. मात्र एक गोष्ट तिला प्रकर्षाने जाणवली ती म्हणजे तेथील स्थानिक लोक परक्यांना आपल्यात सामावून घेण्यास अजिबात उत्सुक नव्हते. भारतात सगळीकडे चालणारी हिंदी भाषा या माणसांना कळत नसे.सगळे व्यवहार अनुजा खाणाखुणांवरच निभावून नेत असे.आईबाबा असेतोवर तिला एकटेपणा जाणवला नव्हता पण आता प्रकर्षाने जाणवत होता. मग सामान, भाजी खरेदी झाली की अनुजा अन्वयला घेऊन रोज जवळच असलेल्या देवीच्या मंदिरात जाऊ लागली. प्रशस्त गाभारा असलेल्या त्या मंदिरात इकडे तिकडे पळणे,आईने उंच पकडल्यावर घंटा वाजविणे प्रसादाचा खाऊ खाणे यात अन्वयचा वेळ चांगला जात असे.अमेयचा ऑफिस मधून निघतोय म्हणून फोन आला की ती अन्वयला घेऊन घरी येण्यास निघे.

त्या दिवशी अन्वय उड्या मारत पायऱ्या उतरत होता. गडबडीत त्याची पायरी चुकली आणि तो पडणार एव्हढ्यात 'अरे बाळा हळू, पडशील ना,'असे म्हणत एक वृद्ध भिकारीण पुढे झाली आणि तिने अन्वयला सावरले.अनुजा दचकली. मराठी कोण बोललं? तिने आवाजाच्या अनुरोधाने पाहिले पण तोपर्यंत ती भिकारीण वळून चालायला लागली होती.संपूर्ण रस्ताभर अनुजा अस्वस्थ होती.हा आवाज तिने पूर्वी अनेकदा ऐकला होता. कोणाचा आवाज अगदी अस्साच होता बरं? डोक्यात एकदम वीज चमकल्यासारखे झाले. दहावीला शिकवणाऱ्या लाखे मॅडमचा आवाज अगदी अस्साच होता. नक्कीच. पण लाखे मॅडम आणि कर्नाटकातील एका गावातील मंदिरासमोर भिकारणीच्या रुपात? कसं शक्य आहे हे? अनुजा आपल्याच विचारात बुडालेली पाहून अमेयने विचारले तेव्हा अनुजाने आज मंदिरात घडलेला प्रसंग सांगितला आणि आपली शंकाही सांगितली. 'ह्या, काहीतरीच तुझं, 'अमेयने तिची शंका उडवून लावली.' तुझ्या दहावीला असणाऱ्या मॅडम कशा असू शकतील? कर्नाटकात? आणि तेही भिकारीण म्हणून? काहीतरीच तुझं आपलं!' अमेयने तिची शंका धुडकावून लावली तरी अनुजाच्या मनातील संशय काही दूर होईना. दुसऱ्या दिवशी तिने त्या कृश भिकारणीचे मोबाइल वर गुपचूप फोटो काढले आणि विद्या सदन शाळेच्या व्हॉट्स अप ग्रुप वर टाकले. अपेक्षेप्रमाणेच कॉमेंट्स चा महापूर लोटला. सगळ्यांनी अनुजावर टीकेचा भडिमार सुरू केला. सर्वांचा एकच सूर होता, कसं शक्य आहे? फक्त लाखे मॅडम जवळ रहाणाऱ्या संजा पाटीलने सांगितले की त्यांचा मुलगा विश्वास लांब कोठेतरी नोकरी लागली म्हणून घरदार सोडून लाखे मॅडम बरोबर कुटुंबासहीत नोकरीच्या गावी गेला आहे. म्हणजे लाखे मॅडम गावात रहात नाहीत याची खात्री झाली. संजाने पुढे सांगितले, मध्यंतरी त्यांच्या पायाला फ्रॅक्चर झाले होते आणि काहीतरी दोष राहिल्याने त्या थोड्या लंगडतात. तेव्हापासून अनुजाने त्या भिकारणीवर लक्ष ठेवले आणि तिच्या निदर्शनास आले की ती भिकारीणही लंगडते आणि ती भिकारीण म्हणजेच लाखे मॅडम आहेत यावर शिक्कामोर्तब झाले आणि ग्रुपमध्ये एकच गडबड उडाली. प्रत्येकजण एकमेकांस विचारू लागले, 'कसं शक्य आहे हे?'

  आपल्या शाळेतील एका शिक्षिकेवर अशी पाळी यावी? आणि का? ग्रुप वर सन्नाटा पसरला.कोणाला काही सुचेना. सम्याने पुढाकार घेतला आणि लाखे मॅडमना आर्थिक मदत करण्याचे आव्हान करताच मदतीचा पाऊस पडला. आता पुढे काय?आशूच्या काकांचा वृद्धाश्रम असल्याने त्याने त्यांच्या रहाण्याची सोय करण्याचे आश्वासन दिले. मंदार आणि दिशाने जवळच रहात असल्याने वृद्धाश्रमात ठेवल्यावर लाखे मॅडम ची विचारपूस करण्याची जबाबदारी घेतली.आता प्रश्न होता लाखे मॅडमना समजावून, पटवून परत आणण्याचा तर मंग्या, रश्मी आणि सुनेत्राने होनागेरेला जावयाचे आणि लाखे मॅडमना परत आणावयाची कामगिरी स्वीकारली आणि त्याप्रमाणे ते तिघे होनागेरेला येत असल्याचे अनुजाला कळवले. पहाटे अनुजाकडे पोहोचल्यावर उत्तेजित स्वरात झालेल्या चौघांच्या गप्पा, लाखे मॅडमना भेटायचे या विचाराने थोडी धाकधूक मनात घेऊन कधी एकदा उजाडतंय असं सर्वांना झाले होते.आज अमेयने बॅंकेत रजा टाकली होती.अन्वयला सांभाळणे आणि घराची व्यवस्था त्याने आपणहून अंगावर घेतली होती. चौघेजण मंदिराकडे निघाले.त्यांच्या चालण्याचा वेग वाढला होता आणि हृदयातील धडधडही.

मंदिराबाहेर नेहमीप्रमाणे भिकाऱ्यांची रांग होती. श्रद्धाळू भक्त मंदिरात देवीचे दर्शन घेऊन भिकाऱ्यांना पैसे, केळी, कोणी वाढदिवसानिमित्त पेढे, लाडू वगैरे वाटत होते. त्या रांगेत लाखे मॅडमही होत्या.अॅल्युमिनियमचे वाडगे समोर ठेवून विझलेल्या डोळ्यांनी भिक्षेची वाट बघत. अनुजा लाखे मॅडम समोर जाऊन उभी राहिली आणि तिने हाक मारली, 'लाखे मॅडम'. बेसावध लाखे मॅडम एकदम दचकल्या. त्यांनी समोर पाहिले तर त्यांचे माजी विद्यार्थी उभे होते.आश्चर्य, शरम आणि वेदनेने त्यांचा चेहरा विदीर्ण झाला. त्यांच्या डोळ्यात अश्रू उभे राहिले. 'चला लाखे मॅडम, आम्ही तुम्हाला न्यायला आलोय. 'रश्मी आणि सुनेत्राने त्यांना हात देऊन उठवले. रांगेतील भिकारीणी आश्चर्याने पाहू लागल्या तशी मोडके तोडके कानडी शिकलेल्या अनुजाने प्रसंगावधान राखून 'बळगरु' (नातेवाईक) असे सांगितले.

 अनुजाच्या घरी ऊन ऊन पाणी, साबण, शांपूने अंघोळ करून लाखे मॅडमनी सैलसर पंजाबी ड्रेस परिधान केला. आकस्मित घडलेल्या घटनांनी त्या इतक्या भांबावून गेल्या होत्या की काय प्रतिक्रिया द्यावी हेच त्यांना कळत नव्हतं. गरमागरम कांदेपोहे आणि चहा पिऊन त्यांना तरतरी आली आणि त्या जरा सैलावल्या. आधीच्या दीनवाण्या दिसणाऱ्या आणि आताच्या टवटवीत मुद्रेच्या लाखे मॅडमचे बदललेले रुप त्यांच्या विद्यार्थ्यांना सुखावत होते. लाखे मॅडमचा आत्मविश्वास जागृत झाला होता हे त्यांच्या प्रसन्न मुद्रेवरुन लक्षात येत होते. लाखे मॅडमच्या भोवती सर्वांनी कोंडाळे केले आणि प्रश्न विचारुन त्यांना भंडावून सोडले अगदी शाळेतल्या दिवसांसारखेच. 'शांत बसा सर्वांनी.'लाखे मॅडमचा दमदार आवाज घुमला त्यासरशी सारे एकदमच गप्प झाले. शक्य असतं तर लाखे मॅडमनी टेबलावर डस्टर आपटला असता. त्यांच्या शाळेतील ही मुले मिनिटाभरात भानावर आली आणि आपण लाखे मॅडमच्या वर्गात नसून अनुजाच्या घरी आहोत हे लक्षात आल्यावर हास्याचा कल्लोळ उठला. 'मॅडम तुम्ही आम्हाला ओळखलंत?' रश्मीने विचारले. 'हो,का नाही ओळखणार? 2012ची बॅच.अनुजा, रश्मी, सुनेत्रा आणि मंगेश. बरोबर ना?'लाखे मॅडमच्या स्मरणशक्तीने सर्वांनाच चकित केले. 'जेवण आलं आहे. आधी जेवून घ्या.' अमेयने पुकारले. सर्वांनी जेवणावर यथेच्छ ताव मारला.अन्वयला नवीन मामा,मावशा आवडल्या होत्या. तो त्यांच्या भोवती घुटमळत होता.तेसुद्धा लहान मूल होऊन त्याच्याशी खेळत होते. 'ए तिकडे व्हॉट्स अप वर सगळे जण उत्सुकतेने आपली वाट पहात असतील, 'सुनेत्राने आठवण करून देताच सारेजण लाखे मॅडम भोवती बसले आणि फटाफट सेल्फी काढून ग्रुपवर टाकले. ग्रुपमधील सारे जण किती एक्साईट झाले असतील .

  आता वातावरण जरा गंभीर झाले होते. प्रथितयश शाळेतील नावाजलेली शिक्षिका ते मंदिराबाहेर बसून भीक मागणारी भिकारीण अशी लाखे मॅडमच्या आयुष्याची परवड कशी झाली याबद्दल जाणण्यासाठी सारेजण अधीर झाले होते.लाखे मॅडम थोडावेळ निःशब्द बसल्या.शब्दांची जुळवाजुळव करीत असाव्यात.अखेर त्या बोलू लागल्या...

 'जवळपास अडतीस वर्षे अध्ययनाचे काम करुन मी निवृत्त झाले.पतीनिधनानंतर लहान मुलाचा सांभाळ करत एकटीने संसाराचा भार पेलला. मुलगा चांगला शिकला, नोकरीला लागला.त्याचे लग्न झाले, गोंडस मूल झाले.आता आराम करायचा, नातवंडांबरोबर वेळ मजेत घालवायचा एव्हढेच स्वप्न् उरले होते. एक दिवस विश्वास,माझा मुलगा म्हणाला,आई, मला आणि स्वातीला, माझ्या सुनेला हैद्राबाद मध्ये नोकरी मिळाली आहे.आम्हाला जॉईनिंग लेटर सुद्धा मिळाले आहे. तीन महिन्यात जॉईन करायचे आहे. 'हैद्राबादला? 'मी आश्चर्याने विचारले.नीट चौकशी केली आहेस ना?'त्यावर स्वाती घाईघाईने म्हणाली,'अहो आई, माझ्या मैत्रिणी रहातात तिकडे.सगळं स्वस्त आहे तिकडे.घरंसुद्धा कमी किंमतीत मिळतात.आपण विकतच घेऊ घर तिकडे.या भाड्याच्या घरात राहून कंटाळा आला. स्वतःच्या मालकीचं घर कधीही चांगलंच नाही का?' मला खरं तर आपलं घर,आपली माणसं सोडून जायला अगदी जिवावर आलं होतं पण मुलांचं भविष्य जर उज्ज्वल असेल तर मला तडजोड करणं भाग होतं. मी अनिच्छेनेच होकार दिला.त्यांना नोकरीच्या गावी स्वतः चं घर हवं होतं पण पैसे कमी पडत होते म्हणून माझी सारी बचत त्यांच्या हाती सोपवून मी त्या परक्या गावी जाण्याची मनाची तयारी करू लागले. विश्वास आणि स्वाती सामानाची बांधाबांध, पैशांची व्यवस्था वगैरेंची धावपळ करीत होते आणि मी नातवाला सांभाळत त्यांची लगबग पहात होते.'लाखे मॅडम क्षणभर थांबल्या.कदाचित नातवाची त्यांना आठवण झाली असावी.आवंढा गिळून त्या पुढे सांगू लागल्या, 'हैद्राबादला जाण्याचा दिवस जवळ आला.घरातील सामान आधीच रवाना झाले होते.घरमालकांचा निरोप घेऊन, घराच्या चाव्या त्यांच्या हाती सोपवून आम्ही भाड्याच्या कारने हैदराबादला निघालो.रात्री विश्वासने जेवणासाठी एका धाब्यावर कार थांबवली. सर्वांनी जेवण केले. स्वाती आणि विश्वास टॉयलेटला जाऊन आले आणि मी नातवाला त्यांच्याकडे सोपवून टॉयलेटला गेले. परत आल्यावर कोणी दिसेना म्हणून ट्रक्सच्या गर्दीत आमची कार शोधू लागले. माझी धावपळ बघून एका ट्रक ड्रायव्हरने विचारले, 'मांजी, क्या बात है? किसे ढूंढ रही हो?'मी रडकुंडीला येत म्हटलं, माझी कार शोधत आहे. तेव्हा तो म्हणाला, 'वो सफेद रंगकी कार तो कब की निकल गयी' मी मटकन खाली बसले. डोळ्यापुढे अंधारी आली. 'मला सोडून विश्वास सरळ निघून गेला? आपली आईची अशा अनोळख्या जागी काय अवस्था झाली असेल याची त्याला जाणीव नव्हती? का मला सोडून तो मुद्दाम निघून गेला? किती निष्ठूर झालाय हा?' त्या अनोळख्या जागी मी एकटी होते. पूर्णपणे एकटी. 'लाखे मॅडम क्षणभर थांबल्या. सर्वांच्या डोळ्यातून घळाघळा आसवं वहात होती. लाखे मॅडम कातर झालेल्या आवाजावर ताबा ठेवत पुढे सांगू लागल्या.

  'मी भयाने कापू लागले.आजूबाजूला तांबारलेल्या डोळ्यांचे आडदांड ट्रक ड्रायव्हर्स जमा झाले आणि मला सोडून निघून जाणाऱ्या मुलाला अर्वाच्य शिव्या देऊ लागले. त्यांच्या दारुच्या भपकाऱ्यांनी माझी शुद्ध हरपू लागली. तेव्हढ्यात काय गडबड झाली आहे ते पहायला त्या ढाब्याचा मालक तिथे आला. क्षणभरात त्याला परिस्थितीचा अंदाज आला आणि त्याने अदबीने ढाब्यात नेले. मला त्याने विचारले, 'आपका नाम क्या है? आप कहां रहती हो?' आणि त्याक्षणी मी भानावर आले. माझी पर्स त्या कारमध्येच राहिली होती.आत्ता या क्षणी माझ्याकडे ना पैसे होते, ना मोबाईल ना घर मग माझी ओळख काय सांगू? कोण विश्वास ठेवेल माझ्यावर? माझे अस्तित्व या जगात कसे पटवून देणार लोकांना? माझ्या डोळ्यात पाणी आलं तशी त्या सहृदय मालकाला माझी दया आली आणि त्याने त्या ढाब्यावर रात्री झोपण्याची माझी व्यवस्था केली.सकाळी त्यांची नैमित्तिक कामे सुरू झाली.आता माझी व्यवस्था मलाच करावी लागणार होती. मी त्या मालकाचा निरोप घेतला. त्याने माझ्या हातावर २००रु.ठेवले. समोर दिसेल त्या बसमध्ये चढून मी शेवटच्या स्टॉप चे तिकीट काढले आणि या गावात येऊन पोहोचले. पुढचे सर्व तुम्ही जाणताच. 'लाखे मॅडमनी समारोप केला. लाखे मॅडमची कथा ऐकून सर्वजण सुन्न झाले होते.लाखे मॅडमच्या बाबतीत सत्य हे अद्भुत...नव्हे भयंकर होते.पतीनिधनानंतर हाल अपेष्टा सोसत वाढविलेल्या पोटच्या मुलाने, विश्वासने त्यांचा विश्वासघात केला होता! आईला असे असहाय्य स्थितीत सोडून जाताना त्याला काहीच कसे वाटले नाही? त्याची बायकोही त्याला कशी काय सामील झाली? सर्वजण निःशब्द बसले होते.

 'मॅडम,झाले ते झाले. भूतकाळ कितीही कटू असला तरी त्याला आपण बदलू शकत नाही.'मंगेश शांततेचा भंग करीत म्हणाला.'तुमचे आयुष्य या पुढे सुखात जावे म्हणून आम्ही विद्यार्थ्यांनी एक योजना आखली आहे.'काय?'लाखे मॅडमनी आश्चर्याने विचारले.पुढे त्या घाईघाईने म्हणाल्या,' हे बघा, आपल्या गावी परत जायची माझी मुळीच इच्छा नाहीय.ज्या गावात मानाने, प्रतिष्ठेने राहिले त्याच गावाने आपली कीव करावी असं मला वाटत नाही.'

 'नाही मॅडम,'अनुजा घाईघाईने म्हणाली,'आम्ही तुमची व्यवस्था एका वृद्धाश्रमात केली आहे.'लाखे मॅडमच्या चेहऱ्यावर आश्चर्य पसरले.'पण वृद्धाश्रमाची फी देण्याइतके पैसे नाहीत माझ्याकडे बाळांनो,'लाखे मॅडमच्या आवाजात खिन्नता होती.'त्याची तुम्ही काळजीच करू नका मॅडम,'मंगेश म्हणाला.'त्याची व्यवस्था आधीच झाली आहे.'लाखेमॅडम विचारमग्न झाल्या.'प्लीज मॅडम, नाही म्हणू नका.'सुनेत्रा काकुतीला येऊन म्हणाली. 'मॅडम, आम्ही तुमच्याकडून ज्ञान मिळविले, प्रेम मिळविले आता तुमच्या साठी काही तरी करायची जबाबदारी आमची.आपल्या संस्कृती मध्ये गुरुंसाठी गुरुदक्षिणा द्यावी अशी प्रथा आहे.तुमच्या विद्यार्थ्यांनी ही 'गुरुदक्षिणा' तुमच्या चरणांवर ठेवली आहे तिचा स्वीकार करा प्लीज',सुनेत्राच्या या आर्जवी स्वरांनी लाखे मॅडमच्या डोळ्यात पाणी उभे राहिले. एका मुलाने आईला धुत्कारले पण या विद्यार्थ्यांनी माझ्यावर किती निरपेक्ष प्रेम केले!'

लाखे मॅडमच्या बरोबर रश्मी, मंगेश आणि सुनेत्रा गाडीत चढले.गाडी सुटली.अनुजा,अमेय आणि अन्वय सर्वांना टा टा करीत होते. लाखे मॅडम निघाल्या होत्या आयुष्याचा नवा अध्याय सुरू करण्यास!


Rate this content
Log in

Similar marathi story from Tragedy