गुरुदक्षिणा
गुरुदक्षिणा
अजूनही शाळेची आठवण आली की मला आठवतात माझे गणिताचे सर. गणित या विषयाला साजेल असेच त्यांचे व्यक्तिमत्त्व होते. ते त्यांच्या कडक आणि शिस्तप्रिय स्वभावासाठी शाळेत प्रसिद्ध होते. त्यांचा मुलांमध्ये चांगलाच दरारा होता. मला त्यांची खूप भीती वाटे. आणि त्यामुळे गणित या विषयाची पण. परीक्षेत मी इतर विषयात खूप चांगल्या गुणांनी उत्तीर्ण होई पण गणितात मात्र मला जेमतेमच गुण मिळत असे आणि मग वर्गात माझा नंबर कायम घसरत असे. त्यामुळे तर या गणित या विषयावर माझा अजुनच राग होता.
आजही मला अगदी स्पष्टपणे आठवतो तो दिवस..मी सहावीत असेल त्यावेळी.. आमचा गणिताचा तास चालू होता आणि गणिताच्या सरांनी आम्हाला काही गणिते सोडवायला सांगितली होती..मला काही केल्या ते जमेना..सर कुणालाही उठवून गणित फळ्यावर करायला बोलावत असे..आणि करता आले नाही की हातावर छडी देत. त्यामुळे सगळी मुले त्यांना खूप घाबरत.
आजही सर वर्गात फिरत सगळ्यांकडे लक्ष देत होते. जसे ते आमच्या बेंच जवळ आले तसा माझा भीतीने थरकाप उडाला. मला अजिबात काही सुचेनासे झाले आणि सरांनी मला न विचारावे म्हणून मी मनोमन देवाची प्रार्थना करू लागले..पण म्हणतात ना ज्याची भीती असते तेच होते आणि झालेही तसेच..त्यांनी आमच्या बेंच वरून मलाच बोलावले ते गणित सोडवायला.. मी उभी झाले अन् जागच्या जागीच थबकले. पुढे जाण्याची माझी हिंमतच होईना. माझ्या डोळ्यातून गंगा यमुना वाहायला लागल्या.
सर माझ्या जवळ आले तसा मी माझा हात पुढे केला आणि आता कुठच्याही क्षणी हातावर छडी पडणार या विचाराने डोळे गच्च मिटले. पण आश्चर्य म्हणजे आज तसे काहीच घडले नाही. माझ्या शेजारच्या मुलीला सरांनी गणित सोडवायला बोलाविले. मी डोळे उघडून गुपचूप खाली मान घालून उभे होते. तेवढ्यात मधल्या सुट्टीची घंटा वाजली आणि सर वर्गातून गेले. जाताना मात्र मला भेटायला सांगून गेले.
मी घाबरत घाबरतच सरांकडे गेले. सरांनी मला विचारले, मला शिकवलेले समजतं की नाही? तशी मी मान हलविली आणि म्हंटले की मला जरा वेळ लागतो हा विषय समजायला आणि गणित करताना माझा जरा गोंधळ उडतो. तसे ते म्हणाले, गणित मुळी च कठीण विषय नाही पण त्याच्या अभ्यासात सातत्य लागत. न कंटाळता रोज या विषयाची प्रॅक्टिस केली की हे चुटकीसरशी सोडवता येत. आणि त्यांनी मला जे पण माझे प्रश्न असतील ते न घाबरता वर्गात विचारायला सांगितले.
आणि मग वर्गातदेखील ते आवर्जून शिकवलेले समजले की नाही विचारत असे. त्यांच्या त्या प्रोत्साहनाने मी मन लावून घरी देखील गणितात अधिक मेहनत घेऊ लागले आणि हळूहळू सरांमुळे गणिताची भीती मनातून नाहीशी व्हायला लागली आणि त्या विषयाची आवड निर्माण झाली.
मोठी होऊन याच विषयात मी माझे करिअर करीन असे लहानपणी कधी स्वप्नातही विचार केला नसेल. परंतु माझ्या सरांच्या प्रोत्साहनामुळे पुढे जाऊन मी गणित याच विषयात स्नातकोत्तर पदवी घेतली आणि एका चांगल्या कॉलेज मध्ये गणिताची प्रोफेसर म्हणून रुजू झाले. आजही मला माझ्या सरांकडून मिळालेली शिकवण कायम लक्षात आहे. ते आम्हाला नेहमी सांगत,की कधीही कुठल्याही गोष्टीत प्रयत्न केल्या शिवाय हार मानू नये..जिद्दीने आणि चिकाटीने प्रयत्न केल्यास अशक्य असे काहीही नाही. जी मी माझ्या विद्यार्थ्यांना शिकवताना नेहमी सांगते. आणि माझ्या सरांचे उदाहरण देते.
आपल्या सर्व थोर शिक्षकांचे ऋण कधीच फेडता येणे शक्य नाही. त्यांना खरी गुरुदक्षिणा देणे म्हणजे त्यांनी दिलेली शिकवण आपल्या पुढच्या पिढीला बहाल करणे आणि ही ज्ञानज्योत सतत तेवत ठेवणे. ज्याप्रमाणे मातीला जसा आकार द्यावा त्याप्रमाणे त्याचे रूप तयार होते तद्वतच शिक्षक आपल्या विद्यार्थ्यांना जीवनात योग्य दिशा दाखवित त्यांना त्यांचे ध्येय गाठण्यासाठी मदत करतात. त्यामुळेच विद्यार्थ्यांच्या जीवनात शिक्षकांचे स्थान नेहमीच एका ध्रुवताऱ्याप्रमाणे कायम अढळ राहणार.