गुप्त समेवर -भाग १
गुप्त समेवर -भाग १


भाग १ -
माधवगड बंगला, एका उच्चभ्रू सोसायटी मध्ये दिमाखात उभा डॉ. माधव नेनेंचा बंगला.
धड्डाम्...बंगाल्याच्या मागच्या बाजूस आवाज आला. रिया भिंतीवरून उडी मारून बंगाल्याच्या आवारात शिरली. आपण हे करतोय ते योग्य आहे की नाही या गोंधळात भिंतीवरच थांबलेल्या मुग्धाला तिने दबक्या आवाजात ओरडले,
“ मनू, जास्त विचार करू नको. आपल्या मिशन साठी आजसारखी संधि परत मिळणार नाही आपल्याला. कम ऑन डियर, जंप.”
गोंधळ दूर सारून मुग्धाने पण उडी मारली अन दोघी मांजरीच्या पावलाने बंगल्याच्या दारासमोर आल्या. आता यापुढील काम आणखी कठिण होते. त्यांनी आणलेल्या डुप्लीकेट चावीने जर दारच लॉक उघडल नाही तर इतक्या दिवसांची बंगल्यात शिरण्यासाठी केलेली मेहनत पाण्यात जाणार होती.
“मनू, लवकर दे चावी, वॉचमन पानटपरीवरून येईल दोन मिनिटात. त्याआधी आपण आत जायला हव नाही तर आपली खैर नाही.”
“हे घे.” चाव्यांचा जुडगा रियाकडे देत मुग्धा म्हणाली.
“ शट्ट.. तिन्ही चाव्या लागल्या नाही. आता लास्ट ट्राय करते. त्या की मेकऱने काही घोळ तर नाही केला नं?”
“शुभ बोल गं, इतक्या शिताफीने मी त्या चाव्या मिळवल्या आणि डुप्लीकेट पण केल्या. लागेल ही.” इतका वेळ शांत असलेली मुग्धा रियावर वैतागली.
शेवटची चावी दाराच्या लॉक ला लावून रिया मनातल्या मनात पुटपुटली,” खूल जा सिम सिम…” आणि बंगल्याच लॉक उघडल. दोघींनी आनंदाने एकमेकींना मिठी मारली. मुग्धाने रियाला परत एकदा समजाऊन पहिलं,
“ माझ्यासाठी तू नको तुझा जीव धोक्यात घालू, इथून पुढे मी इकटी आत जाते. तू माघारी फिर.”
“अरे यार, कितनी बार बोलू तुझे, ये दोस्ती हम नही तोडेंगे , तोडेंगे दम मगर तेरा साथ ना छोडेंगे!"
रियाच्या या फिल्मी उत्तरावर जरा रीलक्स होत मुग्धाने हसून तिला म्हटले,
“ही तुझी नौटंकी पण ना..., चल आत.” दोघी हसतच बंगल्यात शिरल्या.
हॉल विविध देशी आणि विदेशी दुर्मिळ ऊंची वस्तूंनी सजवलेला असला तरी तिथे मुग्धाला जरा अस्वस्थ वाटलं, विशेषत: तिच्या कपाळावरील व्रण जरा ठणकत आहे अस तिला जाणवलं. घर एखाद्या इतिहास प्रेमिने कलात्मक रित्या सजवलेले असावे, असे लगेच लक्षात येई. हॉलच्या बाजूला एक खोली आणि त्यानंतर किचन होते. पण मुग्धाची नजर जिन्याच्या बाजूला असलेल्या भिंतीवरील चित्रांकडे गेली. नकळत तिची पाऊले तिकडे खेचली गेली. एखाद्या प्राचीन लेण्यांतील कोरलेली भित्तिचित्रे असावी ती. ही चित्रे या आधी पण कुठे तरी पाहिली असावी आस तिला वाटलं, पण नक्की कुठे ते काही आठवेना.
रिया मात्र लहान मुलीसारखी हॉल मधल्या दुर्मिळ वस्तु न्याहाळत होती. अचानक तिने वर टांगलेल झगमगत झुंबर पहिलं अन् स्वत:भोवती गिरकी घेत ती म्हणाली,
“वॉव किती भारी आहे सगळं, जुन्या काळातील एखाद्या महालात आल्यासारख वाटते यार ..” मुग्धाची काहीच रिएक्शन न आल्याने रिया मुग्धाला शोधू लागली तेव्हढ्यात तिला स्वत:च्याच तंद्रित जिन्यावर असलेली मुग्धा दिसली. पळत जाऊन तिने मुग्धाला हलवत म्हटलं,
“अशी झपाटल्या सारखी एकटीच वर का आली?”
थोड भानावर येत मुग्धा बोलली, “ ही पेंटिंग्स किती छान आहेत नं, ते पाहता पाहता कधी वर आले ते कळलच नाही बघ”
“बर चल आता, अजून उशीर नको. तू पटापट त्या बाजूच्या खोल्या पहा आणि मी याबाजूच्या खोल्या पाहते. काही तरी सापडेल आपल्याला आणि इतके दिवस तुला छळणार्या रहस्याचा भेद होईल.” फास्टर्फेणेचा आव आणत रियाने सूचना दिली आणि तडक दोघी दोन दिशेने गेल्या.
पहिल्या खोलीत मुग्धाला एक बेड, ड्रेसिंग टेबल आणि कपाट इतकच सामान दिसलं ते पण वापरात नसलेल, त्यावरून ही गेस्टरूम असावी असा विचार करून मुग्धा ती खोली बंद करून दूसर्या खोलीत गेली. ती एक सुसज्ज अशी स्टडीरूम होती. पुस्तकांनी भरलेले दोन बूकशेल्फ, सागवानि टेबल, त्यावर सुबक टेबल लॅम्प आणि किमती पार्करचे पेन ठेवलेले पेनस्टँड...
“अहाहा!!! याहून सुंदर ठिकाण कोणतेच नाही” वाचन लेखनाची प्रचंड आवड असणारी मुग्धा स्वत:शी पुटपुटली. ती खोली न्याहाळत असताना अचानक तीच लक्ष भिंतीवरील एका फोटोकडे गेल आणि ती जागीच खिळली. तो माणूस तिला आठवेना पण त्याचे डोळे मात्र ती आयुष्यात कधीच विसरू शकत नव्हती. तेव्हाढ्यात तिला रियाची किंकाळी ऐकू आली.
धावतच रिया गेली होती त्या खोलीत मुग्धा आली. समोर बेशुद्ध पडलेली रिया पाहून तिच्या अंगतील सारे त्राण जाऊन ती मटकन् खाली बसली. ती रियाला उठवायला समोर झुकली इतक्यात मागून तिला कुणी तरी पकडले आणि तिच्या नाकापुढे उग्र दर्प असलेला रुमाल धरला. त्या माणसच्या तावडीतून सुटण्यासाठी धडपड करताना मुग्धा मागे वळली आणि पुन्हा गर्भगळीत झाली कारण तिला परत दिसले होते तेच भीतीदायक दोन डोळे, जे कित्येक दिवस तिचा पिच्छा पुरवत होते. त्यासोबत तिच्या नजरेसमोर उभा राहिला तिने रियासोबत केलेला गेल्या सहा महिन्यातील रोलर कोस्टर सारखा थरारक प्रवास!
क्रमशः