Pranjalee Dhere

Abstract

3  

Pranjalee Dhere

Abstract

गुलमोहोर

गुलमोहोर

2 mins
12.2K


घराच्या मागच्या गल्लीत एक गुलमोहोर आहे, इतक्या वर्षांत कधीही लक्ष गेलं नाही. Lockdown मुळे सध्या घरातच असल्यामुळे अचानक लक्ष गेलं. ग्रीलच्या खिडकीतून कैद्यासारखं उभं राहून तो गुलमोहोर बघितला. किती छान बहरला आहे गुलमोहोर. तासनतास त्याच्याकडे नुसतं बघत राहावंसं वाटतं. संपूर्ण लाल, हिरव्याचा लवलेश नाही. खोडाचा एक वेगळा रंग सोडला तर लाल व्यतिरिक्त इतर कुठलाही रंग नाही. कडक, तळपत्या उन्हात तो लालबुंद गुलमोहोर काय दिसतो! अहाहा! दिवसाच्या बदलत्या प्रहराप्रमाणे त्याचा तो लाल रंग बदलतो की काय असा भास होतो. एका संपूर्ण घरावर आपली प्रचंड सावली धरून तो गुलमोहोर उभा आहे. त्या घराच्या गच्चीवर आणि त्या रस्त्यावर संध्याकाळी असा काही सडा पडलेला असतो ना गुलमोहोराचा. मन मोहरून जातं त्याला बघून. संध्याकाळच्या मंद प्रकाशात, सूर्याची मावळती किरणं त्या गुलमोहोरावर पडतात. गूढ, उदासवाणी संध्याकाळ जास्त उदासवाणी होते आणि तो गुलमोहोर पण. 

    

संध्याकाळचा तो गुलमोहोर बघून काय-काय आठवतं. खूप-खूप जुनं, दुखरं, हळवं असं काहीतरी. प्रवासात किंवा कुठे-कुठे असेच ओझरते बघितलेले गुलमोहोर आठवतात. त्या शहरातला, त्या नेहमीच्या रस्त्यावरच्या Bus Stop वर आपली सावली देणारा तो गुलमोहोर आठवला. त्या लाल रंगांच्या फुलांमध्ये किती आठवणी साठवलेल्या आहेत माझ्या. त्या Bus Stop वर उणीपुरी २-३ वेळा थांबली आहे मी. त्या २-३ वेळा माझ्यासाठी कदाचित २-३ क्षणांसाठीच्या झाल्या किंवा २-३ जन्माच्या! घरासमोरचा तो बघून गुलमोहोर माझ्या नकळत त्याची आठवण देऊन गेला. आताच्या या कठीण काळात तो कसा आहे, कुठे आहे काहीही माहित नाही. तो खुशाल असेल ही अपेक्षा आहे. आपण आपल्या सोबत किती आठवणी घेऊन जगत असतो ना! असं काहीतरी बघून त्या आठवणी वर येतात इतकाच काय तो फरक. त्या शहरातल्या त्या गुलमोहोराने माझं लाजणं बघितलं, रुसणं बघितलं, आणि रडणंसुद्धा बघितलं. अशा कितीतरी जणांच्या गोष्टी त्या गुलमोहोराने बघितल्या असतील. कितीदा त्या लोकांवर त्याची ती लाल फुलं पडली असतील. मला वाटतं इतक्या गोष्टी बघून, इतकी दु:खं बघून, कधीकाळी प्रेम बघून तो गुलमोहोर अजून जास्त लाल तर नसेल ना होत? कारण जसा प्रेमाचा रंग लाल तसाच दु:खाचा आणि तसाच रक्ताचादेखील. 

   

रोज त्या गुलामोहोराकडे बघते मी. रोज. दिवसाचे बदलणारे प्रहर त्या गुलमोहोरावर पडतात. छान वाटतं त्याला तसं बघून. असा विचार करून मी माझ्या मनाला समजावते कदाचित. कारण मला माहितीये या गुलमोहोरात मी त्या गुलमोहोराला बघते, आणि मुख्य म्हणजे त्याला. या गुलमोहोराच्या लाल छटांमध्ये मी त्याची सावळी छटा शोधत राहते. त्याच्या त्या लाल फुलांमध्ये आणि त्याच्या फांद्यांमधून झिरपत जाणाऱ्या त्या सूर्यप्रकाशाच्या किरणांमध्ये त्याचं ते हसू शोधत राहते. ती निरागस खळी शोधत राहते तासनतास. ऋतू बदलला की गुलमोहोराचं हे लालपण ओसरेल. तो पुन्हा एकदा हिरवा होईल. फुलांचे हे घोस जाऊन पानं त्याचा ताबा घेतील. पुन्हा एकदा सगळं सुरु होईल, आयुष्य सुरु होईल जोरात. त्याच्या आठवणी पण काळाच्या ओघात पुन्हा मनाच्या तळाशी जाऊन बसतील. कधीतरी गुलमोहोर बघितला की, आठवणी येतील परत. परत. आणि परत.


Rate this content
Log in

Similar marathi story from Abstract