पारितोषिक
पारितोषिक


"मॅडम साहित्य जगतातला हा एवढा मोठा पुरस्कार आज तुम्हाला मिळाला आहे. तमाम मराठी वाचकांना,रसिकांना ह्याचा आनंद आहे. ही कथा तुमचीचं तर नाही ना ?"- पत्रकार.
पत्रकाराचा प्रश्न ऐकून मीराला आश्चर्य वाटलं नाही. मुळात हा असा प्रश्न येईल हे तिला अपेक्षितच होत. आणि तिच्याकडे उत्तरही तयार होतं. जराही न रागवता तिने उत्तर दिलं: "ही कथा माझी आहेही आणि नाहीही. ही कथा तमाम त्या स्त्रियांची आहे ज्यांनी आयुष्याच्या एका वळणावर त्यांच पहिलं प्रेम मिळवलं तर खरं पण ते दैवाने त्यांना उपभोगू नाही दिलं. कधी परिस्थितीने, कधी त्यांनी, कधी समोरच्याने असं काहीतरी केलं की ते एकमेकांपासून दूर झाले. पुढे आपापल्या आयुष्यात गुंतले,रमले. कारण आयुष्य कुणासाठी थांबत नाही ना. कुणासह आणि कुणाशिवाय तुम्हाला जगत राहावं लागतं. हो, एक आहे की त्या व्यक्तीचा नसण्याचा सल मात्र कायम राहतो तुमच्या आयुष्यात. पण काही सल हे शुरांच्या जखमांसारखे असतात. त्रास देणारे पण तितकेच हवेहवेसे.
"मीरा मॅडम, तुमच्या ह्या यशाचं श्रेय कुणाला द्याल?''-पत्रकार .
मीरा मंद हसली आणि म्हणाली की, ''माझ्या ह्या यशाचं श्रेय माझ्या नवऱ्याला देईल. खूप कमी लोकांमध्ये ही ताकद असते की त्यांची काहीही चूक नसताना त्या चुकीची जबाबदारी ते स्वीकारतात. आणि आपल्यावर इतकं प्रेम करतात की, ती चूक-चूक राहातच नाही. त्यांच्या प्रेमान
े आणि मोठ्या मनाने ते आपल्याला त्यांच्यात सामावून घेतात आपल्या स्वतः सकट. Thank You अनय. मी ह्यापेक्षा जास्त काहीही बोलणार नाही. ह्या न बोलण्यातचं खूप काही आहे.
"Ma'am तुमच्या आयुष्यात कधी असं झालं की ते जे हरवलं आहे ते पहिलं प्रेम जीवनाच्या ह्या टप्प्यावर तुमच्या आयुष्यात परत आलं तर तुम्ही त्याचा स्वीकार कराल?"
मीराने एकदा अनयकडे पाहिलं. अनयच्या डोळ्यात मीरासाठी अपार प्रेम होतं, कौतुक होतं, माया होती. तिच्या ह्या यशाचा सगळ्यात जास्त आनंद संपूर्ण सभागृहात त्याच्याच डोळ्यात होता. कदाचित मीरापेक्षा सुद्धा जास्त. "माझ्या आयुष्यात असं कधी झालं तर मी अनयला सोडून नाही जाणार. भलेही ते हरवलेलं प्रेम परत आलं असेल, आठवणींची हजार दार त्याने उघडली असतील तरीही नाही. अनय माझा नवरा आहे, मी भारतीय नारी आहे वगैरेंच्या पलीकडे जाऊन मला असं वाटत की, भलेही त्या "क्ष " व्यक्तीने मला प्रेम करायला शिकवलं असेल, आयुष्यतला पहिला गुलाबी रंग, तो स्पर्श, ती संवेदना जाणीव करून दिली असेल. पण; प्रेम जगायला आणि प्रेम निभवायला मला अनयने शिकवलं आहे. आणि प्रेम करण्यापेक्षा ते जगणं आणि ते निभावणं हे जास्त महत्वाचं आहे असं मला वाटतं."
सभागृहात टाळ्यांचा कडकडाट झाला. साश्रू नयनांनी अनयने तिला आणि तिने अनयला पाहिलं. आज जगातलं सगळ्यात मोठं पारितोषिक तिने मिळवलं होतं. अनयच्या रूपात.