गोधडी
गोधडी
*गोधडी* नमस्कार मित्रांनो, आज खूप दिवसांनी लिखाणाच्या माध्यमातून नवा विषय घेऊन आलो आहे. मधल्या काळात लिखाण करावे असे वाटत नव्हते कारण म्हणजे मुक वाचक, हो म्हणजे लेख वाचतात पण प्रतिक्रिया देत नाही. त्यामुळे आपण लिहितो ते आवडते की नाही याचा पत्ता लागत नाही. मग अशा वेळी लेखणीतून नवं साहित्य कसं बाहेर पडणार! तर वाचक हो मुळात लेखक किंवा कवी हा प्रतिसादाचा भुकेला असतो. त्याने जे काही लिहिले आहे ते तुमच्या पर्यंत पोहचल्या नंतर चांगली किंवा वाईट जशी तुम्हाला वाटेल तशी प्रतिक्रिया येणं आवश्यक असते. आणि प्रतिक्रिया ही प्रेरणा देते. हा लेख वाचला तर कळवा म्हणजे झालं. असो आता आपण आपल्या मुख्य विषयाकडे वळू आजचा विषय आहे गोधडी हो बरोबर वाचले तुम्ही! तुम्ही म्हणाल असे विषय का निवडता तर याला कारण आहे. बदलत जाणारी प्रथा परंपरा लिखाणाच्या माध्यमातून जिवंत रहावी असा आहे. आपण हा लेख आज जरी वाचला नाही तरी सोशल मीडियाच्या माध्यमातून तो खूप काळ टिकून राहिलं आणि नव्या पिढीच्या वाचकांच्या हाती पडेल असा विश्वास मला आहे. आपण लहानपणी म्हणजे सध्या जे म्हातारपणाकडे झुकले आहेत ते विशेषतः ग्रामीण भागातील आहेत असे आवडीने रात्री झोपण्यासाठी वापरायचो ती गोधडी आपल्याला मायेची साद घालते आहे. बाळा हट्ट करून तू जी अंगाशी गुंडाळून निवांत सुखाच्या स्वप्नात झोपायचा तीच गोधडी आज इतिहास जमा होण्याच्या मार्गावर आहे. तुझी आई, आज्जी, मावशी,काकी, ताई या जवळपास असो अथवा नसो मी मात्र तुझ्या भोवती गुंडाळी करून मायेची ऊब दिली आहे. आठवतंय का तुला जेव्हा खूप भुक लागली पण जवळ कुणी नव्हतं तेंव्हा हमसून हमसून रडला आणि माझ्या कुशीत येऊन शांत विसावला नंतर तुला कळलेच नाही की तुला भुक लागली होती. बरोबर ना! काही वेळा तू कुणावर रागावला किंवा कुणी घरातील तुझ्यावर रागवले कि तू रडत रडत माझ्या मांडीवर डोकं ठेवून किंवा गोधडीत डोकं खुपसून म्हणा कितीतरी वेळ बसायचा कुणाशी बोलायचा सुध्दा नाही. इतकी आवडती होते मी. रोज रात्री मला माझी गोधडी पाहिजे म्हणून तुम्ही भावंडे किती धिंगाणा घालायचे. शेवटी ज्याची त्याची गोधडी मिळाली की खूप आनंद आणि नाही मिळाली तर रात्रभर डोळा लागायचा नाही. आठव जरा! आपली ताटातूट व्हावी इतकी का मी वाईट आहे, मला माहित आहे काळ हे सर्व घडवून आणतं आहे. माझी त्यालाही हरकत नाही पण आजकाल माझी तुला लाज वाटायला लागली आहे, हे मात्र मला आवडले नाही. थंडी कितीही असो तुला ऊब दिली. उकाडा कितीही असला तरी गारवा देणारी गोधडीच होती. मित्रहो गोधडी ही अशी वस्तू आहे ती प्रत्येक घरात आवश्यक आहे. आणि गोधडी शिवण्याची कला हर एका गृहिणी कडे आहे. पण आजकाल धावपळीच्या जीवनात बाजारात उपलब्ध असलेल्या चादर, रजई, ब्लॅंकेट, रग , कांबळे इत्यादी अनेक पर्यायी गोष्टी आहेत. त्यामुळे गोधडी नामशेष होण्याच्या मार्गावर आहे. खेडोपाडी उन्हाळ्यात बाय्या बापड्या एकत्र जमून गोधडी शिवण्यासाठी जमत आणि गाणी, गप्पा गोष्टी करत हा आनंद सोहळा चालायचा त्यामुळे वेळ कसा मजेत जायचा. म्हणून तर कधी गावाकडील माणसांना मनोरंजनासाठी कोणत्याही टिव्ही, मोबाईल किंवा अशा चंचल गोष्टींची गरजच पडली नाही. गोधडी शिवण्यासाठी विशिष्ट प्रकारच्या सुया विकत घ्याव्या लागत होत्या. थोड्या जाड, लांब आणि टोकदार कारण गोधडी मध्ये तीन चार कापडाचे थर दिलेले असतात. गोधडी शिवण्यासाठी जाड सफेद गुंडाळी असलेला मोठा दोरा बंडल बाजारातून विकत घेऊन यावा लागे. खेडेगावात डोक्यावर टोपले घेऊन घरोघरी जाऊन हात विक्री करणाऱ्या महिला, पुरुष यांच्या कडून सुया आणि दोरा बंडल मिळत असे. एक जुन पातळ (लुगडे किंवा साडी) समांतर जागेवर अंथरूण बरोबर सहा फूट होईल अशी घडी मारून पुन्हा वरून तेवढाच थर येईल अशी टाकली की पहिली पायरी पुरी झाली. आता आत मध्ये लहान मुलांची फाटके कपडे, मुलं मोठी झाली म्हणून आपरी झालेली, उसवलेली, वापरायचा कंटाळा आलेली, किंवा चांगली दिसत नाही असे वाटणारी घरातील सदस्यांची कपडे, जी एका कापडात गुंडाळून ठेवली होती, ती समांतर थर लावावा अशा पद्धतीने टाकायची. म्हणजे कुठे जाड बारीक होणार नाही याची काळजी घ्यावी लागे. एकंदरीत संपूर्ण कपडे अंथरूण त्यावर अगोदर टाकलेल्या पातळाचा थर पुन्हा वरून सारखा करून घ्यायचा. आता तुम्ही म्हणाल त्यात काय विशेष पण असे नाही हं! अनेकदा गोधडी व्यवस्थित अंथरण्यासाठी हुशार असलेल्या म्हाताऱ्या बाईला बोलावून घ्यावे लागे. आणि तिला मिसरी, तंबाखू, चहा पाणी करून गोडी गुलाबीने हे काम करुन घ्यावे लागे. नाहीतर तुला गोधडी शिवता येत नाही हा शब्द जल्मभर ऐकावं लागेल. (जन्मभर असा सुध्द शब्द मुद्दाम नाही वापरत, जल्मभर असेच गावाकडे लोक बोलतात. ) म्हातारीला दिसायला कमी असेल तर सुयी दोरा ओवून द्यावा लागे मग म्हातारी जोशात गोधडी शिवायची. चार दोन बायका हळुच येऊन बसणार म्हातारी कशी गोधडी शिवते ते बघणार. तिच्या कडून माहिती काढून घेणार, पण म्हातारी सहजासहजी सांगणार नाही बरं का! तिला माहीत असतं सगळ्या गोष्टी यांना शिकवल्या तर माझी गरज उरणार नाही. म्हातारी हळू हळू एक एक धागा गुंफत पहिला गरका पुर्ण करणार आणि मग हळूच धर ग तू दुसरी सुयी आणि कर सुरू शिवायला असं करत बरोबर एक पुढे दुसरी मागे तिसरी अशा ओळीने एक एकीला शिवायला बसवी. एखादी चुकली का तिला शाल जोडी फटकारे मारावे तसे टोमणे मारुन म्हातारी तिला अर्ध मेली करून सोडायची. आता गोधडी शिवणे रंगात आले की हळुच जात्यावरची गाणी सुरु करायची म्हणजे शिवणकाम कंटाळवाणे होवू नये म्हणून! , गाणी सुद्धा थट्टा मस्करी वाटावी अशीच निवडायची म्हणजे हसून हसून पुरेवाट लागायची. " दादला जाई कामाला ग कामाला बाई कामाला, बायको पावडर लाली लावी तोंडाला ग तोंडाला बाई तोंडाला" सई बाई नाव ठेवू कुणाला ग कुणाला बाई कुणाला " अशी काही टोमणे सुद्धा गाण्यात असायचे. मुलं अंगणात खेळत असली तरी यांची गाणी ऐकण्यासाठी जवळ येऊन बसणार. थोडा वेळ गाणी मग उखाणे नवे नवे उखाणे म्हणायचे असा हा सगळा कार्यक्रम म्हणजे एखादी मैफिल भरावी तसाच सोहळा होता. एखादी बाई उठून जाऊ लागली की तिला आग्रह करून थांबवून ठेवायचं तिच्या घरी, माहेरी अशा गप्पा गोष्टी काढून तिला गुंतवून ठेवले जाई. मग एकदा का ती बोलायला लागली की मग सगळ विसरून जायची. तेवढ्यात संपली बरं का गोधडी आता मस्त पैकी चहा टाक! असा दम म्हातारी द्यायची. पुन्हा तिथे आलेल्या बायका उद्या माझ्या कडे ऐ ग मावसे म्हणून आग्रह सुरू. बघेन जमलं तर असं म्हणून म्हातारी फिरकी घेणार. गोधडी शिवण्याची कला नामशेष नाही झाली अजून पण प्रमाण खूप कमी झाले. धावपळीच्या जीवनात आता महिला सुध्दा नोकरी करू लागल्या आहेत मग असा वेळ काढून गोधडी कोण शिकवणार म्हणून बाजारात उपलब्ध रेडीमेड गोष्टी घरात वाढु लागल्या आहेत. त्यामुळे आरोग्यावर परिणाम जाणवू लागले आहे. पण त्याला आता नाईलाजाने स्विकारावे लागणार आहे. गोधडी म्हणजे आपल्याला मायेची ऊब देणारी होती आणि राहील. थांबतो. धन्यवाद 🙏 लेखक कवी पंडित निंबाळकर 🙏 मु पो सांगवी भुसार ता कोपरगाव जि अहिल्यानगर
