गोदाक्का
गोदाक्का


साठीच्या घरातली गोदाक्का नेहमीप्रमाणे गावातील शाळेजवळ जाऊन शाळेत जाणाऱ्या मुली पाहू लागली. शाळा भरली आणि गोदाक्का परतली घराकडे. ती आलेली पाहून तिच्या वहिनीने ताट वाढून दिले तिच्या पुढ्यात. चार घास गिळून गप जाऊन बसली ओसरीवर.
कितीतरी वर्ष झाली गाव असाच बघतोय गोदाक्काला दिवसरात्र अशीच गपगुमान बसलेली. हसणं नाही कि बोलणं नाही. बसल्या जागेवरून उठतही नाही कधी. फक्त दोन वेळा शाळेला चक्कर असते. शाळा भरायच्या वेळी आणि सुटायच्या वेळी. शाळा सुटून सगळ्या मुली घरी गेल्या कि मगच परतते गोदाक्का.एक जरी मुलगी शाळेत असेल शाळा सुटली तरी ...तर अस्वस्थपणे फेऱ्या मारत राहते गेटसमोर. सगळ्या मुली कश्या लक्षात ठेवते देवच जाणे. बरोब्बर लक्ष असते साऱ्या मुलींवर.
पन्नास एक वर्ष झाली असतील ...दहा वर्षाची चुणचुणीत गोदा शाळेत खूप आवडीने जायची. अभ्यासात,खेळात फारच चांगली होती. वेगवेगळ्या स्पर्धेत छान बक्षिसे पटकवायची. शाळेत लाडकी होती सर्वांची.
एक दिवस कसल्याश्या स्पर्धेची माहिती द्यायला मास्तरांनी हिला एकटीलाच थांबवून घेतले. तासाभराने हि घरी परतली ती भकास नजरेने. कोणाशी बोलेना कि कोणाला जवळ येऊ देईना. काहीतरी बिनसले असेल उद्या होईल परत नॉर्मल म्हणून घरचे गप्प बसले. दुसऱ्या दिवशी शाळेची वेळ झाली तरी हि ढिम्म बसून. आई ओरडली "अग, शाळेत नाही का जायचे? पटपट आटप बघू." गोदाचे एक नाही कि दोन नाही. गोदा लक्ष देत नाही असे पाहून आईला संताप आला. रागाने तिला उठवायला गेली तर हिने रडून नुसता गोंधळ घातला. शाळा एव्हडी आवडणारी गोदा असे का करतेय कुणाला समजेचना. खूप प्रयत्न करून पाहिले घरच्यांनी. रागावून,मारून,गोडीगुलाबीने सारे करून झाले पण हि शाळेचे नाव घेईना . काही बाहेरची बाधा तर नसेल म्हणून तेही उपाय करून झाले. शेवटी सर्वानी हात टेकले आणि गोदाक्का अशीच बसून राहू लागली ओसरीवर.
काळ काय कुणासाठी थांबतोय? गोदाचे लग्नाचे वय झाले पण अश्या मुलीशी कोण लग्न करणार? बाकी भावंडाची योग्य वेळी लग्न झाली. बहिणी सासरी गेल्या. भावाची बायको घरी आली.भावाची बायकोही हिचे प्रेमाने करायची. बाकी कसलाच त्रास न्हवता बिचाऱ्या गोदाक्काचा.
भावाला मुलगी झाली. रमा तिचे नाव. रमा तीन वर्षाची झाल्यावर तिला शाळेत घातले. शाळेचा गणवेश घालून रमा पहिल्या दिवशी तयार झाली आणि गोदाक्काचे डोके सणकले. तरातरा उठली आणि रमाला घट्ट धरून ठेवले. शाळेत जाऊच देईना. सगळ्यांनी समजावून पाहिले पण व्यर्थ. शेवटी भावाने जबरदस्तीने गोदाक्का पासून हिसकावून घेतले रमाला आणि शाळेत नेऊन सोडले. गोदाक्का पाठोपाठ गेलीच शाळेत आणि शाळा सुटेपर्यंत बसून राहिली गेटपाशी.
तो मग दिनक्रमच बनला गोदाक्काचा. यथावकाश रमा मोठी होऊन लग्न होऊन सासरीही गेली पण गोदाक्काचा शाळेचा फेरा काही थांबला नाही आणि परत दुसऱ्या कुणा मुलीवर गोदाक्काने आपल्यासारखी वेळ येऊ दिली नाही.