Pandit Warade

Tragedy

4.0  

Pandit Warade

Tragedy

गणपत चिलीम खाँ

गणपत चिलीम खाँ

5 mins
321


    'एकच झुरका दूर करतो सुखाचा बुरखा' त्याची अनुभूती गणपत सहित तळणी गावातील प्रत्येक व्यक्तीला आली होती. गणपत एक सर्वसाधारण माणूस, सर्वांसारखेच त्याचेही जीवन सुरळीतपणे सुरू होते. लग्न झाले, दोन लेकरंही झाली होती. चार पाच एकर शेती होती. कुटुंबास पूरेसा माल व्हायचा. त्यांची उपजीविका व्यवस्थित चालायची. मात्र कुठलेही व्यसन नसलेल्या गणपतच्या जीवनात अचानक बदल झाला. त्याच्या नावापुढे चिलीमखां ही उपाधी कशी आणि कधी लागली हे त्यालाही कळले नाही.


     एके दिवशी तो शेतात काम करत असतांना एक वाटसरू रस्त्याने पायीच चालत असलेला गणपतला दिसला. ऊन उतरण्याची वेळ झालेली. औत सोडून गणपत बैलांना चारापाणी करून घरीच निघणार होता. त्याने त्या प्रवाशाला हाक मारली. प्यायला पाणी दिले थोडी चौकशी केली. तोवर प्रवाशाने आपल्या बंडीच्या खिशातून चिलीम काढली. तंबाखू मळली, अन् चिलीम भरली. चकमकीने कापसाचा बोळा पेटवला आणि चिलमीच्या तोंडावर ठेवला. मस्तपैकी एक लांब झुरका ओढून चिलीम गणपत कडे लांबवली. गणपतने नम्रपणे नकार दिला. पण पाहुणा भलताच बेरकी, म्हणाला,..


   "घ्या हो. बरं असतं, शीणभाग निघतो बघा कामाचा. विरंगुळा म्हणून कधीमधी घ्यायला काय हरकत?"


    "आसं? पर म्या अजून कधीच हात लावला नाही त्येला." गणपत.


    "काय व्हत नाही. घ्या! हाना एक झुरका." पुन्हा एक झुरका मारून चिलीम गणपतच्या हातात दिलीच. 


     पाहुण्याच्या आग्रहास्तव गणपतने चिलीमीचा एक जोरदार झुरका मारला. त्याची भणक पार मेंदू पर्यंत पोहोचली होती. त्याला मस्त हलकं हलकं वाटायला लागलं. त्याने पाहुण्याकडून एक चिलीम आणि त्यात भरण्यासाठीची तंबाखू त्या पाहुण्या कडून ठेऊन घेतली. पाहुण्याने तंबाखू म्हणून गांजाची पुडी त्याच्या हातात टेकवली. गप्पांच्या ओघात त्या पाहुण्याने स्वतःची सर्व कर्मकहाणी ऐकवली. 'आई वडिलांनी हाकलून दिले. बायको सोडून गेली. आता गावो गाव देवाचं नाव घेत घेत फिरतो. मिळेल ते खातो, जमेल तिथे अन् जमेल तसे राहतो.' डोळ्यात पाणी आणून त्यानं सांगितलं. पुम्हा एकदा पाणी पिऊन तो प्रवासी निघून गेला. 


    गणपतने औत सोडले. बैलांना पाणी पाजून दावणीला बांधले. त्यांच्यापुढे चारा टाकून तो घरी जायला निघाला. जातांना त्या पाहुण्याची कर्मकहाणी मात्र डोक्यातून जात नव्हती. फारच हळहळ वाटत होती. घरी आल्यावर त्याने हातपाय धुतले अन् ओसरीत येऊन बसला. पत्नीने प्यायला पाणी दिले, ते घेतले. पत्नीला बघितल्यावर त्याला अचानक त्या पाहुण्याची आठवण झाली. आणि गणपत मोठ्याने गळा काढून रडायला लागला. आई, वडील, पत्नी, मुले घाबरली. शेजारी पाजारी धावत आले. गणपत काही केल्या काय झाले ते सांगेना आणि रडायचाही थांबेना. वडील म्हातारे झालेले होते. गावकऱ्यांनी त्याचा रडायचा आवाज ऐकला, सगळे तिकडेच धावले. त्यांना वाटले नक्कीच म्हातारा गचकला. येऊन पाहतात तो म्हातारा गणपतच्या तोंडावरचा, डोक्यावरचा घाम पुसताहेत. एका जाणकाराच्या सारा प्रकार लक्षात आला. तो म्हणाला,...


     "घाबरू नका. काही झालेलं नाही. त्याने गांजा ओढलाय बहुतेक. नशा उतरली की त्याला खूप भूक लागेल. मग जेवायला द्या." असे म्हणून तो आणि त्याच्या बरोबर आलेले सारेजण निघून गेले. गणपत मात्र हसायला लागला की खूप हसत रहायचा, रडायला लागला की खूप रडत राहायचा. असा बराच वेळ पर्यंत त्याचा धिंगाणा सुरू होता. जेवायला बसलो तर कधी एकदीड भाकरीच्या वर न जेवणारा गणपत तीन भाकरी खाऊन सुद्धा, 'पोट भरलेच नाही' म्हणत होता. बऱ्याच उशिरा नशेचा अमल कमी झाल्यावर तो झोपला.


    कधी मधी म्हणता म्हणता गणपत आता रोजच चिलीम ओढू लागला होता. हळूहळू त्याचे व्यसन वाढू लागले. गांजा विकत मिळवण्या साठी घरातले धान्य, शेतातला भाजीपाला परस्पर तो विकायला लागला. स्वतःची नशा भागवायला लागला. त्यातून अनेक गमती जमतीचे प्रसंगही त्याच्या जीवनात घडू लागले. 


    असेच एकदा गणपत सासुरवाडीला गेला. आंब्याचे दिवस होते. सासुरवाडीहून खास आमंत्रण आलेले होते. आमरसाचा बेत होता. स्वयंपाक होईपर्यंत गणपतीला चिलीम ओढायची हुक्की आली. चिलीम काढणार तेवढ्यात त्याला एका पाहुण्याने बोलावले. गणपत गेला, तिथे अगोदरच दोन पाहुणे आलेले होते. त्यांच्यापुढे बाटली आणि ग्लास मांडलेलेच होते. अजून एक ग्लास वाढवला. सर्वांनी मिळून ती बाटली रिकामी केली, दुसरी सुद्धा रिकामी झाली. जेवण तयार असल्याची वर्दी मिळताच ते सर्वजण उठले. गणपत सासऱ्याच्या घरी गेला. तिथे स्वयंपाकाला वेळ होता. म्हणून गणपतने एकांतात जाऊन चिलीम पेटवली आणि आपली गांजाची तल्लफ भागवली. दारू आणि गांजा दोन्हीही पोटात गेलेले असल्यामुळे कॉकटेल झाले. गणपतच्या डोक्यात भोवऱ्या सारखं फिरायला लागलं. समोरची वस्तू एक असेल तर चार दिसू लागली. तशात ते जेवायला बसले. ताटात आमरस, भजे, कुरडया, पापड हे सारेच वाढलेले. गणपतला मात्र त्याच्या समोर चारचार ताटं वाढून ठेवलेले दिसू लागले. 'कुठल्या ताटातलं खावं?' त्याला हा प्रश्न पडला. उगाच फजिती नको म्हणून तो ठरवून ताटात हात घालायचा पण कधी ताटात तर कधी जमिनी वरच हात जायचा. तोंडात घास घालतांनाही त्याची तीच गत व्हायची चार तोंडापैकी कोणत्या तर एका तोंडात घालावा म्हणून उचलला घास कधी उजव्या खांद्यावरून तर कधी डाव्या बाजूने पाठीवर जायचा. चुकूनहुकून एखादा घास खऱ्याखुऱ्या तोंडात जायचा. सारेच अंग भरले. त्याला नीट जेवता येईना. तो जागीच लवंडला. सासऱ्याने हळूच त्याला बाजूला ओढून घेतले. कुणीतरी त्याच्या अंगावर पाणी ओतले. पण नशा काही उतरेना. त्याला तसाच ठेऊन इतरांनी जेवण केले. नशा उतरल्यावर जेवायला लागेल म्हणून स्वयंपाक जवळच ठेवला आणि सर्वजण झोपले. रात्री उशिरा कधी तरी त्याची नशा उतरली पोटात कावळे ओरडायला लागले. ग्लानीमुळे उठता येईना. सर्वांगावर रसाचे घास पडलेले, पाणी टाकल्या मुळे ओले झालेले कपडे, तसाच खाली सारवलेल्या जमिनीवर लोळल्यामुळे सर्वांग शेणाने भरलेले. त्याला स्वतःची लाज वाटू लागली. बाजूच्या दुरडीत असलेली चपाती घेतली, भज्यांसोबत खाल्ली तेव्हांकुठे जरा बरे वाटले. पण आता तिथे थांबायची लाज वाटू लागली. तो उठला. पायीच परतीच्या रस्त्याला लागला. बाहेर चंद्राचा प्रकाश होता म्हणून रस्ता चांगला दिसत होता. त्याला आता घराशिवाय काहीही दिसत नव्हते, कशाची भीतीही वाटत नव्हती. गणपत भल्या पहाटेच शेतातल्या खळ्यावर जाऊन झोपला. आवाजाने बाप उठला, त्याचा अवतार बघून काय समजायचे ते समजून गेला. त्याच्या सासऱ्याला फोन करून गणपत तळणीला परत आल्याचे सांगितले. त्यांचाही जीव भांड्यात पडला. इकडे सासरवाडीच्या चार लोकांना भूत दिसल्या मुळे अंगात ताप भरला होता. 'ते भूत नव्हते' हे सासऱ्याला समजले होते पण सांगता येत नव्हते. 'ते भूत नसून तो माझा जावई होता' हे कसे सांगणार?


     गणपतचे हे वागणे, सासुरवाडीला घडलेला तो सारा प्रकार आई वडिलांच्या फारच जिव्हारी लागले. त्या दोघांची प्रकृती खालावत गेली. लवकरच त्यांनी देवाघरची वाट धरली. गणपतला मग आणखीच रान मोकळे झाले. तो व्यसनाच्या खूपच आहारी गेला. शेतात काम होईना. पीकसुद्धा येईना. विकत राहिल्यांमुळे हळूहळू शेताचे क्षेत्रही कमी कमी होत गेले. खायची मारामार होऊ लागली. पत्नी दोन लहान लेकरांचं आणि स्वतःच पोट भरण्या साठी रोज मजुरी करू लागली. गणपतकडे ती काय लक्ष देणार? पैसे कमी पडले की तिला मारहाणही होऊ लागली. तिला आता हे सारे सोसवेना. एक दिवस तिने त्या दोन्हीही मुलांना स्वतःच्या हाताने अन्नातून विष दिले. आणि तिनेही विष घेऊन जीवन यात्रा संपवली. त्याच्या साऱ्या बरगड्या मोजता येतील अशा दिसू लागल्या. खंगत गेलेला गणपत एक दिवस नशा करून जो झोपला तो उठलाच नाही. अशा तऱ्हेने एका सुखी संसाराचा 'एका झुरक्या'मुळे दुःखद अंत झाला.


Rate this content
Log in

Similar marathi story from Tragedy