गडचिरोली-पहिली भेट
गडचिरोली-पहिली भेट
मी महाराष्ट्र पोलीस दलामध्ये अधिकारी असून सी.आय.डी. या विभागात कार्यरत आहे. मी मूळचा पुणे शहरातील असून पुणे व मुंबई या शहरी भागात आजपर्यंत ड्युटी बजावलेली आहे. माझे घर, कुटुंब, नातेवाईक, शिक्षण, मित्रपरिवार सर्वच पुण्यात आहे.
आमच्या विभागातर्फे प्रत्येक जिल्ह्यात काही अधिकाऱ्यांची नेमणूक होत असते. माझी नेमणूक सध्या विदर्भातील भंडारा या जिल्ह्यात असून ग्रामीण भागात नोकरी करण्याचा हा माझा पहिलाच अनुभव आहे. मी आजपर्यंत शहरात वास्तव्य केल्यामुळे मला सुरवातीला ग्रामीण भागात नोकरी करण्यास थोडे जड गेले पण आता इथे राहण्याची सवय झाली, infact पोटासाठी सवय करून घ्यावी लागली.
गडचिरोली या जिल्ह्यातील नेमणूकीस असलेले अधिकारी होळीच्या सणानिमित्त चार दिवस सुट्टी टाकून त्यांच्या गावी गेले होते त्यामुळे गडचिरोली या जिल्ह्याचा अतिरिक्त चार्ज चार दिवसांकरीता माझ्याकडे होता. काही इमरजेन्सी आली तर मला तिकडे जावे लागणार होते.
दोन दिवस काही मी जाण्यासारखे विशेष काही घडले नाही परंतू तिसऱ्या दिवशी नेमक्या धुलीवंदनच्या दिवशी सकाळी नऊ वाजताच माझा फोन वाजला आणि तिकडून आवाज आला...
'जयहिंद सर, मी गडचिरोली वरून पोलीस हवालदार उइनवार बोलतोय, गडचिरोली ला सी-६० या पोलीस तुकडीने पाच नक्षलवादयांना आज सकाळी ठार मारले असून त्यांचे मृतदेह व जप्त केलेले शस्त्रास्त्रे तपासणी संदर्भात पुढील कार्यवाहीसाठी तुम्हाला इकडील चार्ज असल्याने वरिष्ठांनी बोलावले आहे.'
मी माहिती ऐकून घेतली व आवरून थोड्या वेळात निघतो असे सांगून फोन ठेवला.
असे अचानक सुट्टीच्या दिवशी बोलावणे आल्यामुळे माझी तारांबळ उडाली. कारण आज सुट्टी असल्यामुळे मी अजून अंथरूनातच होतो. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर धुलीवंदन सणानिमित्त गर्दी होणार यामुळे सरकारी यंत्रणांकडून आज सर्व ठिकाणी निर्बंध होते. त्यामुळे कर्फ्युसमान सर्वच बंद होते. मला आज बाहेर काही जेवायला मिळणार नाही याची कल्पना होती आणि आता अचानक जेवण बनवायला मला वेळीही नव्हता, पण त्याची चिंता मला नव्हती कारण आमच्या ऑफिसचे सहकारी पोलीस हवालदार साकुरे गुरुजी यांनी मला कालच धुलवड म्हणून त्यांच्या घरी नॉनव्हेज जेवणाचे निमंत्रण दिलेले होते. तसे हे गुरुजी म्हणजे शाळेचे गुरुजी नव्हे, आमच्या सर्वात ते वयाने जास्त असल्याने त्यांना आदराने आम्ही सर्वच सहकारी गुरुजी असे संबोधतो.
गडचिरोली आणि हा सर्वच भाग माझ्यासाठी नवीन असल्यामुळे मी सर्वात आधी साकुरे गुरुजींना तिकडे जाण्याच्या रस्त्याबाबत, वेळेबाबत व इतर माहिती घेण्यासाठी फोन केला त्यांनी सदर माहिती तर संगीतलीच परंतु 'तुम्ही आवरून तिकडे निघण्यापूर्वी प्रथम घरी येऊन जेवण करा आणि मग रवाना व्हा' असा सल्ला दिला. खरंतर मला गडचिरोलीला जाण्यासाठी उशीर करून चालणार नव्हता परंतु बाहेर सर्व दुकाने, हॉटेल्स बंद असल्याने आणि काल त्यांना जेवायला येतो असा शब्द दिल्याने 'मी आवरून येतो' असे सांगून फोन ठेवला आणि आवरायला सुरुवात केली. त्यांनीदेखील माझी ही गडबड पाहून त्यांच्या मंडळींना लवकर स्वयंपाक करायला सांगितले. त्या माऊलींनेदेखिल 'हो' असे म्हणत चपळाईने जेवणाची तयारी चालू केली.
इकडे माझं आवरून झालं आणि मी ऑफिसकडे वरिष्ठांना माहिती देण्यासाठी आणि वाहन, ड्रायव्हर अरेंज करण्यासाठी निघालो. दहा मिनिटात सर्व पूर्तता करून ड्रायव्हरला अर्ध्या तासात जेवण करून यायला सांगून मी साकुरे गुरुजींच्या घरी जायला निघणार तेवढ्यात त्यांचाच फोन आला की...
'सर, जेवण तयार आहे, परस्पर निघून न जाता खाऊन जावा.'
मी पाच मिनिटांतच त्यांच्या घरी पोहचलो. आमचे ऑफिस, माझं घर, गुरुजींच घर असे सर्व एकमेकांपासून एक-दोन किलोमीटरच्या अंतरावर असल्यामुळे प्रवासाला वेळ लागत नाही. त्यांच्या घरी जाताच आम्ही एकमेकांना रंग लावून सणाच्या शुभेच्छा दिल्या आणि दोघेही जेवायला बसलो. जेवण घाईत केले होते पण फार छान झाले होते. त्यांच्या घरी नॉनव्हेज इतर कोणी खात नसे त्यामुळे 'आपण दोघेच आहोत संपवायला' असे त्यांनी सांगितले. मी झटपट खाऊन जाण्यासाठी उठताच ते हसत म्हणाले, 'रात्रीदेखील इकडेच जेवायला या, अजून आपल्याला सर्व संपवायचं आहे'
मी मान डोलवत 'बघू, आता काय होतंय आज!' असे म्हणून घराबाहेर पडलो. माझ्या डोक्यात एका बाजूला पुढील दिवस दिसत होता.
मी ऑफिसला पोहचलो तोपर्यंत ड्रायव्हरसुद्धा नुकताच जेवण करून आला. आम्ही आता पुढच्या प्रवासाला निघालो. सकाळपासून झालेल्या धावपळीमुळे गाडीत बसताच पाच मिनिटं डोळे बंद करून शांत बसलो. पण इतक्यात शांतता लाभते कुठे? माझ्या डोक्यात आता पुढचे सर्व विचार येऊ लागले. आमची गाडी आता मेन रोडला लागली.
मी पोलीस होण्याअगोदर पासूनच गडचिरोलीमधील नक्षलवादी व पोलीस यांच्यामधील चकमकीच्या गोष्टी ऐकत आलो होतो. माझ्या काही पोलीस मित्रांच्या यापूर्वी पोस्टिंग इकडे झाल्यामुळे त्यांच्याकडून बरेच किस्से ऐकले होते. मागच्याच आठवड्यात नक्षलवाद्यांनी एका पोलीस गाडीला स्फोट घडवला आणि त्यात काही पोलीस मारले गेले होते तर बरेचजण पोलीस जखमी झाले होते अशी बातमी टिव्ही न्यूजवर पाहिली होती. दुसरी अजून एक बातमी दोन दिवसांपूर्वी पहिली होती की, सलग दोन दिवस धमकीचे बॅनर नक्षलवाद्यांनी भर रस्त्यात लावलेले होते. अश्या नुकत्याच घडलेल्या ताज्या बातम्या आठवून आज पुढ्यात काय वाढून ठेवले असेल याचा विचार करू लागलो.
गाडी मेन रोड वरून जात असताना बाहेर डोकावले तर संपूर्ण रस्ता निर्मनुष्य होता. रस्त्यावर एकही वाहन किंवा माणसे दिसत नव्हती, सर्व दुकाने, हॉटेल्स, टपऱ्या बंद होत्या. ऊन हळू हळू डोक्यावर चढत होते. ऐन मध्यान्हवेळी मी प्रवास करत आहे आणि त्यातच नेमके अश्या नक्षलवादी एरियामध्ये कर्फ्युसमान परिस्थितीत जात आहे या सर्व गोष्टींमुळे माझ्या मनात एक प्रकारची बैचेनी सुरू झाली. नकारात्मक विचार डोक्यात येऊ लागले.
मी गुगल मॅप वर लोकेशन टाकून किती वेळ लागेल याचा अंदाज घेतला, अडीच-तीन तास तरी लागतील याची खात्री झाली. एरवी मी प्रवासात मोबाईल उचकटत असतो किंवा गप्पा मारत असतो. पण आज गप्पा मारायला कोणी नव्हते आणि मनातील बैचेनीमुळे मोबाईल मध्ये लक्षदेखिल लागत नव्हते. पुण्याला घरी फोन करून मी गडचिरोलीला जात आहे अशी माहिती दिली. फोन झाल्यावर आजूबाजूला पाहू लागलो, बराच वेळ झाल्यानंतर आमच्या गाडीने भंडारा जिल्ह्याची हद्द ओलांडून गडचिरोली जिल्ह्याच्या हद्दीत प्रवेश केला.
सुरवातीला थोडी वस्ती, मार्केट असे ठिकाण आले परंतु हेही सर्व बंद स्थितीत निर्मनुष्य होते. गाडी तेथून थोडी पुढे गेल्यावर जंगली भाग सुरू झाला. रस्त्याच्या दुतर्फा जंगलसदृश झाडे होती आणि मधोमध रास्ता जात होता. तेच एका ठिकाणी 'वन्यजीवांपासून सावधान' असा फलक वाचला, त्या फलकावर वाघाचे चित्र होते. मी ते पाहून गाडीतूनच आजूबाजूला खोलवर डोकावून पाहिले. अश्या ठिकाणी प्रवास करण्याची तशी माझी पहिलीच वेळ आणि सर्व रस्ता सामसूम असल्यामुळे माझ्या मनात काहीशी भीती निर्माण झाली. पोलीस असलो म्हणून काय झाले मीही एक मनुष्यच आहे.
असाच काही वेळ गेल्यावर जंगली भाग संपून आमची गाडी जिल्ह्याच्या मुख्य भागात आली, तसा मी जरा रिलॅक्स फील केले. सर्व बंद असल्यामुळे इकडेही भयाण शांतताच होती. दहाच मिनिटात आम्ही गडचिरोली पोलीस मुख्यालयात प्रवेश केला.
पोलीस कंट्रोलमध्ये मी आल्याची नोंद केली आणि पुढील कामकाज करण्यासाठी आमच्या ऑफिसमध्ये पोहोचलो. एव्हाना नक्षलवाद्यांचे शव व जप्त केलेले साहित्य हेलिकॉप्टर मधून आलेले होते. त्यांच्या शवांना शासकीय रुग्णालयात नेण्यात आले व जप्तीचे साहित्य गडचिरोली पोलिसांच्या सी-६० तुकडीच्या कार्यालयात नेण्यात आले. माझे काम त्याच ऑफिसमध्येच असल्याने मीही तिकडे गेलो.
सी-६० कार्यालयात येताच समोर दिसले की, गेटवर एन्ट्रीच्या ठिकाणी काहीजण रांगोळी काढत होते, मी पोहचलो तेव्हा त्यात रांगोळीने Wel Come असे अक्षरे लिहीत होते. आतमध्ये लाल रंगाचे कारपेट अंथरले होते. एक बाजूला पोलीस बँड बसलेला होता, त्यातील काहीजण बारीक आवाजात धून वाजवून प्रॅक्टिस करत होते. सी-६० ही पोलिसांची तुकडी फक्त गडचिरोली या पोलीस दलात आहे. नक्षलवादी कारवायांना रोखण्यासाठी, त्यांना प्रत्युत्तर देण्यासाठी ही तुकडी कार्यरत असते. नक्षलवादी मोहिमांची, नक्षलवादी आढळल्याची गोपनीय खबर मिळताच ही तुकडी प्रत्यक्ष जंगलात जाऊन नक्षलवाद्यांशी भिडते. स्वतःचा जीव धोक्यात घालून सामान्य नागरिकांचे, आपल्या महाराष्ट्र राज्याचे व पर्यायाने आपल्या देशाचे रक्षण करते. तर अश्या या तुकडीबद्दल आजपर्यंत फक्त ऐकून होतो आज प्रत्यक्ष पाहून माझी छाती फुगून आली. महाराष्ट्र पोलिसांचे ब्रीदवाक्य "सद्रक्षणाय खलनिग्रहणाय" हे मनात तरळून गेले.
मी आत जाऊन येथील अधिकाऱ्यांची भेट घेतली, त्यांनी सांगितले की, 'सर्व सोपस्कार होण्यासाठी दोन तास लागतील, तोपर्यंत तुम्हाला थांबावे लागेल.' मला हे सर्व काम आटपून पुन्हा भंडारा ला निघायचे होते. परतीच्या प्रवासाला आता रात्र होणार हे गृहीत धरून मी पुन्हा ऑफिसमध्ये आलो. दुसरीकडे शासकीय रुग्णालयात नक्षलवाद्यांच्या शवांचे एक्स-रे काढून झाले होते व त्यांना पंचनामा व पोस्ट मॉटर्म करण्यासाठी शवविच्छेदन विभागात आणले गेले. मी त्या ठिकाणी गेलो व पंचनामा चालू झाला. तीन पुरुष व दोन महिला असे एकूण पाच नक्षलवादयांचे शव त्या ठिकाणी होते. प्रथम पुरुषांचे पंचनामे झाले व त्यानंतर महिलांचे. त्यावेळी पोलीस, डॉक्टर, साक्षीदार, महिला साक्षीदार असे आम्ही सर्व होतो. हे सर्व करता करता उशीर झाल्याने डॉक्टरांनी पोस्ट मॉटर्म सकाळी करणार असे सांगितले. त्याप्रमाणे पाचही शवांना शवागरात ठेवून मी सी-६० ऑफिसकडे निघालो.
मी सी-६० ऑफिसकडे जातानाच सदर कामगिरी पार पाडलेले सर्व पोलीसांची वाहने माझ्या समोर आलेली दिसली. मी गाडीतून खाली उतरलो आणि ऑफिसच्या एन्ट्री गेटवर जाऊन थांबलो. हे सर्व जवान एकेक त्यांच्या स्पेशल प्रोटेक्शन असलेल्या वाहनांमधून खाली उतरून ऑफिसमध्ये येण्यास निघाले तसा अचानक जोरात पोलीस बँड वाजू लागला आणि सर्व वातावरणात एकदम स्फूर्ती भरली. ऑफिसच्या एन्ट्रीला सर्वांचे अभिनंदन व स्वागत करण्यासाठी वरिष्ठ पोलीस अधिकारी आणि इतर पोलीस सहकारी यांची गर्दी झाली होती. मीही त्यांच्यामध्ये जाऊन जवानांचे स्वागत करण्यास थांबलो. सर्वांचे स्वागत त्यांच्यावर पुष्पवृष्टी करून, त्यांना गुलाबाचे फुल देऊन केले. सर्व जवान त्यांची जंगलात झालेली पायपीट, नक्षलवाद्यांसोबत झालेली चकमक, अंगावर शस्त्रांचे ओझे, अपुरी झोप व जीवावर उदार होऊन देशाच्या रक्षणासाठी लावलेली जीवाची बाजी या सर्व थकव्यातून ते स्वागत समारंभ पाहून गहिवरले आणि उत्साही झाले. त्यांनीदेखिल मोठमोठयाने आवाज करून प्रतिसद दिला. नक्षीदार रांगोळी ओलांडून सर्वजण ऑफीसच्या प्रिमाईसेसमध्ये जमले. हे सर्व पाहून माझी सकाळपासून झालेली दमछाक पूर्णपणे विरून गेली आणि आज हे पाहण्यासाठी मी इकडे उपस्थित आहे याचा आनंदच झाला. महाराष्ट्र पोलिसांविषयी अभिमान अजून बळावला. मीदेखील या सर्वाचा एक भाग आहे यामुळे माझा मलाच अभिमान वाटला.
आतमध्ये सर्व जमल्यावर वरिष्ठ अधिकाऱ्यांनी कारवाईतील सहभागी सर्व पोलिसांचे कौतुक केले, सर्वांना शाबासकी दिली. जे जे सहभागी होते त्यांना प्रशस्तीपत्रक देऊन रोख बक्षीसदेखील जाहीर केले. समारोप करताना सर्वांना धुलीवंदनाच्या शुभेच्छा दिल्या. हे सर्व झाल्यावर तिथे डिजे लावण्यात आला व डिजेच्या तालावर सर्वांनी रंग उधळून जल्लोष केला. अर्धा तासभर नाचून झाल्यावर सर्वजण आधीपासूनच थकल्याने आपापल्या घरी जाण्यासाठी विजयी रुबाबात निघाले.
हे सर्व चालू असताना एकबाजूला मीही माझे काम उरकले, डॉक्युमेंट तयार करून ते संबंधित अधिकाऱ्यांना सुपूर्द केले. तेथील स्टाफला काही सूचना देऊन पोलीस कंट्रोलला माझे काम पूर्ण करून रवाना होत असल्याची नोंद केली. जवळच उभा असलेल्या ड्रायव्हरला 'चला आता आपल्या घरी' अशी खुण करून भंडारा येथे परतण्यासाठी निघालो. येताना मनावर जे दडपण होते ते आता नाहीसे झाले होते. माझ्यात एक पॉजिटीव्ह ऊर्जा निर्माण झाली होती. दिवसभराच्या गडबडीतून गाडीमध्ये शांत बसल्यावर आज घडलेल्या सर्व घडामोडी एकदा डोळ्यासमोरून सरकल्या. आजूबाजूला अंधार झालेला होता पण आता माझे त्याकडे लक्ष नव्हते, येताना ज्या जंगली भागातून आलो होतो जाताना ते केव्हा येऊन गेले समजलेच नाही. गाणे गुणगुणत आता मी थंड वाऱ्याचे झोके चेहऱ्यावर घेत प्रवास एन्जॉय करू लागलो.
९.३० वाजता भंडारा मध्ये आमच्या ऑफिसला गाडी थांबली तेव्हा भानावर आलो. गाडीतून खाली उतरतानाच साकुरे गुरुजींचा फोन आला आणि माझी विचारपूस करू लागले. मी आल्याचे त्यांना सांगताच त्यांनी घरी जेवायला यायला सांगितले. एव्हाना मी धुंदीत असल्यामुळे मला जेवणाचा विसरच पडला होता. मी त्यांना 'डबा भरून ठेवा, घरी जाऊन अंघोळ करून जेवण करेल' असे त्यांना सांगून पुढे त्याप्रमाणे केले.
आजचा माझा दिवस अनपेक्षित घटनांनी, संमिश्र अनुभवांनी, विविध भावनांनी भरभरून गेला, पण दिवसाच्या शेवटी झोपताना आज एक प्रकारचे समाधान माझ्या डोळ्यात होते.
"I am Proud to be Maharashtra Police"
"जयहिंद - जय महाराष्ट्र"
