Prashant Bhawsar

Tragedy Others

3.7  

Prashant Bhawsar

Tragedy Others

गैरसमज

गैरसमज

5 mins
261


     रोजच्यासारखी आम्हाला पोटात घेऊन मुंबईहून पुण्याकडे ट्रेन निघाली. आज माझे सतत फोन कॉल्स चालू होते आता ट्रेन मध्ये बसलो तरीही त्यात व्यत्यय आलेला नव्हता, बाहेर पाऊस देखील पडत होता आणि चालू ट्रेन मधून कॉल्स ड्रॉप होणार हे माहीत होते. म्हणून मी जरा चिंतेत होतो.

         मी मूळचा पुण्याचा पण नोकरीनिमित्त मुंबईमध्ये बदली झाल्याने रोज ट्रेन ने पुणे-मुंबई असे अप-डाऊन करीत असे. माझ्यासारखे एकाच ऑफिसचे आम्ही दहा-बारा जण रोज प्रवास करत असू. मात्र आम्हा पाच मित्रांचा एक ग्रुप एकत्र बसून प्रवास करत असे. रोज अप-डाऊन मध्ये आमचे सात-आठ तास ट्रेनमध्येच जात असे. त्यामुळे कामाव्यतिरिक्त इतर काही एक्टिव्हिटी करायला जमत नव्हते. पावसाळ्याचे दिवस चालू होते त्यामुळे रेल्वे ट्रॅकवर बहुतेक वेळा पाणी साचून ट्रेन लेट होते म्हणून आज आम्ही लवकर काम आटपून वरिष्ठ सरांची परवानगी घेऊन तासभर अगोदरच्या ट्रेनमधून पुण्याला यायला निघालो होतो.

         माझ्या पुण्याच्या ऑफिस मधील गणेश नावाच्या मित्राने आमच्या कामकाजात मदत होईल असे एक नवीन सॉफ्टवेअर तयार केले होते. गणेश हा सॉफ्टवेअर हाताळणी मध्ये खूप हुशार होता. आमच्या ऑफिसमध्ये कोणालाही कसलीही तांत्रिक अडचण आली की तो पुढाकाराने ती दुरुस्त करून देई. आमचे लॅपटॉप, मोबाईल वगैरेच्या अडचणी तो लगेच सोडवत असे त्यामुळे आम्ही त्याला हक्काने आमच्या बिघडलेल्या वस्तू दुरूस्तीसाठी सोपवत असू व तोदेखील आम्हाला दरवेळी आनंदाने मदत करत असे.

         गणेशने जे नवीन कॉम्प्युटर सॉफ्टवेअर बनवले होते त्यामध्ये डाटा डिजीटाईज्ड करण्यासाठी १५ लोकांची आवश्यकता होती आणि पुणे व मुंबई या ऑफिसमधील स्टाफ मधून ती पूर्ण करण्यात येणार आहे अशी आतल्या गोठातली खबर आम्हाला लागली होती. मुंबईच्या ऑफिसमधून निम्मे लोक तरी घेतील असा अंदाज आम्ही सर्वांनी बांधला होता. डाटा डिजीटाईज्डचे कामकाज पुण्याच्या मुख्य ऑफिसमध्ये चालणार होते. आपले जर नाव त्या यादीमध्ये लागले तर रोजचा हा प्रवास सुटणार होता व अधिक वेळ घरी आणि स्वतःसाठी देता येणार होता. सदरचे काम करण्यासाठी पुण्याच्याच ऑफिसमध्येच जावे लागणार होते त्यामुळे आम्ही सर्वजण आमचा नंबर त्यात लागावा म्हणून देवाजवळ प्रार्थना करीत होतो. आज दिवसभर ऑफिस मध्ये सर्वांची तीच चर्चा चालू होती.

         माझी पत्नी देखील माझ्याच विभागात पुण्याच्या ऑफिस मध्ये कामाला होती. माझा लॅपटॉप एक आठवड्यापासून बिघडला असल्याने तिने आज गणेशला दाखवण्यासाठी ऑफिसला नेला होता. गणेश तो दुरुस्त करत होता व त्याचसंदर्भात माझ्यासोबत सकाळपासून फोनद्वारे बोलत होता. त्याने प्रयत्न करूनदेखील लॅपटॉपला झालेला प्रॉब्लेम काही दूर होत नव्हता. शेवटी त्याने मला लॅपटॉप फॉरमॅट करून पुन्हा नव्याने विंडोज इन्स्टॉल करावा लागेल असे सांगितले. यासंदर्भात अधिक जाणून घेत मी माझ्या कोणकोणत्या फाईल्सचा बॅकअप घेणे आवश्यक आहे असे त्याला सांगत होतो. ट्रेनमध्ये बसलेल्या जागेवरून त्याचा आवाज सारखा कट होत होता म्हणून मी जागेवरून उठून ट्रेनच्या दरवाज्यात उभा राहून बोलत होतो. व्हॉईस ब्रेक झाला की मी पुन्हा पुन्हा फोन लावून त्याच्याशी संवाद साधत होतो. याकारणास्तव माझी चिडचिड होत होती.

         एव्हाना या गोंधळात कर्जत स्टेशन आले होते. आता लोणावळा येईपर्यंत ट्रेन अनेक घाट व बोगद्यातून जाणार होती, त्यादरम्यान ४०-४५ मिनिटे तरी फोन पूर्णतः नॉट रिचेबल होणार होता म्हणून मी लॅपटॉप फॉरमॅट करण्याचा निर्णय गणेशला सांगून माझ्या सिटवर मित्रांसोबत येऊन बसलो. मी गणेशसोबत बोलत आहे हे सर्वांना माहिती झाले होते पण काय बोलत होतो हे माहीत नव्हते. कारण फोनला रेंज नसल्याने मी त्यांच्यापासून दूर ट्रेनच्या दरवाज्यात जाऊन बोलत होतो. पुन्हा जागेवर येऊन बसल्यावर आमच्या ग्रुपमधील एक मित्र शशी काही वेगळ्याच नजरेने पाहत मला म्हणाला की "काय प्रशांत, एकट्याची सेटिंग लावतोयस का गणेशकडे, पुण्यात प्रतिनियुक्तीसाठी". हे ऐकूण मी नाही म्हणालो व माझ्या लॅपटॉप बाबत खरे कारण सांगितले. पण त्यावेळी कोणालाच ते पटले नाही, कारण ती परिस्थितीच तशी होती. तरीदेखील मी माझ्या परीने समजावण्याचा प्रयत्न केला. तो विषय तिकडेच थांबवून त्या दिवशीचा प्रवास संपवून आम्ही सर्व आपापल्या घरी गेलो.

           घरी जाऊन पाहिले तर गणेशने माझ्या पत्नीकडे माझा लॅपटॉप दुरुस्त करून दिलेला होता. मी तो चालू करून पाहिला व माझ्या सर्व महत्वाच्या फाईल्सचा बॅकअप घेतलेला आहे हे पाहून गणेशचे आभार मानण्यासाठी त्याला फोन केला. आभार मानल्यानंतर कुतूहल म्हणून त्याने बनवलेल्या सॉफ्टवेअर विषयी विचारपूस केली. त्याने सॉफ्टवेअरबद्दल मला माहिती सांगितली व म्हणाला की आपले वरीष्ठ अधिकारी यादी बनवणार आहेत त्यामध्ये जे जे कॉम्प्युटर उत्तमरीत्या हाताळत आहेत आणि ज्यांना सॉफ्टवेअर व्यवस्थित हाताळता येईल अश्या लोकांची नावे त्यात येतील. माझे नाव त्या यादीमध्ये येवो अशी आम्ही दोघांनी अपेक्षा व्यक्त करत फोन ठेवला.

          मुंबईच्या ऑफिसमध्ये मी कॉम्पुटर व्यवस्थितरीत्या हाताळत होतो हे सर्व जाणून होते. पण इतर काही जण कॉम्पुटर येत असूनदेखिल ते लपवत होते जेणेकरून त्यांना त्यांच्या कामाव्यतिरिक्त जास्तीचे काम लागू नये. दुसऱ्या दिवशी पुण्यातून आमची यादी बनवली गेली आणि माझ्यासह काही जणांची नावे त्यात आली. मात्र त्यात माझ्या शशी या मित्राचे नाव नेमके नव्हते. झालं! शशीचा आता पक्का गैरसमज झाला की, मी माझी एकट्याची शिफारस गणेशजवळ काल ट्रेनमधून फोन करून केली आणि त्यासाठीच मी त्यांच्यापासून दूर उभे राहून गणेशसोबत बोलत होतो. मी शशीला सांगितले की मी स्वतःहून माझी शिफारस केलेली नसताना माझे नाव त्या यादीमध्ये आलेले आहे. मुळात गणेश हा देखील आमच्यासारखा ज्युनिअर होता. सदरचा प्रशासकीय निर्णय वरीष्ठ अधिकाऱ्यांनी घेतलेला होता त्यात गणेशाचा काहीच सहभाग नव्हता. त्याने सॉफ्टवेअर बनवून सादर केले होते एवढाच त्याचा तांत्रिक भाग होता. मात्र आता हे शशीला सांगून त्याला काही माझ्या बोलण्यावर विश्वास बसेना. त्याला साथ इतर ज्या लोकांची नावे त्या यादीत नाही त्या लोकांनी दिली. यामुळे शशीने मनात पक्के करून घेतले की मी फक्त स्वतःची शिफारस केली व शशीची शिफारस केली नाही.

          या प्रकारणानंतर काही दिवस त्याने मला टोमणे मारले, काहीसा नाराज झाला. मी पुण्यात आणि तो मुंबईत असल्याने बोलणेही जास्त झाले नाही. त्यानंतर एका वर्षाने रीतसर बदली करून शशीदेखील पुण्याच्या ऑफिसमध्ये रुजू झाला. पुन्हा आम्ही एकत्र जेवण करू लागलो, एकत्र फिरू लागलो, एकत्र काम करू लागलो. आधीसारखी पुन्हा आमची गट्टी जमली पण त्याला झालेला हा गैरसमज मी दूर करू शकलो नाही.

         त्यादरम्यान गणेशाची बदली मुंबई येथे झाली. त्यामुळे तो विषय लांबणीवर पडला. पुढे सर्व सुरळीत चालू असताना मी विचार केला की, एकदा गणेशला हा घडलेला प्रकार सांगून त्याने स्वतः शशीला सत्य सांगावे. त्यामुळे शाशीचा झालेला गैरसमज तरी दूर होईल. पण एक फार वाईट घटना घडली, आमचा सर्वांचा लाडका आणि प्रिय मित्र गणेश हा हार्ट अटॅक येऊन अचानक आमच्यातून निघून देवाघरी गेला. हा आम्हा सर्वांसाठी फार मोठा आघात होता. त्याला कोणतेही व्यसन, व्याधी, आजार तर नव्हताच आणि त्याचे वयदेखील कमी होते. त्याला पत्नी आणि दोन लहान मुले आहेत.

         मला आजही शशीला सांगू वाटते की या सर्व प्रकरणामध्ये माझा काही दोष किंवा लपवेपणा नव्हता. आता आम्ही तो विषय मागे टाकून पुढे आलो आहे. पण माझ्या मनात अजूनही याचे दुःख आहे की मी शशीचा झालेला गैरसमज आजपर्यंत दूर करू शकलेलो नाही. आता त्याला दुजोरा देण्यासाठी आमच्यात गणेशदेखील हयात नाही.


Rate this content
Log in

Similar marathi story from Tragedy