Prashant Bhawsar

Comedy

4.4  

Prashant Bhawsar

Comedy

लग्नातील गमतीजमती

लग्नातील गमतीजमती

4 mins
432


  लग्न म्हणजे आयुष्यातील एक महत्वाचा क्षण. सोळा संस्कारांपैकी एक संस्कार. लग्नामुळे दोन जीवांचा एक जीव होतो. आजपर्यंत पाळत असलेला "मी" पणा संपून "आम्ही" या प्रकारात दाम्पत्य मोडू लागते. लग्नानंतर नवीन जोडीदारासोबत नवीन संसाराला सुरुवात होते. त्यामुळे लग्नसोहळा फार उत्साहीपणे पार पाडला जातो. आपल्याकडे लग्न म्हणजे फक्त दोन व्यक्तींपुरते मर्यादित न राहता दोन कुटुंब, परिवार, नातेवाईक, मित्रमंडळी, शेजारीपाजार असे अगणित लोकांच्या सहभागाने होणारा भव्यदिव्य सोहळाच असतो. लग्नात रुसवे-फुगवे, मान-अपमान असे बरेच घटना चालू असतात आणि सर्व समतोल राखत लग्नविधी चालू असतात. याबरोबरच लग्नात फार गमतीजमतीदेखील घडत असतात. असो... तर आज तुम्हाला समजलेच असेल की मी लग्न याविषयी काहीतरी सांगणार आहे.

       मी आजपर्यंत फार लग्नसोहळयांना उपस्थित राहिलो. अगदी मी आईच्या पोटात असल्यापासून! काही लक्षात राहिलेल्या गमतीजमती इथे सांगत आहे.

किस्सा क्र. १ - एकदा माझ्या सचिन नावाच्या मित्राच्या लग्नाला आम्ही सर्व मित्रपरिवार गेलो होतो. नियमाप्रमाणे लग्नाची मिरवणूक चालू झाली. नवरदेव घोड्यावर बसले आणि आम्ही बँडच्या तालावर ठेका धरला. मिरवणूक जशी पुढे पुढे जात होती तसे तसे आमच्या अंगात आल्यासारखे आम्ही नाचत होतो. तासभर झाला असेल पण आमचे काही नाचून मन भरले नव्हते. तिकडे गुरुजी 'लग्नाची घटिका समीप आली, नवरदेव व नवरी यांनी मंडपात यावे' असे माईकवर बोलू लागले.

       झाले...! जे सर्वच लग्नात होते ते इथेही सुरू झाले, दोन्ही बाजूचे व्याही मंडळी 'मिरवणूक संपवा आणि लवकर लग्नमंडपात चला, मुहूर्ताची वेळ झाली' असे सांगू लागले. इकडे अजून मिरवणूक हनुमानाच्या मंदिरातदेखील पोहोचली नव्हती. उन्हाळ्याचे दिवस असल्याने भर मे महिन्याच्या कडक उन्हात आम्ही घामाघूम होऊन नाचत होतो. हा अचानक असा अडथळा आल्याने आम्ही गोंधळ घालायला चालू केला. तोपर्यंत मिरवणुकीने हनुमान मंदिर गाठले. नवरदेवाचे देवदर्शन होईपर्यंत आम्ही आजूबाजूला असलेल्या झाडांच्या सावलीत जाऊन धापा टाकत व पाण्याचे घोट रिचवत बसलो.

       नवरदेवाचे वडील, मामा आणि नवरीकडील काही पाहुणेमंडळी यांची मंदिराबाहेर काहीतरी गुपचूप चर्चा चालू झाली. आम्ही थकलो असल्याने त्यांच्याकडे आमचे काही फारसे लक्ष गेले नाही. तेवढ्यात एक पाहुणा मंडपाकडून मिरवणुकीच्या दिशेने धावत आला आणि नवरदेवाच्या वडिलांजवळ गेला. त्यांना सांगू लागला की 'गुरुजी तिकडे माईकवर बोंबलू लागले आहेत, मुहूर्त वेळ जाऊन तास झालेला आहे. नवरदेव जर येणार नसेल तर मी निघतो. मे महिना लग्नाचा सिजन असल्याने त्यांना दुपारी अजून एक लग्न लावण्यासाठी जायचे आहे.'

       त्याच्याकडे काही लक्ष न देता इकडे आमचा धिंगाणा पुन्हा चालू झाला होता. आम्ही बँडवाल्याला झिंगाट गाणे वाजवायला सांगितले. त्या पाहुण्याचे ऐकून नवरदेवाचे वडील आणि मगाशी चर्चा करत असलेले पाहुणे मंडळी नवरदेवाकडे गेले. त्यातील एकाने घोडेवाल्याच्या कानात काहीतरी सांगितले. आमची "करून दाढी... भारी परफ्यूम लावून आलोया..." ही स्टेप चालू होती. अचानक बघता बघता घोडा नवरदेवाला घेऊन जोरात पळू लागला. त्याच्या मागे नवरदेवाचे वडील व पाहुणेमंडळी जोरात मंडपाच्या दिशेने पळू लागले. आमच्या काही लक्षात येण्याच्या आतच एकट्या नवरदेवाने लग्नमंडप गाठले होते. आणि आम्ही एकमेकांची घामाजलेली तोंड बघत तिथेच उभे राहिलो.

       तिकडे तो राजकुमार एकटाच घोड्यावर स्वार होऊन आपल्या राजकुमारीकडे पोहोचला देखील होता.

किस्सा क्र. २ - आमच्या राहुल नावाच्या मित्राचे लग्न होते. मंगळाष्टका चालू होत्या. आम्ही सर्व ३०-३५ मित्रमंडळी स्टेजवरच होतो. रितीरिवाज असल्याप्रमाणे आम्ही सर्व एकमेकांना अक्षता फेकून मारत होतो. मध्येच मंगळाष्टका म्हणणाऱ्या गुरुजींच्या तोंडावरदेखील मारा होतच होता. तो सुवर्णक्षण आला, गुरुजी म्हणाले...

तदेव लग्नं सुदिनं तदेव

ताराबलं चंद्रबलं तदेव ।

विद्याबलं दैवबलं तदेव

लक्ष्मीपते तेङ्घ्रियुगं स्मरामि ॥

        आणि अंतरपाट काढला गेला. नवरा नवरी ने एकमेकांकडे पाहिले तसा रंगबेरंगी अक्षतांचा मारा त्याच्या तोंडावर झाला. त्यातून सावरून झाल्यावर गुरुजींनी दोघांच्याही हातात वरमाळा दिल्या आणि एकमेकांना घालायला सांगितले. नवरी वरमाळा घालण्यासाठी पुढे आली आणि राहुलच्या गळ्यात हार घालणार तोच आमच्यामध्ये थांबलेला प्रविण नावाचा मित्र जोरात ओरडला की, 'राहुल्या तुझ्या पहिल्या लग्नाबद्दल सगळं सांगितलंय ना' हे ऐकून मान वाकवलेला राहुल, नवरी, गुरुजी, स्टेजवरील पाहुणे आणि आम्ही सर्व मित्रांनी आधी प्रविणच्या तोंडाकडे पाहिले आणि मग सर्वांनी पुन्हा राहुलच्या तोंडाकडे पाहिले. नवरी तर हार गळ्यात न घालता हारासकट तसाच हात वर करून स्टॅचू झाल्यासारखी राहुलकडे एकटक पाहत राहिली. असेच काही क्षण गेल्यानंतर आम्ही सर्व मित्रांनी हसायला सुरुवात केली आणि राहुलची आई स्टेजवर येऊन प्रविणला एक फटका देत सर्वांना म्हणाली. 'अहो याचं काय ऐकता, हे आमच्या सोसायटीमधील कार्टून आहे.... असेच जोक करत असतो.' मग आम्ही सर्वांनी मुलीकडच्यांना खात्री देऊन पुढील विधीला सुरवात झाली. त्यानंतर आम्ही मात्र थेट जेवणाच्या हॉलकडे पळालो ते पुन्हा लग्नमंडपात दिसलोच नाही.

       असे भरपूर किस्से आहेत, सर्वच लग्नात अश्या अनेक गमतीजमती होत असतात. आपणही यासर्वांमध्ये सामील असतो. पण सर्वांनी एक लक्षात ठेवले पाहिजे की मस्करीची कुस्करी झाली नाही पाहिजे.

       "कोणीही जेवल्याशिवाय जाऊ नये ही नम्र विनंती."


Rate this content
Log in

Similar marathi story from Comedy