गारुडी
गारुडी
*गारुडी*
"माय, मलं लय भूक लागली न वं" म्हणून पोर कोकलंत होतं, तसं हौसाचं काळीज खालीवर होत होतं. पोराला खायला काहीतरी देता आलं तर द्यावं म्हणून ती घाईनं हात चालवत होती. अन् पोराच्या केकाटण्यानं आणखीच उशीर होत होता.
त्यातल्या त्यात आज सकाळ पासून पावसाची रिपरिप सुरू होती. सरीवर सरी पडत होत्या. ओलेत्या सरपणानं चुलकांडात धूर मावेनासा झाला, तेव्हा हौसाच्या डोळ्यातून देखील धारावर धारा बरसू लागल्या. तशाच अवस्थेत हौसा पोराची समजूत काढण्यासाठी म्हणत होती ----
"थांब रं माझ्या राजा, उलीसं थांब. यव्हढी भाकर भाजली की तुलाच देते बग आंदी."
"माय, सकाळधरनं तुव्ह आपलं त्येच त्ये सुरू हाय, ' थांब रं माज्या राज्या'. मह्या पोटात लई काव काव सुरू झाली वं माय"
हौसा कळवळली. पण इलाज नव्हता.
काल दिवसभर हौसा ज्वारीच्या शेतात कणसं काढण्यासाठी गेली होती. दिवसभर काढलेल्या कणसांमधून वाट्याला आलेल्या कणसांचे दाणे काढण्यासाठी तिला रात्री उशिरापर्यंत जागरण झालं होतं. दिवसभराच्या कष्टानं अंग तिंबून निघालं होतं. कणसं कुटता कुटता डोळ्यावर झापडं येत होती. एक दोनदा मोगरीचा दणका हातावर बसला तेव्हा सध्यापुरतं बस झालं म्हणून आवरतं घेत ती जागीच लवंडली होती, सकाळी लवकर उठण्यासाठी. व आज मन तृप्त झालेले होते. कणसाचा वाटा आज तिला भरपूर मिळाला होता. आता कमीत कमी चार दिवस सहज निभावणार होते त्यात.
सकाळी हौसाला जाग आली; ती ' माय मलं भूक लागली' या बाबन्याच्या आवाजानं.
हौसा काल पासूनचा घटनाक्रम आठवत होती. तेवढ्यात......
"माय म्या आत्ता यितु गं s s s" करत बबन्या बाहेर पळाला, एक हातानं नाक पुसत तर दुसऱ्या हातानं चड्डी आणखी खाली सरकू नये म्हणून सावरून धरत.
'कडाड कड कड कडाडकड' ढोलकं कडकडत होतं. सर्व गल्ली बोळातून पोरासोराचं, म्हाताऱ्या कोताऱ्यांचं लेंढार लागलं होतं. जो तो ' गारुडी आला, गारुडी आला' करत चावडीकडं पळत होता.
गावात मनोरंजनाचं तेवढं एकच साधन वर्षाकाठी असायचं.
खालच्या आळीतील गंगू आली.
"आगं हावसा, चाल ना वं माय त्या तकडं गारुडी आला म्हणत्यात". हौसाला आवाज देत गंगूनं माहिती पुरवली.
"आवं आल्ये आस्ते गं. ओण लई कामं पल्ड्यात बग". हौसानं कारण सांगितलं.
"आगं, कामं तर जलमभरच आसत्यात की. त्ये तर आपल्या पाचवीलाच पुंजल्याली आस्त्यात. कंदी बिन कामाचं कुणी ऱ्हातंय का?" गंगू....
"न्हाई. पण मलं न्हाई आवडत वं गांगुमाय त्यो गारुड्याचा खेळ. तुलं जायचं आसल तर जाय, म्या न्हाय येणार." हौसानं स्पष्ट शब्दात सांगितलं तेव्हा गंगूचा नाईलाज झाला.
"शंकऱ्या, आज कोणता खेळ करायचा रं?" गारुडी आपल्या पोराला विचारत होता.
"बाबा, आत्ताच नागुबाची नागपंचमी झालीया. नागुबाला लोक आजून ओसरली न्हाईत. तव्हा आज आपून नागुबालाच खेळवूया." शंकऱ्या...
बापासोबत लहानपणापासून खेळ पाहत , खेळ करत शंकऱ्या फिरत होता. कोणत्या वेळेला, कोणत्या लोकांना कोणता खेळ आवडतो, हे तो अनुभवावरून शिकला होता. अनुभवाची शाळाच मोठी शाळा असती ना. नाहीतर शंकऱ्याला कुठली आलीय शाळा? खेळ करण्यासाठी शाळेचं मैदान मिळालं तर तेवढाच त्याचा नि शाळेचा संबंध.
"आस्सं? तर मंग वाजीव पावा. येऊं दे नागराजाला जरा आखाड्यात." असं म्हणत गारुड्यानं ढोलकीवर थाप मारली. शंकऱ्याच्या पाव्यातून मंजूळ धून वाजू लागली. टोपलीतूनच लाल चुटूक रंगाचा नागराजा फणा काढून डोलत होता. तो डोलत होता फक्त सवयीनंच, कारण टोपलीबाहेर येऊन उत्स्फूर्तपणे नाचण्याचे त्राणच नव्हते ना. सारी मंडळी मात्र घटकाभरासाठी जीवनातील साऱ्या चिंता , क्लेश विसरून डोलत होती.
ढोलकीचा व पाव्याचा वाढत आवाज हौसाच्या कानावर पडत होता अन तसाच परत फिरत होता . कारण आवाज ऐकायला ती भानावर कुठे होती? ती सुद्धा दंग झाली होती गारुड्याचा खेळ पाहण्यात.
'गारुडी?' हो! गारुडीच नाहीतर काय? साऱ्या जन्मभर त्याच्या मनात येईल तसाच तर तो खेळवत असतो. जन्मापासून मृत्यूपर्यंत प्राणी काय करतो? का करतो? आहे कुणाला माहीत? हा गारुडीच आपल्या पाव्याच्या तालावर प्रत्येक प्राणिमात्रास नाचवत असतो, डोलवत असतो.
हौसा मनाशीच विचार करत होती आणि विचार विचारात आणखी गुरफटत होती. तिच्या जन्मापासून तिचे आयुष्य म्हणजे गारुड्या-नागराजासारखंच झालं होतं. जन्मतःच तिचे आईवडील तिला एकटीला सोडून गेले होते. मामा मामींनी सांभाळ केला. परंतु जन्मभर पांढऱ्या पायाची म्हणून मामी, मामीच काय सारा गाव तिच्याकडे तिरस्कृत नजरेनं पाहायचा. मामानेही कर्तव्य म्हणून लग्न करून दिले . लग्नानंतर दोनच वर्षानं ती धन्याला गमावून बसली. तसे तर त्याच वेळेस तिच्या जीवनात काही अर्थ उरला नव्हता, परंतु वरचा गारुडी तिला नाचवण्यासाठी एक खेळणे देऊन बसला होता, बबन्या. त्याचे वडील वारले त्यावेळेस तो एक वर्षाचाच तर होता. त्याला सांभाळण्यासाठी तरी तिला जगावे लागणार होते . ती जगतच होती, पण...
याला जगणे म्हणता येईल का? ती स्वतःशीच विचार करत होती. धड वेळेवर खायला नाही, अंग झाकायला पुरेसा कपडा नाही. याला काय जगणे म्हणायचे? हे तर केवळ मरत येत नाही म्हणून जगायचे. की हा 'त्या' गारुड्याचाच खेळ म्हणायचा?
अस्सा राग आला त्या गारुड्याचा. हौसाला क्षणभरच वाटले आत्ताच जाऊन त्या गारुड्याला जाब विचारला पाहिजे, 'काय म्हणून माझ्या जीवनाचा असा खेळ मांडलास? का?'
हौसा किती वेळ असाच विचार करत होती कुणास ठाऊक. गारुड्याचा खेळ संपला होता. गर्दी हळूहळू पांगत होती घरी आल्या बरोबर बबन्याला भुकेची आठवण झाली होती.
"माय, मलं भूक लागली वं. आजून आटपलं का न्हाय तुव्ह?" असं म्हणत बबन्या स्वयंपाक घरात डोकावला.
तव्यावर भाकर जळून कोळसा झाली होती. हातातील उंडा वाळत चालला होता. माय कसलीच हालचाल करत नव्हती. बबन्याला वाटलं, 'मायला रातच्यावाणी झोप लागली आसंल, कित्ती कित्ती काम करती ती?' असं मनाशीच म्हणत बबन्या हौसाजवळ गेला, अन...
"माय मलं लई जोरात भूक लागली न वंsssss" करत ओरडायला लागला. बबन्या रडत होता, ओरडत होता. मात्र हौसा कुठे होती? तिला तो दूरवरचा गारुडी टोपलीत घालून घेऊन गेला होता? की ती स्वतःच त्या गारुड्याला जाब विचारायला गेली होती?
खरंच! मिळाला का हौसाला जाब त्या गारुड्या कडून?
******
पंडित वराडे,
9881749224
औरंगाबाद