एका प्रेमाची दुसरी गोष्ट
एका प्रेमाची दुसरी गोष्ट
घड्याळ पाहिलं तर पाऊणे दहा वाजलेले होते. माझी पुण्याची ट्रॅव्हल्स सव्वा दहा वाजता होती आणि ट्रॅव्हल्स पॉईंटला पोचायला पंधरा मिनिटं तर लागणारच होती. आई आणि माझा भाऊ मला सोडायला येणार होते. मला आज दुपारीच पुण्यात एका इंटरव्यूह साठी फोन आलेला होता. उद्याच इंटरव्यूह असल्याने मला आज रात्रीच पुण्यासाठी निघावं लागणार होतं. तिकीट आधीच भावाने काढून दिलेलं होतं. निघण्याचीच गडबड चालू होती.
पंधरा मिनिटे आवरताना कुठे निघून गेली कळलंच नाही. दहा वाजता मला ट्रॅव्हल्स वाल्यांचा फोन आला की मॅडम गाडी आलेली आहे आणि पंधरा ते वीस मिनिटांत गाडी निघेल, लवकर पोहचा. मी माझी बॅग गाडीत नेऊन ठेवली फक्त हँड पर्स माझ्याजवळ ठेवली. "पाण्याची बॉटल घेतली का आणि तुझे सर्व कागदपत्रे पण घेतली ना नीट एकदा बघून घे काही विसरायला नको " पप्पा म्हणाले. " हो पप्पा घेतले आहेत सर्व कागदपत्रे आणि पाण्याची बॉटल पण घेतली आहे " मी म्हणाले. सर्व तयारी झाली होती निघायची पण माझ्या मनात मात्र फार भीती होती. कोणाला कळो किंवा न कळो पण माझ्या मनात काय चालू आहे हे पप्पांनी अचूक हेरलं. त्यांना नेहमीच माझ्या मनातलं सर्व न बोलता कासकाय कळतं याचंच मला फार नवल वाटे. माझ्या मनातील भिती माझ्या चेहऱ्यावर त्यांना स्पष्ट दिसत होती. ते माझ्या जवळ आले आणि डोक्यावर हात फिरवत विचारलं-
पप्पा -
काय झालं बेटा? भिती वाटतेय का?
मी - हो.
पप्पा -
काय होईल जास्तीत जास्त? पास किंवा नापास इतकच ना. एक तर नौकरी मिळेल किंवा नाही मिळणार या दोन्हीपैकीच एक होईल. या व्यतिरिक्त काय होईल दुसरं?
*"यश मिळालं तर साजरी करायचा आणि अपयश मिळालं तर तो डबल साजरी करायचा"*.
मला पप्पांच बोलणं काही व्यवस्थित समजलं नाही. माझा भाऊ पण आश्चर्याने पाहत होता की हे पप्पा काय सांगत आहेत. म्हणुन मी उत्साहाने पुढे विचारलं-
मी -
पण पप्पा अपयश का साजरी करायचा आणि तो पण डबल? उलट अपयश मिळालं तर आपल्याला वाईट वाटायला हवं ना?
पप्पा -
बेटा, आपण यश मिळालं की साजरी तर करतोच. पण अपयश यासाठी साजरी करायचा की, अपयशामुळे आपल्याला अजून नवीन गोष्टी शिकण्याची संधी मिळते, स्वतःमधे अजून चांगला बदल घडवण्याची संधी मिळते. म्हणून अपयश डबल साजरी करायचा.
मला तुझ्यावर पूर्ण विश्वास आहे. तुला नक्की यश मिळेल. नौकरी तर आज ना उद्या तुला मिळेलच. पण अपयश आलं तर खचून जाऊ नकोस. पुन्हा धैर्याने
उभी रहा.
मी पप्पांकडे पाहून गोड स्मितहास्य केलं आणि त्यांना घट्ट मिठी मारली. " थंक्यु पप्पा, तुम्ही माझी सगळी भिती दूर केलीत" मी म्हणाले.
इतक्यात मला ट्रॅव्हल्स वाल्यांचा परत एकदा कॉल आला, मॅडम किती वेळ लागेल अजून? गाडी दहा मिनिटात निघणार आहे असं त्यांनी मला निक्षून सांगितलं. मी देवाच्या पाया पडल्या. " देवा,मला यश मिळुदे " अशी देवाकडे प्रार्थना केली. देवाचा आशिर्वाद घेऊन झाल्यावर आई - पप्पांचा आशिर्वाद घेतला. नंतर मी, आई आणि भाऊ ट्रॅव्हल्स पॉइंट च्या दिशेने सुसाट निघालो. भाऊ आणि आई मला सोडून परत येणार होते.
तिथे पोचताच भावाने गाडी साईडला लावली. तिघेही बस शोधू लागलो. शेवटी बस मिळाली आणि तिघेही बस च्या दिशेने गेलो. तो माणूस मला येताना पाहताच आतून ओरडला, " काय मॅडम किती उशीर, चला आता लवकर ". मी म्हणले " झाला थोडा उशीर काका सॉरी ". मी वर चढणार इतक्यात आईने माझा हात पकडला आणि हातात हजार रुपये दिले. मी म्हणाले " आई कशाला उगाच हे पैसे? पप्पांनी दिलेले आहेत माझ्याकडे पैसे." तरीही आईने ते परत घेतले नाहीत. मला म्हणाली, " असुदे लागतील कमी जास्तीला." मी ही ते ठेवून घेतले.
खरंच कशी असते ना आईची माया. आपण या जगात आईच्या मायेची तुलना कशाशीच करू शकत नाही. कारण आईच्या प्रेमा इतकी दुसरी कोणती मौल्यवान वस्तू या जगात उपलब्ध असेल असं मला तर वाटत नाही.
मी बस मधे चढले. तिकीट चे पैसे तर आधीच दिलेले होते. त्यामुळे डायरेक्ट सीट नंबर पहिला आणि सीटवर येऊन बसले. " सांभाळून जा, नीट दे इंटरव्यूह, काळजी घे, ऑल द बेस्ट!" अश्या आई आणि भावाने दोघांनीही मला शुभेच्छा दिल्या. त्यांचा निरोप घेतला. माझी बस ही निघाली. बस निघाल्यावर दोघेही घरी परतले. माझ्या बाजूची सीट मात्र अजून रिकामीच होती. कदाचित ती व्यक्ती अजून पुढून कुठूनतरी बसेल असं मनातल्या मनात मी विचार केला. कोणी तरी मुलगी किंवा बाईमाणूसच शेजारी असावं असं मनोमन मला वाटत होतं. कोण येईल बाजूला याची मनाला हुरहुर लागून राहिली होती.
जसा जसा प्रवास पुढे जात होता तसे तसे मनात अनेक विचार येत होते. विचार करता करता एकदम आठवण झाली त्याची. कोणाकडून तरी असंच ऐकण्यात आलं होतं की, अभिला पुण्यातच नोकरी मिळाली होती. मी पण उद्या पुण्यातच जाणार होते. आमचं नातं संपून जवळपास चार वर्षे झाली होती. त्याच्या बद्दल माझ्या मनात आजही प्रचंड राग होता आणि तो राग कधीच संपणार ही नव्हता. मनोमन देवाकडे प्रार्थना केली की "देवा, मला उद्या तो चुकूनही नजरेस पडू नये,फक्त उद्याच काय कधीच नजरेस पडू नये". पण नंतर मला स्वतःवरच हसू आलं की, इतक्या मोठ्या शहरात , इतक्या लोकांत, तो का माझ्या नजरेस पडेल?
गाडी स्टॉप वर थांबली की मी खिडकीबाहेर कुतुहूलाने पाहू लागले की माझ्या शेजारी कोण येईल?
(क्रमशः)
