एक वर्ष!
एक वर्ष!
तसं तर त्याने अख्ख वर्ष लोळतच वाया घालवल. पुढच्या वर्षीच्या न्यू इयर पासून आपण अगदी इमानेइतबारे काम करायचं, जेवण बनवायचं, धान्याचा साठा करायचा असं ठरवलं. पण पुढचं वर्ष अख्ख्या जगाला एका वेगळ्याच संकटात घेऊन जाणार होत. त्या संकटाने नुसता हाहाकार केला होता. पण याच्या छोट्याशा गावाला त्याचा अजून पत्ता नव्हता. पण एके रात्री अख्ख गावच्या गाव दुसऱ्या ठिकाणी स्थलांतरित झालं. आणि याला साधं कोणी विचारायला ही आलं नाही. तशीही याची कोणी दखल घ्यावी इतकं ही याला कोणाच्याही आयुष्यात महत्व नव्हतं. त्यामुळे जो तो आपापला विचार करून दुसऱ्या ठिकाणी स्थलांतरित झाला.
हा पठ्ठ्या एके दिवशी सकाळी उठला,त्याने स्वतःच आवरलं आणि हा घराबाहेर काम शोधायला पडला. आणि अख्ख्या गावात शुकशुकाट पाहून गोंधळला. हा काय प्रकार आहे? गावातले सगळे गेले कुठे? आणि मला कसं कळलं नाही? तो त्याच्या ओळखीतल्या लोकांना हाक मारायला लागला. पण ओ द्यायला तिथे होतं कोण? शेवटी घामाघूम होऊन हा एके ठिकाणी फतकल मारून बसला. ज्या गावासाठी त्याने काडीचही काही केलं नव्हतं त्या गावातल्यानीही त्याला,त्याचं अस्तित्वही न मानता सरळ त्याला एकट टाकून दिलं.
आयुष्यात पहिल्यांदा त्याला दुःख या गोष्टीची जाणीव झाली. आयुष्यात पहिल्यांदा त्याला आता काय करायचं? असा प्रश्न पडला.आणि त्या प्रश्नाचं उत्तर शोधण्यातच त्याचा अर्धा महिना गेला. शेवटी आपण काहीतरी प्रयत्न करायला हवा, हे इतकंच उत्तर त्याच्या मनात आलं. आणि तो हातात कुऱ्हाड घेऊन त्याच्या घराच्या अंगणात आला. त्याने सभोवार पाहिलं. आणि अख्ख आंगण खणायला घेतलं. ते पार संध्याकाळ होईस्तोवर तो खणतच राहिला. शेवटी सगळीकडे काळोख झाल्यावर तो थांबला आणि आहे त्याच जागी झोपी गेला. दुसऱ्या दिवशी त्याला सुर्योदर्यपूर्वीच जाग आली. त्याने पटापट स्वतःच आवरलं,जवळ होतं त्यातलं खाल्लं आणि तो त्याच्या अंगणात आला. आता या खणलेल्या ठिकाणी करायचं काय? हा प्रश्न त्याला पडला. तितक्यात त्याला आठवलं की गेल्या वर्षी त्याच्या आळशीपणा मुळे बरचसं बियाणं त्याच्या कडे असंच पडलं होतं.
तो पटकन आत गेला आणि अडगळीतून त्याने ते बियाणांचं पाकीट शोधून काढलं आणि त्या खणलेल्या जागी टाकायला सुरुवात केली. असं करत करत त्याने अख्ख्या गावात ते बियाणं पेरलं. आणि पाऊस येण्याची वाट पहात बसला. त्यांच्या गावात एकंदरीतच पाण्याची वानवा होती. पण यावर्षी पावसाने उत्तम साथ दिली. आणि यानेही भरपूर मेहनत घेऊन पूर्ण गावात झाडं, पिकं आणि हिरवळीचा नुसता बहर आणला. आणि ज्या गावात प्यायच्या पाण्याचीही सोय नव्हती,तिथे याने जागो जागी ओहोळ, छोटे कालवे खणले. आणि त्या गावाचा पूर्ण कायापालट केला. वर्षभराने जेव्हा लोकं आपल्या गावी परतले तेव्हा हा सगळा बदल पाहून त्यांना आश्चर्य वाटलं. आणि हे सगळं कसं घडलं असं ते बोलायला लागले. आणि सवयीप्रमाणे हा आपल्या घराच्या अंगणात काम करू लागला. आणि हे सगळं याच्यामुळे झालं आहे हे पाहून लोकांनी आनंदाने टाळ्या वाजवायला सुरुवात केली.
