STORYMIRROR

Mita Nanwatkar

Abstract Tragedy Crime

3  

Mita Nanwatkar

Abstract Tragedy Crime

एक शून्य शून्य

एक शून्य शून्य

2 mins
144

बाहेर मध्यरात्रीचा शांत प्रहर... केवळ रातकिड्यांचा किर्र किर्र आवाज....रातराणीचा पसरलेला कोवळा गंध.....पूर्ण फुल होण्यासाठी अधीर,आतुर झालेली गुलाबाची कळी लपेटलेली निर्धास्त वसुंधरा.... ताऱ्यांच्या स्वर्गीय सहवासात विसावलेले गगन..... पौर्णिमेच्या चांदव्यात न्हावून नि:स्तब्ध झालेल्या निळाशार जलधारा.... आपापल्या घरट्यात निपचीत पडलेले रानपाखरं.....वाऱ्याच्या मंद झोक्यावर डुलक्या घेत असलेल्या तरूवेली आणि आत दिवसभर अविश्रांत कष्टानंतर झोपेच्या घट्ट मिठीत सुखावलेले निद्रीस्त देह..स्वप्न तंद्रीत निरागस बालमुखावर पसरलेलं मंद मंद हसू......खिडकी अन् दरवाज्यांच्या कवडस्यातून डोकावणारी झुळूक......आणि हे सर्व न्याहाळत भवितव्याची आखीव-रेखीव रांगोळी डायरीवर काढत मग्न असलेली शशी.......अचानक घाबरून उठली......कारण होते बाहेर ऐकू आलेली एक प्राणांतिक किंचाळी....ती क्षणाचाही विलंब न करता दाराकडे धावली.हळूच दार उघडून बघता तिला धक्काच बसला.

शेजारची मंदा "मारू नका.. मारू नका" म्हणून आपल्या व्यसनी नवऱ्याकडे विनवणी करत स्वतःची सुटका करून घेवू पाहत होती.काहीजण रोजचंच म्हणून आपल्या घरात निघून गेलेले...काही बघ्याची भुमिका घेवून फक्त उभे राहिलेले... आणि काहीजण सोडवायचा प्रयत्न करून थकलेले.... तो ऐकतच नव्हता.... बेभान... बेफिकीर होवून हाती गवसेल त्याने तिला मारत होता.शशीच्या मनात रागाची लाट उसळली.... आणि सोबतच कधीच न बघितलेला भयावह प्रसंग पाहून ती भीतीने थोडीशी शहारली सुद्धा... पण बाकी काहीही विचार न करता,प्रसंगावधान राहून तिने डायल केला 100.सर्व हकीकत फोनवर सांगितली. तीन किलोमीटर अंतरावरील पोलिस दहा मिनिटात तेथे पोहोचले.गाडीत बसवून त्याला घेवून गेले.रात्रभर पोलिस ठाण्यात ठेवून नंतर व्यसनमुक्ती केंद्रात पाठविण्यात आले.मंदा शेतातील छोटीमोठी कामं करून आपला उदरनिर्वाह चालवू लागली.दोन महिन्यानंतर तो परतला.त्याने सर्वप्रथम मंदाची माफी मागितली आणि त्यानंतर शशीचे हात जोडून धन्यवाद मानले.मंदाला पुन्हा सुखाने संसार करताना पाहून शशीच्या मुखावरही आनंदघन बरसले.गोष्ट इवलीशी पण 1 0 0 ची महिमा सांगणारी,भावार्थाने जपणारी,बोधप्रद शेवटाने प्रासंगिक निर्णयांची गरज आणि धाडस करण्याचे महत्त्व विशद करणारी आहे.100 म्हणजे पोलिसांनी जनसामान्यांच्या कायदेशीर मदतीसाठी उपलब्ध करून दिलेली दूरध्वनी सेवा... ज्याचा उपभोग घेणे आपला हक्क आणि कर्तव्य सुद्धा आहे.

पोलिसांचे समाजोपयोगी कार्य सर्वज्ञात आहे.विशेषत: या कोरोना काळात त्यांच्या नि:स्पृह, निर्विकल्प मनाचा मोठेपणा आणि कर्तव्यदक्षता यांचा अनुभव आपण घेतलाच आहे.मग जिथे मानवी प्रयत्न अपुरे ठरताना.... कुप्रवृत्तीचे विळखे भोळ्याभाबड्या जनतेवर पडताना...आईबहिणींच्या अब्रूची लक्तरे वेशीवर टांगताना..... भ्रष्टाचाराची ठिणगी मानवी मन जाळताना....अंधश्रद्धेचा फसवणुकीचा पडदा घरे लुटताना जेंव्हा दिसतात तेंव्हा उघड्या डोळ्यांनी न बघता त्वरित निर्णय घेवून जागरूक नागरिकत्वाची स्निग्धता मनात जपायला काय हरकत आहे....कदाचित याच एका कृतीमुळे कुणाच्या आयुष्याचे उजाड माळरान नंदनवन होण्यास मदत होईल. 'पुढच्यास ठेच मागचा शहाणा' या उक्तीप्रमाणे पुढचे हजार गुन्हे काळाच्या पडद्याआड होतील. संवेदनशीलता अन् कार्यरत वृत्तीचे कौतुक होत जाईल आणि अंत

ठाऊक नसलेल्या या जीवनप्रवासात समाधानरुपी सौख्यक्षणांचे ठसे उमटलेले पाहताना ओठांवर अनुभवांच सुंदर पर्वच साजरं होत राहील.हो ना......बघा विचार करून.....


Rate this content
Log in

Similar marathi story from Abstract