एक मत
एक मत


आज रामराव खुपच चिंताग्रस्त होऊन बसला होता. कोणत्याही कामात त्याचे मन लागत नव्हते. त्याला शेतातील पिकाची काळजी लागली होती. त्याला आपल्या सर्जा आणि राजा या दोन बैलाची काळजी लागली होती. नव्हे त्याला परिवारातील सर्वांची काळजी लागली होती. कारण पावसाळा सुरु होऊन महिन्याचा काळ संपला होता तरी मनासारखा पाऊस अजुन तरी पडला नव्हता. थोड्या पावसाने रामरावने शेती पेरली होती. पीके ही जोमाने लहरत होती. पिकांची वाढ चांगली झाली होती मात्र पिकांना कसदार फळे येण्यासाठी पाण्याची खरी गरज होती. आभाळात रोजच काळे ढग येत होते मात्र पावसाचा एक ही थेंब जमिनीवर पडत नव्हता. हवामान खात्याकडून सांगितले जायचे तुरळक ठिकाणी पाऊस पडणार ! पण पाऊस कुठे पडला हे ऐकण्यात सुध्दा येत नव्हते. असे म्हटले जाते की श्रावण महिन्यात खुप पाऊस पडतो, एक दोन दिवस मुसळधार पडतो. म्हणून रामरावला श्रावण महिन्यावर पूर्ण भरोसा होता. पण या महिन्यात पाऊस तर सोडा उन्हाळ्यासारखे कडक उन पडू लागले. पीके करपू लागली तशी अजुन काळजी वाटू लागली. यावर्षी रामरावने आपल्या बायकोच्या अंगावरील घरातील सोने गहाण ठेवून बियाणे आणि औषधी खरेदी केले होते. त्याची वेगळी काळजी त्याला खात होती. आत्ता काय करावे ? रोज त्याला प्रश्न पडत होता. शेतात जात होता माना खाली टाकलेल्या पिकांना पाहून त्याचे मन हेलावून जात होते. देवाला करुण अंतःकरणाने हाक मारीत होता ' देवा एक दिवस पाऊस म्हणून येऊन जा '. पोळ्याचे दिवस जवळ येत होते. श्रावणातील नागपंचमी आणि रक्षाबंधन सण असे तसेच साजरे झाले. घरात स्मशान शांतता होती. यावर्षी पोळ्याला सर्जा-राजा ला रंग लावण्यास देखील रामरावची हिम्मत होत नव्हती. बैलाला सजवावे असे मन मानत नव्हते. यावर्षी पोळ्यावर दुष्काळाचे सावट असल्याचे बातम्या देखील वृतमानपत्रातून झळकले. बातमी वाचून रामरावच्या डोळ्यात पाणी आले. यावर्षी पीके आपल्या हातून जाणार हे नक्की होते. त्यादिवशी रामराव असाच रेडियो ऐकत बसला होता की आकाशवाणीवरुन एक सूचना देण्यात आली. पुढील दोन दिवसांत मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे, तरी नागरिकांनी काळजी घ्यावी. ही बातमी ऐकून रामरावला आनंद ही वाटले आणि दुःखही कारण हवामान खात्याचा अंदाज म्हणजे रामभरोसे असते. पण यावेळी तसे झाले नाही.
दुसऱ्या दिवशी सकाळी आकाशात काळे ढग जमा झाले. सूर्यदर्शन झाले नाही. भरपूर पाऊस पडणार अशी एकदंरीत परिस्थिती होती. मात्र एक ही थेंब न पडता दिवस संपला. परत एकदा हवामान खात्यावरचा रामरावचा पूर्ण विश्वास उडाला होता. चार दिवसावर पोळ्याचा सण होता. देवाने रामरावची आर्त हाक ऐकली होती म्हणून आकाशवाणीच्या तिसऱ्या दिवशी सकाळ पासून जे पावसाला सुरुवात झाली ते दुसऱ्या दिवशी सकाळपर्यंत चालूच होती. पाऊस पडताना पाहून रामरावला खुप आनंद होत होता. या पावसाने सर्वांचे प्रश्न सोडविले होते. शेतातील पीके वाचली होती. सर्व खड्यात पाणी जमा झाले त्यामुळे जनावरांच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न मिटला होता. नदी नाले तुडूंब झाली त्यामुळे माणसासाठी लागणाऱ्या पाण्याचा प्रश्न देखील संपला होता. रामरावचे नाही तर समाजातील सर्वांचे प्रश्न या एका पावसाने संपविले. म्हणून रामराव आजच्या पोळ्याला आपल्या सर्जा आणि राजा बैलाला खुप सजवून वाजत गाजत नाचत नाचत पोळा सण साजरा केला. पाऊस उशिरा पडला मात्र वेळेवर पडला म्हणून त्यावर्षी रामरावला शेतातून चांगले उत्पादन मिळाले. आपल्या बायकोचे दागिने देखील त्याने सोडवून घेतले. त्याला कशाचीही काळजी नव्हती. गावात ग्रामपंचायतीचे वारे वाहत होते. सरपंच पदाच्या निवडणुकीसाठी थेट मतदान पद्धतीने मतदान होणार होते. त्यामुळे रामराव पाटलाचे मित्र त्यांना या निवडणुकीसाठी उभे राहण्याची मागणी लावून धरली. सर्वांच्या मागणीला मान देऊन रामरावांनी निवडणुकीमध्ये भाग घेतला. तसे तर त्यांना निवडणुकीत हिरीरीने सहभाग घेत असत. निवडणुकीचा धुरळा सुरू झाला. शेतातील सर्व कामे बाजूला करून रामराव पूर्ण वेळ निवडणुकीमध्ये वेळ देऊ लागले. ऐन पेरणीच्या दिवसांत ही निवडणूक आली होती. रामराव दिवसभर निवडणुकीच्या प्रचारात फिरत राहिले आणि शेताच्या कामाकडे साफ दुर्लक्ष झाले. आपणच विजयी होऊ आणि गावाचे सरपंच देखील आपणच होऊ असा त्यांना विश्वास होता. महिनाभर चाललेली निवडणूक प्रक्रिया एकदाची संपली. या काळात शेत ओसाड पडले होते. दुसऱ्या दिवशी तालुक्याच्या ठिकाणी निवडणुकीचा निकाल होता. सुरुवातीला एका एका वार्ड च्या सदस्यांचे निकाल लागत होते. विजयी उमेदवार 'डोल ताशांच्या गजरात गुलाल उधळत होता तर हरलेला उमेदवार खाली मान घालून गायब होत होता. शेवटी सरपंच पदाची मतमोजणी चालू झाली. एक एक फेरी पूर्ण होत होती तशी रामरावांच्या मनात धाकधूक चालू झाली. एकूण चार फेऱ्या होणार होत्या. तिसऱ्या फेरीत रामराव फक्त 60 मतांनी मागे होते. आपला विजय नक्की असे त्यांना वाटत होते. पण चौथ्या फेरीनंतर निकाल घोषित करण्यात आला तेंव्हा रामरावांचा फक्त एका मतांनी पराभव झाले होते. हाता तोंडाशी आलेला विजय निसटून गेला होता. त्यामुळे खूपच नाराज होऊन रामराव आणि त्यांचे मित्र निवडणूक हरल्याच्या दुःखात धाब्यावर जाऊन दारू पीत बसले. रात्री उशिरा घरी परतले. निवडणूक हरल्याची बोच त्याच्या मनाला लागली होती. म्हणून तो रोज सायंकाळी दारू पिऊ लागला. शेताची तर पुरी वाट लागली होती. जवळचे पैसे संपले म्हणून परत एकदा बायकोचे दागिने गहाण ठेवण्याची वेळ आली. यावेळी बायकोने मात्र दागिने देण्यास नकार दिला त्यावेळी दोघांचे खूप मोठे भांडण झाले. ती आपल्या लेकरांना घेऊन माहेरी निघून गेली. इकडे रामरावांची अवस्था दिवसेंदिवस बिघडत चालली होती. एके दिवशी दारू पिऊन घरी परत येतांना रस्त्यात अपघात झाला आणि त्यात रामराव जागेवरच खल्लास झाले. या निवडणुकीमुळे माझ्या नवऱ्याचा जीव गेला म्हणून रामरावांची बायको दरवेळी शिव्याशाप तर देतेच शिवाय ती कधीही मतदान करायला देखील जात नाही. आज मुलाचे नाव मतदान यादीत आले होते आणि त्याला मतदान करण्यास त्याची आई विरोध करत होती. पण मुलाने आईला मतदानाचे महत्व समजावून सांगितले की, त्यावेळी जर एकाने बाबांना मतदान केले असते तर बाबा विजयी झाले असते. निवडणुकीत एक एक मतदान अत्यंत मोलाचे आहे. त्यामुळे चल आपण मतदान करू असे म्हणून ते दोघे मतदान केंद्राकडे रवाना झाले.