Pandit Warade

Tragedy

3  

Pandit Warade

Tragedy

एक होती कांचन-४

एक होती कांचन-४

4 mins
192


  पंकज! नावाप्रमाणेच पंकज होता. चिखलातून उगवलेल्या कमळा सारखा. एकदम गरीब अशा कुटुंबात जन्मलेला. परिस्थिती हलाखीची होती. परंतु कुटुंबातील सर्वजण एकमेकांवर खूप माया करीत असत. घरातील संस्कार चांगले. भाऊ थोडे फार शिकलेले, शिक्षणाची आवड असलेले. परंतु परिस्थितीमुळं जास्त न शिकलेले. अशा संस्कारित वातावरणात त्याला शाळे विषयी आकर्षण वाटलं नसतं तरच नवल.


  वयाच्या पाचव्या वर्षी तो शाळेत जायला लागला. पहिल्या वर्गातच त्यानं त्याचं बुद्धी कौशल्य दाखविलं. वर्गात प्रथम क्रमांकानं पास झाला. त्यामुळं पुढील वर्षांपासून त्याला शाळेतून पाटी, पेन्सिल, पुस्तकं इत्यादी साहित्य मोफत मिळू लागलं.


   चौथ्या इयत्तेपर्यंत त्याचं शिक्षण व्यवस्थितपणे सुरू होतं. नंतर मात्र त्याला शिक्षण घेणं कठीण झालं. लागोपाठ दोन वर्षे भयंकर दुष्काळ पडला. प्यायला पाणी नाही, खायला धान्य नाही. सर्वत्र हा:हा:कार मजला. माणूस नातं ओळखेनासा झाला. भाकरीची चोरी होऊ लागली. भाकरीच्या तुकड्यांसाठी आपापसात भांडणं होऊ लागली. गावातील नावाजलेले, पंचक्रोशीत प्रसिद्ध असलेले श्रीमंत, धनवान सुद्धा सरकारनं सुरू केलेल्या रोजगार हमी योजनेच्या कामावर खड्डे खोदायला जाऊ लागले. कामावर मिळणार सुकडी खाऊ लागले. त्यासाठी सुद्धा गडबड गोंधळ व्हायचाच. अशा बिकट परिस्थितीत पंकजला शिक्षण घेणं कठीण होऊन बसलं. पण म्हणतात ना, इच्छा असेल तर मार्ग आपोआप सुचतो. 


  अशा कठीण परिस्थितीत शिक्षण घेणं शक्य नाही म्हणून शिक्षण सोडून कामावर जावं असाही विचार पुढं आला. पण त्याच्या शिक्षणाचं काय? शिक्षणाची तर खूप इच्छा होती त्याला. त्याच्या इच्छे विरुद्ध शिक्षण बंद केल्यास त्या बालमनावर काय परिणाम होतील?, यावर सुद्धा चर्चा झाली.


  पंकजला जेव्हा कळलं की, त्याचं शिक्षण बंद करण्या विषयी घरात चर्चा सुरू आहे, तेव्हा तो खूप नाराज झाला. काय करावं कळेनासं झालं. अन् त्याला काळे गुरुजींची आठवण झाली. तो धावत पळतच गुरुजींकडे गेला. 


  गुरुजींनी त्याची सर्व सत् परीस्थिती समजून घेतली. त्याचा स्वभाव न दुखावता मदत कशी करता येईल? यावर खूप विचार केला. आणि मदतीचा हात पुढं केला. 


  गुरुजी अविवाहित होते.त्यामुळं एकटेच रहात होते. त्यांच्या साठी धुणं भांडी वगैरे करायला कुणी मोलकरणीही नव्हती. एक दोन वेळेस दुसऱ्या शिक्षकांनी मोलकरणी विषयी सांगून बघितलं. परंतु ....


  "अहो, मी एकटा जीव सदाशीव. माझं काय विंचवाचं बिऱ्हाड पाठीवर. काम आहे तरी काय माझ्याकडे करण्यासारखं? आपण मुलांना वर्गात स्वावलंबना बद्दल शिकवतो अन् आपणच जर स्वावलंबी नसलो तर काय अर्थ आहे त्या शिकवण्याचा? विद्यार्थ्यां समोर आदर्श तो काय राहणार अशानं?" ते समोरच्या शिक्षकाला गप्प बसवत असत. 


  तर अशा या तत्वनिष्ठ काळे गुरुजींनी घरच्या कामा साठी पंकजला कामावर ठेवलं. याचं सर्वांनाच नवल वाटलं. 


  "अहो, कुठं गेलं तुमचं ते तत्व? की थकलात एवढ्यातच?" दुसऱ्या एका शिक्षकाचा खोचक प्रश्न. 


   "हे बघा मिस्टर पाटील, मी अद्याप थकलोही नाही आणि माझं तत्व देखील विसरलो नाही. हा देखील एक तत्वाचाच भाग आहे." 


  "हो. हे बरं आहे. तत्वाच्या बाता मारायच्या आणि स्वतःसाठी सोयी प्रमाणं बदल करायचा. व्वा! गुरू व्वा." 


   "अहो, सर तुम्ही त्या मुलाला अद्याप पूर्णपणे ओळखलंच नाही. फार हळव्या मनाचा आहे तो. त्याच्या बिकट परिस्थिती कडे बघून जर कुणी फुकटची मदत केली असती तर ती त्याला कदापिही रुचली नसती. म्हणून मी हा मार्ग काढला. आता त्याला कुठल्याही प्रकारे संकोच वाटणार नाही. उलट पक्षी त्याच आत्मबल वाढेल. मी स्वतःच्या कष्टानं जगतो, स्वतः काही तरी करू शकतो, याची त्याला जाणीव होईल. मला वाटतं, हा देखील एक शिक्षणाचाच एक भाग आहे. केवळ पुस्तकी ज्ञान शिकवणं म्हणजे शिक्षकाचं काम नव्हे. तर आपल्याला विद्यार्थी घडवायचा असतो. त्याला परिपूर्ण असा माणूस बनवायचं असतं. हेच तर शिक्षकाचं आद्य कर्तव्य ठरतं. 'कठोर परिश्रमा शिवाय पर्याय नाही.' हे प्रत्येक विद्यार्थ्याच्या बालमनावर ठसवायला पाहिजे. विद्यार्थ्यांचं बाल मन हे कुंभाराच्या मातीच्या ओल्या गोळ्या प्रमाणं असतं. त्या मातीच्या गोळ्याला केवळ मातीचा गोळा न राहू देता त्याचं सुंदर मडक्यात रूपांतर करणं हेच कुंभाराचं काम असतं. तद्वतच शिक्षक सुद्धा एक प्रकारचा कुंभारच असतो."


  "सर, मला क्षमा करा. मी आपला हेतू समजून न घेता चेष्टेनं बोललो. पण आज माझे डोळे उघडले. आपण फक्त विद्यार्थ्यांनाच शिकविण्याचं कार्य करत नसून आम्हाला सुद्धा डोळे आणि मनाची दारं उघडी ठेऊन शिकायला सांगितलं. सर, मला खात्री आहे, आपण पंकजला परिपूर्ण माणूस बनवूनच सोडणार." पाटील सरांना गहिवरून आलं होतं. खरंच होतं ते. गुरुजींचा संदेश खरोखरंच प्रत्येक शिक्षकानं आचरणात आणावा असाच होता. 


  गुरुजींनी आधार दिल्यामुळं पंकजच्या शिक्षणाची सोय लागली. कुटुंबालाही आर्थिक मदत मिळू लागली. 


  लागोपाठ तिसऱ्या वर्षीही पावसानं दडी मारली. सर्वांच्या तोंडचं पाणी पळालं. प्रत्येक जण आपल्या टीचभर पोटाची खळगी भरण्यासाठी हाडाची काडं करत होता. ज्याला जिकडे जमेल तिकडे स्वतःची सोय लावून घेत होता. पंकजचे दोन्ही भाऊ घरातून विभक्त होऊन आपापलं बिऱ्हाड घेऊन कामानिमित्त परगावी निघून गेले. 


  इकडे पंकज आईला घेऊन राहू लागला. आता त्याला स्वतःच्या शिक्षणा सोबतच म्हाताऱ्या आईचाही सांभाळ करायचा होता. एवढ्या थोड्या पैशात दोघांचं भागणार नव्हतं. त्यानं काळे सरांच्या मदतीनं पाटील सरांकडेही पाणी भरण्याचं काम स्विकारलं. दुष्काळामुळं पाणी टंचाई सर्वांनाच जाणवत होती. दोन मैलाचा अंतरावरून पाणी आणावं लागत होतं. पंकज पाटील सरांकडे दहा घागरी अन् काळे सरांकडे पाच घागरी पाणी भरू लागला. घरी सुद्धा दोन तीन घागरी पाणी आणावं लागत होतं. त्याच्या परिस्थिती कडे बघून काळे सरांचा डोळ्या समोर ठेवून पाटील सरांनी पंकजच्या आईला स्वयंपाक अन् धुण्या-भांड्याचं काम दिलं.


  आता दोघंही स्वकमाईचं खत होते. स्वकष्टाच्या कमाई मधून पंकजचं शिक्षण सुरू होतं. आईला काम करावं लागतं म्हणून त्याला खुप वाईट वाटत होतं. परंतु काम करण्यासाठी आई हट्ट धरून बसली होती. म्हणून त्याचा नाईलाज झाला होता. शाळा सुरू झाल्या अन् इज दिवस काळे सर आणि पाटील सरांच्या बदलीचे आदेश आले.


   पंकजचे दोन्ही आधारस्तंभ हिरावले जात होते. काळे सर जाणार म्हणून पंकजला खूप वाईट वाटत होतं. त्यांना निरोप देतांना खूप रडला होता तो. काळे गुरुजींनी जातांना त्याला चार धीराच्या गोष्टी सांगितल्या आलेल्या प्रसंगाला समर्थपणे सामोरे जाण्याची प्रेरणा दिली. 


   आवक बंद झाली. काम धंदा बंद झाला. म्हणून गिरीजाबाईंनी पंकजला घेऊन माहेरचा रस्ता धरला. 


Rate this content
Log in

Similar marathi story from Tragedy