दुष्काळ समस्या
दुष्काळ समस्या


"काय झाले रे रामा? असा उदास का दिसतोय? आणि ह्या वखताला कुठं निघालास?" असे आपल्या तंद्रीत चालणाऱ्या रामाला गणपाने हटकले.
राम भानावर आला. "काही नाही रे. पण काय सांगू? आज आपली सर्वांचीच तीच परिस्थिती आहे. कुणी कुणाला आसरा द्यायचा आणि कुणी मदत करायची काही कळेनासे झाले बघ. सगळे धान्य बाराच्या भावात गेले ना रे? ह्या वर्षाला पावसाने जाम वाट लावलीय. पंधरा दिवस पाऊस थांबला असता तर हाताला चार पैसे लागले असते. कर्जाचे हप्ते भरले असते. पोरांना चार घास खायला मिळाले असते. पण कुठचं काय, सगंळ पाण्यात बुडाले. हाता तोंडाशी आलेला घास दैवाने नेला रे. आता कसं निस्तरायचं काही कळेना.."
तेव्हा गणपा बोलला "ही काय तुझीच गोष्ट हाय लेका? ही समद्यांनचीच परिस्थिती आहे. अति वृष्टीने सारा धुमाकुळ घातलाय. दैव गती म्हणायची. अशा दुष्काळ स्थितीत सरकारने लक्ष घालायला पाहिजे, पण तिथे ते नेते लोक आपसात खुर्चीपायी वाद करत पडलेत आणि सरकार कडून काही मिळायची आशा नाही. अशा दुष्काळाची झळ श्रीमंतांना नाही लागत बाबा. त्यांच्याकडे अमाप पैका असतो. त्रास फक्त आपल्या सारख्या शेतकऱ्यांना आणि दुसऱ्या गरीब लोकांना."
" खरं आहे गणपा तुझे. जास्त पाऊस आला तर पिकांच्या नासाडीने त्रास तर सुरुवातीला पाऊस नाही म्हणून सुक्या दूष्काळाने ग्रासलेले. शेवटी काय ओला दुष्काळ आणि सुका दुष्काळ त्याची झळ आम्हा शेतकऱ्यांनाच सोसावी लागते."
"आता सगळ्या पिकांची नासाडी झाली. कांदे, कापूस, द्राक्ष, तांदुळ, फळं, भाज्या आणि काय काय. शेवटी महागाई वाढेल आणि ह्या सगळ्यांचे चटके आम्हा शेतकऱ्यांना आणि सामान्य गरीब जनतेला सोसावे लागतील. सगळ्या वस्तुचे भाव कडाडले आणि अजून ही वाढतील. आपल्या गरजा फार कमी आहेत रे.
आपले खर्च मोजकेच असतात. आपल्या मुलांचे हट्ट ही नसतातच. बाकीच्या पोरांपेक्षा त्यांच्या जुजबी मागण्या, पण त्या सुध्दा आपण पुऱ्या करू शकत नाही ह्याचे फार दुःख वाटते."
"रामा, लक्षात ठेव, ह्या दुष्काळ समस्या सगळ्यांच्याच आहेत. आपण राब राब राबतो शिवारात. अख्खं कुटुंब बी आमच्या संगतीला काम करतं. आता नशिबाला दोष देऊन काही होणार नाही. आता ह्यावर काय तोडगा काढायचा? ह्या सर्वांच्या समस्या कशा सोडवायच्या ते त्या परमेश्वराला माहित. पण एक सांगतो, कठीण परिस्थितीचा धीराने सामना करायचा. मुळीच हताश व्हायचे नाही. आत्महत्या मुळीच करायची नाही. तू जाशील रे मरून, पण मग आपल्या बायका पोरांचा विचार करायला हवा. त्यांना आणखी त्रासात टाकायचे नाही. फक्त सकारात्मक विचार कर. काही तरी नक्की चांगलं होईल ह्याचाच विचार करू. देव सरकारला ही लवकर चांगली बुध्दी देवो आणि आम्हाला काही तरी मदत लवकर मिळो अशी मनात इच्छा बाळगू. चल आता दोघं बी घरी जाऊ." असे एकमेकांची समजूत काढत, आशेच्या किरणाची वाट पाहत दोघे घरी निघाले.
देवा ह्या जगत पोशिंद्यांचा जरा विचार कर.
त्यांच्या दुष्काळ समस्येचा थोडा तरी भार कमी कर ही कळकळीची विनवणी. आपल्या देशाला पोसणाऱ्या शिवार राजाला दुष्काळा पासून वाचव रे देवा.